पैशाचा पाऊस

Submitted by बिपिनसांगळे on 18 March, 2021 - 12:43

----------------------------------------------------------------------------------------------------------
पैशाचा पाऊस
--------------------------------------------------------------------------------------------------------------
विऱ्याने समोर नाचणाऱ्या पोरींवर नोटा उधळल्या .
जणू पैशाचा पाऊसच !
पोरी जाम खुश. त्यांना माहिती होतं गिऱ्हाईक येडं झालंय म्हणून .
रात्रीची वेळ होती. पनवेलच्या त्या डान्सबारमध्ये रात्र रंगात आली होती. त्याचबरोबर जवानी आणि नशासुद्धा ! बार बराच मोठा होता. मध्ये डान्सफ्लोअर होता. चारी बाजूंनी गिऱ्हाईकं बसली होती. तर्राट झालेली. ढाकचिक-ढाकचिक, कानाचे पडदे फाडणारं संगीत वाजत होतं. रंगीबेरंगी दिव्यांची उघडझाप चालू होती.नृत्यचौथऱ्यावर अनेक मादक ललना नाचत होत्या. फॅशनेबल कपडे घातलेल्या . मेकअप थापलेल्या .
त्यामध्ये विराज आणि दिनेशही बसलेले होते. विराज चांगला धट्टाकट्टा होता. पैशाची मग्रुरी त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली होती. दिनेश साधा दिसत असला तरी तोही काही कमी बेणा नव्हता.
विऱ्याला जाम चढली होती. पोरींवर भरपूर नोटा उधळून झाल्यावर तो नृत्यचौथऱ्यावर चढला. नाचण्यासाठी.
तो गमतीशीर नाचत होता. तो मुलींच्या स्टाईलने मादक नाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा कमनीय नसलेला देह दयनीयपणे हलवत . सगळे लोक त्याला हसत होते आणि बारबालासुद्धा .
दिन्या बूड खाजवत, चकण्याचा बकाणा भरत मजा पाहत होता. त्याचं बूड कायमच खूप खाजत असे. आणि आज तर ते जादाच खाजत होतं .
मग विऱ्याने दिन्याला हाताला धरून उठवलं. दिन्या नको म्हणत असताना. त्याला नाचत येत नव्हतं, ना नाचायची हौस होती.
विऱ्याने शेजारून जाणाऱ्या वेटरच्या आईसबकेटमधून एक बर्फाचा खडा घेतला आणि टाकला दिन्याचा शर्टाच्या आत,पाठीमागून.त्यासरशी दिन्या अंगाला वेडेवाकडे झटके देऊ लागला . पाठीला झोंबणारा गारेगार बर्फ आणि त्याचवेळी बुडाला सुटलेली असह्य खाज. तो थयथया नाचू लागला. एकदा पाठ एकदा बूड असे हाताला झटके देऊ लागला . हालचालीने बर्फाचा तो तुकडा खाली सरकला . मग दिन्याचा जणू बेलीडान्सच सुरु झाला ! स्पेशल आयटम ! लोकांना तो खूप आवडला. लोक हसू लागले.
तसा विऱ्या चेकाळला. त्याने अजून एक बर्फाचा तुकडा घेतला व एका बारबालेच्या ड्रेसमध्ये टाकला.ती ‘ अयायो ‘ करून किंचाळली. तसा एक बाउन्सर आला. त्याने विऱ्याचा दंड घट्टपणे धरला. तसं विऱ्यानेही त्याला घट्ट धरलं . जवळ घेतलं. त्याच्या छातीवर डोकं घुसळलं.
लोक अजून हसू लागले . ते ऐकून विऱ्याला चेव चढला . त्याने त्याचं चक्क चुंबनच घेतलं. बारबाला ही गंमत पाहून हसल्याने तो दांडगट भडकला. त्याने विऱ्याला एक ठेवून दिली. तसा तो धडपडला. विऱ्या चिडून त्याच्या अंगावर धावून जाणार तोच आणखी दोन तगडे बाऊन्सर्स आले व त्यांनी त्याला बाजूला नेलं.
आत केबिनमध्ये बातम्या बघणारा अण्णा बाहेर आला. त्याला बघून झुलणाऱ्या विऱ्याला आधी कळेचना की ही ढेरपोटी बाला आली कुठनं समोर ? जरा सावरल्यावर तो ओरडला,“ एय अण्णा ... साला ! बोल इनको. फुकट नहीं पिताय. क्या ? पैसे देताय हम. वोबी ज्यादा .”
अण्णा वैतागलेला होता. टीव्हीवरची ताजी ब्रेकिंग न्यूज बघून . न्यूज होतीच तशी !
“ एय , तुम तुमारा पैसा xxx डालो ! हमको उसका कोय फायदा नई, क्या ? समजा ? साला एक तो बोत लफडा होगयेला है !” अण्णा ओरडला .
विऱ्याचं हे नेहमीचंच काम होतं. पुढचा तमाशा टाळण्यासाठी दिन्या गुपचूप विऱ्याला घेऊन निघाला. त्याने विऱ्याला कारमध्ये घातलं. पंटर लगेच आडवा झाला. गार वाऱ्याचे झोत येत होते. त्याने खिडक्या बंद केल्या अन गाडी दामटली . आता त्याला गावाकडे परतायचं होतं. गावची पहाट व्हायच्या आत . नायतर कोणतरी बेणं आडवं येणार आणि विचारणार , ‘ काय ? ... बरंय ना ? नाय, सकाळी सकाळी भाइरून आलासा , म्हून इचारलं !’
हे त्यांचं नेहमीचं होतं . गावाहून पनवेल गाठायचं. रात्रीच्या रात्रीच त्यांची ही मोहीम फत्ते व्हायची. मग विऱ्याच्या फार्महाऊसवर पोचायचं आणि आडवं पडायचं.
दिन्याला अण्णा का भडकलाय, हे माहिती नव्हतं. अण्णा वैतागला होता आणि अण्णासारखे सगळ्या देशातले बरेचजण !... कारण ?....
देशात अभूतपूर्व अशी नोटबंदी जाहीर झाली होती. त्याच दिवशीच्या मध्यरात्रीपासून.
आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा .
हजार -पाचशेच्या नोटा चालणार नव्हत्या. ज्या काही नोटा असतील त्या बँकेत भरणे हा एकच पर्याय होता. गोष्ट साधीसोपीच होती. पण तो पैसा काळा असेल तर ? तो बँकेत कसा भरायचा? स्वतःहून इन्कम टॅक्सच्या तावडीत सापडायचं ? पुंगी वाजवून स्वतःच साप घरात घ्यायचा ?
अवघड काम झालं होतं. आणि त्या काळ्या पैशाने तोंड तरी कुठे काळं करायचं ?...
-----
दुपारचे बारा वाजले होते.
म्हाद्या विऱ्याच्या फार्महाऊसवर आला . तिथे एक नोकर सोडता कोणच नसायचं. तो आलिशान बेडरूममध्ये शिरला . गुबगुबीत बेडवर आडव्या पडलेल्या , घोरणाऱ्या विऱ्या आणि दिन्याला त्याने पाहिलं. त्याला त्यांचा राग वाटला आणि हेवाही वाटला.
त्याला माहिती होतं की जोडगोळी डान्सबारला जाऊन आलेली असणार. त्या दोघांच्या गप्पा ऐकून त्यालाही खूप वाटायचं, डान्सबारमध्ये जावं म्हणून. सुंदर सुंदर, अगदी सिनेमातल्या हिरोईनसारख्या दिसणाऱ्या पोरींची वर्णनं ऐकून तर फारच . गावाकडची गावरान वाणं बघून त्याचा जीव उबगला होता . पण त्याच्याकडे पैसा नव्हता. आणि हे दोघे काही त्याला तिकडं न्यायचे नाहीत. मुद्दाम त्याच्यासमोर तिकडची चर्चा करून ते त्याचा दरद वाढवायचे .
तो दिन्याचा चुलतभाऊ होता. अडाणी गडी. साधासा, गरीब. तो दिन्याच्या शेताचं काम बघायचा . तर विऱ्या आणि दिन्या मित्र होते. त्यांचं चांगलंच जमायचं. सगळ्याच बाबतीत .
म्हाद्याने दोघांना उठवलं . त्यांना उठवत नव्हतं .
विऱ्याला तर स्वप्नात बाउंसर आला होता. फक्त त्याच्या तोंडाच्या जागी एका सुंदर तरुणीचं मुखकमल होतं. तर दिन्या झोपेतही बूड खाजवत होता.
म्हाद्याने दोघांच्या बुडावर फटके दिले. बारबालांची बुडं समजून !... तेवढंच समाधान . झोपेत त्यांना कळणार नाही हा अंदाज घेऊन. नाहीतर त्याची ही हिंमत कुठली. तो स्वतःशीच लाजत हसला.
दोघं जागे झाले .
“ भाऊ नोटबंदी झालीया .” म्हाद्या म्हणाला .
“ होऊ दे की साला . नोटबंदी झालीये घोटबंदी तर नाही ना ?” दिन्या लोळतच, आळोखेपिळोखे देत म्हणाला . आणि स्वतःच्या विनोदावर हसायला लागला. त्याला सकाळचा उतारा म्हणून पुन्हा घोट घोट घ्यायची लहर आली होती.
“ आजपास्नं बाजारात हजार- पाचशेच्या नोटा चालणार न्हाइत ! “
“ काय ?” आता विऱ्या किंचाळला . आता त्याची उतरली होती.
“ म्हणजे आमच्या पैशांचं करायचं काय आम्ही ? ... घालायचा कुठं ?”
“ बंबात ! “ म्हाद्या म्हणाला.
“ बंबात ?” विऱ्या म्हणाला.
“ नायतर काय हो. बंबात घाला नायतर शेकोटीत . नायतर मला द्या . म्हंजे फुकाट नको. मीच नाचतो लिपसटिक लावून , तोकडा स्करट घालून ! पार तुमच्या गळ्यात पडून . माझ्यावर तरी उडवा त्या नोटा .”
म्हाद्याच्या डोळ्यांसमोर बाद नोटा नाचल्या तरीही त्याचे डोळे नाचले .
“ ए म्हाद्या गप्प बस ,” विऱ्या वेड्यासारखा ओरडला.
-----
दिन्याची मोठी शेती होती . त्याचा बाप दूध डेअरीचा व्याप सांभाळायचा . दिन्या म्हाद्याच्या मदतीने शेती बघायचा . स्वतःला मातीत जरासुद्धा न कालवून घेता . त्याला तरीसुद्धा शेतीत मोठा चमत्कार घडवायचा होता . तो घडवला की गावातल्या प्रगतिशील शेतकरी असलेल्या माधवरावांपेक्षा त्याला गावात जास्त मान मिळाला असता. आणि मग ... त्यांच्या पोरीवरसुद्धा इम्प्रेशन पाडता आलं असतं .स्वीटीवर . जिथं अजून तरी त्याची एकेरी वाहतूकच सुरु होती. म्हाद्याच्या भाषेत ,ती म्हणजे त्याचा कलेजाचा नाजूक दरद होता !
एके दिवशी म्हाद्या दिन्याकडे बोंबलत आला .
“ का रं ? काय झालं ?”
“ आरं तू म्ह्स काकांना चारच्या जागी आठ पैसे कमवून दाखवणार हायीस . पण सारंच मुसळ केरात नव्हं ! “
“ म्हंजे ? काय झालं ?”
“ म्हंजे ते सोयाबीनचं बियाणं डुप्लिकेट हाय. नुसतं नावाला खुंट उगवल्यात. पण रोपाला वाढच नईना.”
“ काय ? आरं , ते लय भारीचं बियाणं हाय. विऱ्याने मुद्दाम मला दिलंय. जास्ती पीक येण्यासाठी. पीक जास्त आलं असतं. तर चार पैसे हातात खेळले असते अन दादांसमोर भाव खाता आला असता गड्या. एकतर त्यांना वाटतं का मी बिनकामाचाच गडी हाय . च्यायला ! ही डोकेदुखीच झाली म्हणायची .”
“ व्हणारंच . आवं, त्या विऱ्याला तरी काय कळतंय साल्याला ! पेरावं तसं उगवतं ! त्याच्या बापाने कायतरी घोळ केला असणार , म्हणून हे असलं बेणं जन्माला आलंया !“ म्हाद्या विऱ्याचा नेहमीच हेवा करायचा अन असलं कायतरी बोलायचा .
-----
रोकड पैशाची बाजारात टंचाई होती . बँकांपुढे पैसा काढायला रांगा होत्या . असा सगळा गोंधळ होता. लोक हवालदिल झाले होते .
विऱ्याचं बी-बियाण्यांचं मोठं दुकान होतं. दौलतराव आणि कंपनी. बियाण्यात आणि खतामध्ये भेसळ करून , काळा बाजार करून ते चांगलेच गब्बर झाले होते.
विऱ्याचं डोकं चालत नव्हतं. बंगल्यावर नोटांच्या थप्प्या होत्या . तो काळा पैसा जिरवायचा वेगळाच बांडगुळ प्रॉब्लेम ! त्या पैशांचं काय करणार आणि कसं करणार, कळत नव्हतं . मोठंच नुकसान झालं होतं.
धंदा नोटबंदीमुळे बसला होता. गड्याची आवकच थांबली होती. त्यात त्याने विकलेल्या सोयाबीनच्या बियाण्याचा घोळ. सगळा डुप्लिकेट माल होता साला ! वांझोटा ! शेतकरी बोंब मारत यायचे. त्यांचे शिव्याशाप . गरीब शेतकरी भांडायचे , पैसे परत मागायचे . दोन्हीकडनं कात्रीत अडकल्यासारखं झालं होतं त्याला.
सगळा कारभार त्याच्या बापाच्या हातात असला तरी तो अधनंमधनं बापाला पैशाच्या गुंड्या लावायचा . नाहीतर त्याचं षौकपाणी भागलं नसतं .
आणि डान्सबार प्रकरण सोडलं तर तो लय चेंगट गडी होता. पोरींवर वाट्टेल तसा पैसा उधळणारा तो, इतर ठिकाणी पै-पैचा हिशोब करायचा .
त्याला डान्सबारमधल्या तमन्नाची लय आठवण यायला लागली होती. नुसती तमन्नाच नाही तर डिम्पी, नुरी आणि प्रिया सगळ्यांचीच. पण हाती रोकडा नसल्याने जाणं जमंना झालं होतं .
डान्सबारमधल्या स्पीकर सारखं त्याचं हृदय धडधडायचं. पण व्यर्थ !
दिन्याचा सोयाबीनसम्राट होण्याचा चान्स हुकला होता. बापाचा त्याच्यावर थोडाही विश्वास नव्हता. त्यात आता अजून भर पडली होती. त्याचा झाला होता पचका ! त्याच्या आग्रहामुळे त्याच्या बापाने बियाण्याला नेहमीपेक्षा डबल पैसा घातला होता. आणि आता बाप डोकं खात होता .’ विऱ्या तुजा मित्र हाय तर त्याच्याकडनं बियाण्याचा पैसा वापस आण म्हणून ! ‘ आता झाली होती नोटबंदी . विऱ्या तरी पैसा कुठनं देणार होता अशा टायमाला ?
तर सोयाबीनचा बक्कळ पैसा हातात आल्यावर दिन्याने म्हाद्याला डान्सबारला न्यायचं कबूल केलं होतं . त्यामुळॆ म्हाद्या पिकाकडे आशेने डोळे लावून बसला होता . बिचाऱ्याची स्वप्नं उगवता उगवता राहिली होती . सोयाबीनसारखी .
पैसा ! ...
पैसा पाहिजे होता तिघांना . आणि नोटबंदीची खोट तर लय मोठी झालेली. त्याची ठसठस दिसागणिक वाढतच चाललेली . बाजारात एक तर सगळ्यांची डोकी फिरलेली, नाहीतर बंद तरी पडलेली .
यावर कायतरी मार्ग काढायलाच पाहिजे होता .
विऱ्याने बराच काळा पैसा जिरवला . पण पूर्ण नाही . हे नुकसान काही करून भरून काढायला पाहिजे होतं . पण प्राप्त परिस्थितीत ते अवघडच होतं . त्याच्यावर उपाय एकच . पुन्हा पैसा जमवणे . पण कसा ? भरपूर पैसा पुन्हा जमवण्यासाठी तर चमत्कारच व्हायला पाहिजे होता. त्याचा जीव पैसा पैसा करत होता. दिन्या आणि म्हाद्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती .
त्यासाठी जास्त डोसकं कोण खाजवत होता - तर म्हाद्या . बिचाऱ्याला खूप आस लागली होती पैशाची . जिंदगीत सगळीच हौसमौज राहून गेली होती . परिस्थितीचे चटके बसून त्याला कळलं होतं - माल है तो ताल है !
-----
आणि येडा वाटणाऱ्या म्हाद्याने आयडिया काढलीच .
कल्पना ऐकून विऱ्या थरारून उठला .
तर दिन्या म्हाद्याला म्हणाला ,” म्हाद्या ,लेका फेकू नको हां , नायतर होईल पुन्ना सोयाबीनसारखं ! “
त्यावर हसत हसत म्हाद्या ‘ नाही ‘ म्हणाला . तर सोयाबीनचं नाव घेताच विऱ्या चिडलाच , “ साल्या हो , सोयाबीनचे सांडगे कोंबीन तुमच्या - घशात ! आवाजच बंद करिन. च्यायला साले, टकूरंच फिरवतात. “
त्यांची बाचाबाची चालू झाली .
येडा म्हाद्या शेवटी म्हणाला, " आरं, तो पैसा ऱ्हाऊ दे बाजूला. जाऊ दे बंबात . तुमचं चालू दे जोरदार . कायतरी येड्यावाणी वागता . "
मग कशीतरी त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली.
म्हाद्या म्हणाला , “पण काम होयाला तेवढं पैशाचं मात्र बघायला लागंन . “
आणि तेही खरं होतं . म्हाद्याकडे पैसा नव्हता .दिन्याचं अवघड होतं . थोडक्यात , विऱ्यालाच भार उचलावा लागणार होता . पण कल्पना ऐकून तो चेंगट गडी भारावला होता . त्यामुळे तोही प्रश्न सुटला होता .
म्हाद्या त्यांना घेऊन एका मांत्रिकाकडे गेला .
-----
मांत्रिक त्याच्या अंधाऱ्या खोलीत बसला होता . त्यात त्याने एक लाल रंगाचा प्रकाश देणारा दिवा लावला होता . त्यामुळे त्याच्या खोलीत जे काही होतं ते नीट दिसत नव्हतं आणि जे दिसत होतं ते भयावह वाटत होतं . एकूण वातावरण गूढ होतं . त्याचे केस लांब वाढलेले होते , काळ्या दाढीमिशांचं जंगल त्याच्या चेहऱ्यावर माजलेलं होतं. तो काळा कुळकुळीत अन काटकुळा होता . छोट्याशा काळ्या खडकावर भरपूर वेली उगवाव्यात तसा त्याचा अवतार होता .
तो तिघांना बसा म्हणाला . विऱ्या आणि दिन्या बसले. म्हाद्याला जरा पलीकडे बसावं लागलं . खाली बसताना त्याच्या बुडाला काही टोचलं . त्याने ते हातात घेतलं तर ते एक लांब हाडूक होतं . तो किंचाळला आणि त्याने ते बाजूला फेकलं. ते पडलं विऱ्याच्या मांडीवर . तोही किंचाळला आणि त्यानेही ते हाडूक फेकलं . समोर . त्या मांत्रिकाने एका झटक्यात ते धरलं . आणि रागावून भेदक डोळ्यांनी , ते हाड त्यांच्या दिशेने रोखून तो किंचाळला , “ काय चालवलंय ? “
त्यावर ते तिघेही चपापले .
म्हाद्या म्हणाला , “ म्हाराज , क्षमा असावी . “
त्यावर तो म्हणाला ,” ठीक आहे . बोल “
“ ह्ये माझे मालक लोक हायेत . त्यांना घेऊन आलोया . तुमची किर्पा व्हायाला पायजेल . “
“ हां , पुढे . “
म्हाद्या चाचरत पुढे म्हणाला , “ म्हाराज ... पाऊस … पैशाचा पाऊस ... “
“ काय ? पैशाचा पाऊस ? तुमच्या बापाने पाडला होता का रे , असा पैशाचा पाऊस ?” मांत्रिक गरजला .
असं म्हणल्यावर त्याच्यासमोरची कवटी उचलून त्याच्याच टाळक्यात घालावी असं वाटलं विऱ्याला . म्हाद्याने त्याचा चेहरा पाहिला आणि इशारा केला म्हणून तो गप्प बसला .
आज म्हाद्याच बॉस होता ! …
“ म्हाराज, चुकलं माकलं माफ करा ,पण पैशाची लैच नड हाय, कायतरी रस्ता दाखवा . लय आशेने तुमच्याकडे आलोया . “
मांत्रिक बराच वेळ गप्प बसला .
मग म्हणाला , " पैसा खर्च करायची तयारी आहे का ? "
म्हाद्या म्हणाला , " म्हाराज, ती काळजीच नको . "
त्यावर मांत्रिक पुढे म्हणाला
“ ठीक आहे . पण काळजीपूर्वक आणि तुमचा विश्वास असेल तरच . या कानाचं त्या कानाला कळता कामा नये . मी सांगतो ते ऐकायचं आणि करायचं . खविसाशी गाठ आहे तो काय करेल याचा नेम नाही . तो खोडसाळ आहे . तो काहीही करू शकतो . पण तेच मनात आलं तर पैशाचा पाऊससुध्दा पाडू शकतो . “
मांत्रिक किरकोळ असला तरी त्याचं बोलणं प्रभावी आणि प्रबळ वाटत होतं . त्याच्या बोलण्यात जबरदस्त आत्मविश्वास होता. ते दिपून गेले होते. दिन्यासकट .
ते परत फिरले .
-----
दिन्या म्हणाला.” अरे, हा पैशाचा पाऊस पाडू शकतो. मग तो स्वतःच का पाडत नाय ? पार नोटात बुडू दे की त्याला. च्या मारी ! काय बी साल्या पुड्या सोडतो ! अन तू तीच पुड्याची पानं आमच्या तोंडाला पूस म्हंजे झालं ! "
त्यावर विऱ्याही संशयाने म्हाद्याकडे बघायला लागला.
म्हाद्याला गडबड लक्षात आली. तो हात जोडत म्हणाला,
“ बाबांनो , इश्वास ठेवा राव . तुमचं कल्याण होईल .”
मग त्याने सगळी कथा सांगितली. त्या मांत्रिकाने मोठ्या कष्टाने गुरूकडून ती विद्या मिळवली होती. पण तो ती स्वतःसाठी वापरू शकत नव्हता.
म्हणून तो दक्षिणा मात्र मोठी घेणार होता.
तेव्हा विऱ्या भारावला , “ म्हाद्या, दिली दक्षिणा . यार तू फस्ट टायम कायतरी कामाचं बोललास बघ.”
दिन्याला तरी ते पटलं नाहीच. “ साला ! आजकाल साधा पाऊस पडायचे वांदे . अन हा पैशाचा पाऊस पाडायच्या बाता करतोय. बाबा बोलतो भारी ! पण तुम्ही त्याच्या बोलण्याला भुलू नका . हे बाबा लोक आपल्याला एका मिन्टात उल्लू बनवतात . काय म्हणा राव , मला नाय वाटत हे खरं . नाय , आपल्याला तर हे पटतच नाय ! "
तेव्हा म्हाद्या म्हणाला, “ ए भाऊ, तू असा अइस्वास दाखवू नकोस. समजा पडला पैशाचा पाऊस, तर तुला काय पैसा नको हाय का ?”
दिन्या गावातलाच शेवटी . त्याचा अशा गोष्टींवर विश्वास होता . नाही असं नाही . पण पैशाचा पाऊस ? ... हे म्हणजे त्याच्या दृष्टीने कायतरी आक्रितच होतं . पार येड्यावाणी अशक्य !
तेव्हा विऱ्या म्हणाला . “ ठरलं तर ! अन ए दिन्या , तू आता मोडता घालू नकोस . गप रहा आमच्याबरोबर. भायर कुठं काय बोलू नकोस . गपपडीची गोळी खा. "
त्यावर दिन्या गप बसला.
तर म्हाद्या म्हणाला , “ मी तर छत्री घेऊन येणार हाय.”
आता मात्र दिन्याला राहवलं नाही, “ काय ? येडा हाय का रं तू ? छत्री आणायला तो काय नेहमीचा पाऊस हाय का ?”
विऱ्या हसला, म्हणाला , “ येड्यांची वस्ती न धिंगामस्ती !”
म्हाद्या म्हणाला , “ असू दे. मी छत्री आणणार हाय ,पर ती सरळ नाय धरणार.तर उलटी धरणार हाय.पैसा गोळा करायला! “
त्या येड्याचं ते बोलणं ऐकून विऱ्या आणि दिन्या पहातच राहिले.
मग ते तिघेही स्वप्नात हरवून गेले. पैसा मिळाल्यावर काय करायचं याची स्वप्नं पाहत. पैशाचा पाऊस पडत होता. पडतच होता. आणि ते मातीत रांगत, लोळत पैसा गोळा करत होते. मातीत खेळणाऱ्या लहान पोरांसारखे !
विऱ्याला तो स्वतः बारबाला असल्यासारखं वाटत होतं आणि दिन्या त्याच्या अंगावर नोटांचा पाऊस पाडत होता.
तर दिन्याच्या स्वप्नाळू डोळ्यांपुढे स्वीटी होती . नोटांच्या राशीवर पहुडलेली , पैसासुंदरी !
म्हाद्या तर कल्पनाही करू शकत नव्हता धडपणे . तो फक्त छत्री उलटी धरून गप उभा होता . पैसा गिरक्या घेऊ घेऊ छत्रीत शाण्या पोरासारखा आपोआप गोळा होत होता .
गरीब म्हाद्याला त्याचं नशीब उघडायला हवं होतं. त्याला पैशाची खूप ओढ लागून राहिली होती . एकदा का तो मिळाला की तो विऱ्या आणि दिन्याच्या बरोबरीला येणार होता . म्हंजे त्यांच्या नजरेतला त्याचा भाव वाढला असता . भावकीत तो छाती फुगवून चालू शकला असता .
-----
अमावास्येची रात्र होती. काळोखी !
रात्रीचे बारा वाजलेले.
पण त्या माळावर तरी अंधुकसं दिसत होतं. त्यांनी बरोबर टॉर्च वगैरे काही आणलेलं नव्हतं . मांत्रिकाची तशी सक्त ताकीदच होती.या कानाची खबर त्या कानाला कळू द्यायची नव्हती.
म्हाद्या मात्र मोठी ,जुन्या पद्धतीची काळी छत्री घेऊन आला होता.
माळावर जायला निघण्यापूर्वी दिन्या त्याला म्हणला होता , " पैशाचा पाऊस जर पडला नाय ,तर याच छत्रीचा दांडा खूपशीन तुझ्या ... नरड्यात ! ओके ? "
त्यावर म्हाद्या वैतागून म्हणाला , " काय राव , जरा तरी इस्वास ठेवा . आता टायम जवळ आला अन तुम्ही ... पैशाचा पाऊस पडणार म्हणजे पडणार. उगा मांत्रिकाची पावर बघू नका . नायतर ... नायतर ... " रागाने त्याला बोलता येईना . मग तो गप झाला .
त्याचा आत्मविश्वास बघून दिन्या चमकला.विऱ्यानेही त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला .
घरातून निघण्यापूर्वी विऱ्याचं आणि बापाचं पैशावरून कडाक्याचं भांडण झालं होतं . त्यामुळे त्याचा आधीच मूड खराब होता . म्हणून तो म्हणाला , " दिन्या गप की लेका , का डोकं फिरवतो ? पैसा मिळाला नाय तर माझा बाप माझीच छत्री बांधंल . माझ्या स्मरणार्थ !..."
त्यावर दिन्याने तोंड बंद केलं.
थंडीचे दिवस होते. गावाबाहेर मोकळ्यावर लय गार लागत होतं . वारं अंगाला झोंबत होतं . हडकुळा म्हाद्या कुडकुडत होता . त्याचं ते कुडकुडणं दिन्याला थंडीने वाटत होतं ,तर विऱ्याला भीतीने .वातावरण भीतीचं असलं तरीदेखील शांत होतं . पण मध्येच कुठे लांबून कुत्र्याचं विव्हळणं ऐकू येत होतं. तर मध्येच टिटवीचं टीटीव टीटीव.
माळावर एक वडाचं भलं प्रचंड झाड होतं. खूप जुनं. आणि त्यावर तेवढाच जुना एक खवीस राहतो असा लोकांचा समज होता. तर मांत्रिकाची पक्की खात्री होती.
त्याला नीट मनवलं तर त्याची कृपा बरसणार होती. आणि आज तेच करायचं होतं. त्यालाच वश करून घ्यायचं होतं.
तसे तिघेही टरकलेले होते.
मांत्रिकाने त्या तिघांना एक रेष मारून त्याच्यापलीकडे थांबायला सांगितलं होतं . काही झालं तरी ती रेष ओलांडायची नव्हती . जणू लक्ष्मणरेषा ! पण ते तसा साधा प्रयत्न सुद्धा करणार नव्हते . जीवाशी खेळ हवा होता कोणाला ?
मांत्रिकाने पूजा मांडली. त्याचं ते चित्रविचित्र साहित्य मांडलं.मग त्याने अग्नी पेटवला.कपाळावर , साऱ्या अंगावर भस्म थापून घेतलं.काहीतरी पुटपुटत . आता जाळ चांगलाच पेटला होता. त्यामध्ये तो आता डेंजर दिसत होता.
तिघे डोळे विस्फारून, उत्कंठेने , लांब थांबून पूजा बघत होते. त्यांच्या मनात धाकधूक होती. अपार उत्सुकता होती. दिन्या बूड खाजवत एकदा म्हाद्याचा अधीर चेहरा पहात होता. तर एकदा मांत्रिकाचा, तर एकदा विऱ्याचा चेहरा पाहत होता . त्याला भीती तर खूप वाटत होती. तरीही या क्षणालाही तो विचारात पडला होता . आत्ताही त्याला असंच वाटत होतं की असे आभाळातून पैसे वगैरे पडत नसतात म्हणून .
पूजा बऱ्याच वेळ चालली . कंटाळलेल्या दिन्याच्या नजरेसमोर स्वीटी आली . त्याला उगा वाटलं, ती आत्ता ,इथे माळावर, एखाद्या उत्सुक प्रेयसीसारखी एकटी भेटायला आली असती तर ? ... तसा तो हुशार झाला .
पूजा झाली. मांत्रिकाने एका कोंबड्याचा बळी दिला.
मग तो मागे सरकला व त्याने इशारा केला.
तसे तिघे आळीपाळीने पुढे सरकले. पहिलं दर्शन म्हाद्याने घेतलं, घाईघाईने . जणू काही तो खवीस पळूनच जाणार होता, पाऊस न पाडता. मग दिन्या . मग विऱ्या पुढे झाला. त्यानेही मनःपूर्वक नमस्कार केला आणि खिशातून नोटांचं बंडल काढून वाहिलं. मोठा आव आणून…
विऱ्याला वाटलं होतं की पैशाचा पाऊस जर पडला नाही तर बाद नोटांचीच दक्षिणा सरकवायची . पाऊस नाही तर पैसा नाही. आणि जर पडलाच तर त्या पैशातूनच दक्षिणा भागवता येईल . म्हणून त्याने हजाराचं अख्खं , पॅक बंडल वाहिलं होतं . नोटबंदीत बंद झालेल्या नोटांचं .
तिघे लांब झाले . मांत्रिक पुन्हा पुढे झाला. त्याने नमस्कार केला व ज्वालांमध्ये काही टाकलं . भपकन जाळ वाढला. ज्वाला सरसरत नागांच्या फण्यांसारख्या उभारल्या. तसा तो पुन्हा नमस्कार करत मागे झाला.
आणि तो झाडाकडे वरच्या दिशेने पाहत खणखणीत आवाजात म्हणाला म्हणाला “ रे खविसा , तुझी यथासांग पूजा केलीये . बळी दिलाय. पैसे वाहिले आहेत . आता तू प्रसन्न हो. पाऊस पाड - पाऊस पाड पैशाचा !”
आणि सारं काही शांत झालं . मग सोसाट्याचा वारा वाहू लागला. घोंगावू लागला. त्याचा अंगावर नकोसा वाटणारा मारा होत होता. त्या वाऱ्याचा आवाजही नको वाटू लागला. त्या तिघांनी कानांवर हात दाबून धरले. शेवटी मांत्रिकानेही.
सारं पूजेचं साहित्य उडायला लागलं. पत्रावळ्या , हळद - कुंकू आणि कायकाय . आग मात्र भडकून उठली होती. कसली आग होती ती !
कसली आग होती ती ?...
मग वाऱ्याचा जोर कमी झाला.
म्हाद्याच्या गालावर जणू मोरपीस फिरल्यासारखं झालं . बूड खाजवणाऱ्या दिन्याच्या तोंडावरही काहीतरी फटकन चिकटलं . विऱ्या डोळे लावून अंधारात आकाशाकडे बघत होता. त्याचेही डोळे कशाने झाकले गेले .
पैसा ?...
आकाशातून हळूहळू नोटा यायला लागल्या होत्या. एकेक करत,गोलगोल फिरत , हेलकावे घेत जमिनीकडे धाव घेऊ लागल्या होत्या... खरंच .
उल्लू बनवल्याची आग मनात पेटलेला खविस वडावर बसला होता . त्याने त्याची अंगारी नजर वर आकाशाकडे उचलली आणि तशीच रोखून धरली .
आणि पैशाचा जोरदार पाऊस सुरु झाला ! ..
.नोटबंदीत बंद झालेल्या नोटांचा .
खोडसाळ खविस हसत म्हणाला,” साला ! जैसेको तैसा अन खोटाच पैसा !”
----------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाबो... भारीये...

... आणि पुढे म्हद्या दिन्या, विऱ्याला धु धु धुतात Proud

Lol

नानबा आभारी आहे
आणि इतर हि साऱ्या वाचकांना धन्यवाद

Lol
भारीच
मला वाटलंच तरी हा बाद नोटा देणार आणि त्याला same उत्तर मिळणार!!

हेहे
भारी आहे कथा
म्हणजे असं मांत्रिकाला सांगताना त्याच्यापुढे 'खविसा आमच्या काळात चालतील अश्या पैश्याचा पाऊस पाड' असे सविस्तर स्पेक्स सांगायला हवेत यापुढे Happy

अनु
छान विनोदी प्रतिक्रिया
आभार