खुळ्या

Submitted by Vishu Patil on 15 March, 2021 - 04:04

त्याला माहीत आहे गावचं प्रत्येक घर ,
सगळ्या वाटा आणि सगळी गुपीते ..
पण तो इकडचे तिकडे नाही करत ....
कारण ...... तो खुळा आहे ...

तो मिसळतो सगळ्यांमध्ये,
अगदी त्यांच्यातला होऊन
मग ते छोटी मुलं असोत वा गुरं
करतो सगळ्यांवर फक्त प्रेमच तो ....
कारण ...... तो खुळा आहे ...

त्याला नाहीत कोणी मित्र ,
पण त्याचे मित्र सगळेच आहेत ,
ना जात , ना धर्म, ना छुवाछूत
त्याला समजत नाही काहीच ...
कारण...... तो खुळा आहे ...

अगदी तल्लीन होतो ,
तो प्रत्येक भजनात ...
जणू परमेश्वरच भेटतो ,
त्याला प्रत्येक माणसात ....
पण त्याच्यातला देव नाही दिसत कोणाला ....
कारण ...... तो खुळा आहे .

आज खुळ्याला उशीरच झाला उठायला , दररोज एव्हाना तो गावच्या सगळ्या देवांची विचारपूस करून घरी परतत असायचा . पण आज तसा उशीरच झाला, खुळ्या लगबगीतच घरातून बाहेर पडला, आतून आई ओरडतच होती 'चप्पल घालून जा ', पण खुळ्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो अनवाणीच बाहेर पडला.
अख्ख गाव जरी खुळ्याला 'खुळं' म्हणत असलं तरी त्याच्या आईसाठी तो बाळच होता . गावालातर खुळ्याच खरं नाव काय आहे हे पण माहीत नव्हतं . खुळ्या जन्मला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होतं की ६-७ वर्षापर्यंत तो जगू शकेल , पण खुळ्याला आज २७ वर्ष झाली . खुळ्याच्या आईने हार नाही मानली , तिने त्याला बालवाडीत बसवला, पण खुळ्याला गणिताचे आकडे कळतंच नव्हते , तो रमायचा निसर्गामध्ये , गुरांमध्ये , पक्ष्यांमध्ये , कुठेतरी एकटक बघत राहायचा, त्याला काय दिसायचे त्यालाच ठाऊक , एकटाच हसायचा . शाळेतील मुलं त्याला त्रास दयायची , पण त्याला त्याचं काहीच नव्हतं , पण जेव्हा खुळ्याच्याच लहान भावाने घरी सांगितले कि खुळ्यामुळे त्याला मुलं त्रास देतात तेव्हा खुळ्याच्या वडिलांनी खुळ्याची शाळा बंद करून टाकली.

खुळ्याची शाळा बंद झाली पण त्याची आई दररोज त्याला राम, कृष्णाच्या गोष्टी सांगायची , आणि खुळ्याही त्या मन लावून ऐकायचा, खुळ्याच्या आईला खुळ्याच एकटेच हसणे आणि तिच्याकडे देव्हाऱ्यात असलेल्या कृष्णाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरच्या हसण्यात साम्य वाटायचे. खुळ्या पोटात असताना त्या मूर्तीकडेच तर ती आपल्या होणाऱ्या बाळासाठी सतत काही ना काही मागायची. खुळ्यासाठी पण त्याची आईच त्याच्यासाठी 'त्याचं आयुष्य' होती. त्याचे वडील आणि भाऊ त्याच्यावर सतत वैतागलेले असायचे. खुळ्याचा दिनक्रम मात्र ठरलेला असायचा. दररोज सकाळी लवकर उठून गावातल्या हनुमानाच्या , दत्ताच्या मंदिरात आणि गावाच्या वेशीबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरात खुळ्या रोज जायचा. महाशिवरात्री सोडली तर खुळ्याच वर्षभर शंकराच्या मंदिराचा पुजारी असायचा. मंदिराच्या मागे असलेल्या आडातून खुळ्या दररोज पाणी काढून शंकराच्या पिंडीला आंघोळ घालत असे. शंकराचे मंदिर म्हणजे खुळ्यासाठी दुसरं घरच होतं , मंदिराच्या आवारात असणाऱ्या चिकूच्या आणि पेरूच्या झाडावरची माकडे खुळ्याला चिकू आणि पेरू खायला आणून देतात, अशा चर्चा गावातल्या लहान मुलांमध्ये व्हायच्यात.

आज दुपार उलटली तरी खुळ्या घरी परतला नाही, तसा आज खुळ्याला उशीरच झाला होता घरातून जायला , पण तो गेल्यापासून खुळ्याच्या आईचे कशातच लक्ष लागत नव्हते, आणि खुळ्याची काळजी तिच्याशिवाय घरी कोणालाच नव्हती. मागच्याच आठवड्यात खुळ्याच्या लहान भावाला बाजूच्या गावातील एक पोरगी सांगून आली होती , आणि कालच त्यांच्याकडून नकार आला होता कारण स्पष्ट होत 'खुळ्याच अस्तित्व'. त्यावरून काल रात्री घरात मोठाच वाद झाला होता, आणि खुळ्याच्या वडिलांनी तर आईवर हात पण उचलला होता. काल हमसून रडता रडता उगीचच आईला वाटलेलं की खुळ्यानी सगळं ऐकलंय.

आज सकाळपासूनच गावच्या वेशीबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरावरच्या आडावर माकडे जोरजोरात ओरडत आहेत, मंदिराच्या आवारातील कुत्री रडवेल्या आवाजात भुंकत आहेत ........

तो खुळा कि मी खुळा प्रश्न पडतो माझा मला ,

तो सतत हसत आयुष्याशी हितगुज करत असतो ,
मी मात्र रडवेला आयुष्याशी भांडत बसतो..

त्याला नाहीत कसलेच प्रश्न
माझ्या मात्र उत्तरानंतरही प्रश्नचिन्ह

मला लागते नवसाचे आमिष माझा पसारा सावरायला
तो मात्र आरसा होतो परमेश्वराला, त्याचेच हास्य बघायला
तो खुळा कि मी खुळा प्रश्न पडतो माझा मला

विश्वजीत पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad काही वेळेस परमेश्वर असा काही कोणावर अन्याय करतो की त्यातुन त्या व्यक्तीचे आणी त्याच्या जवळच्यांचे जीवन खूप संघर्षाचे होते. देवाने भलेही खूप पैसा न देवो, पण सामान्यांसारखी बुद्धी व सारासार विचार करण्याची क्षमता प्रत्येकाला देवो.