ओळख वेदांची - भाग १

Submitted by शीतल उवाच on 24 February, 2021 - 06:36

वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!

वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? नक्कीच नाहीत. एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.

आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला असा वाक्प्रचार खुपदा ऐकण्यात येतो. या चौदा विद्या कोणत्या?

४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्रे अशा एकूण चौदा विद्या किंवा विद्याशाखा होत. यातील वेद सोडून इतर ग्रंथ तूर्तास दूर ठेऊयात.

संस्कृतात विद् म्हणजे जाणणे, वेद हा शब्द येथून उगम पावला. वेद ४ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.

ऋग्वेद

ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद१. देवतांना आवाहन करण्यासाठीच्या मंत्रांना (आजच्या भाषेत श्लोकांना) ऋक्२ किंवा ऋचा असे म्हणता येईल.

ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते असा ऋचांचा समूह (आजच्या भाषेत स्तोत्र). ऋषीसूक्त, देवतासूक्त, अर्थसूक्त आणि छंदसूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. ऋग्वेदात जवळजवळ अशी १०२८ सूक्ते (स्तोत्रे) आहेत एकूण ऋचांची संख्या ही १०५८० इतकी भरते.

हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय३ म्हणजेच पुरुषाने (माणसाने) न रचलेले असेही म्हणतात.

आजच्या व्हॉटसॅप आणि फेसबुकच्या युगात एखादी माहीती किंवा बातमी जर सकाळी सांगितली तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटतात की खरं खोटं तर दूर मूळ बातमी काय होती हे ही विसरायला होतं! अशा वेळी ऋग्वेदासारखा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जसा रचला गेला तसाचा तसा बदल न होता आपल्यापर्यंत पोचलाच कसा? याचे उत्तर ऋग्वेदाच्या रचनेत आहे. असे म्हणतात की ऋग्वेदाच्या रचनेच्या काळात लेखनकलाच अस्तीत्त्वात नव्हती. शाकल (शाकाल नव्हे!) सारख्या ऋषींनी ऋग्वेदाची रचना आणि पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.

आता ऋग्वेदाची रचना थोडी समजाऊन घेऊ. ऋग्वेदात १० मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखे विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. २ ते ८ ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या त्या ऋषीकुलातील ऋषींचे मंत्र आहेत. १ले आणि १० वे मंडल संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या ऋषींच्या मंत्रांचे आहे. ९ व्या मंडलात केवळ सोमरसावरची निरनिराळ्या ऋषींची सूक्ते येतात. ही दहा मंडले खालील प्रमाणे. १) संमिश्र २) गृत्समद ३) विश्वामित्र ४) वामदेव ५) अत्रि ६) भरद्वाज ७)वसिष्ठ ८) कण्व व अंगिरस(?) ९) पवमानसोम (संमिश्र) १०) संमिश्र

प्रत्येक मंडलातील सूक्ते ही देवता, शब्दसंख्या इ च्या पूर्वनिश्चित क्रमाने येतात त्यामुळे त्यातही मागेपुढे होण्याचा संभव नाही.

काय आहे या सूक्तात?…….

गोष्टी! चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.

तत्त्वज्ञान…. ऋग्वेदात जितके तत्कालिन समाजजीवनाचे प्रतिबिंब आढळते तितकेच तत्कालिन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचेही. सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्त्वे, परमात्मा अशा अनेक गुढ विषयांवरचे चिंतनही ऋग्वेदातील सूक्तांत आढळते.

देवता… उषा, अश्विनौ, भग, पूषन्, अर्यमा, सोमरस, सूर्य, सविता, रुद्र, सोम (ग्रह), ब्रह्मणस्पती, अदिती, इंद्र, मरुत्, मित्रावरुण अशा अनेक देवतांची स्तुती ऋग्वेदातले मंत्र करतात. त्याकाळी देवतास्वरुपात प्रामुख्याने निसर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जात असे. अशा देवतांना आवाहन करणारी, त्यांची स्तुती करणारी अनेक सूक्ते ऋग्वेदात आहेत. एकाच देवतेच्या संदर्भात येणा-या मंत्रांच्या गटाला देवतासूक्त म्हणतात.

ऋग्वेदातील अनेक मंत्र आपल्या परिचयाचे आहेत पण ते ऋग्वेदातले आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. उदाहरणार्थ

आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे.

पुर्वी दुरदर्शनवर लागणा-या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत (मराठीत टायटल सॉंग!) आठवतंय का? ‘पृथ्वीसे पहीले सत नही था……’ ऋग्वेदातल्या नासदीयसूक्ताचे ते भाषांतरीत गाणं होतं. ऋग्वेदातल्या काही गोष्टीही या मालिकेत दाखवल्या होत्या… सृष्टीच्या उत्पत्तीविषयक गुढ चर्चा करणारे हे सूक्त आहे.

याचप्रकारे पुरुषसूक्तासारखे आपल्या ऐकण्यातले सूक्त हे ही ऋग्वेदातलेच आहे.भारतीय नौदलाचे ‘शं नो वरूणः’ हे बोधवाक्यही ऋग्वेदातलेच आहे.

एकुण काय तर वेद हे अपौरुषेय आहेत की नाहीत हा मुद्दा वादाचा असला तरी ते अगम्य आणि अज्ञेय नक्कीत नाहीत.. यजुर्वेदासह इतर वेदांबद्दल पुढील भागात……

तळटिप

१. ऋचां समूहो ऋग्वेदः। २. ऋच्यते – स्तूयते प्रतिपाद्यः अर्थः यथा या ऋक् ३. अपौरुषेयम् वाक्यं वेद। – सायण

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच! मी तुम्हाला सुचवणार होते की तुमच्या ब्लॉगवरची ही लेखमाला मायबोलीवर देखील आणा म्हणून!

ऋग्वेदाचे सर्व प्रथम हिंदी भाशांतर स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी केले , पण आठ की नऊ मंडले झाली अन मग ते टीबी की कशाने तरी गेले

त्यानंतर अनेकांनी विविध भाषेत भाषांतर केली , पण कुणाचेच पूर्ण झाले नाही , कुणी हिंदीत 4 केले , कोण इंग्रजीत 5 करून गप्प बसला किंवा मेला

मराठीत श्री चित्राव शास्त्रींनी ऋग्वेदाचे मराठी भाशांतर करताना हा सगळा इतिहास व्यवस्थित अभ्यासला

आणि मग त्यांनी एक विचित्र निर्णय घेतला , त्यांनी भाषांतर करताना 10 व्या मंडलापासून उलट क्रमाने सुरुवात केली

हेतू हा की माझेही काम समजा अर्धवटच झाले तरी पूर्वी ज्यांनी करून ठेवले आहे , तिथवर जरी पोचले तरी इंग्रजी , हिंदी , मराठी सगळे मिळून का होईना पण लोकांना पूर्ण ऋग्वेद वाचायला मिळेल ,

आणि त्यांचे पुस्तक मात्र पूर्ण झाले आणि त्यानंतर ते भरपूर जगलेदेखील आणि त्यांनी अजूनही काही भाषांतरे केली .

ऋग्वेद , हिंदू इतिहास , वैदिक साहित्य वाचायचे असेल तर दयानंद स्वामींचे हिंदी आणि चित्राव शास्त्री यांचे मराठी पुस्तक अगदी must आहे,

विनोबांचेही एक ऋग्वेद सार म्हणून पुस्तक आहे, पण ते गाळीव आहे

https://www.exoticindiaart.com/m/book/details/rigveda-in-marathi-NZJ999/

आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे./////////////////////

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
अर्थ - ज्याची कीर्ती आम्ही वृद्ध लोकांकडून ऐकत आलो आहोत, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वसंपन्न असा जो पूषा म्हणजेच सूर्य आमचे कल्याण करो. ज्याती गती अकुंठित आहे असा जो ताक्ष्र्ये तो आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो.
या प्रार्थनेत पहिले नाव इंद्राचे येते. इंद्राच्या अशा असंख्य प्रार्थनांनी वेदवाङ्मय भरून राहिले आहे. त्या सर्वांत पडण्याची गरज नाही. महाभारत काळाच्या पूर्वसंध्येपर्यंत इंद्राचे महत्त्व टिकून राहिले दिसून येते. महाभारत काळात मात्र नव्या धर्ममताने इंद्राचे महत्व संपुष्टात आले.

छान लिहिले आहे.
असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले.>>>>
हे खूपच रोचक आहे. ध्यानावस्थेत दिसले असतील का असं उगाच वाटतं.

पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.>>>
किती ज्ञानी आणि दूरदृष्टी असतील ते.

@अस्मिता - अर्थातच ध्यानावस्थेत परंतु येथे ध्यान ही ज्ञानप्राप्त योग्याची स्वाभाविक अवस्था आहे. लौकीकात वावरतानाही एखादा कलाकार ज्याप्रमाणे मनाने कलेच्याच विश्वात रममाण असतो. ती अवस्था योगी निरंतर अनुभवतो. त्यामुळेच ईशतत्वाचा साक्षात्कार दृगोच्चर होणे विस्मयाचे (त्यांना) वाटत नाही.

खूप सुंदर लेखमाला.

मूळ वेद कळावेत अशी खूप इच्छा आहे. ह्या लेखमालेतून बरेच काही कळेल असे वाटतेय.

जिज्ञासा - धन्यवाद, प्रयत्न चालू आहेत. वेळेअभावी विलंब>>>>

लिखाण इथे आणण्यात काही मदत करण्यासारखी असेल तर करायला आवडेल.

वेदान्चे रक्षण चान्गल्या प्रकारे व्हावे म्हणुन व वेदातील स्वराक्षरात तसुभरहि फरक पडु नये म्हणुन प्राचीन रुशीनी वेदान्च्या ८ विक्रुती (श्लोक म्हणायचा प्रकार. verse changed in a particular manner) निर्माण केल्या त्यान्ची नावे खालील श्लोकात सान्गितली आहेत : जटा माला शिखा रेखा ध्वजो दण्डो रथो घनः I अश्टौ विक्रुतयः प्रोक्ता क्रमपूर्वा महर्शिभि : I व्याडिर (जटा), वसिश्ठ (माला), भ्रुगु (शिखा), अश्टावक्र (रेखा), विश्वामित्र (ध्वज) पराशर (दण्ड), कश्यप (रथ) व अत्रि (घन) ही त्या रुशीन्ची नावे.

@ शीतल उवाच,

छान सुरुवात. लेखमाला पूर्ण वाचणार !

.... ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत .... फार आवडते आणि पाठ आहे Happy

छापील स्वरूपात वेद उपलब्ध करण्याचे श्रेय जर्मन विद्वान मॅक्समूलर यांचे आहे असे जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व महाराजा डॉ. करण सिंग यांच्या पुस्तकात वाचले आहे.

चार वेदांना 'स्वरूप' आहे असे कल्पून त्यांची स्तुती करणारे मंत्र असेलेले एक चित्र मला नुकतेच एका विदुषीने पाठवले, ते डकवतो इथे.

पु भा प्र

- अनिंद्य

प्रतिसादाबद्दल आभार शीतल उवाच.
@अनिंद्य
भारत एक खोज या मालिकेचे शीर्षकगीत .... फार आवडते आणि पाठ आहे
>>>> +1 त्यात गंभीर व संमोहित करणारं काही तरी आहे .

डकवतो इथे.>>> आवडेलच.

@अनिंद्य - धन्यवाद, मॅक्सम्युल्लरवर अंतिम भागात माहिती येईलच.

शीतल उवाच,

छान सुरुवात. लेखमाला पूर्ण वाचणार !>>>> +1