होय, मी सावित्री बोलते आहे.

Submitted by ललिता गवंडी on 9 March, 2021 - 00:54

होय, मी सावित्री बोलते आहे.
माझ्या लेकिंनो, मातांनो आणि भगिनींनो! आजची परिस्थिती पाहता तुमच्याशी बोलावे वाटते. आज मीही तुमच्यातलीच आहे. प्रत्येक नारीमध्ये मीच तर सामावलेली आहे. कारण तुम्हीच मला ते अति उच्चस्थान दिले आहे. तुम्ही शिकला, सवरला, आज प्रत्येक आघाडीवर तुम्ही काम करता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
पण खरं सांगू का माझ्या मुलींनो, क्रांतीज्योती म्हणून तुमचा आज मला पहिल्यासारखा अभिमान वाटेनासा झाला आहे. कुठेतरी काहितरी चुकतंय याची चांगलीच जाणीव आज तरी मला होत आहे. आज माझ्या क्रांतिज्योतींनो तुमची मशाल वेगळ्याच दिशेला तर जात नाही ना ? ही भीती माझ्या मनात घर करून राहिले आहे. म्हणून तर आता हा संवाद मी खूप मन मोकळे पणाने करीत आहे.
माझा मानसन्मान, माझ्यालेकींनो खूप अभिमान वाटतोय मला तुमचा. पण ही आपुलकी फक्त आजच्या दिवसापुरती तर नाही ना? अगदी जोमात साजरा करा महिला दिन ! आनंद आहे मला.परंतु सख्यांनो, माझ्या मुलींनो, जरा विचार करा. स्वतः जे तुम्ही वागत आहात , ते बरोबर आहे का ? विचारा आपल्या मनाला. तुझी कर्तव्य, तुझी जपणूक आणि तुझे अस्तित्व कुठल्या प्रकारे तू टिकवून ठेवले आहेस?
हा प्रश्न आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात येऊन जातो. स्त्रीत्वाची जाणीव तुला आहे का ? त्याचा आदर सन्मान तुझ्याकडे राहिला नाही. असं एकंदर चित्र मला दिसून येतं आहे. आजची शिकलेली स्त्री आपल्या कुटुंबातल्या माणसांचा आदर करते आहे का? केवढे हे भयंकर वागणं आहे ? काय उपयोग तुमच्या सुसंस्कृतपणाचा आणि तुमच्या शिक्षणाचा ? शिक्षणाने माणसं सुसंस्कृत होतात, ही गोष्ट खरी. हे मी मान्य करते. म्हणून तर स्त्रीशिक्षणाचा ज्योतीबांचा हट्ट मी पूर्ण केला.
स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि कुटुंब शिकले तर समाज सुधारतो. समाज सुधारला तर राष्ट्राचा विकास होतो. पण माझ्या सख्यांनो, तुम्ही सुशिक्षित होऊन काय करता ? हा प्रश्न आहे मला.
सुशिक्षित होणे म्हणजे नेमके काय ? माझ्या सखीला, माझ्या मातेला जर तुम्ही त्रास देत असाल तर याचा अर्थ काही वेगळाच होतो आहे, असे मला आज तरी वाटू लागले आहे.
सुशिक्षित होणे म्हणजे केवळ स्वतःचे स्वातंत्र्य जपणे असं नव्हे , शिक्षणाने माणूस सुधारतो ,पण सखी तूच तर फक्त तुझाच विकास करत आहे. आणि सुशिक्षितपणाच्या नावाखाली अनेक जबाबदाऱ्या विसरत आहे. ही संकल्पना मला मान्य नव्हती. आणि कल्पितही नव्हती. शिक्षणाने तुम्ही सक्षम झाल्या. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. संसाराला हातभार लावला. पण या सर्वांमध्ये तुमचा अहंपणा जागृत झालेला आज तरी मला दिसून येतो.
आज अनेक सुशिक्षित कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहेत. मुले,आजी-आजोबा अनाथ होताना दिसत आहे. या गोष्टी पूर्वीही होत्या, नाही असं नाही! पण त्या काळी स्त्री ही सक्षम नव्हती. तिला हे सर्व थांबवता येत नव्हते. पण आजची स्त्री सुशिक्षित, नोकरदार आणि सक्षम असून आजही वृद्धाश्रम चालू आहेत! या गोष्टीचं मला फार दुःख होतं आहे. मुले बिघडत चालली आहेत , आई वडिलांना कोणी विचारत नाही! कुठेतरी याची खंत मनाला होते. हे असे का व्हावे ?
माझ्या क्रांतीज्योतींनो आज खूप तुम्ही शिकला , खूप मोठे पद तुम्ही भूषवत आहात, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझा वसा माझ्या क्रांतीज्योतींनी,सावित्रीच्यालेकी यांनी पुढे चालवला आणि तोच वसा थोड्या फार नात्याने, नव्याने हाती घेऊन "उतरणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही" ! या म्हणण्याप्रमाणे आपण आपली जीवन पद्धती बदलूया ! आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपली कर्तव्यता पूर्ण करू.मी आणि माझे कुटुंब ही संकल्पना थोडी मोठ्या मनाने मोठी करू !
आई वडिलां सारखेच सासू-सासरे मानुन त्यांचा आदर तथा सांभाळ त्याच पद्धतीने करू! शिक्षणाने तरी आपण आपले विचार बदलू शकतो. स्त्री ही सासू बनते! सासू-सून,ननंद भावजय, जावा जावा या नात्यांमध्ये आपुलकी आणूया. आपण शिक्षणाचा खरा अर्थ जगाला दाखवून देऊ. स्त्रीने स्त्रीला अबला न म्हणता सबला बनवूया! त्रास देणारी पुरुष प्रधान संस्कृती असो! नाहीतर स्री असो ती नष्ट करून मानवतेचा नवा संदेश देऊया! खरंतर पुरुष स्त्रीचा द्वेष , मत्सर करताना दिसत नाही. हेवेदावे यातून त्रास देते, ती फक्त स्रीच आहे. आईने आपल्या सुनेला मुलीच्याच नात्यानं वागवलं जावं. म्हणजेच खर्‍या अर्थाने स्त्री ही संपूर्णपणे सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनेल आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने त्यांचा मान-सन्मान वाढेल. एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करेल, तेव्हाच खरे स्री जीवन सार्थक झाल्यासारखे होईल . माझ्या क्रांतीज्योतींना या माझ्या स्मृतिदिनानिमित्त हा माझा वसा घेऊन नवजीवनाची सुरुवात करुया!
धन्यवाद!
तुमची सवित्रिज्योती.

ललिता गवंडी, अकोले.

Group content visibility: 
Use group defaults

खुप वास्तववादी लेख. अंतर्मुख करणारा. म. फुले आणि क्रंतीज्योती सवित्रीबाईंच्या त्यागाला कशाचीही उपमा देता येत नाही. असे युगप्रवर्तक लाखात एकदा जन्मतात आणि नतद्रष्ट लोकांचे शेणगोळे खाऊनही उलट शेणगोळे मारणार्‍यांच्याच लेकीबाळींना शिकून सवरून चांगले सुखा-समाधानाचे दिवस यावेत म्हणुन कुठलाही किंतू मनात न ठेवता झटतात.

क्रांतिज्योती , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्या बद्दल मला नितांत आदर आहेच. धागा काढला त्याबद्दल धन्यवाद.

<< आज अनेक सुशिक्षित कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहेत. मुले,आजी-आजोबा अनाथ होताना दिसत आहे. या गोष्टी पूर्वीही होत्या, नाही असं नाही! पण त्या काळी स्त्री ही सक्षम नव्हती. तिला हे सर्व थांबवता येत नव्हते. पण आजची स्त्री सुशिक्षित, नोकरदार आणि सक्षम असून आजही वृद्धाश्रम चालू आहेत! या गोष्टीचं मला फार दुःख होतं आहे. मुले बिघडत चालली आहेत , आई वडिलांना कोणी विचारत नाही! कुठेतरी याची खंत मनाला होते. हे असे का व्हावे ?>>

-------- सावित्रीबाई बोलत आहेत असे मला कुठेही दिसले नाही. क्षमस्व.
कुटुंब व्यावस्था टिकविण्याची जबाबदारी एकट्या स्त्रीची आहे असा चुकीचा आणि नकारात्मक सुर दिसतो आहे. व्यावस्था कोलमडत असेल ( मुले, आजी- आजोबा अनाथ आदी) तर सर्व दोष एकट्या नारी जातीला देता येणार नाही , आणि त्यांच्यांतल्या शिक्षणाला तर नाहीच नाही. का ?

घटस्फोट घडणार्‍या घटनांचा आणि स्त्रियांच्या शिक्षणा चा संबंध जोडण्याचा महाकर्मठपणा करणारे लोक आजही आहेत. फुले दांपत्यांच्या आणि त्यांच्या क्रांतीकारी स्त्री शिक्षण उपक्रमाला ज्या विचारसरणीने १७० वर्षांपुर्वी कडाडून विरोध केला... त्याच कर्मठ विचारसरणीचे आज प्रतिनिधीत्व करणारे लोक हे स्त्री ( इंग्रजी ?) शिक्षणामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे असे चित्र रंगवत असतात.

छान पैकी शिक्षण घ्यावे, नोकरी पण करावी, पैसे कमवावे, नोकरीवर जाण्या अगोदर आणि घरी आल्यावर जेवण तयार करावे, घरातल्या वडिलधार्‍यांना तसेच इतरांच्या हातात ताट / पाणी द्यावे. त्यानंतर आवरा आवर करुन मग झोपायला जावे कारण पहाटे ५ वाजता पुन्हा कामाचे चक्र सुरु होणार आहे. कुठेतरी बिघडले तर मन मारुन जगावे. कशासाठी ? मग शिक्षणाचा उपयोग काय ?

घर टिकविणे याची जबाबदारी घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीची आहे. शिकलेली, स्वाभिमानी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर स्त्री हेच सावित्रीबाईंचे स्वप्न होते.

Rubbish article !

सावित्रीबाई बोलताहेत असं वाटतच नाही. एका दुखावलेल्या सासुची व्यथा, हे टायटल पण चाललं असतं. अगदी एकांगी विचार आहेत.