हेल्पलाईन नंबर (?)

Submitted by Kavita Datar on 9 February, 2021 - 04:14
Cyber Crime

"अरे दिपक ! हे आर ओ वॉटर प्युरीफायर कालपासून चालतच नाहीये. प्यायला पाणी कसे मिळणार ?"

"कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून कंप्लेंट दे. ते सर्विस मॅन पाठवतील. त्याच्याकडून दुरुस्त करून घे." "हेल्पलाइन नंबर तुला माहित आहे का ?"

"नाही ग ! गुगलवर शोध ना .."

"अरे हो.. विसरलेच.." ज्योतीने लगेच गुगल वरून वॉटर प्युरीफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधून कॉल केला आणि कम्प्लेंट दिली. सर्विस मॅनला दुपारी दोन वाजता पाठवतो, असे त्या हेल्पलाइन वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

दुपारी दोन वाजता कंपनीचा सर्विस मॅन आला तेव्हा ज्योती एकटीच घरात होती. दीपक ऑफिस मध्ये होता. वॉटर प्युरीफायरचे नीट निरीक्षण करून त्या माणसाने फिल्टर आणि सिलेंडर बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यासाठी साडेसहा हजार लागतील असे तो म्हणाला. ज्योतीने लगेच दीपक ला फोन लावला,

"अरे फिल्टर आणि सिलेंडर दोन्ही बिघडले आहेत. ते बदलायला साडेसहा हजार रुपये लागतील म्हणे."

"अरे बापरे ! इतके ?? त्या सर्विस मॅनला फोन दे बरं.."

ज्योतीने सर्विस मॅन च्या हातात फोन देऊन त्याला दीपक सोबत बोलायला सांगितले.

"तुमचे नाव काय? काय झालंय ? वॉटर प्युरिफायर चालत का नाही??"

"साहेब मी मनोज गोराणे..." त्याचे नाव सांगून तो पुढे म्हणाला, "तुमच्या वॉटर प्युरीफायर च्या सिलेंडर मध्ये लिकेज आहे आणि फिल्टर मध्ये खूप क्षार जमा झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बदलून टाकावे लागतील."

"अरे पण साडेसहा हजार फार होतात.."

"अहो साहेब ही तर पार्ट ची किंमत झाली. मी तर माझे सर्व्हिस चार्जेस लावतच नाहीये. नाहीतर तुम्ही अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. म्हणजे कुठलाही पार्ट पुढच्या तीन वर्षात बिघडला, तरीही फ्री रिप्लेस करून दिला जाईल."

"बरं त्यासाठी काय चार्जेस पडतील ?"

"अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट नऊ हजारात जाईल."

"अरे बापरे ! हे तर अजूनच जास्त आहेत."

"पण साहेब पुढचे तीन वर्ष कुठलाही पार्ट तुम्हाला विकत घ्यावा लागणार नाही. कंपनी मोफत बदलून देईल."

"बर, ठीक आहे. मॅडम ला फोन दे."

"ज्योती त्याला नऊ हजार रुपये दे आणि त्याच्याकडून ते पार्टस बदलून घे. रिसीट घ्यायला विसरू नको."

ज्योतीने त्या सर्विस मॅन ला नऊ हजार रुपये दिले. त्याने रिसीट दिली. पार्टस आणि मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट चे पेपर घेऊन थोड्याच वेळात परत येतो, असे सांगून तो बाहेर पडला. बराच वेळ झाला तरीही तो सर्विस मॅन परत आला नाही. त्या कंप्लेंट नंबर वर परत फोन केल्यावर तो नंबर बंद असल्याचा मेसेज आला. पुढील दोन-तीन दिवस वाट पाहून देखील तो न आल्याने आणि फोनही न लागल्याने त्यांना आपण फसवले गेल्याची खात्री पटली.

वॉटर प्युरिफायर घेतल्या वेळेसची रिसीट त्यांनी शोधून काढली. त्यावर त्या वॉटर प्युरिफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर होता. त्या नंबर वर फोन केल्यावर त्यांना कळले, की मनोज गोराणे नावाचा त्या कंपनीचा कोणीही सर्विस मॅन नाही. आणि ज्योतीने केलेली कंप्लेंट ही त्यांच्याकडे रजिस्टर झालेली नाही.

"आपण सायबर पोलिसात कम्प्लेन्ट देऊ या." ज्योती म्हणाली.

"अगं फक्त नऊ हजारच गेले आहेत ना. एवढ्या पैशांसाठी कुठे पोलीस स्टेशनच्या चकरा मारायच्या? एवढा वेळ तरी आहे का आपल्याजवळ?"

"ह्या अशाच विचारामुळे या गुन्हेगारांचे फावते. 9000 असले तरी फसवणूक झाली आहे ना? मग कम्प्लेंट करायलाच पाहिजे." ज्योतीने म्हंटले

तिचा एक वर्गमित्र सायबर पोलीस स्टेशनला काम करत असल्याने तिने त्याला फोन करून आधी कल्पना दिली आणि सायबर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देखील केली. तिथे गेल्यावर तिला कळले, की अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी या काही दिवसात आलेल्या आहेत. गुगल वरून तिने शोधलेला मोबाईल नंबर एका रिक्षाचालकाच्या नावावर होता. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला शोधून काढल्यावर, त्याने सांगितले की त्याचे आधार कार्ड आठवड्याभरा साठी 500 रुपयाने एका व्यक्तीला भाड्याने दिले होते. आता पोलिस त्या व्यक्तीच्या शोधात आहेत.

वरील घटनेवरून वाचकांच्या लक्षात आले असेलच, की गुगल वरून शोधलेली प्रत्येक गोष्ट विश्वासार्ह असतेच असे नाही. अशाच घटना स्वीगी, झोमॅटो, डॉमिनोज आणि काही बँकांच्या बनावट हेल्पलाईन नंबर मूळे देखील घडल्या असून काही जणांचे त्यात आर्थिक नुकसान झाले आहे. शक्यतो कुठल्याही सेवेचा किंवा बँकेचा हेल्पलाइन नंबर गुगल वरून शोधू नाही. त्याऐवजी त्या सर्विस सेंटर आणि आस्थापनांच्या अधिकृत कागदपत्रांवरून किंवा त्यांना समक्ष भेट देऊन हे हेल्पलाइन नंबर घ्यावेत. तसंच वरील घटनेत ज्योतीने जर त्या सर्विस मॅनला कॅश ऐवजी चेक दिला असता, तर नंतर चेक पेमेंट कदाचित थांबवता आलं असतं. अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट चे सर्व साधारणपणे कंपनीच्या नावावर चेक दिले जातात. लोकांनी थोडी सतर्कता बाळगली तर अशा प्रकारच्या घटना सहज टाळता येतील.

सावधान रहा.

सुरक्षित रहा.

©कविता दातार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सगळ्यांचे...
लेख माझ्या नावासह जरूर शेअर करा.
जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळावी हाच हेतू आहे.

असाच वाईट अनुभव आला आहे.. १९००० गेले..पोलीस स्टेशन ला सायबर ला तक्रार नोंदवली पण काहीच फायदा झाला नाही.. पैसे गेले..