भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोलक
मला वाटतं कसंही लोंबणारे ते लोलक , कानातले (काय उदाहरण आहे) Happy

आंदोलक
ठराविक वेग, परीघ ,वारंवारता असणारे ते लंबक .

‘अफलातून’ हा अपभ्रंश तर भलताच रोचक आहे.

• मूळ शब्द आहे प्लेटो. म्हणजेच ते प्रसिद्ध ऐतिहासिक तत्त्वज्ञ.

• प्लेटो चे अरबीत झाले अफ्लातून

• हिंदीत तो ‘अफलातून’ झाला = वह जो अपने आप को औरों से बहुत बड़ा समझता हो

• आणि मराठीत
अफलातून = अप्रतिम , अलौकिक , सुंदर .

आहे की नाही ही शब्दकथा अफलातून !!

चिपळूण गावाचा चितळोण हा अपभ्रंश झाला.
त्यावरून चितळोणचे राहणारे ते चित्तपोलन >> चित्पावन.

या शब्दाबद्दल बऱ्याच कथा प्रचलित आहेत.

खूप दिवसांनी इथे डोकावलो.
"शिरा पडो" चा अर्थ समजवणाऱ्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

मस्त धागा आहे. चांगली माहिती मिळतेय

अडाण या मूळ शब्दाचा अर्थ 'शेतकामात न गुंतलेला असा गावचा समूह ' असा आहे

हे बरोबर वाटत नाही आहे. अडाणी चा अर्थ निरक्षर, अशिक्षित
(संदर्भः https://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php)

अडाण आणि अडाणी हे जरी समानार्थी वाटत असले तरी ते दोन वेगळे (वेगळ्या अर्थाचे) शब्द असावेत.

मूळ शब्द गडधू असून त्याचा अर्थ गावाची सीमा दाखवणारा दगड असा आहे.>>>>

ओहह, आमच्या गावाची शेवटची वाडी गडदुवाडी म्हणून ओळखली जाते. त्याच्यापुढे गाव संपते. त्याचा अर्थ आता कळला.

मूळ शब्द गडधू असून त्याचा अर्थ गावाची सीमा दाखवणारा दगड असा आहे.>>>>

आंबेगाव तालुक्यात ढाकाळे आणि सुपेवाडी गावाच्या मध्ये गडदूबाई नावाचे गुहेतील देऊळ आहे.

अडाण या मूळ शब्दाचा अर्थ 'शेतकामात न गुंतलेला असा गावचा समूह ' असा आहे>>>>
हे बरोबर वाटत नाही आहे. अडाणी चा अर्थ निरक्षर, अशिक्षित >>>

शेतीशी संबंधित नसलेले अडाणी समजले जात. अज्ञानी > अडाणी हे योग्य आहे. माझ्या आई च्या बोलण्यात बऱ्याचदा "शेतकऱ्याला कसली आली दिवाळी, दिवाळी अडाणी कबाड्याना असते" दिवाळी ची वेळ सुगी ची असल्याने शेतकरी कामाच्या गडबडीत असतात. आणि बलुतेदार ते धान्य नेऊन दिवाळी करू शकतात. पण शेतकऱ्याला आलेले धान्य साठवून रब्बी पेरायची घाई असते. गम्मत म्हणजे आता एखाद्या निरक्षर शेतकऱ्यालाही अडाणी म्हटले जाते.

साधना ,
हे २ संदर्भ आहेत :

षट्कर्में- जारण, मारण, उच्चाटन, मोहन, स्तंभन, विध्वंसन हीं मंत्र व तंत्र विद्येंतील कर्में.
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D

आणि
हिंदी विकीपिडीयानुसार :

'षड्यंत्र' = षट्+यंत्र = षड्यंत्र , अर्थात् छह यंत्र या छह विधियाँ

६ विधियाँ = जारण , मारण , उच्चाटन , मोहन , स्तम्भन , विध्वंसन.

पिण्याच्या पाण्याचा माठ, आंघोळीचे पाणी तापवायचा बंब किंवा अभिषेक पात्र ज्यावर ठेवतात ती तीन पायांची अडणी.

ती आडणी. किंवा तो आडणा.
दार आड कर म्हणजे दार (थोडेसे) झाक.
आड हा शब्द अनेक संदर्भात अनेक अर्थांनी किंवा एकाच अर्थाच्या अनेक छटांनी वापरला जातो. आड म्हणजे छोटी विहीरही. काही ठिकाणी ह्याचा अड असाही उच्चार होतो.

+१
आणि हे ही एक पाहा :
आढणी
स्त्री. तिवई. अडणी पहा.
दाते शब्दकोश
....
अ/आ, ड / ढ व ण मिळून बरीच धमाल आहे खरी !

आडणी शब्द रोचक आहे. मला त्याचा अर्थ ज्याने अडवतो ती वस्तू असा वाटला होता (दार बंद झाले की ये जा करता येत नाही अशा अर्थाने) पण हिरा यांनी दार आड कर म्हणजे झाक असे लिहिले तेव्हा दाराआड, आडबाजूला, आडोसा असे अनेक आड शब्दाचा hidden/covered या अर्थी उपयोग असलेले शब्द आठवले.

छान.
'पसायदान' हा पण 'प्रसाददान'चा अपभ्रंश आहे असे ऐकले होते.
ख/खो माहित नाही.

प्रसाददान >>>

सं. प्रसाद वरून प्राकृत पसाय झाला आहे.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%...

ही प्रार्थना म्हणजे प्रसादरुपी मागणे आहे. यावर विकिपीडिया अधिक चाळला असता काही रंजक माहिती मिळाली.
पसायदानातील “आणि ग्रंथोपजीविये” ही ओवी मूळ ज्ञानेश्वरलिखित नसून घुसडलेली (प्रक्षिप्त) आहे असे काही तज्ञांचे मत आहे. त्यावर इथे बरंच काही वाचायला मिळेल :

http://diwali.upakram.org/node/182

खालील म्हणी / वाक्प्रचारांचा उगम काय असावा याबद्दल कुतूहल आहे :-

हातावर 'तुरी' देऊन पळून जाणे
'मूग' गिळून गप्प बसणे
तोंडात 'तीळ' न भिजणे
वाटण्याच्या अ़क्षता लावणे

हातावर तुरीऐवजी मूग दिले तर पळून जाण्यात काही अडचणी यायच्या का ? तिळाऐवजी शेंगदाणे भिजणार नाहीत का ? मला लहानपणापासून असेच भाबडे प्रश्न सतावतात Happy

अनिन्द्य,
मूग चा दुसरा अर्थ मौन :

मू(मु)ग
न. मौन; स्तब्धता; मूकत्व. . [सं. मूक; प्रा. मूग] ॰आरोगणें- खाणें-गिळणें-गिळून बसणें-(कोणी अपमान केला असतां किंवा आपणास उत्तर द्यावयास येत नसतां, उत्तर दिल्यास अनर्थ होईल म्हणून) न बोलतां, स्वस्थपणें, मुकाट्यानें वसणें.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%97

तोंडात 'तीळ' न भिजणे
तिळाऐवजी शेंगदाणे भिजणार नाहीत का >>> शेंगदाण्यापेक्षा तीळ लहान असतो न, म्हणजे इतका लहान 1 तीळ भिजायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ही गुप्तता राखता न येणे असं असावं. डॉ कुमार सांगतीलच खरं काय ते.

थोडं अवांतर --मला लहानपणापासून असेच भाबडे प्रश्न सतावतात>>> चवथी च्या स्कॉलरशिप ला भाषेच्या पेपरचा अभ्यास करताना मी असले प्रश्न विचारायचे ,हेच का न तेच का तर उत्तर यायचं आधी आहे ते एका जागी बसून कर मग संशोधन कर असच का न तसच का . तेव्हा मायबोली हवी होती. Happy

Pages