जे जे मनात होते

Submitted by निशिकांत on 2 March, 2021 - 11:01

ऐकून थक्क झाले, जे जे घरात होते
बोलून टाकले मी जे जे मनात होते

एकत्र नांदले ते, बसचे जणू प्रवासी
ना ओल अंतरी ना कोणी कुणात होते

मोठेपणा जगाला दावावयास स्पर्धा
होतो विवाह छोटा, मोठी वरात होते

काळीज काळजीच्या स्वाधीन जाहलेले
सारी मुले क्रमाने का दूर जात होते?

ओलांडल्यास रेषा, दावून काय घडते
भय वाल्मिकी ऋषीने भरले स्त्रियात होते

गंगातिरी कधी मी प्रत्यक्ष पाहिले की
उरकून स्नान पापी, टाकीत कात होते

भक्तास मंदिरीही दिसले कुणी न वाली
नवसास पावल्याने, याचक सुखात होते

पत्नीसही पणाला लाऊन हारलेल्या
का पांडवास चित्रित केले उदात्त होते

"निशिकांत" एवढा का नाराज आजही तू?
घडले घडावयाचे जे प्राक्तनात होते

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users