दिगंत - ३

Submitted by सांज on 17 March, 2021 - 01:26

रस्ता सुसाट धावत होता. सूर्य डोक्यावर आला होता. कोल्हापूर यायला अजून तासभर तरी लागणार होता. संगीताच्या तालावर सरणार्‍या रस्त्याकडे पाहत संहिता सीट वर मागे रेलून बसली होती. ती न गेल्यामुळे ऑफिस मध्ये आज काय कमाल धांदल उडाली असेल, वर्मा रागाने कसा लाल झाला असेल या सगळ्याचा विचार करून तिला क्षणभरासाठी गम्मतही वाटली.

इतक्यात रिया तिला म्हणाली,

“संहिता, एक काम कर ना..”

“बोल”

“माझा फोन घे. बाबांचा नंबर काढ आणि मी सांगेन ते टाइप कर.” रिया.

काही न बोलता संहिता ने ती म्हणतेय तसं केलं. “हम्म, काय टाइप करू..”

थोडासा विचार करून रिया बोलू लागली.

“बाबा हाय.. मी आणि संहिता हम्पीला जातोय काही दिवसांसाठी. मला वेळ मिळाला की मी कॉल करेन. पण, खरं सांगू का आत्ता कोणाशी काही बोलावंस वाटत नाहीये. मी ठीक आहे. मला फक्त थोडासा वेळ हवाय. मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल.”

नजरेनेच ‘झालं’ असं रियाने संहिताला सांगितलं.

“sent.” संहिता.

फोन बाजूला ठेवत संहिता पुढे म्हणाली,

“डोन्ट वरी, काका-काकू तसे अंडरस्टॅंडिंग आहेत. घेतील ते समजून.”

“हम्म..” रिया.

दोघींनी एकमेकींकडे हसून पाहिलं.

थोड्यावेळाने हायवे ला लागून असलेल्या एका रसवंती समोर रियाने गाडी थांबवली. उन्हाची लाही गाडीतल्या एसीलाही जुमानत नव्हती.

दोघी उतरून चार खुर्च्या मांडलेल्या आणि गवताच्या गंजीचं छत असलेल्या त्या रसवंती मध्ये गेल्या.

“बोला ताई काय देऊ?”

स्त्री चा आवाज ऐकून दोघींना सुखद धक्का बसला. खुर्चीवर बसत दोघींनी दोन ग्लास ऊसाचा रस मागवला. हायवे वरच्या त्या रसवंतीत त्या एकट्या बावीस-तेवीस वर्षांच्या वाटणार्‍या मुलीला पाहून त्यांना कुतूहल वाटल्यावाचून राहिलं नाही.

सराईतासारखं तिने मशीन मध्ये ऊसाच्या कांड्या घातल्या. तिचे हात ठरलेल्या वेगाने आणि कौशल्याने चालत होते.

चौकशी अंती त्यांना समजलं की ही शिल्पा तिच्या वडिलांसोबत ही रसवंती चालवते. तिचा भाऊ पुण्याला काहीतरी काम करतो. तो गावाकडे फारसा येत नाही. मग वडील आणि ही आलटून पालटून त्यांचा हा व्यवसाय सांभाळतात.

बोलत-बोलतच तिने दोन मोठे काचेचे ग्लास भरून रस आणला त्यात दोन बर्फाचे खडे टाकले आणि थोडासा लिंबू पिळून तिने ते दोघींसमोर ठेवले.

दोघींचे तहानलेले गळे त्या गार-मधूर रसाने तृप्त झाले. शिल्पाच्या प्रसन्न चेहर्‍याकडे बघत रियाने तिला विचारलं,

“शिक्षण किती झालंय गं तुझं?”

“बीए फायनल ची परीक्षा दिली ताई यावर्षी मी.”

“अरे वा.. मग आता पुढे काय विचार?” संहिता ने विचारलं.

“पुढे काय ताई मला आमची ही रसवंती लई आवडते बघा. मला हिला वाढवायचाय. म्हणजे थोडं असं मॉडर्न वगैरे कारायचंय. पन त्याला पैसे लागतात. आण्णा कडं आहेत थोडे पन तो काय माझं ऐकत न्हाई. माझ्या लग्नासाठी ठेवलेत म्हणतो. आता मला कै लगेच लग्न बिग्न कारायचं न्हाई बरं. पन लोक बसू देत नाहीत.” ती निरागस पणे सगळं सांगत होती.

तिचं बोलणं ऐकून दोघी विचारात पडल्या. संहिता हसून म्हणाली,

“सो, शिल्पा तुझी स्टोरी काही आमच्याहून वेगळी नाही.”

रिया यावर ओळखीचं हसली. शिल्पा काही न कळून म्हणाली,

“म्हणजे ओ ताई, तुमचे आई-वडील बी लग्नाच्या मागं लागलेत का?”

“हो ना बाई, म्हणून तर पळून आलोय आम्ही.” रिया म्हणाली.

शिल्पा विचारात पडली. “पळून??”

“अगं पळून म्हणजे पळून नाही. पण कंटाळून ट्रीपला जातोय आम्ही. रिया, अगं, घाबरवू नको तिला.” संहिता हसून म्हणाली.

“अस्सं होय!” शिल्पाने हसून टेबलवरचे ग्लास उचलले.

नाही म्हटलं तरी रियाच्या मनात विचार आल्या वाचून राहिला नाही. मुलगी कुठल्याही सामाजिक स्तरातली का असेना, काही मूलभूत गोष्टी प्रत्येकीच्या बाबतीत सारख्याच असतात.

जरावेळ तिथे बसून हसर्‍या शिल्पाला मनोमन शुभेच्छा देत दोघी कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या.

बर्‍याच वेळाने न रहावून रिया संहिताला म्हणाली,

“संहिता, माझं, या शिल्पाचं थोडं वेगळंय. आमची करिअर्स अजून व्हायचीयेत. ऑर इन फॅक्ट आमच्या मनाचीच तयारी अजून व्हायचीये. पण, तुझं तसं नाहीये. तू settled आहेस. तू का करत नाहीस लग्नाचा विचार?”

संहिता यावर थोडीशी शांतच राहिली.

“सांगून टाक गं. किती दिवस गोष्टी मनात ठेवणार आहेस? दरवेळी मी विषय काढला की तू अशीच गप्प बसतेस. शेअर केल्याने हलक वाटतं डियर!”

“काय सांगू रिया. माझ्या मेडिकल कंडिशन विषयी तुला माहितीच आहे. पीसीओडी अँड ऑल दॅट स्टफ. सहा एक महिन्यांपूर्वी मी नेहमीसारखी माझ्या gynac कडे गेले होते. तेव्हा काही टेस्ट्स केल्या होत्या. रीपोर्ट पाहून डॉक्टर थोड्याशा टेंस्ट वाटल्या. आधी काही बोलल्या नाहीत. पण मी खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या, माझ्या ओवरीज मध्ये uncurable defect आहे. त्याचा अर्थ थोडक्यात मी कधीही आई होऊ शकत नाही असा होतो.

अर्थात आयव्हीएफ वगैरे बरेच options आता उपलब्ध आहेत. विज्ञान खूप पुढे गेलंय. असंही त्या म्हणाल्या. पण मी समजले काय समजायचं ते.”

रिया ऐकून स्तब्ध झाली. पण सावरत पुढे म्हणाली,

“इट्स ओके संहिता.. हे biological आहे. कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. आणि दत्तक घेण्यापासून बाकीचे बरेच पर्याय आहेत की. या सार्‍याचा संबंध तू लग्नाशी का जोडतेयस?”

“कारण मला त्यानंतरचे complications नको आहेत. लग्न करा मग मूल होत नाही म्हणून स्वत:च्या शरीरावर नको तितक्या treatments चा मारा करा. नो. मला नाही जायचंय त्यातून. कुटुंब, समाज सार्‍यांच्या नको त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा.. नकोच ते. मी अशीच उत्तम आहे.”

“तू नकारर्थी विचार करतेयस असं नाही वाटत का तुला?” रिया.

“नकारर्थी नाही रिया, मी प्रॅक्टिकल विचार करतेय. हे बघ, मी एकतर ही गोष्ट लपवून ठेवणार नाहीये. आणि हे कळल्यावर मला नाही वाटत कुठला मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार होईल! तुला तो ऑफिस मधला अनिकेत माहितीये. तो माझ्यात इंट्रेस्ट घेऊ लागला होता. I too had feelings for him. तू मधल्या काळात चिडवू लागली होतीस बघ त्यावरून मला. पण नंतर अचानक तो चॅप्टर संपला. का माहितीये? मी त्याला माझ्या मेडिकल कंडिशन्स विषयी सांगितलं. हे असं असतं. गोष्टी फिरून तिथेच येऊन थांबतात. सो, आता माझं ठरलंय. एकटा जीव सदाशिव!”

“.. स्टिल मला वाटतं, तू ओपन रहा. हे सगळं अॅक्सेप्ट करणारा कोणीतरी नक्की येईल बघ तुझ्या आयुष्यात..” रिया.

“हाहा.. fantasies!” संहिता खिडकी बाहेर पाहत म्हणाली.

रस्त्यावर मधोमध उंच signboard झळकत होता,

“कोल्हापूर शहर तुमचं स्वागत करत आहे!”

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users