असेच काही!

Submitted by mrsbarve on 4 March, 2021 - 01:37

हे असं काय होते आहे? काही म्हणून लिहिता येत नाहीय. एका विचाराशी स्थिर होता येत नाहीय.

मी नुसती लिहीत जातेय, पण त्या शब्दांना ना अर्थ,ना आकार,ना संबद्ध कथासार ....

पण त्याचे काही वाईट नाही वाटत. झोपण्यापूर्वी जितक्या सहजपणे चष्मा काढून काड्यांची घडी करून वर ठेवते तशीच ,तेव्हढ्याच प्रतिक्षिप्त क्रियेने हे असे रोजचे दोन शब्द डायरीत उतरवतेय.

काय लिहू? हमम सकाळी जाग आल्याच्या क्षणापासून आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या बद्दल?

काहीच घडलं नाही...कदाचित काहीच उतरले नाही... कातडीची संवेदना कमी झालीय.. विचार आणि शरीर एकाच वेळी एकमेकांबरोबर असतातच असे नाही. त्यामुळे लिहावे असे काहीच नाही.

उदासीनता या ह्रदयाला वगैरे तर नाहीच नाही..

हि अशी घट्ट झाकणाच्या डब्यात बंद असण्याची अवस्था आहे. काय म्हणतात हिला?

काही नवे वाचायला नको,जुने काही आठवत नाही, काही घडल्याची आठवण नाही, काही घडावं अशी इच्छाही नाही.

अनुभवांची शिदोरी - ना काही त्यात भर पडत ना काही गळल्याची जाणीव होत ...

मग लिहायचं काय ? कथा ? कविता? ललित? अशा वेळी सगळंच - अर्थहीन बडबड - जशी हि सुद्धा! म्हणून कसला विषय नाही, लिहिताना कुठला आव नाही ,

म्हणजे -

सुंदर तरुणीला खांद्यावर उचलून घेतलेला साधू तिला नदी पार करून झाल्यावर काठावर उतरून देतो, त्याचे सहकारी मित्र मात्र तिला न उचलता ते ओझेच मनावर वागवत राहतात. निदान ते नाही...

ना बज राहा है बास ,ना बजेगी बासुरी!

हा हा हा हा !

काहीही ,काहीही ,असंबद्ध ,आकार उकार नसलेलं, हा असा विषय तरी सापडलाच कि खर तर?

लिहिताना काय वाटतंय सांगू?

चला काही तरी सापडलय, काही तरी जमिनीच्या बाहेर येऊ पाहतय,काही तरी मुक्त होऊ पाहतय.

अरेच्च्या म्हणजे आत काही तरी आहेच ,जे फक्त खूप खूप लेयर्स मधून हळू बाहेर पडतंय .

चला फार काही साहित्यिक मूल्ये वगैरे नसली तरी काय झाले?

ते त्या कोकणातल्या नाटकात म्हणतात तसे "माझ्या मनाचे मनोगत" तर झालेच कि... Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला पण असंच कधी कधी वाटे की काहीतरी वाटावे... नंतर वाटे राहुदे रोज रोज काय वाटायचे तेव्हा.. पण मग खूप विचाराअंती वाटण्यासाठी मिक्सरच घेतला..घुर्रर्रर्रर्रर्रर्र........................!