दिगंत - ६

Submitted by सांज on 20 March, 2021 - 13:21

दुसर्‍या दिवशी सूर्योदया पूर्वीच त्यांनी हॉटेल सोडलं. मार्चचे दिवस असल्याने हवेत तितकासा गारवाही नव्हता. आणि गूगल मुळे कुठे कोणाला रस्ता विचारत बसण्याचीही आवश्यकता नव्हती. हुबळी पासून पूर्वेकडे 167 किमी वर हम्पी आहे. 3-4 तासांचा प्रवास. रिया ड्रायविंग सीट वर बसली होती. हुबळीहून निघून हायवे लागेपर्यंत रस्ता थोडाफार खराब होता. ती अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत होती. अजून उजाडलं नसल्याने रस्त्यावर बर्‍यापैकी अंधार होता.

“रिया, आपण निघालोय खर्‍या. पण व्हॉट इज धिस हम्पी ऑल अबाऊट?” संहिता उत्सुकतेने म्हणाली.

“हम्पी.. खूप मोठा इतिहास आहे या ठिकाणाचा. रामायणा मधली किष्किंधा नगरी ती हीच. सुग्रीव आणि वाली चं राज्य. श्रीराम आणि हनुमानाची प्रथम भेट इथेच झाली. त्यानंतर मध्ययुगात हरिहर आणि बुक्क राय या दोन संगम वंशीय भावांनी मिळून इथे विजयनगर साम्राज्य उभं केलं. ते जवळपास तीन शतकं टिकलं. विजयनगर त्याच्या भरभराटीच्या उच्चांकावर असताना जगातलं बीजिंग नंतरचं सर्वात मोठं शहर होतं. तिथलं आर्किटेक्चर, जॉग्रफी सगळंच खूप वेगळंए नि अद्भूत आहे. 1986 मध्ये हम्पीला यूनेस्को साइट चा दर्जा मिळालाय. मी इतके दिवस फक्त वाचत आलेय या सगळ्या विषयी. पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे आता.” रिया म्हणाली.

“हम्म.. हिस्टरी ऑप्शनल हं? ग्रेट.. पहायला हवं मग.” संहिताने आधी रियाकडे आणि मग खिडकी बाहेर पाहत म्हटलं.

रस्ता मागे पडत होता.. मिट्ट काळोख जाऊन प्रकाश हळूहळू त्याचे पाय पसरत होता. कुठल्याही क्षणी सूर्योदय होईल अशी वेळ. सरळसोट रस्ता. दख्खनचं विस्तीर्ण पठार. जगातल्या सर्वात जुन्या आणि स्थिर भूभागांपैकी एक. आजूबाजूला थोडीफार शेती. समोर निमुळता होत गेलेला रस्ता. आणि तो जिथे बिंदुप्राय दिसत होता ते क्षितिज. सगळंचं डोळ्यांच्या कक्षेत. श्रेया घोशाल तिच्या अतिमधुर आवाजात ‘ओ आकाश, ओ पोलाश.. राशि राशि..’ म्हणत असतानाच बरोबर समोर पूर्व क्षितिजावर रस्त्याच्या किंचित उजवी कडे सूर्योदय झाला. सूर्याचं पिवळट केशरी बिंब क्षितिज रेषेच्या वर अवतीर्ण झालं. दोघी क्षणभर पाहतचं राहिल्या. सूर्योदय ही खरंतर रोज घडणारी घटना. पण ती आज, इथे, अशी अनुभवताना दोघींची मनं एकदम उन्मिलित झाली. आजचा सूर्योदय त्यांना कुठल्याशा खिडकीतून, घरातून, गच्चीवरून, बिल्डिंगच्या आडून, डोंगरा मागून वगैरे ‘दिसत’ नव्हता. तर तो अगदी सरळ रेषेत, समोर ‘घडत’ होता. मध्ये क्षितिजापर्यंत पसरलेली सपाट जमीन फक्त. झाडंही अगदी विरळ.

रियाने एक चहाची टपरी पाहून गाडी बाजूला घेतली. दोघींनी बरेचसे फोटोज क्लिक केले. आणि मग चहा घेत घेत तो सूर्योदय celebrate केला.

गाडीच्या bonnet वर एका हातात चहाचा कप घेतून बसत संहिता ने रियाला विचारलं,

“मग, मॅडम काय विचार आहे..”

“गाडी मीच चालवणारे.. तू विचार पण करू नकोस.” गरम चहा फुंकत रिया म्हणाली.

“अगं बावळट, त्या कालच्या अनुराग विषयी बोलतेय मी..” संहिता.

“ओहह.. त्यात काय विचार करायचाय. तो माझ्यासाठी विषयच नाहीये. माझे तीन attempts बाकी आहेत अजून. सो लग्नाचा विचार अजिबातचं नाही..

.. हम्म आईच्या फोनची वाट बघतेय बघ मी. त्या अनुराग ने कालचा प्रकार नक्कीच सांगितला असणार घरी. आता मातोश्री माझी शाळा घेणार कन्फर्म.”

दोघींनी हसत एकमेकिना टाळी दिली.

“ए पण काका-काकू तुला प्रिपेर करू नको असं कुठे म्हणतायत. लग्न करून कर इतकंच म्हणतायत ना.. मग एकदा विचार तरी कर की..” संहिता ने तिचा पॉइंट लाऊन धरला.

“seriously? हे तू बोलतेयस? तुला वाटतं लग्न झाल्यावर त्या सगळ्या responsibilities सांभाळत मला अभ्यास करता येईल?”

“का नाही? हू नोज.. तुझं हे passion समजून घेणारा कोणीतरी भेटेल तुला..” संहिता.

यावर तिच्याकडे मिश्किल हसून पाहत रिया म्हणाली,

“हाहा.. fantasies!”

आणि मग यावर दोघी हसल्या.

“आपलं आयुष्य, स्वप्नं ही त्या unknown would be partner वर किती depend असतात ना.. कळत-नकळत..”

संहिता तिच्याच विचारात हातातल्या चहाच्या रिकाम्या कप कडे पाहत म्हणाली.

“हो. पण आपली स्वप्नं, तो अनोळखी होऊ घातलेला सहचर यांना निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे की. कित्येकींकडे तेही नसतं. आपल्याकडे आशा आहे.. शक्यता आहेत.. बरंच काही आहे. लेट्स लुक अॅट द brighter साइड..”

उगवत्या सूर्याकडे पाहत रिया म्हणाली.

संहिताला कालच्या पेक्षा आजची रिया नक्कीच वेगळी वाटली. बदललेल्या वातावरणाचा परिणाम की आणखी काही माहीत नाही..

दोघींनी मग पुढचा प्रवास सुरू केला.

सूर्य हळू हळू डोक्यावर चढू लागला. सकाळी अकराच्या आसपास त्या होस्पेटजवळ पोचल्या. रस्ता अतिशय सुंदर होता.. तुंगभद्रा नदीचं दर्शनही झालं..

आजूबाजूचा परिसर आता हम्पी जवळ येऊ लागल्याचं निदर्शित करत होता. अजस्त्र आकाराचे पाषाण मधूनच कुठेतरी स्वागताला उभे दिसत होते..

दोघींच्या मनात आता प्रचंड उत्सुकता दाटली होती. तेवढ्यात समोर हम्पी मध्ये येणार्‍यांचं स्वागत करणारी एक मोठी कमान दिसली. त्यावर कन्नड मध्ये काहीतरी लिहलेलं होतं.

कमानीतून आत वळत दोघींनी फायनली हम्पी मध्ये प्रवेश केला तेव्हा घड्याळात साडे अकरा वाजले होते.

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालू आहे कथा. पण मार्च मध्ये हंपी त्रासाचं होतं. फेब्रुवारी तच उन्हाचा तडाखा सुरू होतो.