पंचिंग बॅग

Submitted by इकेबाना on 5 February, 2021 - 20:30

पंचिंग बॅग
या ..... ढिशुम ...... या.......धडाम
या .... धप्प ..... या..... ढिशुम
सुचित्राला सईच्या बेडरूमच्या दरवाज्याच्या बाहेर आवाज येत होते , " सई अग जरा धुवायचे काही कपडे असतील तर बाहेर दे , वॉशिंग मशीन लावायचे आहे. " आई प्लिज आत्ता डिस्टर्ब् करू नकोस ना, किती वेळा सांगितलं तुला”.
“ अगं नाश्त्याचे काय ? तुम्हाला नाश्त्याला काय पाहिजे हे विचारायला आले होते , मनासारखा केला नाही तर तुम्हीच न खाता जाता”
“आई एकदा सांगितलं तरी कळत नाही का ग तुला? प्लिज १५-२० मिनिटांनी बोलते”

सईचे सध्या दर वर्षी प्रमाणे व्यायामाचे नवीन फॅड चालू झाले होते, वजन कमी करण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी तिने पंचिंग बॅग आणली होती. ती एक वाळू भरलेली कातड्याची मोठी पिशवी होती आणि त्यावर ती रोज सकाळी बॉक्सिन्गचे ग्लोव्हस घालून जोरजोरात प्रहार करायची, मधेच पायांनीसुद्धा लाथा मारायची आणि त्याबरोबर तोंडातून आरोळ्या ठोकायची. तिच्या म्हणण्याप्रमाणे असे केल्यानी, मनावरचा ताण सुद्धा कमी व्हायला मदत होते.
मुलीने बाहेरच्या बाहेर जा म्हणून सांगितल्याने, सुचित्राने आपला मोर्चा राहुलकडे वळवला. राहुलच्या खोलीचाही दरवाजा बंद होता आत शांतता होती, म्हणून ती दरवाजा उघडून आत गेली, राहुल बेडवर झोपून हेडफोन लावून त्याच्या मैत्रिणीशी बोलत होता, " आई, तुला काही मॅनर्स आहेत की नाही, सरळ काय आत येतेस? , बघतेस ना मी बिझी आहे ते."
" अरे राहुल जरा धुवायचे काही कपडे असतील तर बाथरूम मध्ये टाकायचे ना , वॉशिंग मशीन लावायचे आहे. "
“आई तू प्लिज बाहेर जा, नंतर थोडयावेळाने ये "
“जातेरे बाबा पण नाश्त्याचे काय ? तुला नाश्त्याला काय पाहिजे हे विचारायला आले होते”
“आई शेवटच सांगतो , लिव, आत्ता मला फक्त मला प्रायव्हसी पाहिजे”
“सुनबाई अगं चहा झाला का नाही ? अण्णांना सकाळी लवकर चहा लागतो , इतकी वर्ष झाली पण लक्षात म्हणून राहत नाही तुझ्या.” सासूबाई हॉलमध्ये गॅलरीत होत्या, अण्णा पेपर वाचत होते , तिथून विचारणा झाली
“आले आले सासूबाई, चहा तयार आहे, गाळायचाय फक्त.” सुचित्रा लगबगीने स्वैपाकघरात धावली तेव्हढ्यात तिच्या बेडरूम मधून अरविंदने हाक मारली,
"सुचित्रा माझी आज मीटिंग आहे , माझे मॅचिंग टाय आणि सॉक्स काढले नाहीत , मला उशीर होईल पोचायला. तुला माहित आहे मला सगळं वेळेवर लागत तरी आजकाल तू माझे कपडे वगैरे काढून ठेवत नाहीस. ऑफिसमध्ये नवीन मॅनेजमेंट मूळे टेन्शन आहे, डोक्याला ताप कमी आहेत का माझ्या? कळत कसं नाही तुला”
त्याच वेळेला तिला आठवले की आज पोळ्यांची बाई येणार नाही ...
आज शाळेत मुलांना नवीन विषय शिकवायचा होता, तिने काढलेल्या नोट्स परत बघायच्या होत्या.
म्हणजे तिची अजून धावपळ होणार होती. सुचित्राला क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली
त्याक्षणी सुचित्राला काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्याला कुठेतरी लांब पळून जाता यावे अशी तीव्र इच्छा झाली.
पण कामे पडली होती, अरविंदला ऑफिसला आणि मुलांना कॉलेजला निघायचे होते, त्यांचा नाश्ता, जेवणाचे डबे, अण्णांना त्यांच्या पूजेची तयारी करून द्यायची होती. सासूबाईंना अंघोळ घालायची होती, साडी नेसवाईची होती. कारण स्पॉन्डेलीसीस मूळे त्यांना आताशा जमत नव्हते. नंतर त्यांना पोथी वाचायला द्यायचे होते. तिने कसेबसे सगळे आवरले, आंघोळ वगैरे आवरून घेतलं तेव्हा कुठे जाऊन तिला स्वतःसाठी एक कप चहा घेता आला. पण घरातली कामे काही संपली नव्हती. सगळ्या खोल्यांमधून आवरायचे होते आणि नंतर स्वतःची तयारी करून शाळा गाठायची होती. मुलें, अरविंद हातातल्या वस्तू जिथल्यातिथे टाकायचे आणि नंतर काही मिळाले नाही की तिचा उद्द्धार हा ठरलेला.
सुचित्रा एकेक खोली आवरत सईच्या खोलीत आली. खोली नुकतीच तिथे मारामारी झाली असावी अशी अस्ताव्यस्त होती. राहुल आणि तिची रूम आवरणे म्हणजे तिला सगळ्यात जिकरीचे काम होते. पलंगावरचे कपडे आवरता आवरता तिचे लक्ष कोपऱ्यातल्या पंचिंग खाली पडलेल्या बॉक्सिंग ग्लोव्हकडे गेले. मजा म्हणून तिने ते ग्लोव्स हातात घातले आणि त्या वाळूने भरलेल्या पिशवीवर मारून बघितले. आणि ते करत असताना मजा म्हणून तिने स्वतःला आरश्यात बघितले.

सुचित्रा अरविंद कोलतेवार, वय ४८, शिक्षण बी ए ( लिटरेचर), डी एड. पूर्वाश्रमीची सायली कुलकर्णी , नागपूर सध्या वास्तव्य मुंबई , प्राथमिक शाळेत शिक्षिका,
पती, अरविंद कोलतेवार, वय ५२ एम.बी.ए एका मोठ्या कंपनी मध्ये जी एम ,
मुलगा राहुल कोलतेवार, वय २१, कॉलेजकुमार ,
मुलगी सई कोलतेवार, वय २६ , एम.बी.ए एका मोठ्या कंपनी मध्ये नोकरीला, खूप महत्वाकांक्षी, वडिलांसारखीच

क्षणभर तिला सगळ्या कामाचा विसर पडला , ती आरश्यात स्वतःला बघत राहिली आणि एकाएकी ती आरशातून नाहीशी झाली आणि कानावर नेहेमीचे संवाद आरडाओरडा पडायला लागले
सुचित्रा, हे कर ते कर, तुला हे नीट करता येत नाही का, तुला कळत नाही का?... तू मला सांगायला जाऊ नकोस,.... तुला काय कळतंय? तुला कळणार नाही … माझे टेन्शन ,
सुनबाई , घरात लक्ष नाही तुझे, आजकाल जेवणात मीठ कमी जास्त असते,.... घर वेळच्या वेळी आवरले जात नाही.... घरखर्चावर काही लक्ष आहे की नाही? का अरविंद मिळवतोय म्हणून उधळायचे पैसे ........
आई, तुला आमचे टेन्शन कळणार नाही, तू बाहेर जा बघू....... . आम्ही कुठे तुला आमची रूम आवरायला सांगतो , राहू दे तशीच.
आई उगाच पकवू नकोस, ....प्लिज तूच लेक्चर तुझ्या कडे ठेव ,.... आम्ही आमचे बघू ,... आम्ही तुम्हाला आम्हाला जन्माला घालायला सांगितले नव्हते ...
कोलतेवार बाई , जोशीबाई ४ दिवस येणार नाहीत त्यांचा वर्ग तुम्ही घ्या, त्यांच्या वाटणीचे पेपरसुद्धा तुम्हालाच तपासावे लागतील ...... हि नोकरी आहे , टिकवायची असेल तर सांगितले जाईल ते काम करायला लागेल
नेहमीचे संवाद, तिच्या कानावर जोरजोरात पडत होते कानात कोणीतरी घण मारल्यासारखे, सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात होते, तिला चक्कर येत होती , ती तशीच खाली कोसळली , पण खाली कोसळत असताना तिचे लक्ष आरशात गेले , तिथे तिला दिसत होती फक्त एक पंचिंग बॅग , वाळूने भरलेली पिशवी जिच्यावर चहुबाजूने प्रहार होत होते . प्रहार करणाऱ्या माणसांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नव्हते पण त्यांनी घातलेले कपड्यावरून ती ओळखू शकत होती.
तिचे लक्ष त्या पंचिंग बॅग कडे गेले. तिच्या उरात एक जीवघेणी कळ आली , त्या बॅगमध्ये तिला फक्त स्वतःचा चेहरा दिसत होता आणि जाणवत होते फक्त ते …………… तिच्यावर होत असलेले प्रहार आणि तिची असहायता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई कुठे काय करते??????
एखादी मदतनीस ठेवावी. अरुंधतीकडेपण विमल आहे.

सर्वप्रथम माझी कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. आई कुठे काय करते ही मालिका डिसेंबर २०१९ मध्ये आली. माझी ही कथा सर्वप्रथम "कुसुमाकर" ह्या मासिकात सप्टेंबर २०१८ साली आली होती(संपादक -श्याम पेंढारी). सोबत मासिकाची अनुक्रमणिका आणि कथेचे पण जोडायचा प्रयत्न करीत आहे.

वाचली Happy
मराठी/हिंदी मालिका मी बघत नाही त्यामुळे माहीत नाही.
कथा छान !