वातानुकूलीत खोली--( वीक एंड लिखाण--कथा. )

Submitted by निशिकांत on 13 March, 2021 - 11:11

कावेरीबाईंचा जीवन प्रवास तसा फारसा वेगळा नव्हता. इतराप्रमाणेच लग्नानंतरचे स्वप्नवत दिवस. जरी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती तरीही आज पण मागे वळून बघता जीवनाचा हा काळ सुवर्ण काळच वाटत होता. प्रेम, स्वप्ने, पतीपत्नीचे आपापसातले समर्पण.  थोडक्यात फालतू अपेक्षा नसलेले संपन्न असेच जीवन होते त्यांचे. हळूहळू काळपरत्वे जीवनाला स्थैर्य लाभले. पैसा पैसा जमवून एक बेडरूम हॉल किचन असलेली सदनिका घेतली त्यांनी. राजा, राणी आणि एक मुलगा मजेत रहात होते. कालांतराने मुलास छान नोकरी लागली आणि हे कुटुंब सुखवस्तू वर्गात दाखल झाले.
मुलाचे यथावकाश लग्न झाले आणि घरात सून आली. सहाजीकच पहिला फ्लॅट विकून दुसरा दोन बेडरुमचा फ्लॅट घेतला. तेथे सारे स्थलांतरीत झाले. सर्व कांही मजेत चालले होते. कावेरीबाईंना एक नात पण झाली. कुटुंबाला दृष्ट लागावी अशी परिस्थिती होती. हे सगळे मजेत चालू असतानाच अचानक कावेरीबाईंच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. आता घरात आई, मुलगा, सूनबाई आणि नात असे आटोपशीर कुटुंब रहात होते.
कावेरीबाई पतीच्या निधनानंतर खूप खचल्या होत्या. त्यांचे प्रपंचातले लक्ष उडाले होते. देव देव, भजनी मंडळ अशा गोष्टीत त्या स्वतःस रमवण्याचा प्रयत्न करत होत्या. काळ पुढे पुढे सरकत होता. कावेरीबाईंच्या तबियतीच्या शिकायती सुरू झाल्या. त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला. वैद्यकीय उपचार सुरू होते. तीन चार वर्षे ही भुणभुण चालूच होती. म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. त्यात अजून एक मोठे संकट आले. जेंव्हा संकट येते तेंव्हा ते एकटे येत नसते. अनेक संकटे एकामागून एक लाटा याव्यात तसे येतात. हा खरा परिक्षेचा काळ असतो.
एका तपासणीत कावेरीबाईंना कर्क रोग झाल्याचे निदान झाले. घरातील सर्व वातावरणच बदलले. बिमारीचे मळभ घरावर पसरू लागले. उत्तमोत्तम उपाय मुलगा करत होता पण म्हणावे तसे यश येत नव्हते.
कावेरीबाई नैराश्याने ग्रासल्या होत्या. भुयाराच्या शेवटी कुठेही प्रकाश दिसत नव्हता. कर्करोगामुळे शरीराच्या वेदना दिवसेंदिवस वाढत होत्या. किडनी खराब असल्यामुळे वेदनाशामक औषधे पण डॉकटर देत नव्हते. आता कावेरीबाईंना वेदना सहन करण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता.   बर्‍याच वेळेला त्या असाह्यतेने रडत आणि जोरजोरात ओरडत असत. घरात त्यावेळेस वातावरण गंभीर होई.
मुलगा आणि सूनबाई याला कंटाळल्याचे जाणवत होते. त्यांचे वागणे, घरातली चिडचिड वाढत होती. आईला पण तिच्याकडे मुलाचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत होते जरी त्या बोलून दाखवत नव्हत्या. कावेरीबाई ज्या खोलीत झोपत होत्या त्या खोलीतील पंखा बंद पडला. त्या गर्मीमुळे त्रस्त होत होत्या. त्यांनी मुलाला दोन तीन वेळा या बाबत छेडले पण त्याने विशेष लक्ष दिले नाही असे त्यांना वाटले.
एके दिवशी घरी कांही सुतारकाम करणारे लोक आले. त्यांनी कावेरीबाईंच्या खोलीची दारे आणि खिडक्या बदलल्या. रबराचे गोठ चौकटीला लावून दरवाजे टाईट केले. खिडक्यांना पण साधी दारे काढून स्लायडिंग दारे बसवली. कावेरीबाईंना वाटले की मुलगा खोलीला एसी बसवत आहे. एवढ्या दुखण्यात पण त्या मनोमनी सुखावल्या. पण एक आठवडा गेला तरीही पुढे कांहीच होईना. एकेदिवशी त्यांची नात, जी एव्हाना आठ वर्षाची झाली होती, चहा घेऊन त्यांच्या खोलीत आली तेंव्हा त्यांनी तिला विचारले की माझ्या खोलीचे वातानुकूलीत करायचे काम का रेंगाळत आहे. नातीने उत्तर दिले की आजी! एसी बसवणार नाहीतच. फक्त तुझी खोली साऊंड प्रूफ केली आहे . आजी तू रडतेस, ओरडतेस ना तेंव्हा बाहेर सर्वांना त्रास होतो आणि आपला डॉगी आहे ना! त्याची पण वारंवार झोपमोड होते.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

    

Group content visibility: 
Public - accessible to all site users