तप्तमुद्रा

Submitted by अनन्त्_यात्री on 7 January, 2021 - 12:42

शुभ्र निर्मम कठोर
जेव्हा भोवती दाटले
निळे अनाहत खोल
खोलवर झंकारले

अनाघ्रात अदृृष्टाची
जाणवली रूणझुण
स्पर्श,गंध,रस, रंग
एक झाले कल्लोळून

आकलनाच्या कवेत
आले-आलेसे वाटले
अज्ञेयाच्या धुक्यामध्ये
क्षणार्धात वितळले

जाणिवेची नेणीवेशी
जेव्हा थेट भेट झाली
जुन्या जखमेच्या जागी
तप्तमुद्रा उमटली

Group content visibility: 
Use group defaults