ऐन वसंतात भल्या सकाळी...

Submitted by ललिता-प्रीति on 14 May, 2009 - 00:57

आचार-विचार, पध्दती, संभाषण, कालगणना या सगळ्यांतच आपण अति आंग्लाळलेलो असल्यामुळे ‘ऐन वसंतात’ म्हटल्यावर - म्हणजे नक्की कधी बरं? - वसंत म्हणजे चैत्र - वैशाखवणव्याच्या आधीचा उन्हाळा - म्हणजे परिक्षांचे दिवस - म्हणजे मार्च-एप्रिल... अशी आपली विचारांची गाडी जाते. त्याशिवाय त्या ‘ऐन वसंतात’चा कालावधी नक्की करताच येत नाही! मग मार्च-एप्रिलमध्ये, भर उकाड्यात, भल्या सकाळी कोण कोण काय काय करत असतात? वेगळं काही नाही. नोकरदार आणि कष्टकरी मंडळी कामाला निघायच्या घाईत असतात. परिक्षा सुरू असल्या तर विद्यार्थीवर्ग लवकर उठून वह्या-पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला असतो किंवा सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तर डाराडूर झोपलेला असतो. निवृत्त ज्येष्ठ नागरिक सूर्य वर यायच्या आत फिरून-बिरून आलेले असतात...
मी आणि माझा चौदा वर्षांचा मुलगा मात्र ऐन वसंतात एका रविवारी भल्या सकाळी लोकलची गर्दी सहन करत कुलाब्याला निघालो होतो...

मुंबईतल्या लोकलच्या गर्दीला रविवार, साप्ताहिक सुट्टी वगैरेशी तसंही काही देणंघेणं नसतंच! खचाखच भरलेली लोकल... पहाटे साडेपाचला घरातून निघून, लांबलचक रांगेत उभं राहून तिकीटं काढून, सहाची लोकल पकडल्याची माझी मर्दुमकी कुठल्याकुठे विरून गेलेली... गाडीत जेमतेम उभं रहायला जागा मिळालेली होती. "मी कॉलेजला जायचे तेव्हा पीक-अवर्सना एवढी गर्दी असायची..." मुलाला सांगता सांगता विरणार्‍या मर्दुमकीला मी गतस्मृतींच्या मदतीनं परत बोलवू पाहत होते. प्रचंड उकडत होतं. घामाच्या धारा फक्त सूर्य उगवायची वाट पाहत होत्या. मी हळूच माझ्या मुलाच्या चेहर्‍याकडे पाहिलं. गर्दी, उकाडा आणि अपुरी झालेली झोप यामुळे आता तो कुठल्याही क्षणी माझ्यावर वैतागेल असं मला सारखं वाटत होतं आणि तो तसा वैतागला जरी असता तरी ती त्याची चूक ठरली नसती. मग त्याच्या (आणि माझ्याही) रविवारच्या झोपेचा विचका करण्याचं मला तरी काय नडलं होतं? असं कुठलं कारण होतं की ज्यामुळे मुलाचा वैताग, चिडचिड सहन करायची माझी तयारी होती? असं काय होतं की जे या सगळ्याच्या मागून डोकं उंचावून आम्हाला खुणावत होतं...?

-------------------------------------

आदल्या आठवड्यात लोकसत्ता-व्हिवा पुरवणीतल्या एका निवेदनाकडे अगदी योगायोगानं माझं लक्ष गेलं होतं - ‘वृक्षमैत्र’ या उपक्रमाअंतर्गत कुलाब्याला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सागर उद्यानात त्या रविवारी वृक्षपरिचयाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार होता. खाली संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांक दिलेला होता. बस्स, निवेदन असं म्हणावं तर एवढंच होतं... काय उपक्रम, कुठलं सागर उद्यान काहीही माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती पण कसं कोण जाणे, मला ते वाचून तिथे जावंसं वाटलं. माझी उपजत भटकी प्रवृत्ती त्याला कारणीभूत ठरली असावी बहुतेक! या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईच्या कुलाबा परिसरात एक फेरफटका होईल असा पहिला विचार मनात आला. शाळा आणि कॉलेजचं एक वर्ष केल्यानंतर गेलं जवळजवळ पाव शतक मुंबईशी फारसा संपर्क राहिला नव्हता पण मुंबईबद्दलचं आकर्षण मात्र कायम होतं. कॉलेजच्या दिवसांतही घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढ्यापुरतीच मुंबई माहीत होती. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राबाहेरहून ठाण्यात मुक्काम हलवल्यानंतर मात्र ती कसर भरून काढायचं तसंही मी ठरवलंच होतं आणि त्यासाठी याहून चांगलं निमित्तं दुसरं कुठलं असणार होतं? शिवाय वृक्षपरिचयासारखा विषय असल्यामुळे माझ्या मुलाच्या कानावरही चार चांगले शब्द पडतील असा आपला माझा साधा-सरळ, मध्यमवर्गीय दृष्टीकोन होता. त्यामुळे जरा घोळात घेऊन मी माझ्या मुलाला माझ्यासोबत येण्यासाठी तयार केलं आणि दिलेल्या नंबरवर फोन करून सगळी माहिती विचारली.
‘व्हिवा’शी किंवा फारफारतर त्या उपक्रमाशी संबंधीत असलेल्या कार्यालयातली कुणी स्त्री-कर्मचारी पलिकडून माहिती देत असावी अश्या अंदाजानं मी ४-५ मिनिटं ज्यांच्याशी बोलले त्या प्रत्यक्षात ‘व्हिवा’च्या संपादिका शुभदा पटवर्धन होत्या! ही गोष्ट मला अगदी शेवटी फोन ठेवता ठेवता त्यांच्याकडूनच समजली. एक सेकंद माझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता... खोटं कश्याला बोलू! मी आधी थोडी बुचकळ्यातच पडले. मला कळेना की कार्यालयातल्या एखाद्याकडे हे काम न सोपवता त्या स्वतःच सर्वांना ही माहिती का बरं देत होत्या? मुळात, त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक त्या निवेदनासोबत का दिला? शिवाय त्या स्वतः त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असणार होत्या असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टींचा उलगडा कदाचित तिथे प्रत्यक्ष पोचल्यावरच होऊ शकला असता...

-------------------------------------

... आणि तो रविवार उजाडला. उजाडला कुठला? तो उजाडायच्या आतच खरं म्हणजे आम्ही निघालो होतो. ठाण्याहून सी.एस.टी.मार्गे कुलाब्याला पोचायला दोन तास लागले. (मी जुन्या कॉलेजच्या सवयीनं व्ही.टी.-व्ही.टी. म्हणत होते तर माझा मुलगा ‘अशी कशी आपली आई मागासलेली... सी.एस.टी. म्हणायच्या ऐवजी व्ही.टी. म्हणतीये’ अश्या नजरेनं माझ्याकडे बघत होता!)
लहानपणी आई-बाबांबरोबर आम्ही चार्ली चॅप्लीनचा सिनेमा पहायला जिथे गेलो होतो त्या ‘रीगल’ थियेटरवरून पुढे गेल्यावरच कुलाबा येतं हे समजल्यावर आनंद झाला! मुंबईबद्दलच्या आपल्या सामान्यज्ञानात भर पडली असं उगीचच वाटायला लागलं. पण ज्यासाठी इतकी तकतक करतोय तो कार्यक्रम मात्र प्रत्यक्षात कसा असणार आहे त्याची काहीच कल्पना करता येत नव्हती.
साडेसात वाजता सागर उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो तेव्हा तिथे आमच्यासारखीच अजून १०-१२ उत्साही मंडळी हजर होती. त्यांतली काही वृक्षप्रेमी किंवा जाणकारही असतील कदाचित पण उत्साही होती एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकले असते! सर्वजण जमल्यावर शुभदाताईंनी एक छोटंसं प्रास्ताविक केलं. फोनवर त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जे नवल वाटलं होतं त्याचा त्या प्रास्ताविकानंतर अपेक्षेप्रमाणे उलगडा झाला.
‘विस्तार’ नावाची त्यांची संस्था आहे जिच्या अंतर्गत निरनिराळे सामाजिक उपक्रम चालवले जातात. विशेषतः अंध आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी बरंच काम केलेलं आहे. असे उपक्रम राबवताना पैशांचा सढळ हस्ते वापर, भरघोस देणग्या हे किंवा असंच स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण त्याहीपलिकडे जाऊन संवेदनशील मनानं करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात - जसं अंध मुलांना पुस्तकं वाचून दाखवणं... त्या मुलांसाठी त्याचं मोल पैश्यांच्या राशीपेक्षाही जास्त ठरतं. तर अश्या प्रकारे त्या करत असलेल्या कार्याची त्यांनी थोडक्यात माहिती दिली. प्रत्येक वर्षाची एकएक संकल्पना नक्की करून त्यानुसार विविध उपक्रम आखले जातात. यंदाची संकल्पना आहे - ‘पर्यावरण मैत्री आणि संवर्धन’ आणि त्याअंतर्गत वृक्षपरिचयाचे असे कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं.

आमचा उद्यानातला फेरफटका सुरू झाला. वृक्षांची माहिती देण्यासाठी मेधा कारखानीस या शुभदाताईंच्या स्नेही तिथे आलेल्या होत्या. बँकेत नोकरी करता करता केवळ आवड, छंद म्हणून मेधाताईंनी झाडांचा अभ्यास केलेला आहे. पुढचे दोन तीन तास त्यांचं बोलणं ऐकताना त्या हे केवळ छंदापोटी करताहेत यावर विश्वासच बसत नव्हता. निरनिराळी वैशिष्ट्यं असलेल्या विविध झाडांपाशी थांबून त्या त्यांची खरंतर शास्त्रोक्त माहिती देत होत्या पण ती ही तांत्रिक शब्दांच्या कुठल्याही जंजाळात न अडकता... सोबतीला शुभदाताईंच्या गप्पाही होत्याच. त्यांनीदेखील भरपूर भटकंती करून झाडांबद्दल खूप माहिती मिळवलेली आहे. त्या माहितीशी संबंधित काढलेल्या फोटोंचा एक मोठा अल्बम त्यांनी बरोबर ठेवला होता. ते फोटो, माहिती आणि सर्वांच्या गप्पा यात २-३ तास अक्षरशः पळत निघून गेले. सकाळचा लोकलमधला उकाडा आम्ही केव्हाच विसरून गेलो होतो. उद्यानाच्या अंतर्भागात पोचल्यावर तर आपण मुंबईत आहोत हे ही विसरायला झालं होतं.
झाडांबद्दलच्या अनेक समजुती-गैरसमजुतींना त्यादिवशी छेद दिला गेला. उदाहरणार्थ ज्याला आपण अशोक वृक्ष म्हणून ओळखतो तो खरा अशोक नाहीच... तो आसूपालव! लंकेत सीता ज्या झाडाखाली बसली होती तोच खरा अशोक. मग आम्ही सगळ्यांनी या दुसर्‍या अशोकाला ‘खोटा अशोक’ असं नाव दिलं! (कोण म्हणतं खर्‍याखोट्याची दुनिया राहिलेली नाही...! जोपर्यंत मनुष्यप्राणी आहे तोपर्यंत ती राहणारच!) गुजराती लोकही त्याला ‘आसोपालव’ म्हणतात हे मला आमच्या गुजरातमधल्या काही वर्षांच्या वास्तव्यामुळे माहीत होतं. तेव्हा मी त्यांना नाकं मुरडायचे! ‘अशोक’ नाव किती सुटसुटीत, छान आहे... आसोपालव हे कसलं नाव, वगैरे!... ज्या त्या गोष्टीत मराठी बाणा दाखवायची खोड... ती या ‘आसूपालव’नं अशी उघडकीस आणली!
मेधाताईंनी निदर्शनास आणून दिल्यावर सगळ्यांच्याच लक्षात आलं की आसूपालव (ऊर्फ खोटा अशोक) सरळसोट, उंच वाढतो. त्याचा आडवा विस्तार नसतो. त्यामुळे त्याची सावलीही फारशी नसते. मग अश्या तुटपुंजी सावली देणार्‍या वृक्षाखाली बसून सीता अशोकवनातले आपले खडतर दिवस कसे काढेल?... अगदी साधी सरळ गोष्ट आहे ही! पण आपल्यापैकी किती जणांनी असा विचार केला असेल... खरं म्हणजे अशोक आणि आसूपालव या दोघांच्यात ती दोन्ही झाडं आहेत यापलिकडे काहीही साम्य नाही. मग हा नावांचा गोंधळ का आणि कधी झाला असेल कोण जाणे!
त्यावर विचार करायला फारसा अवधी मिळालाच नाही कारण तसाच ‘शिरीष’ आणि ‘रेन-ट्री’च्या बाबतीतला प्रकार मेधाताईंनी दाखवून दिला... छोट्याश्या पांढरट गुलाबी फुलांच्या ज्या झाडाला आपण शिरीष म्हणून ओळखतो ते झाड प्रत्यक्षातलं रेन-ट्री आहे. शिरीषाची फुलं हिरव्या पांढर्‍या रंगसंगतीची असतात. तरी, अशोक-आसूपालव इतकी तफावत इथे नव्हती... फुलांच्या रंगात फरक असला तरी रूपात नव्हता. अश्या कितीतरी गमती-जमती त्यादिवशी आम्हाला समजल्या! अगदी माझा मुलगाही त्याला अपवाद नव्हता! मेधाताईंनी गुंजांचं झाड आणि त्याखाली पडलेल्या गुंजा दाखवल्यावर तो खाली बसून दिसतील तितक्या गुंजा वेचण्यात इतका दंग झालेला होता की मी बघतच राहिले!... तुतीच्या झाडावरून पडलेली ताजीताजी तुती चाखून बघितल्यावर ती चव आवडल्यामुळे त्याचे डोळे जे चमकले ते पाहून मलाच जास्त आनंद झाला!
सोनमोहोर, काटेसावर, गोरखचिंच, ताम्हणी हे सगळे वृक्ष मी त्यादिवशी प्रथम ‘निरखले’. ही सगळी झाडं या‌आधीही अनेकदा समोर आली असतील. पण त्यांची वैशिष्ट्यं जाणून घ्यायचा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता असं आता म्हणावं लागेल. (गोरखचिंच म्हणजेच बाओबाब ट्री हे कळल्यावर माझ्या मुलाच्या चेहर्‍यावरही ओळखीचे भाव उमटले!) सुंदर जांभळ्या फुलांचे गुच्छ मिरवणारं ‘ताम्हणी’ हे तर आपल्या महाराष्ट्राचं राज्यफूल आहे! (‘प्रत्येक राज्याचं राज्यफूल’ असा काही प्रकार असतो हे तोपर्यंत माझ्या गावीही नव्हतं.)

‘सागर’ उद्यानातल्या त्या फेरफटक्यानं मला कणभर का होईना पण वृक्षसाक्षर बनवलं आणि त्याची प्रचिती मला दुसर्‍या दिवशी लगेचच आली... नित्यनेमाप्रमाणे सकाळी चालायला गेले असताना मी रस्त्याकडेच्या झाडांकडे प्रथमच मान उंचावून बघितलं. तिथे मला सोनमोहोर दिसला, (खरा) शिरीष ओळखता आला. अजूनही १-२ झाडं परिचयाची वाटली, भले त्यांची नावं मला त्याक्षणी आठवली नसतील! माझं मलाच आश्चर्य वाटलं. माझ्यासारख्या झाडांचं अतिशय तुटपुंजं ज्ञान असलेल्या व्यक्तीत त्या २-३ तासांमुळे असा इतका फरक पडला??...

दर महिन्याच्या अश्या प्रकारच्या कार्यक्रमांना हजर रहायचा माझा निश्चय तर केव्हाच पक्का झाला होता. तरीही, काही घरगुती कारणांमुळे मी त्यापुढच्या फिरोजशाह मेहता उद्यानातल्या म्हणजेच ‘हँगिंग गार्डन’ला झालेल्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. पण नंतरचा जिजामाता उद्यानातला - राणीच्या बागेतला - कार्यक्रम मात्र मी चुकवला नाही. ५३ एकरात पसरलेल्या जिजामाता उद्यानात तर वृक्षांच्या २२५ जाती आहेत. तिथल्या प्राणीसंग्रहालयाच्या विस्तारासाठी त्यांतले अनेक वृक्ष तोडले जाणार असं मध्यंतरी कानावर आलं होतं. ते कळल्यावर त्याला जोरदार विरोध करणार्‍यांत शुभदाताई आघाडीवर होत्या हे मला तिथे समजलं...
‘वृक्षमैत्र’ या उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद, पर्यावरणप्रेमींची सततची वाढती संख्या यामुळे ‘विस्तार’मार्फत त्यांनी चालवलेल्या या चळवळीला अधिकाधिक बळ मिळेल हे नक्की कारण नेहेमीच्या चाकोरीपलिकडे जाऊन काहीतरी करण्याची ऊर्मी आणि उत्साह अंगात असणारे अगणित लोक या जगात असतात... प्रश्न असतो तो फक्त त्या ऊर्मीला योग्य दिशा देण्याचा!
... नाहीतर ऐन वसंतात एका भल्या सकाळी एक गृहिणी रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरात झटापट करत न बसता निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी घराबाहेर पडली नसती... आणि एक शालेय विद्यार्थी अंथरुणात उशीरापर्यंत न लोळता झाडांशी परिचय वाढवण्यासाठी निघाला नसता...!

( संपर्कासाठी माहिती : फोन नं. - ९८९०४५२०८० , ई-मेल - vistaar@gmail.com )

-----------------------------------------------------------------------------------------------------

स्त्री मासिकाच्या एप्रिल-२०१०च्या अंकात नुकताच हा लेख प्रकाशित झाला.

गुलमोहर: 

फार छान उपक्रम. ओळख करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. त्यांच्या दूरध्वनी क्रमांक टाकणार का कृपया?

मुंबईत- बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटी ही अशा प्रकारचा उपक्रम राबवते.
www.bnhs.org

वा छान. पुढच्या वेळेला मुंबईत असले तर मी नक्की येणार.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

कवे, धन्यवाद गं Happy मी लेखाच्या शेवटीही टाकलाय आता तो नं.

~~~
हम 'मत'वाले...

मस्त लिहिले आहेस! Happy

माहिती करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद... मु॑बईत असलो तर नक्की सहभागी व्हायला आवडेल...

धन्यवाद.. छान ओळख करुन दिलीत संस्थेची आणि उपक्रमाची देखिल. Happy

छान लिहिले आहे. अशा उपक्रमांना जायला आवडेल... Happy

लेख आवडला, तुमचे मुलाला घेवुन आवर्जुन जाणहंी आवडलं आणि विस्तारचा उपक्रम तर नक्कीच कौतुकास्पद आहे.

वा! छान लिहिलंय.

अभिनंदन.. चांगल्या लेखासाठी आणि विधायक उपक्रमाला साथ दिल्याबद्दल...

ललु मस्त लिहीलयस , उपक्रम ही छान आहे.

नेहेमीच्या चाकोरीपलिकडे जाऊन काहीतरी करण्याची ऊर्मी आणि उत्साह अंगात असणारे अगणित लोक या जगात असतात... प्रश्न असतो तो फक्त त्या ऊर्मीला योग्य दिशा देण्याचा!
>>> आवडला उपक्रम आणि तुझा उत्साहही Happy

----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.

छान लिहिले आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  ***
  Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.

  उत्तम लेख आणि उत्तम कार्य. कधीतरी मीही पोहोचेन या कार्यक्रमाला.
  .........................................................................................................................

  http://kautukaachebol.blogspot.com/

  अशा छान उपक्रमाबद्दल वाचून मस्त वाटलं. आणि तुझा उत्साहही वाखाणण्याजोगा. Happy
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  There is no charge for awesomeness.... or attractiveness.

  खूप मस्त लिहीलं आहेस ! अशा काही उपक्रमात सहभागी होता येत नाही, ही टोचणी लागली आहे!

  तुला आणि शुभाताईंना मात्र मनापासुन शुभेच्छा ! Happy

  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
  ~ प्रकाश ~ GET CONNECTED

  छान लिहीलंय .. Happy