आपुली नव्हतीस तू

Submitted by निशिकांत on 9 March, 2021 - 11:33

आपुली नव्हतीस तू ---( जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लिहिलेली दुसरी कविता )

माय तू भगिनी कधी तर
पत्नी कधी झालीस तू
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

आखले परिघास तुझिया
सांग कोणी? का असे?
धर्ममार्तंडांस कळते
यातले का फारसे?
चार भिंतीचे तुझे जग
त्यात का रमलीस तू?
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

जन्म झिजण्यालाच असतो
बिंबल्याने हे मनी
रेटला संसार गाडा
हूं न चू! रात्रंदिनी
कोरलेली भाग्यरेषा
ना कधी पुसलीस तू
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

वेदना लपवून जगणे
शाप तुजला लाभला
सदगुणाचा या जगाने
स्वार्थ अपुला साधला
दे झुगारुन जोखाडांना!
शांत का बसलीस तू?
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

चंदनाचे झाड आता
वाळले असले तरी
हास्य लेउन सांगशी "मी
कोपर्‍यामध्ये बरी"
वाढले जे प्राक्तनाने
पचवुनी जगलीस तू
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

नांदती आदर्श जेथे
मी स्त्रिये! तुज पाहतो
प्रश्न माझे, उत्तरांना
मी तुझ्यातच शोधतो
द्यावया पूर्णत्व विश्वा
भूतळी रुजलीस तू
जोडुनी नाते घराशी
आपुली नव्हतीस तू

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users