जेव्हा अदम्य ऐसी

Submitted by अनन्त्_यात्री on 18 February, 2021 - 06:58

जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते

अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून साक्षी उरते

दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते

अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो

निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत.

Group content visibility: 
Use group defaults

सही!!!
आपल्याकडे निद्रा कशी वाईट याची काही सुभाषिते आहेत,
पण आधुनिक विज्ञानानुसार निद्रा ही नितांत आवश्यक अशी गरज आहे. तेव्हा कविता एकदम आवडली, पटली
निद्रासुख-प्रिय सामो

किती सुंदर! डोळ्यासमोर अगदी नकळत चित्र उभे करून गुंतवून टाकते कविता. आणि शेवट तर किती अप्रतिम.
मी शून्य एरवी पण निद्रेत मी अनंत. कमाल.

खूप सुंदर कविता.
पण मला एक गोष्ट खटकतेय. प्रत्येक कडव्याच्या पहिल्या ओळीत ७ मात्रा आहेत. पण दुसर्‍या कडव्यात "अंधार भिनत जाता" इथे ८ मात्रा आहेत. अंधार+भिनत गडबडीत म्हणून ७ मात्रात बसवता येतेय पण ते सहज नैसर्गिक वाटत नाही.