मुक्त .... भाग २

Submitted by abhishruti on 15 January, 2021 - 19:53

मुक्त 2

तसंही अगदी लहानपणापासून आमची जय-वीरु स्टाईल शरु आणि वीरुची मैत्री! सुरुवातीपासूनच ती मला "तू हुशार तर आहेसच पण ठोंब्या कॅटेगरी" असं म्हणायची. मी कध्धी म्हणून कोणाशी आपणहून बोलत नसे, दोस्ती करत नसे किंवा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत नसे. अगदीच कोणाशी मैत्री नव्हती असं नाही , ग्रुप होता आमचा, पण बोलणं जेवढ्यास तेवढं... तिच्या भाषेत 'मोजून मापून' .... जे तिला कधी जमलंच नाही आणि जमणारही नाही. ती नुसती वहात असायची कोणाची पर्वा न करता! वहावत जाते असंच वाटायचं मला. वयाचं काही बंधन नाही, नवीनजुन्याचं भान नाही. मला नेहमी वाटायचं Though she is smart, she is not focused. मी मात्र तिच्या भाषेत one track n super-controlled mind! काही खोटं नव्हतं त्यात.... मी स्वतःला, स्वतःच्या भावनांना व्यवस्थित पणे बंदिस्त करुन ठेवण्यात नेहमीच यशस्वी! बरीच वर्ष एकमेकांना ओळखत असल्यामुळे आम्ही एकमेकांची काळजीही करायचो. ती उघडपणे आणि मी न सांगता!

लग्नाच्या दिवशी तर ती कम्मालीची आकर्षक दिसत होती, किती नाही म्हंटलं तरी सगळ्यांची नजर फिरूनफिरून तिच्याकडे वळत होती. हेच, अगदी हेच मला आवडत नाही.! होणाऱ्या सुनेच्या वडिलांबरोबरही ती साताजन्माची ओळख असल्यासारखी थट्टामस्करी करत होती. अशी असते का सासू? आज आई आली असती तर बरं झालं असतं.... भ्रमनिरास झाला असता! काय झालंय आपल्याला, का असा विचार करतोय आपण, का नाही सगळ्यांमधे, त्यांच्या आनंदात उत्साहात सहभागी होत? एकेकाळी किती छान ग्रूप होता आपला .... किती मस्त क्षण घालवलेत आपण एकमेकांबरोबर! पिकनिकला, गॅदरिंगला सगळ्यात धम्माल यायची! मग अचानक काय झालं कोण जाणे? विचारांची साखळी हळूहळू भूतकाळात खेचू लागणार एव्हढ्यात ती दत्त म्हणून समोर उभी राहिली.... दरवेळी असंच करते ती! "फोटोला चल ना, सगळी गँग थांबलीय तुझ्यासाठी".... मग तिच्या पाठोपाठ स्टेजवर जाणं भागच पडलं. तिने नवऱ्याला ओरडून सांगितलं "अरे, ओळ्खलस का? विरु, विराज साठें, मागे काही वर्षांपूर्वी आपण लंडनला भेटलो नव्हतो का अचानक?" त्याची ट्यूब पेटली का नाही कोणजाणे पण तो हसला. तसा तो मला ओळखत असावा. तिचा मुलगा आणि सून ताटकळत उभे होते म्हणून पटकन ग्रुपफोटोचे सोपस्कार आटपले. जेवणं झाली, निरोप घेताना नेहेमीप्रमाणे हात हातात घेऊन प्रेमाने अभिवादन केलं तिने .... तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, मलाही गलबलल्यासारखं झालं, पण मी त्याक्षणी हात सोडला. हे असं होता कामा नये.... मी मनाला बजावलं आणि मागे वळून न पाहता बाहेर पडलो.... अगदी तसाच जसा कॉलेजच्या शेवटच्या दिवशी निसटलो होतो !

क्रमशः....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान..
हमारी अधुरी कहाणी असणार बहुतेक Happy
पुढील लेखणास शुभेच्छा !

छान... पण टुकडोमे... जरा विरस होतो.. उत्सुकता वाटते पुढील लेखनाची... लवकर लिहि .. हे वाचुन लगेच संपल. Happy

Thanks friends.... भाग छोटे होतायत खरं पण पटापट पोस्ट करायच्या नादात नकळत तसं होतय.... क्षमस्व!