प्रिय काॅफी,

Submitted by सांज on 15 March, 2021 - 10:05

प्रिय काॅफी,

तुझा फेसाळ कैफ
घशाखाली उतरवून
त्या कडवट-गोड चवीच्या मार्गाने मागे-मागे जात
मी पाहत राहते डोळे बंद करून
तुझी-माझी गाठ पडली
त्या आपल्या पहिल्या धक्क्याकडे.
आयुष्यातलं ‘दूध’ सरुन त्याची जागा
‘अमृततुल्य’ घेऊ पाहत होतं
त्या कुठल्या तरी नवतरुण वळणावर
तुझं ॲबस्ट्रॅक्ट, बेफिकीर रूप आयुष्यात आलं.
आणि मी भारावले.
तुझा कैफ हवाहवासा वाटू लागला.
एका हातात तुला आणि एका हातात ‘करिक्युलर’ व्यतिरिक्त कुठलंसं पुस्तक धरुन बसण्याची
धुंदी चढायला लागली.
काय काय आणि किती किती वाचलं मी तुझ्या सोबतीने!

हो पण, तू आलीस म्हणून अमृततुल्य मागे पडलं असं नाही.
त्याची जागा वेगळी!
तो प्यावा टपरीवर.
ऊन्हाच्या हलक्या तिरिपी अंगावर घेत
टाळ्या देत
चर्चा झाडत
उनाडक्या करत.

आणि तू?
तू आर्ट गॅलरी सारखी.
बाहेर एखादा बहावा नाहीतर गुलमोहर
नाहीतर जॅकारन्डा त्यांची भुरभुर रंगविभोर फुलं
विस्तीर्ण, शांत रस्त्यावर सांडत असताना
काचेच्या भिंती आडून,
तुझा ऊबदार मग हातात धरून
एखादं सुंदर पुस्तक एकटीनेच वाचत बसण्याचा जो काही कैफ आहे ना
तो तुझ्या चवीपेक्षाही कैक पटींनी मादक आहे!

पुढे तू सखी होत गेलीस
माझा माझ्याशीच संवाद घडवणारी
पायरीवर बसून पाखरांची किलबील ऐकत
अंगणातला ऊन्ह-सावलीचा खेळ पाहत
तुला चाखणं,
हा सोहळा होत गेला!
क्वचित गवसणारा.

आणि आज तुला असं स्वत:त
मुरताना पाहून लक्षात येतंय,
मीही कदाचित तुझ्यासारखीचं होत चाललेय
ॲबस्ट्रॅक्ट!
मेटॅफिजीकल!
.
कडू-गोड!

सांज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिओ!!
>>>>आणि आज तुला असं स्वत:त
मुरताना पाहून लक्षात येतंय,
मीही कदाचित तुझ्यासारखीचं होत चाललेय
ॲबस्ट्रॅक्ट!
मेटॅफिजीकल!
कडू-गोड!

सुपर्ब!! हे कडवं तर कळस आहे.

"आयुष्यातलं ‘दूध’ सरुन त्याची जागा
‘अमृततुल्य’ घेऊ पाहत होतं" - किती चपखल लिहिलं आहे हे! खूप शुभेच्छा!
मनात रेंगाळणारी अप्रतिम 'कॉफी' "आणि बरच काही"...