विक्रम आणि वेताळ - भाग १

Submitted by प्रभुदेसाई on 17 January, 2021 - 10:02

सुरवात
“हेल्लो ,हेल्लो मी बॉसचा सेक्रेटरी बोलतो आहे “
“ हेल्लो मी विक्रम बोलतो आहे “
क्षणभर विक्रमच्या लक्षातच काही आले नाही. कोण हा बॉस आणि ह्याला आपल्याशी काय
बोलायचे आहे ? .विक्रमला प्रथम वाटले की हा कोणीतरी अंडरवर्ल्डचा दादा आपल्याला धमकी
देत असावा
अर्थातच विक्रम असल्या धमक्यांना भिणारा तरुण नव्हता, तो असा
घाबरत असता तर ह्या असल्या व्यवसायात तो पडलाच नसता
“ बोला इकडे बॉसशी “
एकदोन क्लिकचे आवाज आले .फोन बॉसला ट्रान्स्फर झाला असणार!
घनगंभीर आवाजात बॉसने बोलायला सुरवात केली .
“ कैसे हो आप?”
एका क्षणांत विक्रमला त्या आवाजाची ओळख पटली. सगळ्या देशाला भारून टाकणाऱ्या अपराजितचा तो आवाज होता. अपराजित हा बॉलीवूडचा एक महान कलाकार होता. विक्रमचा मेंदू विद्युतगतीने काम करू लागला. आधी त्याचा विश्वासच बसत नव्हता. ह्याचे आपल्याकडे काय काम असणार?काय बोलायचे ,काय उत्तर द्यायचे हे तर तो विसरूनच गेला.
“ बस आपकी दुआ है”
अपराजित दिलखुलास हसत म्हणाला
“ अरे वा, तू तर एकदम फिल्मी डॉयलॉग बोलायला लागलास. आणि बाबा कसे आहेत? “
“ बाबा ठीक आहेत “
“ देव त्यांना उदंड आयुष्य देवो. हे पहा विक्रम तुला उद्या वेळ आहे? नाही ,नाही तुला वेळ काढावाच लागेल माझ्यासाठी आणि मला येऊन भेटावेच लागेल. नाहीतर मग मला बाबांशी बोलावे लागेल -----“
अपराजीतला बाबांविषयी इतक्या आदराने बोलताना ऐकून विक्रमला काही खास आश्चर्य वाटले नाही
विक्रमला बाबांच्याविषयी कित्येक गोष्टींची माहिती नव्हती. आणि बाबाही कधी त्यांच्या पूर्वायुष्याविषयी कधी बोलत नसत. विक्रमच्या कामात कित्येक वेळा त्याला अश्या अनेक व्यक्ति भेटत आणि त्याच्या बाबांची आदराने आठवण काढत. पण विक्रम असे विषय बाबांच्या बरोबर कधीच काढत नसे. बाबांच्या भूतकाळात काय काय दडले होते ?
आता अपराजीतचा सेक्रेटरी बोलत होता
“ बॉसने उद्या संध्याकाळी पाच वाजता यायला सांगितले आहे. कुठे म्हणजे? ह्या इथे बंगल्यावर “
इतर काही सटरफटर बोलणे झाल्यावर फोन बंद करण्यात आला.
विक्रम हा एक संगणक शास्त्राची पदवी घेतलेला तरुण होता. त्याला यंत्र, तंत्र आणि मंत्र –---म्हणजे इंजिनिरिंग, टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर यांची लहानपणापासूनच आवड होती. केवळ त्या आवडीपोटी त्याने संगणक शास्त्राची पदवी घेतेली होती. नोकरीची बांधिलकी त्याला आवडणारी नव्हती. सिंह कधी प्राणीसंग्रहालयात राहू शकेल काय?
विक्रम बाबांना लहानपणापासून पहात आला होता . त्याचे वडील पोलीस खात्यात मोठे अधिकारी होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले होते. शेवटी अंडरवर्ल्डचा दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पठाणापर्यंत त्यांचे हात पोहोचले होते. पण त्याच वेळी ----------------
काय झाले कोणास ठाऊक बाबांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. ह्या बाबत त्या दोघांचे कधीही संभाषण झाले नव्हते.
विक्रम तेव्हा केवळ शाळेत जाणारा मुलगा होता. त्याला आपल्या बाबांविषयी माहिती त्याला भेटणाऱ्या लोकांकडूनच मिळाली होती. ते सर्वजण त्यांच्याविषयी अत्यंत आदराने बोलत असत. अजूनही पोलीस दलातील छोटे मोठे अधिकारी—जेव्हा एकःद्या केसमध्ये हतबल झाले कि--- घरी येऊन त्यांच्याशी सल्लामसलत करत असत. सध्याचे पोलीस कमिशनर पवार ह्यांनी बाबांच्या हाताखालीच उमेदवारी सुरु केली होती. ह्या सर्व गोष्टीमुळे विक्रमच्या मनात एक सल होती कि आपल्या बाबांच्यावर अन्याय झाला आहे.
ह्या एकाच गोष्टीमुळे विक्रमने नोकरी करायच्या ऐवजी स्वताची एक कंपनी स्थापन केली होती. ज्या कोणावर अन्याय होत असेल किवा जो कोणी दुर्दैवाच्या दुष्ट चक्रात सापडला असेल अश्या लोकांना मदत करण्यासाठी त्याची ही कंपनी होती. पण अर्थातच तो इतरही कामे घेत असे. पण कोठलीही केस हाती घेण्याआधी तो स्वतःची खात्री करून घेत असे कि तो सत्याच्या बाजूनेच काम करत आहे.
ते फोनवरचे संभाषण संपल्यावर विक्रमचे विचारचक्र सुरु झाले. ह्या अपराजितचे आपल्याकडे काय काम असेल? त्याला कोणी अंडरवर्ल्डचा दादा धमक्या तर देत नसेल? असे जर असेल तर त्याने सरळसरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवायला पाहिजे होती. पण त्याला हेही माहित होते कि बरेच लोक अश्या गोष्टीत पोलीसांकडे जाण्याऐवजी प्रकरण आपापसात मिटवायला बघतात. आणि अश्यामुळे खंडणी मागणारे जास्तच धीट होतात आणि नवीन नवीन बकरे शोधत रहातात.
हा हिरो कोठल्या स्त्रीच्या भानगडीत तर फसला नसेल ना. समाजात प्रसिद्ध असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या काही केसेस त्याला माहित होत्या.
आणि हो त्याची आणि बाबांची चांगली ओळख दिसते आहे. अर्थात बाबा त्याबद्दल कधी बोलले नव्हते. बाबा कधीच असल्या गोष्टी त्याच्याशी बोलत नसत. बाबांचे जेवढे पैलू त्याला माहित होते त्यापेक्षा जास्त त्याला अज्ञात होते !
अपराजितला भेटायच्या आधी बाबांशी बोलायला पाहिजे. तसा तो नेहमीच प्रत्येक केसमध्ये बाबांशी बोलत असेच.
त्याच्या केबिनचा दरवाजा उघडून तानाजीने आत प्रवेश केला.
तानाजी हा बाबांचा सर्वात आवडता आणि विश्वासू पोलीस हवालदार होता, तो बाबांच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहिला होता. बाबा जेव्हा जेव्हा मोहिमेवर – गुंडांच्या अड्ड्यावर हल्लाबोल करण्यासाठी जात असत , तानाजी हमखास त्यांच्या बरोबर असायचाच. कित्येक वेळा त्याने आपले प्राण पणाला लाऊन बाबांचे रक्षण केले होते. पण बाबा पोलीस फोर्स मधून बाहेर पडल्यावर त्याला कामात रस उरला नाही आणि त्याने देखील नोकरीला राम राम ठोकून गावचा रस्ता पकडला आणि शेतीत आपले मन रमवू लागला . पण वाघ किती दिवस गावात खाणार ? जेव्हा विक्रमने आपल्या कामाला सुरुवात केली तेव्हा बाबांनी त्याला बोलावून घेतले आणि त्याला विक्रमची जबाबदारी सोपवली. जो पूर्वी भक्त हनुमानाच्या भूमिकेंत होता तो आता मोठ्या भावाच्या भूमिकेंत आला होता. तानाजी एका खास कामावर होता परंतु आज त्याच्याकडे सांगण्यासारखी बातमी नव्हती.
विक्रमचा एका खास मित्र होता राघव. राघव आणि विक्रम ते दोघे एकाच शाळेत शिकले. दोघांनी बरोबरच अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर विक्रमाने आपला व्यवसाय सुरु केला होता तर राघव एम बी ए चे उच्च शिक्षण घेउन एका कंपनीत मानव संसाधन विभागात व्यवस्थापक म्हणून काम करू लागला. कंपनीत नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या आधी त्या उमेदवाराची पार्श्वभूमी पूर्ण तपासावी लागते. हे काम तो विक्रमला देत असे. अशाच एका कामावर तानाजी काल गेला होता.
“काही विशेष नाही. सगळे काहीं आलबेल आहे,“ तानाजी सांगत होता, “उमेदवार श्री सिंग यांनी त्यांच्याविषयी बायोडाटा मध्ये दिलेली सर्व माहिती खरी आहे. आणि त्यांच्याविरुद्ध डिपार्टमेंट मध्ये काहीही रेकॉर्ड नाही.”
“तानाजी. एक रिपोर्ट बनवून मला दे,“ विक्रमने त्याला सांगितले, “एवढी घाई नाहीये त्याची. ते काम दुपारी कर. आधी मी काय सांगतो ते ऐक. तुला अपराजित माहित आहे?“
“अपराजित –म्हणजे आपला हिरो? बॉलीवूडचा बादशहा ? मी तर त्याचा फँन आहे. एकपण पिक्चर सोडत नाही. पहिला दिवस पहिला शो. काय फायटिंग करतो !! तुम्ही तो ‘विच्छा तुझी पूर्ण करतो’ हा सिनेमा बघितला आहे का? अवश्य बघा. माझ्याकडे सीडी आहे त्याची. देईन मी तुम्हाला. आपला हिरो विलनला किंवा विलनच्या चमच्याला ठोकायच्या आधी काय म्हणतो ‘विच्छा तुझी पूर्ण करतो ‘ आणि मग एक अशी ठेवून देतो कि बस. त्याने एक दिली कि विलन जो हवेत मागच्या मागे हवेत उडत जातो ते थेट खिडकी तोडून रस्ता क्रॉस करून समोरच्या हॉटेल मध्ये खुर्चीवर जाऊन पडतो. वेटर येऊन त्याला आता गरम काय आहे त्याची यादी सांगतो. लोकांनी थिएटर टाळ्या आणि हशांनी डोक्यावर घेतले. आठवडा होऊन गेला अजून अॅ बु हौस फुल चालू आहे.“
“अॅ बु हौस फुल म्हणजे काय?”
“अॅ बु म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग, विक्रम साहेब,” तानाजीने माहिती पुरवली.
विक्रमला सिनेमासृष्टी मध्ये माफकच स्वारस्य होते. तानाजी अपराजित बद्दल बरच काही सांगत होता. पण विक्रमचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्याच्या मनात अपराजितच्या केसचेच विचार चालले होते. विक्रमचे आपल्याकडे लक्ष नाही हे चलाख तानाजीने ओळखले. आपली बक बक थांबवून त्याने विक्रमला विचारले, “साहेब तुम्ही मला अपराजित बद्दल काही सांगत होता. काय झाले त्याचे?”
विक्रम आपल्या विचारचक्रातून बाहेर पडला.
“आपल्याला त्याने बोलावले आहे. उद्या संध्याकाळी. त्याच्या बंगल्यावर जायचे आहे.“
“विक्रम साहेब, तुम्ही माझी खेचत आहात.... हो ना?”
“नाही तानाजी ,मी तुझी चेष्टा करत नाही आहे. मी तुला खरच सांगतो आहे. कशासाठी बोलावले असेल आपल्याला ? तुझा काही तर्क ? तू सगळ्या जगाची माहिती ठेवातोस. तेव्हा तुला माहिती असेलच.“
आता तानाजीचा नूर पूर्णपणे पालटला. तो आता एक सिनेमा वेडा प्रेक्षक नव्हता तर एक जबाबदार हवालदार होता. विक्रमचा उजवा हात होता! आणि उद्या तो आपल्या हिरोला भेटणार होता. आणि कदाचित त्याच्यासाठी कामही करणार होता.
“मला थोडा वेळ लागेल. उद्या दुपारपर्यंत.”
विक्रमची ही एक सवय होती. कोणालाही भेटायला जायच्या आधी त्या बद्दलची सर्व माहिती अभ्यासूनच मग तो तयारीनच जात असे.
त्या दोघांची ती काम करायची पद्धत होती. विक्रम इंटरनेट, संदर्भ ग्रंथ, रिपोर्ट आदींचा अभ्यास करून तयारी करत असे तर तानाजीची रोख ठोक पद्धत होती. त्याचे मित्र सर्व दूर पसरलेले होते. जसे ते पोलीस खात्यात होते तसे ते गुन्हेगारी जगतातही होते. त्याचे खबर्यांचे जाळे होते, कोण कुठल्या बार मध्ये कुठल्या मुलीवर पैसे उधळत होता, कोण केलेल्या ‘गेमची’ बढाई मारत होता, कोण चोरीचा माल खपवायच्या मागे आहे ह्या बातम्या त्याला आपसूकच मिळत असत. त्या सर्व माहितीची सांगड घालून निष्कर्ष काढणे हे काम अर्थातच विक्रमचे.
“फारच छान,“ विक्रमने त्यला प्रतिसाद दिला.
विक्रमने स्वतःसाठीपण कामाचा आराखडा ठरवला. उद्यापर्यंत अपराजित बद्दल जेवढी मिळेल तेवढी माहिती तो मिळवणार होता. ते काम काही अवघड नव्हते कारण अपराजित बद्दल इंटरनेट वर भरभरून माहिती होती.
अपराजित हा स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आणि कष्ट करून वर आलेला अभिनेता होता. एका नगण्य शहरांत त्याचा सुमारे चाळीस वर्षपूर्वी जन्म झाला होता. त्याचे आई वडील हे मध्यमवर्गातील होते. त्यांनी अपराजीताला मोठ्या प्रेमाने लहानाचे मोठे केले. त्यांची इच्छा होती कि अपराजित ने खूप शिकावे, डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे आणि सुखांत राहावे. पण कोवळ्या वयाचा अपराजित दुसरीच स्वप्ने बघत होता. त्याला पुस्तके वाचावयाची आवड होती. आणि जेव्हा त्याची शेक्स्पिएअरशी ‘ओळख’ झाली तेव्हाच त्याचे आयुष्याचे ध्येय निश्चित झाले. तो दिवस रात्र त्या महान नाटककाराने निर्माण केलेल्या निरनिराळ्या व्यक्तिमत्वामध्ये जगू लागला. असे सांगतात कि शेक्स्पिएअरच्या नाटकांतली कित्येक स्वगते त्याला आजही तोंडपाठ आहेत. ह्या त्याच्या वेडाने त्याला अभिनयाकडे खेचून नेले. प्रथम कॉलेज मधल्या एकांकिका स्पर्धेत भाग घेत त्याने अनेक बक्षिसे मिळवली मग त्याने व्यावसायिक नाटकांत काम करायला सुरवात केली. ह्यातून त्याचा अभिनय फुलत असताना त्याच्यावर बॉलीवूडच्या एका मातब्बर दिग्दर्शकाची नजर पडली. तेव्हापासून अपराजितचे सर्व आयुष्य बदलले. आज तो बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जात होता. हा त्याचा प्रवास अगदी सगळाच रमत गमत झालेला नव्हता. त्यांत ही काही चढ उतार होतेच. खरे मित्र आणि कपटी, अप्रामाणिक, तोंडपुजे यांची गल्लत केल्यामुळे तो एका मोठ्या संकटात सापडला होता, पण त्यातून तो सही सलामत सुखरूप बाहेर पडला होता. ( तेव्हा बाबा पोलीस खात्यात मोठे अधिकारी होते ! निव्वळ योगायोग?)
त्यानंतर मात्र त्याची चढती कमान होती. त्याच्या चाहत्यांनी त्याचा प्रत्येक पिक्चर हॉउसफुल केला. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत तो आता बॉलीवूडचा बादशाह झाला होता.
ह्या सगळ्यामुळे तो अमाप पैसा कमवत होता. पण हा पैसा तो हुशारीने निरनिराळ्या धंद्यांमध्ये गुंतवत होता. त्याला गेल्या पिढींतील कितीतरी अभिनेते माहित होते ज्यांनी उमेदीच्या काळांत रग्गड पैसा कमावला आणि तितकाच आपल्या कृतघ्न ‘ मित्रांवर ‘ , निरनिराळ्या व्यसनांवर आणि छंदांवर उधळला आणि शेवटी कफल्लक होऊन ते रस्त्यांवर आले. अपराजित आज तीन लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेल्सचा मालक होता. एका टीव्ही चॅनलचा मुख्य भागीदार होता. त्याचे स्वतःचे प्रॉडक्शन हाउस होते. आणि विशेष सांगायचे म्हणजे तो एका क्रिकेट टीमचा सर्वेसर्वा होता.
अपराजितचे क्रिकेट प्रेम हा लोकांच्या कौतुकाचा विषय होता.
“मी जर अभिनयाच्या क्षेत्रांत आलो नसतो तर निश्चितच देशाच्या क्रिकेट टीम मध्ये खेळलो असतो’. ह्या त्याच्या क्रीकेट वेडातूनच , जेव्हा देशांत क्रिकेट लीग सुरु झाली तेव्हाच त्याने आपली एक टीम बनवली होती. ह्या लीगमध्ये खेळणाऱ्या सोळा संघामध्ये त्याची टीम दरवर्षी पहिल्या एक ते चार क्रमांकावर असे. एकूण तीन वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले होते. ‘अपराजित इलेवन‘ च्या जवळ जवळ प्रत्येक सामन्यात तो थोडा वेळ का होईना येऊन हजेरी लावत असे, खेळाडूंना प्रोत्साहन देत असे.
विक्रमने अजूनही बरीच माहिती जमवली होती. त्यात अपराजितच्या खासगी आयुष्याचा पण लेखा जोखा होता. सिनेमाश्रृष्टीमध्ये यशाची मुहूर्तमेढ झाल्यावर त्याने लगेचच आपल्या कॉलेजमधल्या मैत्रीणीशी विवाह केला होता आणि एक सुखी आयुष्य व्यतीत करत होता.
मग प्रॉब्लेम कुठे होता ?
विक्रम एक अत्यंत हुशार तरुण होता ह्याबद्दल प्रश्नच नव्हता. प्रत्येक भारतीयाला क्रिकेटची जेवढी जाण असते तेव्हढी त्यालाही होती. शाळा कॉलेजमध्ये तो क्रिकेट खेळलाही होता. पण त्यापेक्षाजास्त वेळ क्रिकेटमध्ये घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे त्याचे प्रामाणिक मत होते. क्रिकेटपेक्षा भौतिकशास्त्र आणि गणित किवा गुन्हेगाराचा अभ्यास ह्यांचे त्याला जास्त आकर्षण होते. नेमके ह्यामुळेच त्याला अपराजितची समस्या समजली नाही.
संध्याकाळी बाबांच्या बरोबर चहा घेताना विक्रमने अपराजितचा विषय काढला.
“बाबा तुम्हाला अपराजित माहित आहे? हिंदी सिनेमाचा हिरो?”
“हं, माहित आहे.”
“त्याने आज मला फोन केला सकाळी आणि भेटायला बोलावले आहे.”
.त्याला खात्री होती कि अपराजित आणि बाबांचे बोलणे झालेले असणार आणि बाबांनीच अपराजीतला विक्रमशी बोलण्याची सूचना केली असणार. बाबांना अपराजितचे काय काम असावे ह्याची पण कल्पना असणार.
“त्याला काय अंडरवर्ल्डकडून धमक्या येत आहेत काय ? खंडणीसाठी ?”
“त्याचे आणि माझे बोलणे झालेले नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे असे काही असण्याची शक्यता नाही. अंडरवर्ल्ड सध्या थंड झालेले आहे. पोलिसांनी टकल्या मेह्मुदचा चकमकीत पाडाव केल्यानंतर आता अंडरवर्ल्डला कोणी नेता उरला नाही ही माझी माहिती आहे.“ बाबा शांत आवाजात बोलत होते.
“पंधरा दिवसापुर्वी भंडारी बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्या. तेव्हा मला वाटले कि हे लोक पुन्हा सक्रीय झाले.”
“तो सगळा भंडारीचा बनाव होता. त्याच्यामागे राजकारण होते ती भंडारीचीच चाल होती. ती फसली आणि त्याच्याच अंगाशी आला. पोलीस त्याला धडा शिकवणार होते खोटी तक्रार केली म्हणून पण .................” त्यांनी आपले बोलणे अर्धवट सोडले, “तू आता तिथे जाणारच आहेस तेव्हा तुला सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच.”
“अपराजित बोलताना तुमची आठवण काढत होता.”
बाबांनी स्मितहास्य केले, “छान, त्याला माझे आभार सांग. अजून विसरला नाही तर.”
विक्रमला पक्की खात्री होती कि बाबा ह्यापेक्षा जास्त बोलणार नाहीत इतक्यांत स्वयंपाकघरातून
आत्याबाई बाहेर आल्या.
“तुम्ही दोघेही नीट ऐका ---- मी रात्री कार्ल्याची भाजी करणार आहे. ती सगळी खायला पाहिजे. काहीही सबब ऐकणार नाही मी. कधीतरी आरोग्याची काळजी घ्या.” आत्याने वार्निंग दिली, ह्या आत्याबाई म्हणजे विक्रमच्या दूरच्या नात्यातल्या होत्या. विक्रमने आपल्या आईला कधी पहिलेच नव्हते. कधीतरी ह्या आत्याबाई घरी आल्या आणि त्यांनी लहानग्या विक्रमला मायेची उब दिली. त्यानाही कोणी जवळचे नातलग नव्हते. मग त्या विक्रमच्या घरांतच रमल्या.
“तू काय त्या उपटसुम्भाला भेटायला चालला आहेस म्हणे?“
“उपटसुम्भ? उपटसुम्भ कोण आत्या?“
“अरे तो तुमचा हिरो अपराजित ! दुसरा कोण. उपटसुम्भच तो. बायकांच्या मागे काय लागतो. हाणामारी काय करतो अरेरे बघवत नाही. हां, पण कधी कधी डोळ्यातून पाणी पण काढतो बर का. तसा लाघवी आहे रे तो. कोणता त्याचा तो चित्रपट आपण बघितला होता रे -----“
“ममता की आंस“ आत्याने अपराजितचा तेव्हढा एकच सिनेमा बघितला होता, त्यात शेवटी अपराजित मरतो असा सीन होता. कदाचित आत्येला त्याची आठवण झाली असणार.
“ते जावूदे. तू त्याला भेटलास कि माझा एक निरोप सांग. त्याला म्ह्णव कि सिगारेट प्यायचे थोडे कमी कर.”
“सांगेन आत्या “
(भाग पहिला)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pubhapra