आज ती मैफिल सुनी

Submitted by निशिकांत on 1 March, 2021 - 00:38

आरसा सांगून गेला
जाहले आता जुनी
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

लेक होते, माय झाले
आज आजी मी घरी
सर्व मोसम पहिले म्या
ग्रिष्म अन् श्रावणसरी
आठवांनी गतक्षणांच्या
कंठ येतो दाटुनी
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

बोलते माझ्यासवे मी
हेच संभाषण अता
जीवनाचे नाट्य बनले
एकपात्री का कथा?
संपण्या आधीच नाटक
सर्व गेले सोडुनी
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

तेवले नंदादिपासम
वादळांशी झगडले
संपली उपयोगिता अन्
कोपर्‍याला पहुडले
काजवेही दूर गेले
हारली का दामिनी?
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

कालचक्राचाच महिमा
दोष कोणा का उगा?
थांबलेला काळ जेथे
एक मज दावा सुभा
प्राक्तनाने वाढलेले
भोग घ्यावे भोगुनी
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

झिंग येते भोगताना
वेदना बावनकशी
कुटुंबासाठीच झिजणे
आगळी मिळते खुशी
मी पुन्हा, स्त्री जन्म घेइन
ईश्वराला मागुनी
रंगली होती कधी जी
आज ती मैफिल सुनी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users