अंधार पसरला भवती

Submitted by द्वैत on 20 February, 2021 - 12:47

अंधार पसरला भवती

अंधार पसरला भवती
परतून पाखरे येती
व्याकूळ घराच्या भिंती
आवाज कुणाला देती

झाडांना कळते माया
पानांची सळसळ सांगे
डोळ्यांत गोठले अश्रू
प्रेमाचे तुटती धागे

कुठल्या आशेने जाणे
दाराशी पणती जळते
ना दोष कुणाचा मजला
माझीच सावली छळते

ह्या काळोखाशी माझे
मी असे जोडले नाते
संवाद साधतो साधा
अन नकळत गाणे होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users