माझा स्वभाव आहे

Submitted by निशिकांत on 6 March, 2021 - 11:12

माझा स्वभाव आहे--( वीक एंड लिखाण )
मी पूर्वीच या सदराखाली लिहिले होते की माझ्या गझला डॉ पराग चौधरी आणि सौ, मिनाक्षी चौधरी यांनी गाऊन एक खास कार्यक्रम केला होता औरंगाबाद येथ. हा कार्यक्रम खूपच रंगला आणि श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. कार्यक्रम तब्बल तीन तास चालला. हा कर्यक्रम म्हणजे माझ्या आयुष्यातील अत्त्यूच प्रसंग होता.कविता/रचना कितीही छन असल्या तरी त्या पुस्तकात पडून रहातात. पण जर त्या गायल्या गेल्या तर त्या रचनांचे सोने होते हे मात्र तितकेच खरे. या गझलेबाबतही असेच झाले. मी ही गझल लिहिली आणि वहीत पडून राहिली होती. मी स्वतःच फार इंप्रेस झालो नव्हतो. पण ही गझल जेंव्हा डॉ चौधरी यांनी गायली तेंव्हा माझ्या ध्यानात आले की ही गझल बर्‍यापैकी फ्लॉसफिकल झाली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मीच केले होते. मी स्टेजवरून बघत होतो की दुसर्‍या ओळीतील एक वयस्क गृहस्थ ऐकत ऐकत एक कागदावर कांही लिहून घेत होता. कार्यक्रम संपल्यावर तो माणूस स्टेजवर आला आणि मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला कि आखरी गझलमे एक शेर गहजब का है. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू घळघळत होते. मी दंगच झालो. त्याला आवडलेला शेर हा आहे:
माझ्या कलेवराला मम अंगणी पुरावे
खांद्यास भार नसणे माझा स्वभाव आहे
माझ्या कविता आणि गझलांना खूप प्रतिसाद येतात पण या गझलेवरचा कार्यक्रम झाल्यानंतरचा प्रतिसाद माझ्या काळजावर कोरून गेला आहे. केवळ अविस्मरणीय. ही पूर्ण गझल खाली देतोय जिचा आपण आस्वाद घ्यावा.

स्वछंद मस्त जगणे माझा स्वभाव आहे
दु:खात शांत निजणे माझा स्वभाव आहे

गरिबीत पाहिल्या मी हस-या अनेक जखमा
त्या कोंदणी सजवणे माझा स्वभाव आहे

वस्तीत आज माझ्या रडणे निषिध्द आहे
हसणे कधी हसवणे माझा स्वभाव आहे

मजला नकोत कुबड्या अथवा शिड्या कुणाच्या
लागून ठेच, चढणे माझा स्वभाव आहे

बाजार आज भरले ईमान शील विकण्या
सौदे कधी न करणे माझा स्वभाव आहे

वाटेत लाख काटे, मज काळजी कशाला?
येता प्रसंग उडणे माझा स्वभाव आहे

उध्दार मम कराया देवास हाक कैसी ?
करणे प्रयत्न झटणे माझा स्वभाव आहे

पाठीत वार केले, मजला न राग त्यांचा
वाईट ते विसरणे माझा स्वभाव आहे

उपदेश मी न केला, सांगीतली न गीता
हातात शस्त्र धरणे माझा स्वभाव आहे

माझ्या कलेवराला मम अंगणी पुरावे
खांद्यास भार नसणे माझा स्वभाव आहे

"निशिकांत" तू कशाला केलीस आत्महत्त्या ?
पिकण्या अधीच गळणे माझा स्वभाव आहे

ही सुंदर गझल ऐकण्यासाठी क्लिक करा---https://www.youtube.com/watch?v=Na_BhSEGWyw

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users