कधीतरी

Submitted by अनन्त्_यात्री on 2 February, 2021 - 05:48

उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला

शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश पोहोचायचंय मला

नीटनेटक्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला

त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
व्यामिश्र वितान
व्यापून थोडं उरायचंय मला

Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्तच....

व्यामिश्र वितान
व्यापून थोडं उरायचंय मला >>>>
हे मी असं वाचलं....
व्यामिश्र वितान
व्यापून पूर्ण विरुन जायचंय मला