रात्रीस खेळ चाले ३

Submitted by DJ....... on 8 March, 2021 - 11:47

सीझन ३

अगदी उत्सुकतेच्या शिखरावर चढूनच भल्या मध्यरात्री हा सीझन ३ बघायला सुरुवात केली. टायटल साँग न लागताच एपिसोड सुरु झाला त्यामुळे अनपेक्षितपणे तोल गेल्या सारखंच वाटलं. एपिसोड सुरू होतो तोच मुळी पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड अन दुसर्‍या सिझनचा शेवटचा एपिसोड घेऊन. आपण ठार केलेल्या सर्व माणसांच्या भुतांचा भास होत आण्णांचा मृत्यु होतो अन माई हंबरडा फोडते. दत्ता लगेच माधवला फोन करून कल्पना देतो. लगेच रघुकाका अन इतर गावकरी जमून आण्णांना नदीकाठी नेऊन क्रियाकर्म करतात तेव्हा माधव आणि अभिराम देखिल दिसतो. नदीच्या पाण्यात आण्णांच्या धगधगत्या चितेचे प्रतिबिंब उमटते अन भडकलेली चिता पाहून माधव, दत्ताला सावरण्याचा उपदेश करत रघुकाका सर्वांना परत फिरायला सांगतात. ते सर्वजण निघुन जातात पण कॅमेर्‍याच्या साक्षीने आपण मात्र आण्णांच्या चितेजवळच घुटमळत रहातो. नको म्हटलं तरी कॅमेरामन आपणाला पार चितेत घुसवतो Proud . शेवटी चितेतून मागे खेचत आपण नदीच्या पाण्यातल्या प्रतिबिंबात चिता बघत बसतो तेव्हा आण्णांचा आत्मा वर गेल्याचा भास होतो. Uhoh (हे फार भयानक चित्रण केलं आहे..!)
---------------------------------------------------------------------------०००--------------------------------------------------------------------------
मुंबईत कोण परुळेकर नामक एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असतो त्याच्या मुंबईतल्याच टुमदार घरापासून सीनला सुरुवात होते. तो घाईगडबडीत आकेरीला निघालेला असतो जिथे त्याला आण्णा नाईकांचा वाडा इस्टेट एजंटकरवी विकत घ्यायचा असतो. तो अचानक निघालेला बघून त्याची बायको त्याला काळजीने बरेच प्रश्न विचारते परंतु त्या वाड्यात रिसॉर्ट बनवण्याच्या कल्पनेने परुळेकरवर पुर्ण ताबा घेतलेला असतो. तो एकटाच त्याच्या कारने आकेरीसाठी रवाना होतो तत्पुर्वी बायको त्याच्या हातात एक लाल धागा बांधते.

मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ-सावंतवाडी राज्यमार्ग अशी मजल-दरमजल करत आपण कधी परुळेकराच्या कार मधुन आणि कधी ड्रोनच्या माध्यमातून एरियल व्युने आकेरीतल्या नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर पोचतो तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. आधीच्या सीझनमधील हिरवीगार निसर्गरम्य भातखाचरं या सीझन मधे मात्र पेटवून दिल्यामुळे काळी-पिवळी-तपकिरी दिसत असतात. परुळेकर आपली बी.एम.डब्ल्यु. नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर फक्त २० फुट अलिकडे थांबवतो अन समोरुन येणार्‍या इसमास आण्णा नाईकांच्या वाड्याचा पत्ता विचारतो. तो माणुसही वेडेपणा करत पुढे जाऊन डावीकडे वळा (एरियल व्यु मधे आपणाला उजवीकडे वळायचं ते लक्ख दिसलेलं असतं..!) सांगायचं तर पुढे जाऊन उजवीकडे वळा असं सांगुन तिथून पोबारा करतो. शेवटी ते २० फूट अंतर पार करून परुळेकराची कार वाड्यासमोर थांबते अन दिवेलागणीच्या वेळेस पोचलेल्या परुळेकराच्या तोंडून (अन आपल्याही तोंडून Wink ) हुंड्या-झुंबरं ल्यालेला भारदस्त वाडा पाहून शब्द फुटतात - "मार्व्हलस..!!" Bw .

परुळेकर वाड्यासमोर पोचतो तोपर्यंत आपणही अनामिक ओढीने वाड्याचा साज-शृंगार भिरभिरत्या नजरेने डोळ्यात साठवू लागतो. वाड्याचं ते पेटंट फाटक, फाटकाच्या पिलरवर लावलेले प्रकाशाचे मोठे लाईटस, आतमधे माईचं वृंदावन, वाड्याची ओसरी, पायर्‍या, ओसरीच्या लाल दगडांच्या बिचीत लावलेला सफेद रंग (हा पांढरा रंग जरा नाजुक ब्रश ने दिला असता तर बरं झालं असतं असं वाटुन जातं Uhoh ), ओसरीतील झुला, वाड्याची काळं पॉलिश केलेली भारदस्त सागवानी चौकट, दरवाजा, कडी-कोयंडा, खिडक्या, भिंतींना दिलेला फिकट निळा रंग आणि पांढर्‍या रंगाने नजरेत भरलेले दारं, खिडक्या, खोल्यांच्या कोनांचे उठाव अन यासर्वांवर हुंड्या-झुंबरं यांच्या आरस्पानी काचेतून पसरलेला नाजुक प्रकाश यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो तसा तो परुळेकरही Bw .

वाड्यात शिरता शिरताच परुळेकराच्या हातात त्याच्या बायकोने बांधलेला लाल धागा फाटकाच्या बिचीत अडकून निघतो अन तिथेच लटकून रहातो. वाड्याच्या समोर आल्यावर मंत्रमुग्ध झालेला परुळेकर "घरात कोणी आहे का?" असं विचारतो तर आण्णांचा आवाज येतो "बूट ओसरीखाली काढून समोरच्या घंगाळातल्या पाण्याने हात-पाय धुवून या..!". सुचनेबरहुकुम परुळेकर सर्व सोपस्कर करतो अन बुट काढयला लागतो तेव्हा आपणाला दिसतं की आण्णांची खेटरं वाड्याकडे टाचा करून ठेवलेली आहेत. परुळेकरालाही असंच वाटत असतं नेमकं तेव्हाच आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ).

मग झुल्यात बसून आण्णा परुळेकराला येण्याचे प्रयोजन विचारतात. परुळेकर देखिल एका दमात वाडा विकत घ्यायला आलो असं सांगतो त्यावर आण्णा "दिला..!" असं हसत सांगतात. फुकट वाडा द्यायला निघालेल्या आण्णाला बघुन चपापलेला परुळेकर किंमत विचारतो त्यावर आण्णा त्याला गोल गोल घुमवतात. मधेच आतमधे नजर टाकून पाहुणे आलेत चहापाण्याचं बघा असं फर्मावतात. माई आता येईल मग येईल अशी आपण वाट बघत बसतो खरं पण झुल्याच्या किरकिरण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपण माईला बघण्यासाठी आतुर झालेलो आपण मात्र आण्णा स्वतः जाऊन पितळी तांब्या-भांड्यातून पाणी आणतात तेव्हा मात्र हिरमुसले होतो. Uhoh (त्याच वेळी परुळेकरास पाटणकरणीने फास घेतलेलं अंगणातलं भेसूर झाड दिसतं.. अन तो चपापतो...!)

परुळेकर अन आण्णांच्या ओसरीतच गप्पा सुरु असतात. दिवाणखान्यात कधी जायला मिळणार अन तिथल्या भुईवरचं मडगुलं (चुन्याने रंगवलेली पेटंट नक्षी) अन रेखीव लाकडी जिना कधी बघायला मिळणार या विचारानं आपण सैरभैर झालेलो असतो. आण्णा अन परुळेकरच्या गप्पा सुरुच असतात तेव्हा आपण उगिचच उतावळेपणाने ओसरीतुन माजघराचा दरवाजा अन परसदाराचा वेध घेत असतो. चाणाक्ष कॅमेरामन आपल्या उत्सुकतेला वाटाण्याच्या अक्षता लावत आपणाला थेट आण्णांच्या खोलीतच घेऊन जातो. तिथला माहोल बघून आपले अन परुळेकराचेही डोळे दिपून जातात.

आण्णांच्या खोलियेत छताला २-२ झुंबरं अन खांबांवर डकवलेल्या हुंड्यांतून मंद प्रकाश पसरलेला असतो. आपलं मन मात्र अडकवलेली बंदुक, आण्णांचं सुप्रसिद्ध कपाट, ग्रामोफोन, मेजावरचं तांब्या-भांडं, आण्णांची खाट, तीमागची खीडकी, खिडकीतून दिसणारी बाव, समोरच्या दरवाजातून दिसणारी गॅलरी, भिंतींवरच्या आखिव-रेखीव तस्विरी, देवळ्या हे सर्व जिथं हवं तिथंच आहे का हे पहाण्यात गुंतलेलं असतं. त्याच वेळी आण्णा हसतमुख चेहर्‍याने परुळेकराला गोवा दाखवण्याच्या बोलीवर कपाटाचं दार उघडतात अन तिथला गोवा बघून आपल्याही चेहर्‍यावर मंद स्मित येतं Bw . कपाटाच्या आत आण्णांचा मुद्देमाल जसाच्या तसा असतो.. त्यात अजुन काही बाटल्यांची भर पडलेली दिसते. कपाटाच्या दारांवर आतील बाजुने भिवरी मदनिकेच्या अवतारात फोटोंवर चिकटवलेली असते. तिला बघुन आपणाला बरं वाटतं Bw .

परुळेकराला आण्णा भरपूर आग्रह करुन इतकं मदिरापान घडवतात की परुळेकराचा अक्षरशः पळूरेकर होतो Biggrin . मग नशेत चूर झालेल्या पळूरकराचं लक्ष समोरच्या भिंतीवरील तस्विरीकडे जातं अन तो ते चित्र पाहून त्याला दाद देत असतो तेव्हा आपण मात्र खूप नॉस्टेलजिक होतो. ते चित्र असतं लाल नऊवारी नेसून पाठमोरी उभी राहून आपणाकडे बघणार्‍या पाटणकरणीचं..! तिथं १४ जानेवारी २०१६ अशी तारिख असते. जुनं कॅलेंडर का लावलंय असं पळूरेकर विचारतो तेव्हा आण्णा उत्तरतात "काळ तिथंच तर थांबला..!" (ते ऐकुन आपणला जुने दिवस आठवून उगिच कावरं-बावरं व्हायला होतं Uhoh )

नशेत चुर्रर्रर्रर्र झालेल्या पळूरेकराला भिंतीवरील बंदुक दिसते अन तो अजुन रंगात येतो. आण्णा त्याला बंदुक काढुन त्यात बार भरून देतात अन रिकामी बाटली स्वतःच्या डोक्यावर ठेवत नेम धरायला सांगतात ते बघून पळूरेकराचा खरेच बार सुटतो Rofl Rofl Rofl . शेवटी आण्णांनी अतिशय आग्रह केल्याने परुळेकर शेवटी बंदुकीतुनही बार ठोकतो अन धुरात हरवलेल्या आण्णांच्या हाती फुटलेली बाटली दिसते. आण्णा पळूरेकरावर खूश होत खाली जेवणाची तयारी करण्यासाठी आवाज देतात अन खाली जातात (आपण पुन्हा एकदा ओढीने माई नाही निदान सरिताची लगबग बघायला स्वयपाक घरात जाण्यासाठी धडपडत असतो पण कॅमेरामनने थोपवून धरल्यामुळे आण्णांच्याच खोलीत चरफडत बसतो Uhoh ) त्यावेळी पळूरेकराला खाटेच्या मागच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर बावीकडे कोणीतरी पळालेल्याचा भास होतो. शेवटी पळूरेकर उठून भेलकांडत जिना उतरू लागतो अन निम्यात येतो तेव्हा आण्णा वरुनच त्याला आवाज देतात तेव्हा तो अन आपणही चमकतो. या खोलियेत यायला १२ वाटा आहेत असं हसत हसत आण्णांनी सांगितलं अन ते पळूरेकराला पटलं तरी आपणाला माहित असतं की वर जायला ही एकच वाट आहे Wink

आपण पळूरेकरासोबत भेल्कांडत कपाळ्मोक्ष होणार तेवढ्यात वरील खोलित असणारे आण्णा समोर मुख्य दरवाजात जिन्याच्या तोंडाला पळूरेकराला सावरतात (आपण मात्र भुईवरील नक्षी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत रहातो अन जेव्हा ती दिसते तेव्हा खूप भ्रमनिरास होतो. संपुर्ण वाड्याला रिपेंट करणार्‍या पेंटरने नक्षीसाठी मात्र पाट्या टाकण्याचं काम केलं हे प्रकर्षाने जाणावतंं Uhoh ). मग आण्णा त्या पळूरेकराला जेवण्यासाठी गादीवर बसवतात (आपलं मन मात्र दिवाणखान्यातलं गणापती-लक्ष्मी-सरस्वतीचं चित्र बघण्यात रमतं..!) अन समोर चांदीच्या चौरंगावर चांदीच्या ताटात सुग्रास भोजन वाढलेलं असतं (आपण पुन्हा एकदा माई नाही निदान सरिताची लगबग बघायला मिळते का.. निदान छाया तरी आत्ता येऊन भोचकपणे काहीतरी बोलताना दिसेल किंवा गेला बाजार पांडु तरी "इसारलंय..इसारलंय.." करत हात झटकत आत येईल अशी वाट बघत बसतो..! पण हिरमोडच होतो.. कोण्णी कोण्णी येत नाही Uhoh ).

जेवण झाल्यावर आण्णा पळूरेकराला त्याच्या माडीवरच्या खोलियेत झोपवतात अन सकाळ होते तेव्हा इस्टेट एजंट परुळेकराला उठवत असतो. झापड आलेल्या परुळेकराला जाग येते खरी पण आपणाला समोरचं दृष्य बघून अतिशय धक्का बसतो. रात्री झुंबर-हुंड्यांनी उजळून निघालेल्या खोलीची अक्षरशः वाताहत झालेली असते. संपुर्ण खोली जाळ्या-जळमटांनी अन धुळीने भरलेली असते अन खाट, कपाट, मेज, खुर्च्या, बाकं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं.. छताची कौलं फुटलेली असतात. Uhoh Uhoh Uhoh एजंट परुळेकराला उठवतो तर परुळेकराने जेवणाऐवजी यथेच्छ माती खाल्लेली दिसते. घाबरलेला परुळेकर ओरडत जिन्यावरून खाली येतो खरा पण दिवाणखाना, ओसरी अन संपुर्ण वाडा इतका विद्रुप झालेला असतो की त्याच्या ऐवजी आपल्याच अंगावर भितीने अन संतापाने काटा उभा रहातो Uhoh :रागः

एजंट त्या परुळेकराला थांबवायचा अटोकाट प्रयत्न करतो पण परुळेकर कसाबसा बूट घालत कार मधे बसून पळ काढतो तेव्हा तो बुट घालताना रात्री करकरीत नवीन असणारी आण्णांची वहाण कुजून जीर्ण झालेली दिसते. आपणाला धक्का बसतो की नाईकांच्या वाड्याचं हे असं मातेरं का झालं असेल...? माई, सरिता, दत्ता, छाया, माधव, अभिराम, देविका कुठे आहेत..? निलिमाला नक्की कोणती शिक्षा झाली..?? असे असंख्य प्रश्न समोर उभे रहात असतानाच ४० मिनिटांचा लांबलेला पहिला एपिसोड समाप्त होतो.

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. पाटणकरणीच्या (दुसर्‍या) घराच्या ठिकाणाहून भेसूर वाड्यावर कॅमेरा रोखलेला असतो अन त्या फ्रेममधे जुने पोतेरं झालेलं लुगडं नेसलेली म्हातारी पुसटशी दिसते (ही नक्कीच माई असणार यात शंका नाही.. तिला अशा अवतारात बघणे अतिशय क्लेशदायक ठरणार Uhoh )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल कावेरी अन सयाजीला तर ऑक्टोपसच्या आकाराच्या सावल्या जमीनीवर अन छतावर दिसू लागल्यात हेही कसंतरीच वाटतं >>>>>> स्टार प्रवाहच्या ' सान्ग तु आहेस का' मधल्या काळया सावलीची कॉपी केली की काय? सध्या तिथे काळया सावलीचा ट्रॅक चालू आहे.

काय माहित.. पण हे असं काहीच्या काही सुरू आहे इथे. आता कोविड सिच्युएशन मुळे शूटिंग थांबलं तर परत येरे माझ्या मागल्या Uhoh

चिंदरकरला एवढ्या वर कसा लटकावला. मला तर पांडुचीच भीती वाटते. त्याला हे आधीच्या सीजनमध्येपण कळायचं का कोणाचा आणि कसा मृत्यू होणार आहे ते. शेवंताचं भूत कावेरी तिथे येण्याची वाट बघत होतं का. घरातली माणसं सोडून अण्णाचं भूत सयाजीच्या अंगात का येतं. त्या बांगडया परत दाखवल्या नाहीत. दत्ताच्या चेहऱ्यावर लागलंय ते कधीच बरं कसं होत नाही. एकंदर मेकपचा अतिरेक आहे, गरिबी आणि श्रीमंती दोन्हीसाठी. माईकडे तर बघवत नाही.

चिंदरकरला मोठ्या दोरखंडाने खेच्लं असावं त्या नारळाच्या झाडावर. बावीतल्या रहाटाचा दोर वापरला की काय माहित Uhoh

त्याला हे आधीच्या सीजनमध्येपण कळायचं का कोणाचा आणि कसा मृत्यू होणार आहे ते>> नाही नाही.. त्याला तसलं काही कळत नव्हतं. फक्त त्याचं सगळीकडं लक्ष असायचं अन जे इतरांना दिसलं नाही ते याला बरोब्बर दिसायचं. कधी कधी मनाचे श्लोक पण सांगायचा तो. यावेळीही असंच असेल.. कावळा बसायला अन फांदी तुटायला गाठ पडत असावी Bw

घरातली माणसं सोडून अण्णाचं भूत सयाजीच्या अंगात का येतं.>> कितीही नाही म्हटलं तरी आण्णाचा जावईच लागतो ना सयाजी Wink

दत्ताच्या चेहऱ्यावर लागलंय ते कधीच बरं कसं होत नाही. >> शी: कॅटेगरीतलं लागलंय त्या दत्ताला. तो आला की मी टिव्हीकडे बघतच नाही Uhoh

एकंदर मेकपचा अतिरेक आहे, गरिबी आणि श्रीमंती दोन्हीसाठी. माईकडे तर बघवत नाही.>>+++१११ अगदी अगदी.. पहिल्या ८-१० भागात माईच्या तर ओठाची अन हन्वटीची सालटी निघालेली दाखवलं होतं.. नशिब ती पहिली कळकटलेली माई आता थोडी बरी दिसतेय. गेल्या सीझनला तिच्या साडिच्या अन ब्लाऊजच्या / खणाच्या चोळीच्या रंगसंगती खूप छान असायच्या. कॉट्रास्ट मॅचिंगच असायचं पण भारी दिसयचं. म्हणजे फेंट पोपटी पातळ असलं की डार्क गुलाबी ब्लाऊज.. पिवळं पातळ असलं की हिरवं ब्लाऊज, आकाशी पातळ असलं की डार्क जांभळं ब्लाऊज. भारी दिसायाचं ते. आता मेलं कुठल्याही मळकट रंगाच्या पातळांवर तेच ते काळं ब्लाउज. कधी कधी पिवळ्या नाहीतर राखाडी रंगाच्या पण लाल किनार असलेल्या पातळावर लाल ब्लाऊज असतं तेव्हा बरी दिसते म्हातारी.

राखेचा चे परत जुनेच भाग दाखवायला सुरूवात केलेली दिसते आहे. सोमवारी रात्री तिसर्या सिझनचा पहिला भाग परत दाखवला.

हो.. त्यांचं शुटिंग कोरोना मुळे बंद झालं असावं अशी शंका आहे. इतर मालिका शुटिंग सुरु रहावं म्हणुन इतर राज्यात गेल्या पण राखेचा साठी वाडा हेच प्रमुख पात्र असल्यामुळे त्यांना आकेरी सोडून इतरत्र जाता आलं नाही अन महाराष्ट्रातील लॉकडाऊन मुळे शुटिंग बंद पडलं असावं असा माझा कयास.

कथेत थोडा बदल करवून म्हातारीला अभिराम बंगळूरास घेऊन जातो अन तिथं तिची कावेरी अन अभिराम कशी सरबराई करतात तरी म्हातारीला गावची अन वाड्याची आठवण येत रहाते असं गोव्यात त्या तिघांचं शुटिंग घेऊन काहीतरी दाखवता आलं असतं. फ्लॅशबॅक मधे माईला मागील २ सीझन मधलं काहीबाही आठवतं असंही दाखवून हे लॉकडाऊनचे दिवस भरून निघाले असते. लॉकडाऊन संपल्यावर माई पुन्हा आकेरीत येऊन इथली कहाणी पुढे सुरू ठेवता आली असती.

हो अगदी अगदी

वाडा, माई, अण्णा आणि पाटणकरीण हीच मुख्य पात्रं आहेत, बाकी सगळी नुसतीच पात्रं आहेत Happy

चंपा... गोSS चंपा.... अरुणा..... रेSS अरुणा... सूलू_८२....... स्वप्ना_राज.......Ajnabi..... योगी९००... अरे खंय गेले सगळे..? गोSS भोचकभवानी, _गार्गी_, अमाSS गोSS अमाSS... खंय आसंय...?? खंय शोधु मी तुमका..?? इसारलं तर नाय ना माका..??? येतंय रे बाबांनो.... मी परत येतंय. माझ्यावांगडा माझो वाडो अन वाड्यातली सगळी माणसा परत येताहत. माझो अभिराम येताहां, कावेरी येताहां. मी किती नाय म्हटला तरी माझो पदरच्या आडून दत्ता-सरिता-छाया पण येताहत... बाईलीच्या काळ्या कर्तुकीन आयुष्याची माती झालेलो माझो झील माधवा पण येताहा... माझो पांडबा येताहा..

तां नटमोगरी शेवंताचो गावभवानी चेडु सुसल्या येताहा.. तिचो घो येताहा... काय माहित आता ह्या नाईकांचो वाड्यात पुन्हा गोकूळ नांदलेलो माका बघुक मिळता का नाय तां..!! काय तां रवळनाथाकच ठाऊक रे बाबांनो..!!

येतंय.. येतंय हां मी... वाईच वाट बघा. येतंय.. तुमका भेटूक नक्की येतंय मी. १६ आगस्टला येतंय हां.

Screenshot_20210426-141557_Chrome.jpg

१४ ला संपते.. रात्रीस खेळ चाले३ १६ ऑगस्ट पासून रात्री ११ वाजता येतेय (मी झी५ वर १७ पासून बघेन Wink )

हे काय त्याच दिवशी.. म्हणजे १६ ऑगस्टलाच सुरु होतेय "देवमाणुस"च्या जागी. तिला परत आल्यावर प्रेक्षकवर्ग मिळावा म्हणुन झी वाल्यांनी राखेचा३ रखडवली की काय अशी शंका येत आहे. राखेचा३ चं शुटिंग बरेच दिवसांपासून सुरु आहे असं कळालं.

परवा राखेचा३ पुन्हा सुरू झाली. मी काल झी५ वर भाग बघितला. पहिल्या लॉकडाऊन नंतर राखेचा२ पुन्हा सुरु करताना जसं माई, आण्णा, छाया, माधव, माधव, पाटणकरणीच्या नजरेतून झालेल्या भागांचा पूर्ण आढावा घेतला तसं आता दुसर्‍या लॉकडाऊन नंतर आढावा घेण्यासारखी परिस्थिती नाही. कारण राखेचा३ चं शुटिंग बंद झालं कथा पुढे सरकलीच नव्हती.

तरिही काल पाटणकरणीला अन आण्णाला समोर ठेऊन नक्की काय आणि कशामुळे राखेचा३ मधे उलथापालथ सुरु झाली आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसला. बरा वाटला. परंतू पुढे उर्वरीत कथानक सुरु व्हायला नमनाला अजुन किती तेल घालावं लागेल हे सांगता येत नाही.

काल रात्री कुणी पाहिलं का काय झालं ते...?

Bw

नमनाला घडाभर तेल न घालता जिथपर्यंत कथा आली होती तिथपर्यंत आजच्या भागात आणुन सोडलं गेलं. आधीच्या भागात आपणाला जिथं जिथं प्रश्न पडले होते त्या त्या शॉट्स मधे शेवंताचं भूत घालून आपल्या शंकांचं निरसन करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.. तरिही पहिल्या २ सिझन मधे जी भुतं आहेत असं आपणाला वाटलं ती भुतं नसून ते केवळ भास होते हे दिग्दर्शकाने पटवून दिले होते. आता शेवंता अन आण्णाची भुतं बघणं पटत नाही तरिही नवा प्रयोग म्हणुन हे मान्य करुन पुढे काय होतंय ते बघावसं नक्की वाटलं.

कालच्या भागात पांडबाचा कावेरीला भूत समजण्याचा प्रसंग खदखदून हसवणारा Proud . अगदी माई पण मनसोक्त हसली.

दुसर्‍या लॉकडाऊन आधीच्या शुटिंगमधे दिवाणखाणातलं भुईवरचं मडगुलं (सफेद नक्षी) दिसली नव्हती... ती आता दिसली. चांगलं वाटलं. नाईकांच्या वाड्यात पुन्हा कधी येता येईल का ही आशाच सुटली होती पण आता मात्र पुन्हा सगळा वाडा तोही नवीन रुपात रोज दिसणार म्हणुन मन सुखावलं Bw . आता आजपासून राखेचा३ मधे काय काय नवीन वळणं घेत कथा पुढे सरकते हे बघण्याची उत्सुकता लागली आहे.

बहुतेक तीसरा सीझन घाईगडबडीत सुरु केलेला वाटला. दुसर्‍या लॉकडाऊन नंतर राखेचा३ पुन्हा सुरु झाल्यावर त्यात आण्णा-पाटणकरणीचे शॉट्स टाकून लॉकडाऊन आधीच्या घाईगडबडीतला विस्कळीतपणा सांधलेला दिसत आहे.

कालच्या भागात नव्या सुनेच्या हळदी कु़ंकवाची तयारी माईने सुरु केलेली असते. त्याच वेळी ऑल इन वन साळगांवकर वाड्याच्या डागडुजीचे पैसे मागायला येतो. त्याला बघून माई तिचे मिचमिचे डोळे त्याच्यावर रोखून त्याला तिरकं तिरकं बोलु लागते नेमका तिथं अभिराम येतो. साळगांवकराला तो पैसे देतो अन माई उभ्या उभ्याच पाया पडणार्‍या साळगांवकराला शालजोडीतले ठेउन देते. माईचं लागलेलं बोलणं कसबसं लपवत साळगांवकर तिथुन सटकतो तेव्हा माई अभिरामाला हा साळगांवकर कसा वाडा विकायला बघत होता ते सांगते अन नंतर पांडुला गावातल्या सवाष्ण बायांना निरोप द्यायला धाडते. मग पांडबा "माईनं लगीन केलंय अन अभिरामनं हळदीकुंकु ठेवल्याने.. संध्याकाळी वाड्यावर हळादीकुंकवाला या" असा निरोप देत सुटतो Biggrin

तो निरोप ऐकुन सुसल्या विचारात पडते पण पांडबा तिला सांगतो की तिला हळदीकुंकवाला बोलावलं नाही म्हणुन. पांदुकडून तिला समजतं की अभिराम परत आलाय अन त्याने वाड्याला डागडुजी करून पुन्हा नवं रुप दिलं. हे काम अभिरामने ऑल इन वन साळगांवकराकडून केलेलं कळताच ती पिसाळते अन साळगावकराला घरी बोलावून त्याच्याकडून अभिरामने कामाचा मोबदला म्हणुन दिलेले ३० हजर रुपये काढून घेते. वाड्यावर जाऊन अभिरामला धमकाऊन येतो असं म्हणणार्‍या तिच्या नवर्‍याला ती तसं करण्याची परवानगी देते अन तिचा नवरा - सयाजी ते काम करायला वाड्यावर जातो.

तिथं पाटणकरीण आण्णाला सांगत असते की त्याला अभिरामच्या अंगात शिरायचं आहे अन ती स्वतः कावेरीच्या अंगात शिरेल म्हणजे त्यांना हवा तसा सुखाने संसार करता येईल अन पाटणकरणीची आण्णा सोबत वाड्यात नांदायला येण्याची इच्छा पूर्ण होईल.

इकडे माई भोळसरपणे वाड्यात विघ्न येऊ नये म्हणुन अभिराम अन कावेरीला देवघरात नेऊन देवाला गार्‍हाणं गाते अन देवासमोरचा पान-सुपारीचा विडा अभिरामला देते. तो विडा सोबत असल्यामुळे आण्णाला त्याच्या शरिरात प्रवेश करता येत नाही.

नंतर हातपाय धुवुन येण्यासाठी अभिराम तो पानसुपारीचा विडा टेबलावर ठेऊन बाहेर ओसरीतल्या ओलनीवर टाकलेला टॉवेल घ्यायला जातो त्याच वेळी आण्णा दमदार पावलं टाकत अभिरामच्या अंगात शिरण्यासाठी येत असतो. नेमका त्याच वेळी सयाजी देखील कमरेला पिस्तुल लाऊन अभिरामला धमकावयाला वाड्यात येत असतो. अभिराम पाठमोरा असतो अन त्यात शिरण्यासाठी आण्णाचं भूत तिथं येणार त्याच वेळी तिथं सयाजी येऊन उभा रहातो अन त्या गडबडीत आण्णाचं भूत अभिरामच्या अंगात शिरण्याऐवजी सयाजीच्या अंगात शिरतं अन एपिसोड संपतो. Proud

आण्णा सयाजीच्या अंगात कसा शिरला याचं उत्तर मिळाल्यामुळे बहुतेक इथून पुढे काहीतरी नक्कीच रंजक बघायल मिळेल अशी आशा आहे.

रात्रीस खेळ चाले ३ हा सिझन आता वेग पकडू लागला आहे असं मला तरी वाटतंय. ज्यांनी पहिले दोन सीझन बघितले अन तिसर्‍या सीझनची सुरुवात पाहिली असेल त्यांना त्यावेळी पडलेल्या प्रश्नांची उकल आता दुसर्‍या लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या कथानकात होऊ लागली आहे.

हा सीझन सुरू झाला तेव्हा घाईघाईत शुटिंग का सुरु केलं असावं असं वाटलं होतं पण कदाचित तो सीझन३ चा युएसपी असावा असं आता वाटतंय. पहिल्या सीझन मधे केवळ त्याच सीझन मधले सीन्स होते. दुसर्‍या सीझन मधे पहिल्या सीझनचा प्रीकॅप होता जो पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागाशी संलग्न करून कथानक संपवलं गेलं. परंतु या सीझन मधे पहिल्या अन दुसर्‍या सीझनच्या मधल्या भागातले काही सीन आणि त्यांना सांधणारे शेवंता-आण्णांच्या भुताटकीचे प्रसंग आल्यामुळे लिंक लागत आहे.

गेल्या आठवड्यात सयाजीच्या अंगात चुकुन शिरलेले आण्णा आपण बघितले. मग सयाजी आण्णांसारखा झोपाळ्यावर बसून त्यांच्याप्रमाणेच बोलू लागतो. अभिरामची उलटतपासणी घेऊ लागतो. दहळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सवाष्णांवर नजर रोखू लागतो Proud . सवाष्ण सयाजीला लाखोली वहात आत स्वयंपाक घरात माईपाशी जाऊन कागाळी करते. मग माई बाहेर येऊन सयाजीला जाब विचारणार तोच सयाजी जिन्याची पायरी चढत वर जाऊ लागलेला असतो अन वरून खाली येणार्‍या कावेरीला बघून कॉर्नरलाच थबकलेला असतो. तेवढ्यात माई तिथं पोचते अन सयाजीवर जाळ-धूर काढत घराबाहेर हाकलून लावते Proud . माईला घाबरून अंतर्धान पावलेल्या आण्णांमुळं शरीर पुन्हा ताब्यात आलेल्या सयाजीला मात्र नक्की काय अन कसं झालं हे कळेनासं होतं पण आपणाला मात्र योग्य ती लिंक लागलेली असते.

त्यानंतर पाटणकरीण पण कावेरीचा ताबा घेऊ बघते पण माईनं दिलेल्या विडा-सुपारीमुळे पाटणकरणीला शॉक बसतो Biggrin अन ती काही कावेरीच्या अंगात त्यावेळी शिरू शकत नाही. मग सरिताचं घर अन तिची हळदीकुंकवाला येण्याची लगबग दिसुन येते (ही बाई आता फक्त आणि फक्त वच्छीची अ‍ॅक्टिंग कॉपी करत आहे..!). ती त्यातल्या त्यात बरी साडी घालून वाड्यावर येते अन तिला ओसरीपुढे उभी असताना तिने अन दत्ताने माईला अन छायाला कसा त्रास दिलेला असतो ते आठवतं. त्यावेळचा सीन सरिताच्या डोळ्यापुढून तरळून गेलेला दाखवला जातो अन आपणाला आता माई सरिता अन दत्ताशी अशी का वागते याचं उत्तर मिळतं. छायाने देखील आण्णांच्या वयाच्या रघुकाकांशी का लग्न केलं असेल हेही समजतं. माधवला वेड का लागलं याचंही कारण कळतं (दत्ता आण्णांप्रमाणेच वागु लागलेला असतो. दारूत आकंठ बुडालेला असतो अन घरातील एकेक वस्तू/दागिना विकून खात असतो. माधवला सतत त्याच्या बायकोच्या कृष्णकृत्याचे दाखले देत टोचून बोलल्याने मृदू स्वभावाच्या माधवला वेड लागलेलं असतं Uhoh या सर्व प्रकाराला असह्य होऊन माईने दत्ता अन सरिताला वाड्याबाहेर हाकललेलं असतं).

सरिता वाड्यात रहायला आली हे पारावर बसलेल्या पाटणकरणीला आजिबात आवडलेलं नसतं. सरिताला बाहेर काढण्याची इच्छा ती आण्णांना बोलून दाखवते. मग दुसर्‍या लॉकडाऊनच्या आधीच्या हळदीकुंकवाच्या प्रसंगाचा सीन येतो. सरिता वचवचत दिवाणखाण्यात जाऊन सवाष्णांना अद्वतद्वा बोलून हाकलून लावते. माई अन अभिरामला घालून पाडून बोलते. कावेरीचं मनगट करकचून आवळत तिला मालवणी हिसका दाखवते. त्याप्रकाराने भेदरलेली कावेरी रडत बाहेर पाटणकरणीने फास घेतलेल्या झाडाच्या पारावर जाऊन बसते अन आयतेच पाटणकरीण कावेरीत प्रवेशते Proud . मग काय. अंगात पाटणकरणीला घेऊन कावेरी वाड्यात घुसते अन माईशी-अभिरामशी वचावचा बोलणार्‍या सरिताच्या हातातल्या हळदीकुंकवाने भरलेल्या ताटाला खालून हाताने दाणकन उधळून लावते Proud त्यामुळे ताटातलं हळदीकुंकु भस्सकन सरिताच्या चेहर्‍यावर उडून सरिताका लाल-पिवळी दिसू लागते Biggrin तिला अशी लाल-पिवळी झालेली बघुन माई-अभिरामची जाम टरकते अन ते दोघे भेदरून कावेरीकडे बघत रहातात. पुढच्याच क्षणी कावेरी सरिताचं मनगट हातात धरून तिला हिसका देतदात ओठ खात दम भरते "हे घर माझं आहे... इथे जास्त शहाणपणा केलेला दिसलीस तर कोंबडीची मुंडी पिरगाळावी तशी तुझी मुंडी पिरगाळीन (अन हे असं सांगताना दोन्ही हातानी कोंबडीची मान पिरगाळल्यासारखी करून दाखवते)" Rofl Rofl Rofl .

त्यानंतरही सरिता वाड्यातच राहु लागते अन मग पाटणकरीण तिला घाबरवण्यासाठी सअरिताच्या ओलनीवरील वाळत घातलेल्या साड्यांना खाली उतरवून कावेरीच्या साड्या वाळत घालते. तव्यावर भाकरी करणार्‍या सरिताला अचानक चुलीतला जाळ वाढवते. सरिता झोपलेली असताना कावेरीच्या अंगात शिरून सरिताचा गळा दाबल्याचं स्वप्न पाडते Proud . सरिता जाम टरकते पण कुणाला काही सांगु शकत नाही. रात्री दत्ता जेवणाच्या निमित्ताने परसदारी खोलियेत दारावर टकटक करतो तेव्हा सरिताची भितीने गाळण उडते अन तो दत्ता आहे हे समजल्यावर त्याला आत घेऊन माईने केलेला स्वयंपाक चोरून जेऊ घालते. तेवढ्यात दत्ता सरिताचं लक्ष नाही हे बघून जेवणाचं ताट-वाटी चोरून पळ काढतो. Proud

अशा प्रकारे आपणाला अनुत्तरीत प्रश्नांचा सर्व उलगडा होत गेल्या आठवड्यातील शेवटचा एपिसोड संपतो.

आकेरीचं नयनरम्य दर्शन एरियल व्युने दाखवत आपण वाड्याच्या अंगणात उतरतो पण आता आपणाला हवं असलेलं दृष्य आता परत कधीच दिसणार नसतं हे उमगून आपण थोडे खट्टु होतो. असो.

मागील भागांतील दृष्यांना आण्णा-पाटणकरणीच्या दृष्यांची फोडणी घालून आपल्या शंका सांधल्या जातात.
सयाजीच्या अंगात आण्णा अन कावेरीच्या अंगात पाटणकरीण कसे, कधी अन का शिरले हे एवढं कळालं.

माईच्या विगची पण बरी डागडुजी केली त्यामुळे तिला म्हातारीच्या रुपात बघणं थोडंतरी सुसह्य होत आहे. काल आण्णा अन पाटणकरीण आवसेच्या दिवसाचा मुहुर्त काढून सयाजी अन कावेरीच्या अंगात शिरले अन एकमेकांना मिठी मारत असताना ते सरिताने बघितले.

आता पुढं ती ते छायाला सांगते अन त्यानंतरचे काही सीन्स रघुकाकाची फटफजिती कशी झाली ते दाखवले जाईल असं वाटतंय. बघुया आज काय होतं ते.

मी मागील सीझन मधे म्हटल्याप्रमाणे वच्छी खरेच मेली नव्हती.. ती पुन्हा आली. तिचा विग मात्र पचनी पडला नाही.
या सीझन मधे फुल टू मेलोड्रामा सुरु आहे. भुतं वगैरे येतात हे दिसत आहे. डोकं बाजुला ठेऊन बघितलं तर ते पटतं Proud
फार उशीराचा टाईमस्लॉट असल्यामुळे झी५ वर वेळ मिळेल तसं बघणं सुरु आहे.

शेवंताने शिरेल सोडली म्हणे. तिला तिच्या वजनावरून कोणी नवख्या कलाकारांनी जबराट टोमणे मारले म्हणुन तिने चिडून मालिका सोडली म्हणे. झी वाल्यांनी पण तिला झुलवत ठेवली. नवीन मालिका किंवा प्रोग्रॅमची होस्ट म्हणुन काम देण्याचे मान्य केले होते परंतु असं काहीच झालं नाही. शिवाय राखेचा३ मधे केवळ लाल नऊवारी मधेच अधे मधे काम मिळत आहे याचाही उबग आला असावा. तशी ती गुणी अभिनेत्री वाटली. शेवटी किती केलं तरी वय अन सौंदर्य अबाधीत रहात नाही. नशिबाच्या जोरावर एखादेवेळी कुठल्याही वयात कलाकाराला चमकण्याची अन प्रेक्षकांच्या स्मरणात रहाण्याची भुमिका मिळते त्यातल्या बर्‍याच भुमिका या शिरेलीत आहेत हे मनोमन पटते.

मालिकेतील कलाकारांकडूनच बॉडी शेमिंग होत असल्याने अपूर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताने मालिका सोडली. तिने फेसबुकवर सविस्तर पोस्ट टाकली आहे. हे खरे असेल तर धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.

अपूर्वाला शेवंता म्हणुन सर्वजण मिस करतील.. तिच्या जागी नवीन कोणीतरी येणार हे अजुनही गुल्दस्त्यात आहे. तिची जागा कोणी घेणार की सीझनच संपवणार काय माहित. याही सिझन मधे माईच रोजच स्क्रीन वर दिसते. सलग तीन सीझन माई ९९% तरी रोजच स्क्रीन वर दिसते. तिच्या खालोखाल अभिरामही या सीझन मधे रोज दिसतो आहे.

अपूर्वाच्या जागी क्रुत्तिका तुळसकर आली की. शेवंता म्हणून. दोन तीन एपिसोड मध्ये दिसली पण. अण्णासोबत खंडीभर भाताचे जेवण जेवत्याना. पहिल्या शेवंताची सर नाही. पण आता नवीन आकर्षण भाग्या नायर कावेरी म्हणून व सुसल्याच्या भुमिकेत पौर्णिमा डे असलेने अपूर्वाला कुणी विचारत नसावे.

सुसल्या तर निव्वळ गंडलेली पात्र आहे. तिला काहीही अभिनय जमत नाही. पहिल्या सुसल्यालाच घ्यायला हवं होतं असं अजुनही वाटतं. तोकडे कपडे घातले म्हणुन सुसल्या जमली असं नाही. पहिल्या सुसल्याला अंगभर कपडे असुनही ती बर्‍यापैकी शेवंताचीच मुलगी असली पाहिजे हे पटतं. कदाचित पहिली सुसल्या ह्या आत्ताच्या सयाजीची बायको म्हणुन वाईट दिसली असती एवढ्या एका कारणास्थव काढली असेल तर ते खरंच चुकलं.

खरंतर दुसर्‍या सीझन मधे पण अशीच बदला बदली झाली होती. आधीचे नेने वकील प्रकृती अस्वास्थामुळे बदलले गेले पण एक-दोन एपिसोड नंतर नव्या नेने वकिलांनी पण चांगला जम बसवला होता. तसंच या शेवंताचंही होईल ही अपेक्षा. शेवटी व्यक्तिरेखा कागदोपत्री सशक्त असली की ती कोण निभावतंय याला जास्त महत्त्व उरत नाही.

Pages