यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (५)

Submitted by रानभुली on 15 February, 2021 - 10:34
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )
टीप - या मालिकेतील काही प्रचि जालावरून घेतलेली आहेत. इथे मिळतीजुळती असल्याने त्याचा वापर केला आहे.

पुरूलियाच्या खूप जवळ असताना बंदनाने मला पलश ट्री चे फोटो दाखवले. पुरूलियापासून एक दीड तासाच्या अंतरावर पलशचं जंगल आहे आणि एक नितांतसुंदर धरण आहे. संपूर्ण हिरवागार परीसर, आजूबाजूला डोंगर, डोंगरातून खाली यायला केलेल्या पाय-या आणि तांबड्या रंगाचे पलश वृक्ष आणि त्याची त्याच रंगाची फुलं. आपल्या कडे याला काय म्हणतात ? सिंहगडाला जाताना अशा फुलांच्या वेली लागतात. पांढ-या तांबड्या रंगाची.

DW-gSTgXkAAerG5.jpg

वेड लावणारे फोटो होते.
पण पुरूलियापासून दीड तास जायला दीड तास यायला आणि तिथे किमान तासभर म्हटलं तरी चार तास असेच जातील असा सूर लागला. अशा वेळी ड्रायव्हर कामाला येतो.

तो म्हणाला, "आपण मुळातच पुरूलियासाठीच्या मुख्य रस्त्याने आलो नाही. या रस्त्यालाच ते जंगल आहे. आधी सांगितलं असतं तुम्हाला जंगल बघायचंय तर मागचाच कच्चा रस्ता घेतला असता. आपण आत्ता तिथे जागेवर असतो."

चंदनचा डाऊट होता कि तरी पण पुरूलियाला जायचंय आणि पुढे बेगुनकोडोर.

तर ड्रायव्हर म्हणाला कि ते जंगल बेगुनकोडोरला लागूनच आहे. परत कशाला उलटं पुरूलियाला जायचंय ?
मी तर वेडीच झाले हे ऐकल्यावर.
आम्ही दोघींनी मग आग्रहाने तिकडेच जायचं असा सूर लावला. शेवटी जीत आमचीच झाली. फक्त धरणावर जायचं नाही ही अट मान्य केली. त्या मागे ऋतूपर्णची सुरक्षेची भावना होती.

एकदाचं आम्ही जंगलच्या रस्त्याला लागलो. वेड लावणारं निसर्गसौंदर्य होतं.
घरच्यांसोबत भारतातली जवळपास सर्वच हिलस्टेशन्स फिरलीये. पण या नैसर्गिक सौंदर्याला त्याची सर नाही. अगदी शूटींग पॉईण्ट आहे. यशजींना इतक्या लांब स्वित्झर्लंडला जायची गरजच नव्हती.

एका ठिकाणी मी गाडी उभी करायला सांगितली आणि सरळ खाली उतरले. अशा वेळी जास्त चर्चा करत बसले असते तर या बंगाल्यांची चर्चाच सुरू झाली असती.

purulia.jpgpalash.jpg

मी चालायला सुरूवात केली. चंदन पण उतरून पुढे जाऊन फोटो घेत होता.
मागून ऋतू उतरून धावत आला.

असं एकटीने जंगलात उतरून चालत जाणे त्याला अजिबात आवडले नव्हते.
पण त्याचं असं नाराज होणं मला तरी खूप आवडत होतं. कहानी सिनेमातल्या परंब्रत चट्टोपाध्याय (चटर्जी) सारखे त्याचे लुक्स होते. माझ्याहून दोनच वर्षांनी मोठा असेल. पण किती मॅच्युअर्ड वाटायचा सर्वांच्यात.

मी रस्ता सोडून आत चालायला सुरूवात केली. त्याला समजत नव्हते.
तो ही मागे मागे येत होता.
आता रस्ता दिसेनासा झाला. सगळीकडे हिरवा आणि तांबडा रंग होता. एखाद्या स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं.
आणि या स्वप्नात ऋतूपण खूप हवाहवासा वाटत होता. त्याचा सहवास मला आवडत होता हे माझ्या लक्षात आलं होतं.
घरापासून, समाजापासून, मनुष्यप्राण्यांपासून दूर अशा या दुनियेत आम्ही दोघंच !
माझा हात त्याने हातात घ्यावा असं मला वाटत होतं.
पण त्याला काही सुचत नव्हतंं.

किमान त्याच्या हाताचा स्पर्श व्हावा अशा बेताने मी त्याला खेटून उभी राहिले.
त्याच्या बोटांचा अलगद स्पर्श झाला.
पलश फुलांचा मोहर बहरावा तशी माझी स्थिती झाली.
याला काय म्हणतात वगैरेशी आत्ता या क्षणाला मला घेणं देणं नव्हतं. बस्स अनुभवायचं होतं.
निसर्ग आणि निसर्ग.

पण त्याने हात हातात नाही घेतला.
आम्ही थोडे निवांत झालो.
त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. आम्ही अवघडल्यासारखे झालेलो. निघावंसंही वाटेना आणि बसताही येईना.
मी त्याला एक बंगाली गाणं म्हणायची फर्माईश केली.
त्याने माझ्याबरोबर गुणगुणशील का असे विचारले,
या क्षणी माझ्या तोंडून गाणं बाहेर पडणे शक्यच नव्हतं. बस्स त्याला ऐकावंसं वाटत होत.

असं वाटत होतं या सर्वांना माघारी पाठवावं.
तिथेच एक कॉटेज आहे. कायमचं तिथे स्थायिक व्हावं.
पण हे सगळे विचार मी मनातच ठेवले.
उद्या हे सगळं विसरलं जाईल. मन असाही विचार करू शकतं या वेळी ?

चंदन आणि बंदना आवाज देत होते.
ऋतुपर्णा उठला. त्यानेही आवाज दिला .
"कसला माठ आहे"
माझ्या मनाने बोललेलं त्याला ऐकू गेलंच नसणार.

जड मनाने आणि पावलाने पुन्हा गाडीत बसलो.
पुन्हा कधीतरी इथे येऊयात का इतकंच विचारायचं होतं. पण ते ही राहीलं.

एक धरणाकडे जायचा बाण दिसला,
पण आम्ही त्याला वळसा घालून चांगल्या रस्त्याला लागलो. पुरूलियाहून येणारा हा रस्ता होता आणि मधेच कुठेतरी ते गाव लागत होतं

बेगुनकोडोर...

अक्षरशः हाकेच्या अंतरावर होतं.
माझा विश्वास बसत नव्हता.

क्षणापूर्वी एका रोमँटीक जगात वावरत होते आणि क्षणातच एका साहसाला सज्ज झाले होते.
एक अनामिक भयाचं सावट मनावर पसरत होतं.

माझा कुणीतरी हात दाबला. मी चमकून पाहीलं.
बंदना होती ती.

घाबरली होती,

त्यातही मला हसू आलं.

माझी तरी अवस्था कुठे वेगळी होती ?

(क्रमशः)

( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पलश वृक्ष म्हणजे आपला पळस का? तोच वाटतो आहे.

मूळ विषयावरून फोकस जाऊ देऊ नका >> मी ही हेच म्हणणार होतो. Happy
असो, पुढच्या भागात भूत येईल अशी आशा आहे Happy Happy

मृणाली, देवकी, मनिम्याऊ, वावे, हरचंदजी खूप आभार.
वावे धन्यवाद स्पष्ट कळवल्याबद्दल. आवडलं. खूप वेळ लागतोय ना, माझा मूड टिकवून ठेवण्यासाठी, कथेशी कनेक्टेड राहण्यासाठी हा भाग लिहीला.

हे म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटामधेच त्याची मेकिंगची स्टोरी दाखवल्यासारखे झाले. Wink

हर्पेन जी Lol
खूप हसले. पण हा पिक्चर आधीच बनलेला आहे. आम्ही फक्त खरं खोटं बघायला चाललोय.