देवपण विसरलेला देव...

Submitted by १८तन्वी on 2 March, 2021 - 15:59

जेव्हा एक आयुष्य सुरू होण्याआधीच संपतं, तेव्हा कशाचाच अर्थ लागत नाही...देवाच्या असण्याचासुद्धा...

देवपण विसरलेला देव...

इवल्याश्या जीवाला आकार देऊन होऊ देतोस मोठं...
मग ऐन बहरातल्या तारूण्याला मृत्यूच्या शापाचं ओझं...
स्वप्नाळू मनाला नुकतेच फुटलेले पंख का रे कापतोस,
देवा तू का रे अश्यावेळी तुझे देवपण विसरतोस...

तुझ्या कृपाळू वरदहस्ताला सुटतो बहुतेक अश्यावेळी कंप...
विखुरतात देहाची पिसे तूच निर्मिलेल्या मातीत संथ...
एक एक श्वास तुटतो डोळ्यांमधला प्राण विझतो,
देवा तू का रे अश्यावेळी तुझे देवपण विसरतो...

सुरूवात असते एका जीवाची स्वत:चं आकाश शोधण्याची...
तेव्हाच तुझी ताकद कमी पडते का रे हे जग चालवण्याची...
सहन कर हा आरोप, सळसळणारं रक्त जणू चोरतोस,
देवा तू अश्यावेळी खरंच देवपण विसरतोस...

देह नश्वर असतो म्हणतात,
पण तू इथे स्वत:च मोठेपण मिरवतोस...
पोटचा गोळा गमावलेल्या आईच्या डोळ्यातील पाण्याला मात्र अमर करतोस...
देवा तू अश्यावेळी खरंतर तुझे देवपण विसरतोस...

बापावरही तुझं बारीक असतं लक्ष...
आयुष्यभरासाठी थिजवून टाकतोस त्याचे वाट पाहणारे नेत्र...
हे सगळं पाहून तू कसा काय निजतोस,
अश्वत्थाम्याची जखम दोन कपाळांवर कोरतोस...
देवा तू का रे अश्यावेळी तुझे देवपण विसरतोस...

‘हे असं का?’ या प्रश्नाची तुला भीती वाटते का रे...
याचं उत्तर असूच शकत नाही या जाणिवेने तू पण कधी रडतोस का रे?
असो.. हे असं व्हायचं कधीतरी म्हणून तू ही विषय सोडतोस का रे?
देवा अश्यावेळी तुझं देवपण सोयीस्कर विसरतोस का रे?

पण तुझ्या देवपणाला कोणी आव्हान देणार नाही, तू मात्र घाबरू नये...
नशीब, नियतीचे फासे...हे उसासे, हे दान आम्हांस सरावाचे, सवयीचे...
तरीही तुझ्याकडे एकच मागू का रे, असा दानवासारखा वागू नकोस...
देवा बघ जमलं तर तू तुझं देवपण विसरू नकोस...

-तन्वी

Group content visibility: 
Use group defaults

कवितेत मांडल्या गेलेल्या मुद्द्यांशी १००% टक्के सहमत नसलो तरी सुद्धा, एक मालिका-शीर्षक गीत आठवलं,

"माणूस होऊन जगणे थोडे" जगून पहा...देवपणा तू सोडून खाली, उतर जरा...मायबापा! मायबापा!
तू नसल्याचा भास पसरला, चहूकडे...दगड-मातीच्या भिंतींमधूनी विहर जरा...मायबापा! मायबापा!
सुंदर गीत, सुंदर मालिका - "प्रपंच"... अशा मालिका आता बनतच नाहीत!

हे लेखन छान! पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा!