अंधार

Submitted by चंदन सोनाये on 18 January, 2021 - 02:22

--------
अंधार
--------

आज अवचित आला, दाराशी कोण अंधार,
चल म्हणाला सोबत, सोडुनि सारे धरेवर...

शहारलो मी मनी, घाम आला माथी,
हे काय अवचित जाणे, कार्य किती आहे बाकी...

थांब म्हणालो जरा, करू दे थोडी तयारी,
जाता न पडो कमी, कोणा माझ्या माघारी...

अजून थोडे क्षण हवे, घेण्यास मोकळा श्वास,
थोडे आयुष्य अजून, बिनधास्त जगण्यास...

अंधार तो हसला, म्हणाला मी जातो परतून,
ओंजळीत टाकुनी तुझ्या, जीवनाची शिकवण...

राहिले असे काही, जगायचे ठेवू नको,
भरभरून घे आनंद, दुःखी मना ठेवू नको...

स्वप्ने बघुनी ती, अर्धवट ठेवू नको,
मनोरथ पूर्ण करण्या, कसर बाकी ठेवू नको...

आयुष्य हे तुझे, आहे श्रेष्ठ वरदान,
जगुनी आनंदाने, ठेव तयाचा मान...

प्रत्येक क्षण अमौलिक, घे त्याचा आस्वाद,
आहे जोवरी जीवन, ऐक मनाची साद...

जुळले कर नकळत, समोर त्या अंधार,
जगण्याचा नवा प्रकाश, ओतीला मज मनावर...

---- चंदन सोनाये

Group content visibility: 
Use group defaults