सुस्पष्ट आयुष्यातली अस्पष्ट 'चष्म'कश.

Submitted by Charudutt Ramti... on 16 January, 2021 - 01:50

वर्तमानपत्रावरील ऑफसेट प्रिंटिंग केलेली बारीक बारीक अक्षरं अधेमधे पुसट आणि कधीकधी फिसकट दिसू लागली आणि मला स्वतःला आपल्याला 'चाळीशी लागली असावी कदाचित' अशी कुणकुण लागली. ‘आज जाऊ…उद्या जाऊ’ असं करत शेवटी एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला म्हणून गेलो. त्यांनी “उ-घ-डा डो-ळे, प-हा नी-ट!” असं दरडावत त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात खुपसत तपासणी केली.

“चष्म्याचा नंबर लागल आहे की हो तुम्हाला, बरेच दिवसांपासून असणार आहे, डोळ्यांवर ताण आलाय तुमच्या बराच." - शक्य तेवढा गंभीर चेहरा करत आणि माझ्या डोळ्यात खोलवर पाहत डॉ. बोलले.

गंमत म्हणजे त्यांनाही चष्मा होता. चांगल्या जाड भिंगांचा, आम्ही शाळेत असताना ‘सोडा वॉटर’ चा नंबर असं म्हणून चिडवत असू, इतर मुलांना तेव्हढा जाड चष्मा असेल तर. डोळ्यांच्या डॉक्टरांना एवढ्या जाड भिंगांचा चष्मा असलेला पाहून मला गंमत वाटली.

“लोकांचे डोळे तपासता तपासता, तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर किती ताण आलाय ते पहा…!” - मी डॉ. ना उद्देशून (अर्थात, मनातल्या मनात).

“डाव्या डोळ्याला 'सिलिंड्रिकल' पॉसिटीव्ह जवळचा आणि उजव्या डोळ्याला 'स्फेरिकल' 'निगेटिव्ह' लांबचा” असल्या काहीतरी अगम्य शब्दात त्यांनी माझ्या डोळ्यांना किती आणि कसला नंबर लागला आहे ते सांगितलं. लांबचा, सिलिंड्रिकल, ऍक्सिस ८० अंश आहे वगैरे, हे असलं किचकट गणित अजिबात समजून न घेता आणि "न” ऐकूनही ऐकल्यासारखं" करत मी तो चष्म्याचं चित्रं रेखाटलेला, आणि त्यावर बॉल पेन ने डॉक्टरांनी गिजमीड अक्षरांत माझा नंबर लिहिलेला असा पोस्टकार्ड सारखा पिवळा पुट्ठे वजा कागद घेऊन सरळ ‘ऑप्टिशियन’ गाठला.

चष्मा सिलेक्ट करणे हा प्रकार सुद्धा, त्या ऑप्थल्मोलॉजिस्ट समोरच्या खुर्ची वर बसल्या नंतर, समोरच्या आरसा वजा पडद्या वर दिसणाऱ्या (खरंतर “न” दिसणाऱ्या) ‘एरियल नॅरो ४८ पासून ५’ किंवा ‘टाइम्स न्यू रोमन’ मधील ‘७२ पासून ते ३’ ह्या वेगवेगळ्या फॉन्ट साईज मध्ये गिरवलेल्या बारीक गिजमीड अक्षरांपेक्षाही अधिक किचकट कार्य आहे हे मला माहिती नव्हतं. खरंतर पूर्वी मला ‘ऑप्थलमॉलॉजिस्ट’ आणि ‘ऑप्टिमेट्रिस्ट’ ह्या दोघांच्यातला फरकच समजत नसे. मग चांगले मार्क्स पडून एका ‘मेडिकल’ला गेलेल्या मित्रांन मला कळेल अश्या भाषेत ”ऑप्थलमॉलॉजिस्ट’ म्हणजे डोळ्यांचा डॉक्टर आणि ‘ऑप्टिमेट्रिस्ट’ म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांचा कंपाऊंडर, फक्त तो दवाखान्यात न बसता दुकानात बसतो” असं साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं. मी त्याला परवा व्हाट्सअँप करून सहज गंमत म्हणून परत “एक ‘ओप्टिमेट्रिस्ट’ आणि दुसरा ‘ऑप्टिशियन’ ही दोन परत काय भानगड आहे?" असं विचारणार होतो. पण म्हंटल नको ऊगाच, जाऊदे! कंपाउंडर हा विषय आधीच लॉकडाऊन आणि कोविड मुळे वैद्यकीय क्षेत्रापेक्षा पेक्षा राजकीय क्षेत्रात अधिक चघळला गेला होता अलीकडॆ, त्यामुळे मी “तो वादग्रस्त विषय पुन्हा डिस्कशन मध्ये नकोच!” असं मनातल्या मनात म्हणतच टाळला.

"तुमचा चेहरा उभट आहे, तुम्हाला ह्या शो केस मध्ये डिस्प्ले ला असलेली कोणतीच फ्रेम चांगली दिसणार नाही" तुम्ही ह्या इकडे भिंतीवर काचेत लावल्या आहेत त्या फ्रेम्स पैकी एखादी पहा” असं जवळ जवळ वस्सकन ओरडत मला आवडलेली फ्रेम ह्या ऑप्टिशियन ने माझ्या हातातून अशी काही हुसकावून घेतली, की माझ्या “चष्मा, सौंदर्य, डोळे, भाव” ह्या असल्या सगळ्या कधी काळी तरुणाईच्या जमान्यात जीवापाड जपलेल्या हळूवार आंतरिक संकल्पनांना पहिल्या पाचच मिनिटांत 'तडा' गेला.

आता मात्र सावधगिरीने विचारत विचारत, त्या पलीकडच्या भिंतीवर काचेच्या फडताळ वजा कपाटात ठेवलेले चष्मे एकेक करत हळूहळू कानाच्या आणि डोळ्यांच्या मध्ये चढवून पहात असताना "ही केव्हढ्याची हो फ्रेम" असं मी बिचकत ऑप्टिशियन ना विचारणार इतक्यात…दोन सुंदर तरुणी दुकानात आल्या आणि त्यांनी रेबॅन का कसल्या गॉगल ची चौकशी केली, एवढं सुंदर (आणि कदाचित धनाढ्य) गिऱ्हाईक दुकानाची पायरी चढून आल्यावर ऑप्टिशियन ने माझ्या चष्म्याच्या फ्रेम चा 'दर' विचारण्याकडे सोईस्कर पणे काना'डोळा' करत त्या दोन रेबॅन वाल्या ललनांकडे आपली पारखी नजर आणि पाऊले वळवली.

पुढची पाच मिनिटे मग त्या ऑप्टिशियन आपल्या बोटांनी त्या दोन पैकी एका ललने च्या डोळ्यांना हळूच एक-दोन गॉगल अदलून बदलून घातले आणि “ही छान सूट होईल तुमच्या चेहऱ्याला”, “ती जास्त छान दिसते अशी असेल डोळ्यांची ठेवण तर” वगैरे सौंदर्य विषयक मोहक आणि लडिवाळ संवाद केला. दहा बारा मिनिटांनी ललनांनां गॉगल आवडला नाहीं की काय परवडला नाही ते देवच जाणे, पण कोणतीच खरेदी न करता दुकानदाराकडे नुसतेच गालावरील खळीयुक्त हास्य शिंपडून निघून गेल्या.

गिऱ्हाईक असं हातचं निसटलं ह्याचा त्याचा राग ऑप्टिशियन उगाचंच ने काहीही कारण नसतांना माझ्यावर काढत "तुमचं नक्की किती बजेट आहे ते सांगा, म्हणजे बरं पडेल, तुम्हालाही आणि मलाही!”. मी सुद्धा काहीही कारण नसताना उगाचंच ‘खजील’ होत निमूटपणे माझं बजेट सांगितलं.

माझं बजेट ऐकून, माझ्या आधीच दिवसा गणीक डोक्यावर कमी होत जाणाऱ्या केसांपासून ते पायातल्या रोजच्या रोज झिजत जाणाऱ्या चपले वरून खाल पर्यंत एक आपल्या डोळ्यात जणू काही मोबाईल मध्ये पॅनोरमा फोटो काढतात तशी नॅचरल लेन्सच देवाने बसवली आहे असा अविर्भाव करत, वरपासून मान खालपर्यंत मान फिरवत…

“अहो तुम्ही चष्मा घेत आहात डोळ्यांसाठी, पायात घालायचं चप्पल नव्हे. प्रश्न डोळ्यांचा आहे. एवढी कसली काटकसर करता एवढ्या नाजूक अवयवा बाबतीत?” - ऑप्टिशियन ने शब्दफेकीमध्ये शक्य तितका तुसडे पणा आणत डायरेक्ट माझ्या ‘डोळ्यात चांगलं झणझणीत अंजनच’ घातलं.

“ ………….. ” – मी. काहीच बोललो नाही. (बोलू शकलो नाही). काय बोलणार मी नजरेला नजर नाही सुद्धा मिळवू शकलो त्या दुकानदाराच्या. कसा काय एखाद्याला एवढा परखड पणा जमतो बोलताना काय माहिती? विक्रम गोखले, विनय आपटे, नाना पाटेकर, शिरीष कणेकर इथे चुकून आले असते तर ते सुद्धा लाजले असते, एव्हडा परखड पणा ह्या ऑप्टिशियन ने कमावला होता.

“हे पहा, बेसिक दोन प्रकार आहेत, बायफोकल आणि प्रोग्रेसीव. बायफोकल हे असे असतात…” हातातले दोन चष्मे त्यांच्या काड्यांनी, स्वतःच्या अंगठा आणि अनामिकेच्या चिमटीत पकडत आणि ते काडीचा अक्ष करून गोल गोल फिरवत परखड स्वभावाचे ऑप्टिशियन वदले.

एक दीर्घ श्वास घेऊन “…पण प्रोग्रेसीव मात्र जरा महाग असतात” - गरगर फिरता चष्मा हवेतच (लाईट गेल्यावर पंखा थांबवा तसा) थांबवत आणि नाटकात लेखकानं दिलेल्या वाक्यात स्वतः ची ऍडिशन करत नट बोलतो तसं आपलं वाक्य पूर्ण करत, त्यांनी माझी 'ऐपत' चाचपण्याचा प्रयत्न केला.

“ कां बरं बुवा महाग असतात प्रोग्रेसिव्ह ? ” - वाचता येत असूनही अडाण्यासारखे प्रश्न विचारणारा मी.

“कारण ते प्रोग्रेसिव्ह असतात” - ऑप्टिशियन च्या उर्मट उत्तरावर मला पु.लं.चा, ‘रंजले’चा समानार्थी शब्द ‘गांजले’ आणि ‘गांजले’चा ‘रंजले’ , हा जुना विनोद आठवला.

“ ………….. ” मी काहीच बोललो नाही. नजरेला नजर मात्र भिडवली ह्या वेळेस त्या परखड ऑप्टिशियनच्या मी माझा ‘करारी’पणा दाखवत.

“ अहो…ते प्रोग्रेसीव असल्यामुळे वापरणाऱ्याला सोईचे पडतात, थोडे महाग असतात एवढंच.” - स्वतःच्याच उर्मट पणाच्या पश्चात्तापाचा अग्निदाह असह्य होऊन ऑप्टिशियननी थोड्या नरम आवाजात खुलासा केला.

परावर्तन, अपवर्तन, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र, प्रिझम, लोलक, कलर स्पेक्ट्रम, आठवी नववी मध्ये भौतिक शास्त्रात शिकलो (आणि पुढे तिथेच विसरलो) एवढंच माझं “काच” आणि “भिंग” ह्या विषयीच जुजबी ज्ञान. त्या कोवळ्या आणि अजाण वयात सुद्धा माझ्या डोक्यात "भिंग, स्पेक्ट्रम, वगैरे विषय आपले नव्हेत असा "प्रकाश" पडला. त्यामुळे आता आपलं संबंध आयुष्य 'भिंग' ह्या विषयाला समर्पित केलेल्या ह्या चष्म्याच्या दुकानदार पुढे अधिक बोलून आपण आपलं "बिंग" उघडं पडू न देणे श्रेयस्कर असं म्हणत मी पुन्हा गप्प बसलो.

तरीसुद्धा धाडसानं मी "प्रोग्रेसीव लेन्स ची किंमत साधारण किती असते हो ?" असं विचारलं. ऑप्टिशियन ने ती सांगितली आणि ती ऐकल्यावर ज्या प्रकारे भुवयांच्या वरती माझ्या कपाळावर आठया आल्या, त्या आठया पाहून “काय बुरसटलेल्या विचार सरणीचा माणूस भेटलाय ? हा कसली घेतोय प्रोग्रेसिव्ह लेन्स?” अश्या प्रकारची एकंदर मूक प्रतिक्रिया देत दुकानदाराने त्या ‘प्रोग्रेसिव्ह’ लेन्सेस परत शोकेस मध्ये ठेवायला सुरुवात केली.

खर्चाच बजेट, डोळ्यांच आरोग्य, चेहऱ्याचं सौंदर्य(?). ती महागडी “प्रोग्रेसिव्ह” लेन्स आणि माझे ते “बुरसटलेले” विचार ह्या सगळ्यांची सांगड कशी घालायची ह्या विचाराने मी चांगलाच बुचकळ्यात पडलो. आयुष्यात असले मोठे निर्णय एकट्याने घ्यायची धडाडी माझ्या अंगी अजिबात नाही. त्यामळे आजचा दिवस माझी राशीसाठी 'चष्मा खरेदीस अशुभ दिन' असून उद्या सौभाग्यवती समवेत येऊन असे धाडशी निर्णय घेणे अधिक श्रेयस्कर असं म्हंणत मी दुकान दाराच्या करारी नजरेला नजर न भिडवतच बाहेर पडलो.

घरी आलो. काल पर्यंत स्पष्ट दिसणारं जग आज मात्र “तुम्हाला वाचायचा म्हणजेच जवळचा आणि लांबचा दोन्हीचा चष्मा लागलाय” असं डॉक्टरांनी सांगितल्यावर उगाचंच ‘अंधुक अंधुक’ दिसू लागलं. संध्यानं म्हणजे माझ्या एकुलत्या एक बायकोनं "लेन्स्कार्ट" च्या वेबसाईट वर शोधून एक दोन फ्रेम्स टॅग करून ठेवल्या होत्या, मला शोभतील(?) अश्या. ऑनलाईन शॉपिंग ह्या कॉनसेप्ट च्या एकंदर "पारदर्शी"पणा विषयीच मला मुळात शंका आहे. त्यामुळे "चष्मा" हा विषय ऑनलाईन खरेदीचा असू शकतो, हा 'दृष्टि'कोनच माझा अजून म्हणावा तसा तयार झालेला नाहीये.

बायकोनं “अहो, एकदा ट्राय तरी करून पाहू ऑनलाईन चष्मे” अशी गळ घातली. मी त्या गोष्टीला स्पष्ट आणि ठाम नकार दिला. ऑनलाईन शिक्षण, वधुवर संशोधन, लग्न जुळवणे अथवा मोडणे, बँकेच्या एफ.ड्या. करणे अथवा मोडणे, डॉक्टर लोकांशी कंसल्ट करणे, इतपत किरकोळ गोष्टी वगैरे ठीक आहेत, परंतु मला ‘रुमाल’, ‘पेन’, ‘पाकीट’, ‘किचेन’, ‘लोकलचा मंथली ‘पास’ (अलीकडे मास्क) आणि आता त्यात भर पडलेला “चष्मा” वगैरे स्वतःच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या गोष्टी “ऑन लाईन” खरेदी करणे ही गोष्टच मुळात मला कधी पटली नाही.

बायकोला घेऊन परत त्याच ऑप्टिशियन कडे जाण्यास मी खरं तर अजिबात उत्सुक नव्हतो. परंतु पुन्हा अजिबात तोंड न पाहण्याची प्रतिज्ञा करून सुद्धा, नको असलेली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटतात तुमची कितीही इच्छा नसतांनाही हा माझा स्वत: चा खूप वेळेला घेतलेला अनुभव आहे. हा चष्मेवाला त्या अनेकांपैकीच एक. ह्याचं तर तोंड मला बिना चष्म्याचं आणि पुन्हा चष्मा सिलेक्ट झाल्यावर चष्म्यातून, असं दोन दा पहावं लागणार होतं.

मी आज पुन्हा दुकानाचा उंबरा ओलांडल्यावर ऑप्टिशियन ने चेहऱ्यावर फार काही उत्सुकता दाखवली नाही. डोळ्यात तर त्याच्या ‘भाव’ कधी नव्हतेच. एखाद्या मासिकात किंवा दिवाळी अंकात छापून आलेल्या नवकवीच्या पहिल्या वाहिल्या कवितेला आणि प्रतिभेला जशी फक्त गूळ आणि शेंगदाण्याची पुडी बांधण्या इतकीच किंमत असते वाण्याच्या दुकानात (अलीकडे तर पॉलिथिनच्या पिशव्यांमुळे मुळे ती सुद्धा किंमत उरली नव्हती. परंतु मध्यंतरी एक दोन वर्षांपूर्वी ‘पॉलिथिन’ पिशव्यांवर बंदी घातल्यापासून कवितेची पानं छापून आलेल्या रद्दीला जरा परत बरे दिवस आले, असो.) तर तेव्हडीच किंमत "आssज तूsss डोळ्यात माझ्या, मिसळुनीssss डोळेss पहाssss" वगैरे नाजूक भाव-भावनांची, ह्या ऑप्टिक्स च्या दुकानात.

परंतु आज सोबत माझी बायको आलीय हे पाहिल्यावर मात्र ऑप्टिशियनच्या (व्यावसायिक) डोळ्यात क्षणभर थोडे आशेचे किरण चमकले.

“बोला मग, काय ठरलं तुमचं, प्रोग्रेसिव्ह घेताय की बायफोकलंच परवडतेय?” मी ओगलेवाडीच्या “काच” कारखान्यात ‘रोजंदारीवर’ ह्याच्या हाताखाली कामाला असल्यासारखा ऑप्टिशियन माझ्याकडे पाहत तुसडे पणाने.
ह्या त्याच्या प्रोग्रेसिव्ह आणि बाय’फोकल’ च्या कुत्सित प्रश्नावर त्याला चांगलं ‘फोकलून’ काढावं, त्याच्याच दुकानात - असे रानटी प्रवृत्तीचे विचार माझ्या मनाला स्पर्शून गेले.

“ हे पहा, प्रोग्रेसिव्ह असो की बायफोकल, जी चांगली असेल ती द्या, महाग पडली तरी चालेल, आधीच 'हे' वयाच्या मनानं जरा जास्तचं वयस्क दिसतात त्यात आणि चष्म्या मुळे पाच वर्ष अजूनच भर घालतील ह्यांच्याकडे पाहणारे.” इति अर्थात मम् भार्या. मध्ये मध्ये (बऱ्याचदा चुकीचं) न बोलती तर मग ती माझी बायको कसली? (किमान पक्षी इथे 'वयस्क' ऐवजी निदान 'पोक्त' हा शब्द प्रयोग तरी करेल की नाही ही बया).

'महाग पडली तरी चालेल' ह्या वाक्यावर निळसर आकाशात जसे इंद्रधन्युष्य पडल्यावर सप्तरंग उमटतात, तसे ऑप्टिशियन च्या काळसर चेहऱ्यावर त्या सप्तरंगाचे 'किरण' दुकानदाराच्या मनातून थेट त्याच्या ड्रॉवर मध्ये, माझा चष्मा सिलेक्ट होण्याची केव्हाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बिल बुकाच्या आर्थिक नफे खोरीत 'परावर्तित' झाले.

दर वटपौर्णिमेला सात सुलट आणि सात उलट अश्या तब्बल चौदा फेऱ्या मारणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीच्या सबंध वाक्यातील फक्त “म-हा-ग पडला तरी चालेल” ही एकंच उक्ती उचलून धरत, ऑप्टिशियन ने लगबगीने चटाचट हाताची दाही बोटे वापरत शोकेस, ड्रॉवर, काचेच्या दारांची कपाटे दिसेल तिथून महागात महाग लेन्सेस आणि फ्रेम्स चे चष्मे हिच्या पुढ्यात आणून अलगद ठेवले.

“हे बघा ही प्रोग्रेसिव्ह तर आहेच पण ही अल्ट्रा व्हायोलेट रेझीस्टन्स सुद्धा आहे. थोडी बजेट च्या बाहेर जाते असं वाटेल, पण शांत पणे विचार केलात तर समजेल, आपल्या डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मोल किती कमी आहे ते.”

“ होsss नंss ! होss नंsss !!” आमची वट वट सावित्री नागीन सिनेमातल्या श्रीदेवी सारखी मान डोलवत डोलवत.

“पण मला कशाला लागतोय यु.व्ही. रेझीस्टन्ट?” आयुष्यात, खरेदीचं, चोखंदळपणाचं, पगारपाण्याचं आणि हौस किती कमी किंवा जास्त असली म्हणजे तिला मोल नसतं? ह्याचं (आणि आता चष्म्याचं) गणित अजिबात न सुटलेला मी.

‘अहो यु.व्ही. ‘रे’ज चांगले नसतात शरीराला…!’

“तिकडे ते केंट की युरेका फोर्ब्स वॉटर प्युरिफायर वाले यु.व्ही.रेज मारून शुद्ध आणि निर्जंतुक केलेलं प्यायचं पाणी शरीरास अधिक आरोग्यदायी असं म्हणत, यु.व्ही.वॉटर प्युरिफायर्स नेहमीपेक्षा दाम दुप्पट भावानं विकतात आणि तुम्ही म्हणता यु. व्ही.’रे’ज चांगले नाहीत , नक्की काय भानगड आहे?” माझ्या (सिलेंड्रिकल नंबर असलेल्या) डोळ्यापुढे केंट वॉटर प्युरिफायर विकणारी वय होईल तशी अधिक सुंदर दिसणारी हेमा मालिनी तरळून गेली.

“ त्तुम्ही ज्जर्रा शांत्त बस्साल का थोड्डया वेळ ” - बापरे, डोळे माझे , नंबर माझा, चष्मा लागलाय मला, घेणार मी, घालणार मी, पैसे माझे आणि तरीही मीच शांत बसायचं? हिनं माझ्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वर एकदम अचानक लॉकडाऊनच टाकलं. पूर्वी आचार , विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सत्ताधाऱ्यांकडून 'गदा' आणली जायची. आता अलीकडेच सत्ताधार्यांना शोध लागलेल्या ‘लॉकडाऊन’ ह्या नाविन्यपूर्ण संकल्पने मुळे ‘गदा आणणे’ आऊट ऑफ फॅशन झालंय.

दुकानदाराच्या वतीने बायकोने केलेल्या माझ्या अपमानामुळे सुखावल्या दुकानदाराने अजून दोन चष्मे बायकोच्या पुढ्यात पॅराशूट जमिनीवर उतरतं तसे अलगद पणे टाकत “हे पहा हे यु.व्ही. बरोबर स्क्रॅच रेझिस्टन्स सुद्धा आहेत.”

“आणखी थोड्या वरच्या रेंज मध्ये गेलात तर यु.व्ही. आणि स्क्रॅच रेझिस्टन्स बरोबर 'अँटीग्लेयर' ‘पोलराइज्ड’ वगैरे पण आहेत आपल्याकडे. पहा कसे वाटतात तुम्हाला? आणखी रेंज आहे 'क्रीझाल' च्या आणि 'बॉश'च्या पण आहेत लेन्सेस आपल्याकडे. फक्त आणखी थोडं बजेट वाढवा.” दुकानदाराने आणखी बजेट वाढवलं तसे माझे डोळे पांढरे झाले आणि क्रिझाल बॉश अशी इंपोर्टेड नावं ऐकल्यावर हिचे डोळे उगीचच 'दिपले'.

मी ‘हि’ला दंडाला ओढून थोडं बाजूला घेत "अगं काय करायचीत आपल्याला ही थेरं? अगं साधा चष्मा घ्यायचाय वाचायचा, चाळीशी ला लागतो तो " असं म्हणणार तो पर्यंत…

“ अहो थेरं कसली? अहो बर्फाळ प्रदेशात वगैरे त्या बर्फावर सूर्य किरणं पडतात ती जेव्हा परावर्तित होतात तेंव्हा डोळ्यांना अत्यंत घातक असतात.” – ऑप्टिशियन. (ऑ.)

“अहो पण मी कशाला काळजी करू? बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्याच्या आरोग्याची, मी पुण्यात राहतो, इथे फक्त ऊन आणि पाऊस पडतो, आणि अगदी कधी तरी दहा एक वर्षांतून एकदा गारा पडल्या तर पडतात, ब-र्फ आ-जि-बा-त प-ड-त ना-ही” – मी.

“अहो, असलं काय उर्मट पणे बोलता? आपण आपण लेह लडाख ला जाऊ तेंव्हा उपगोग होईल नं? अजून राहिलंय आपलं लेह लडाख पाहायचं, तुम्हाला नं मेली कसली हौसच नाही" - सौ. संध्या.

“अगं लेह लडाख ला कसली जात्येस, संध्या? तिकडे सध्या पन्नास पन्नास हजार सैन्य तैनात आहे गेले सहा महिने सीमेवर शून्याच्या खाली वजा बारा डिग्री तापमाना मध्ये.” - मी.

“सैन्य काय कायमचं राहणार आहे का तिथे?, अहो ‘खाली’ येतीलच की कधी नं कधी?” - काहीही संबंध नसताना दुकानदार मधेच.

“मी म्हणते एवढा खर्च परवडणारे का आपल्या ह्या मोदींना आणि त्या तुमच्या झी जीनपिंगला? आधीच कोविड मुळे देशाचं बजेट कोलमडलंय” - सौ. संध्या.

“तू देशाच्या खर्चाचं आणि बजेट चं सोड, आधी माझ्या पगाराचं आणि बजेट चं पहा” - मी.

“तुमचा पगार आणि खर्च पाहत बसले तर आयुष्यभर मला मेलीच्या हौसेला आणि आनंदाला विरझण घालूनच जगावं लागेल.” - सौ. संध्या.

“ खी: खी: खी: ” - काहीही कारण नसताना दुकानदार मधेच, जणू काही आपण निमंत्रितांच्या रांगेत फुकट पास मिळाल्यावर पहिल्या रांगेत बसून प्रशांत दामले चं विनोदी नाटक पाहताना आत्मिक आनंद व्हावा तसं हसत.

“अगं, कुठला विषय कुठे नेतेस?, बरं गेलो लडाख ला, तर तिथे घालू नं ते स्पेशल गॉगल भाड्यानं घेऊन? तासाला अडीच तीनशे काय असतील ते देऊन? त्यासाठी आत्तापासून महागडे यू.व्ही. , ब्यू.व्ही. चे चष्मे कशाला करायचे ?” - मी.

“अहो तुमच्या डोळ्याला नंबर आलाय नं? मग त्या सध्या चष्म्यानं तुम्हाला काय डोंबल दिसणार समोरचं दृष्य?” - सौ. संध्या.

“अगं चष्म्याचा नंबर मुख्य करून वाचायचा आहे, लांबचा किरकोळ आहे, समजतंय का तुला मी काय बोलतोय ते? ” - मी.

“अहो पण वाचणार तरी कसे आहात त्या भाड्याच्या गॉगल मधून, ते भयानक बर्फातून यु.व्ही.’रे’ज डोळ्यात पडले तर” - सौ. संध्या.

“अगं तिथे कोण मरायला सकाळ, पुढारी, लोकमत असले मराठी पेपर वाचायला जातो का एवढा खर्च करून?” - मी.

"जाऊदे बाई, ह्यांच्या डोक्यात कै केल्या 'प्रकाश' पडत नाही त्या यु.व्ही. 'रे'ज च्या फायद्याचा." - सौ. संध्या.

“संध्या, अग यु.व्ही. 'रे'ज चा प्रकाश कसा पडेल, ते दिसत सुद्धा नाहीत साध्या डोळ्यांना. तुझं भौतिकशास्त्र जरा पहिल्यापासून कच्चं ते कच्चंच.” - मी.

“अहो मी यू.व्ही.'रे'ज बद्दल नाही तुमच्या डोक्यातल्या प्रकाशाबद्दल आणि माझ्या आयुष्यातल्या अंधाराबद्दल बोलत्ये” – सौ.

सौ. च्या ह्या निर्णायक वाक्या नंतर, आमची ही सांस्कृतिक जुगलबंदी इतक्यावेळ ऐकत बसलेला दुकानदार आता अचानक ऍक्टिव्ह झाला.

“अहो वाहिनी कशाला एवढा उगाच त्रागा करून घेताय निष्कारण, नाही पटत तर जाऊदे, त्यांच्यासाठी हलक्या क्वालिटी च्या आहेत लेन्सेस, त्या दाखवीन नं मी, बरं ते जाऊदे ‘ह्यांच्या’ चष्म्याचं काय होत राहील, तुमच्या साठी सनग्लास्सेस ची एक नवीन रेंज आलीय ती दाखवतो पाच मिनिटं पहा आवडत्येय का? ”

त्यानंतर मला 'ही'चा एखाद्या शास्त्रीय संगीतातील मुरलेल्या गवयानं पंचवीस एखादी तान घ्यावी तसा तीस ते पस्तीस सेकंद “ ऐssय्याsss ” असा तार स्वर ऐकू आला.

'ही'चा एक "ऐssय्याsss" मला साधारण पणे ‘एक ते दीड’ हजार रुपयांना पडतो. आणि "अsग्ग्ss ब्बाssई" साधारण ‘अडीच’ ते ‘तीन’ हजार रुपयांना, हा माझा लग्नानंतरचा आजता गायतचा प्रत्येक खरेदीचा अनुभव आहे.

आणि नंतर मग ह्या महा आश्चर्य, त्रिगुणात्मक आनंद, रोमहर्षक उत्साह आणि इतर अश्याच अजून पाच ते सहा वेगवेगळ्या भाव भावना संमिश्र रित्या व्यक्त करणाऱ्या त्या प्रदीर्घ "अssय्याssss!" नंतर पुढचे साधारण एक दीड तास आम्ही -

"आजकाल स्त्री व पुरुष ह्या दोघांच्या करीता "युनिसेक्स गॉगल्स" ची रेंज किती छान आलीय, त्यामुळे प्रामुख्याने तुमच्या घ्या आणि कधी ह्यांनाही उपरती झालीच तर हे ही घालतील कोकणात बिकणात जाल तेंव्हा, लेह लडाख काही इतक्यात ह्यांचं होईल असं दिसत नाही, आपल्या कोकणात यु.व्ही.'रे'ज बीज चा धोका नाही, ऊन पडतं फक्त." दुकान दाराचं धाडस फारंच वाढलेलं होतं.

साधारण पस्तीस एक गॉगल सौ. च्या डोळ्यांना कसे शोभून दिसतात हे एका नंतर एक आरश्यात पाहत असताना, तिने नुकत्याच पार्लर मध्ये नाजूक कोरीव काम केलेल्या भुवया त्या गॉगलच्या सानिध्यात कश्या अधिकच उठून दिसतात वगैरे ऐकण्यात पुढची पंधरा वीस मिनिटं गेली. आपला "चक्षु-वणीज" धर्म इमाने इतबारे पाळणाऱ्या त्या चलाख आणि चाणाक्ष अश्या मातबर विक्रेत्या कडून, आमची खरेदी साधारण अडीच तीन हझार रुपयांच्या घरात जातेय असं लक्षात आल्यावर, शेजारच्या कॅफे मधून दोन कप नेस कॉफी मागावून आम्हाला चक्षूं बरोबर जिव्हे ला ही सुखावण्यात आले. प्रत्येक गॉगल च्या ट्रायल नंतर ‘संध्या’ च्या भुवया अधिक अधिक सुंदर दिसत होत्या तर माझ्या भुवया त्या गॉगल ची किंमत ऐकून अधिक अधिक उंचावत होत्या. 'संध्या'-छाया भुवविती सॉरी भिवविती ह्रिदया चा नवीन अर्थ आज मला उमगून गेला.

माझ्या बायकोच सौंदर्य विषयक व्यवच्छेदन माझ्याच समोर उभा राहून वर हा ऑप्टिशियन मलाच "तुम्हाला एस्थेटिकस ह्या विषयाची जाण आणि मुख्यत्वे आस्था कमी दिसतेय" असे टोमणे बायकोच्या पुढ्यात अधून मधून मारत होता.

तास सव्वा तासानंतर ‘संध्या’चा गॉगल फायनल झाल्यावर पाचंच मिनिटात माझ्या चष्म्याची लेन्स आणि फ्रेम फायनल झाली. जि.एस.टी. पकडून बिल साडेचार पाचच्या घरात गेल्याची खात्री झाल्यावर…

"अजूनेकेक कप कॉफी घेणार? तुमच्या कपात साखर मगाशी थोडी जास्त पडली होती नं, कमी साखरेची सांगतो पाहिजेतर?” एवढ्या प्रदीर्घ सहवासानंतर, आमच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी वाहून झाल्यावर आमच्या शरीरातल्या 'साखरेच्या पातळीची' काळजी करणाऱ्या ऑप्टिशियन कडून पुन्हा एकदा ‘कॉफी’ ची आस्थेनं विचारपूस करण्यात आली. त्याला मुख्यत्वे ‘मी’ आणि हिनेही बऱ्याच कालावधीनंतर (कदाचित प्रथमच) माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत नम्र पणे नकार दिला. कारण, आयुष्यात एवढी “महाग” कॉफी मी देवा शप्पत ह्या पूर्वी कधीच प्यायलो नव्हतो.

'डोळ्यांचं आरोग्य', 'चेहऱ्याचं सौंदर्य', 'तरुणाईत असलेली फॅशनची हौस' आणि 'तद्दन व्यावसायिकपणा' आणि प्रामुख्याने ‘कॉफी सारख्या दुकानात म्हणून कॉम्प्लिमेंटरी ऑफर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र किती महाग पडू शकतात ही आज मला मिळाले ली एक मोलाची शिकवण’ आणि ‘चष्मा’ ह्या इतक्या साध्या वस्तूकडे, इतक्या ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एकाच वेळी पाहता येऊ शकतं हा मला आज कळून चुकलेला आयुष्यातील एक अत्यंत नाविन्यपूर्ण विचार.

चारुदत्त रामतीर्थकर
१६ जाने २०२१ (पुणे).

टीप: लेखाचा हेतू कोणत्याही विशिष्ट व्यवसाया बद्दल टीका करणे नसून, केवळ प्रसंगनिष्ठ/वस्तूनिष्ठ विनोदाचा हा एक प्रयत्न आहे. मा.बो.कर तो त्यापध्दतीनेच स्वीकारतील ही अपेक्षा.
(पूर्णतः काल्पनिक)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users