ती.... आणि तो....

Submitted by nimita on 6 March, 2021 - 21:15

ती : "उद्या रविवार आहे. लक्षात आहे ना?सकाळी लवकर उठायचंय. आणि नेहेमीप्रमाणे यावेळीसुद्धा कोणतीही कारणं चालणार नाहीत. ऐकतोयस ना ?"

तो : "हो ,राणी सरकारांचा हुकूम सिर आखों पर ... मी कधी तुला नाही म्हणालोय का? कितीही कारणं सांगितली तरी शेवटी येतोच ना तुझ्याबरोबर.."

दोघंही उघड्या डोळ्यांनी दुसऱ्या दिवसाची स्वप्नं रंगवत राहिले.शब्दांचा आधार न घेता एकमेकांशी बोलत राहिले.... मनातल्या मनात !!

ती :

"हो, माहितीये मला. उगीच आढेवेढे घेतोस नेहेमी ; पण मनातून तूही आतुर असतोस दर रविवारी...माझ्याबरोबर देवळात यायला!

माझ्या सोबत येतोस खरा... पण माझ्या बरोबर कधीच नाही चालत. सतत माझ्या मागून मागून चालत राहतोस.... अगदी माझ्या पावलांवर पावलं टाकत! त्या वेळचं तुझ्या चेहेऱ्यावरचं ते समाधान मला स्पष्ट दिसत असतं... अगदी मागे वळून न बघताही !पण एक सांग ?... असं माझ्या मागून चालण्यात कसला आनंद मिळतो रे तुला ?

पहिल्यांदा जेव्हा मी तुला याबद्दल हटकलं तेव्हा हळूच एक डोळा मिटत म्हणाला होतास -'आगे है क़ातिल मेरा और मैं पिछे पिछे। '

तू आणि तुझी नौटंकी....

किती लाजले होते मी तेव्हा... सगळ्यांसमोर तुझी ही अशी धिटाई !! पण तू तर असाच आहेस .. unpredictable .. कधी काय म्हणशील, काय करशील - नेम नाही ! ए, पण खरं सांगू? तुझी ही धिटाईच तर आवडते मला ! तुझं हे असं उत्स्फूर्तपणे व्यक्त होणं - हेच तर भावतं मनाला... तुझ्या स्वच्छ, नितळ मनाची साक्ष मिळते मला यातून ! तुझ्या हृदयावर कोरलेलं माझं नाव अगदी स्पष्टपणे वाचता येतं मला अशावेळी !!

जेव्हा मी गाभाऱ्यातल्या मूर्तीसमोर उभी असते तेव्हाही नसतोस तू माझ्या जवळ... समोरच्या खांबाला टेकून उभा राहतोस नेहेमी. पहिल्यांदा ते देवळातले पुजारी म्हणाले देखील... "जोडीने नमस्कार करा देवाला!"

त्यावर त्यांनाही ऐकवलंस... "ती एकटीच पुरेशी आहे... आमच्या दोघांच्या वतीने नमस्कार करायला... "

पण तू काहीही कारणं सांगितलीस तरी मला ठाऊक आहे ना त्यामागचं खरं कारण ...

तिथे लांब उभा राहून माझ्याकडे बघत असतोस - अगदी एकटक ! तुला वाटत असेल की मी डोळे बंद केले म्हणून मला दिसणार नाही ... पण... पण त्या बंद डोळ्यांच्या पडद्यामागूनही मला तुझी नजर जाणवते.... माझ्या चेहेऱ्यावर रेंगाळणारी... प्रत्यक्ष बघू शकले नाही तरी अनुभवू शकते मी - तुझ्या त्या नजरेतून झिरपणारं माझ्यावरचं तुझं प्रेम !! किती दिलासा देऊन जातो तुझ्या नजरेचा तो ओलावा! मग हळूच डोळे किलकिले करून बघते मी तुझ्याकडे.... तुझ्याही नकळत . .. आणि सापडते मला - तुझी ती नजर - माझ्या चेहेऱ्यात अडकलेली !! इतकं काय बघत असतोस रे ?

तुला एक गुपित सांगू ? आजकाल ना - मी मुद्दामच जरा जास्त वेळ प्रार्थना करते देवाची... तेवढीच जास्त वेळ तुझी नजर अनुभवता येते ना - म्हणून !

आणि जेव्हा प्रदक्षिणा घालायची वेळ येते तेव्हा .... तेव्हा मात्र अगदी निमूटपणे तू सुद्धा येतोस - पण पुन्हा तसाच ... माझ्या बरोबर नाही ; तर माझ्या मागून ..

एकदा मला रागच आला होता तुझा ... म्हटलं सुद्धा मी तुला -" माझ्या बरोबरीने चालायची लाज वाटते का रे तुला ?" तेव्हा म्हणालास -" असं सारखं सारखं बरोबर असलं तर बघणाऱ्यांची दृष्ट लागते म्हणे ..."

काहीतरीच तुझं ! पण मी मुद्दामच काही बोलले नाही.. नाहीतर तू प्रदक्षिणा घालणंच थांबवलं असतंस कदाचित !

पुजाऱ्यांच्या हातून प्रसाद घेताना पण तुझी नेहेमीचीच नाटकं... म्हणतोस -" माझ्या वाटचा तिलाच द्या ."

पण मग देवळाच्या पायऱ्या उतरताना माझ्यासमोर प्रसादासाठी हात का बरं पसरतोस ??

कधीकधी मला तुझं वागणं कळतच नाही बघ !! कधी तुझं प्रेम अगदी ओसंडून वाहात असतं तुझ्या डोळ्यांतून ... पण मग अचानक एकदम अलिप्त झाल्यासारखा वाटतोस... माझ्या सोबत असूनही आपल्याच विश्वात रमलेला !!

पण तरीही मी पूर्ण आठवडाभर त्या एका रविवारच्या सकाळची वाट बघते... तुझ्यासाठी - तुझ्या सहवासाचे काही क्षण वेचण्यासाठी !!

तू म्हणतोस तुला देवदर्शनात अजिबात रस नाही.... तरीही येतोस - दर रविवारी - केवळ मी म्हणते म्हणून !

खरं सांगू ?? मलाही माहितीये - देवाची आठवण करायला, त्याची प्रार्थना करायला देवळात जायची काहीच गरज नाही. बसल्या जागी सच्च्या मनानी आळवणी केली तरी पोचते ती देवापर्यंत !!

पण तरीही मी देवळात जाते .... कारण तिथे मला तू भेटतोस... ती काही मिनिटं ही फक्त आपली दोघांची असतात... आणि त्या मंतरलेल्या क्षणांच्या शिदोरीवर माझा पुढचा संपूर्ण आठवडा रंगून जातो.....

म्हणूनच , म्हणूनच आज पण मी वाट बघतीये - उद्याच्या इंद्रधनुष्यी सकाळची !!"

तो :

"कधी एकदा उद्याची सकाळ उजाडतेय असं झालंय मला... कधीकधी मला स्वतःचंच इतकं आश्चर्य वाटतं ना ! एरवी माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट न करणारा मी - दर रविवारी केवळ तुझ्या सांगण्यावरून तुझ्या बरोबर त्या देवळात येतो. खरं सांगायचं तर माझ्या मते देवळात न जाताही देवाची भक्ती, त्याची आराधना करता येते. पण तरीही येतो मी तुझ्या बरोबर.... नाही नाही - बरोबर नाही - तुझ्या मागे मागे येतो मी ! मला आवडतं असं तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालायला. देवळात शिरताना तू जेव्हा पाय धुवून आत जातेस ना ; तेव्हा तिथल्या फरशीवर उमटलेली तुझी ती नाजुकशी पावलं बघायला खूप आवडतं गं मला .... खरंच सांगतो - अगदी लक्ष्मी ची पावलं भासतात ती मला! आणि जेव्हा मी तुझ्या त्या पावलांच्या ठशांवरून चालतो ना तेव्हा तो ओलावा माझ्या मनावर प्रेमाची शिंपण करतो.

ए, तुला आठवतंय .. पहिल्यांदा जेव्हा तू मला याबद्दल हटकलं होतंस तेव्हा मी काय म्हणालो होतो ?? ... 'आगे है क़ातिल मेरा....' कित्ती गोड लाजली होतीस तू तेव्हा ! खरं म्हणजे मला हे असं सगळ्यांसमोर रोमँटिक होणं, आपल्या भावना अशा लोकांसमोर जाहीर करणं - अजिबात आवडत नाही ... पण मी जाणून आहे - तुला माझं हे असं व्यक्त होणं खूप आवडतं. हो ना ? आणि म्हणूनच मी अधूनमधून असा बेधुंद होतो - तुझ्या चेहेऱ्यावरची ती लाजेची लाली आणि डोळ्यांतली ती चमक बघता यावी म्हणून !

जेव्हा तू डोळे मिटून, हात जोडून त्या गाभाऱ्यातल्या देवाची प्रार्थना करत असतेस ना : तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे ते शांत, सोज्वळ भाव अगदी बघत राहवेसे वाटतात... म्हणूनच तर मी असा तुझ्यापासून लांब उभा राहातो... शेजारी उभा राहिलो तर तुझं ते ध्यानस्थ होणं कसं अनुभवता येईल, तूच सांग !

ए, अगदी खरं खरं सांगशील? इतक्या मनोभावे काय मागत असतेस गं दरवेळी तुझ्या त्या देवाकडे? कधी कधी भास होतो मला - तू काहीतरी पुटपुटत असतेस... मंत्र म्हणतेस का कुठला? त्यावेळी तुझ्या चेहेऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवतं मला... वाटतं... वाटतं साक्षात सरस्वती देवी उभी आहे समोर !

तुझ्या नकळत - तुझं ते रूप माझ्या डोळ्यांत साठवून ठेवायला जन्मभर त्या खांबाला टेकून उभा राहायला तयार आहे मी ! पण हल्ली जरा जास्तच प्रार्थना करतेस बरं का तू ! एवढं काय मागायचं असतं देवाकडे ? माझं तर फक्त एकच मागणं असतं नेहेमी....आपली ठरलेली प्रार्थना - 'देवा; ती जे काही मागतेय ना ते तिला मिळू दे... बस्स, और कुछ नहीं चाहिये।'

पण तुझी ती प्रार्थना संपते आणि तू माझ्या दिशेनी एक कटाक्ष टाकतेस ... मग नाईलाजाने मला माझीही समाधी सोडावी लागते. पण तुझ्या त्या एका कटाक्षावर - नजरेच्या एका इशाऱ्यावर मी संमोहित झाल्यासारखा तुझ्या मागे मागे येतो प्रदक्षिणा घालायला ! तेव्हा सुद्धा मुद्दाम तुझ्या मागेच राहतो... तुझी ती गजगामिनी चाल.. आणि प्रत्येक पावलागणिक हेलकावे घेणारी तुझी ती लांबसडक तिपेडी वेणी.... केवड्याच्या बनात सळसळणारी नागीणच जणू!! तुझ्या त्या मोहिनी रुपाचं गारुड काही केल्या हटत नाही बघ माझ्या अस्तित्वावरून !

तुलाही कळत असते ना गं माझी ती भारावलेली अवस्था ! तुझ्या त्या तीन प्रदक्षिणा मधे मी माझा सप्तपदी पूर्ण करून घेतो... प्रत्येक वेळी नव्यानी !!

आणि मग बघता बघता देवळाच्या पायऱ्या उतरायची वेळ येऊन ठेपते. पण अजून एक विधी शिल्लक असतो हं..... तुझ्या हातून प्रसाद घेण्याचा विधी ... तू नेहेमी विचारतेस ना मला की ' मी पुजाऱ्यांकडून प्रसाद का नाही घेत?' वेडाबाई !! जर खुद्द अन्नपूर्णेच्या हातून देवाचा प्रसाद मिळत असेल तर तो नाकारायला मी काय खुळा आहे?

तुझ्या हस्तस्पर्शानी अजूनच गोड झालेले ते साखरफुटाणे ... माझा पुढचा संपूर्ण आठवडा माधुर्यानी भरून टाकतात.... तुझ्या आठवणींचं ते माधुर्य चाखतच मी पुन्हा एकदा येणाऱ्या रविवारची वाट बघायला लागतो !!!".......

असे कित्येक रविवार आले आणि गेले... ती आणि तो... दोघं एकत्र देवळात जात राहिले.. ती देवदर्शनाच्या बहाण्याने त्याच्या सहवासात रमत होती... आणि तो ... तिला सोबत करण्याच्या बहाण्याने त्याच्या देवीच्या विविध रूपांचं दर्शन घेत होता !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users