दिसलीस तू....(भाग १)

Submitted by nimita on 6 January, 2021 - 05:47

"अभिनंदन मॅडम!! या घ्या तुमच्या नव्या घराच्या किल्ल्या ..."

अर्पिता च्या हातात किल्ल्यांचा जुडगा देत साईट मॅनेजर म्हणाला. त्यावर अर्पितानी हसून त्याचे आभार मानले आणि त्या किल्ल्या शेजारी उभ्या असलेल्या आपल्या सासूच्या हातात देत ती म्हणाली,"आई, congratulations !! आता कुलूप उघड आणि दोघं जोडीनी तुमच्या या नव्या घरात गृहप्रवेश करा..."

तिचं ते बोलणं आणि तो एकंदरीत उत्साह बघून प्रमिलाताईंच्या चेहेऱ्यावर पण समाधानाचं हसू विलसलं. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे- जयंतरावांकडे बघितलं... त्यांनीही हसून मान डोलावली. उजव्या हातातली काठी डाव्या हातात धरत प्रमिलाताईंनी अर्पिता कडून घराच्या किल्ल्या घेतल्या आणि आपल्या थरथरत्या हातानी कुलूप उघडलं.

तसं पाहिलं तर हा काही त्या दोघांचा पहिलाच गृहप्रवेश नव्हता. शहरात त्यांचं इतक्या वर्षांपासूनचं राहतं दुमजली घर होतं; पण तरीही आत्ता आयुष्याच्या संध्याकाळी त्या दोघांनी या नव्या 'रिटायरमेंट होम' मधे राहायला यायचा निर्णय घेतला होता. आता या वयात त्या दोघांना असं आपल्यापासून लांब राहायला पाठवणं खरं म्हणजे अर्पिताच्या अगदी जीवावर आलं होतं. पण सर्व बाबींचा विचार करता शेवटी तिला त्यांचा हा निर्णय पटला होता. म्हणूनच त्यांच्या या निर्णयाला तिनी स्वीकृती दिली होती.आणि आज या नव्या वास्तूत प्रवेश करत असताना त्या दोघांच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह बघून तिला आपला निर्णय योग्य असल्याचं जाणवत होतं.

"अर्पिता, या नव्या देवघरात पहिला दिवा तुझ्या हातून लागू दे." प्रमिलाताईंच्या या म्हणण्याला जयंतरावांनीही दुजोरा दिला. समईच्या मंद प्रकाशात देवासमोर हात जोडून उभ्या असलेल्या आपल्या सासू सासऱ्यांकडे बघत असताना अर्पिताचा ऊर दाटून आला. इतरांसमोर जरी त्या दोघांनी हा हास्याचा मुखवटा घातला असला तरी मनातून त्यांना सलणारं दुःख तिला दिसत होतं. आज पुन्हा एकदा तिला प्रकर्षाने अभिजीतची उणीव भासली. इतर वेळी समजूतदारपणे वागणारं तिचं मन -आज मात्र तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. आज पदोपदी अभिजीत च्या आठवणींनी डोळे पाणावत होते. उगीचच तो आपल्या 'शेजारी असण्याचा' भास होत होता.

अर्पितानी हळूच आपल्या गळ्यातल्या लॉकेट ला स्पर्श केला... अभिजीतनी तिला दिलेलं सगळ्यात पहिलं आणि म्हणूनच सगळ्यात स्पेशल गिफ्ट होतं ते....ती मनात म्हणाली,'अभि, आज खरंच तू हवा आहेस मला माझ्याबरोबर.... खूप एकटं एकटं वाटतंय रे आज! एका भक्कम आधाराची गरज भासतीये गेल्या काही दिवसांपासून... तसा माझ्या 'मनातला' तू कायमच असतोस माझ्याजवळ ....जेव्हा जेव्हा माझं मन मोकळं करायची गरज भासते तेव्हा तुझीच प्रतिमा दिसते मला डोळ्यांसमोर ...पण मनातल्या तुझ्या प्रतिमेच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता नाही येत ना रे ! तुझे धीराचे शब्द आठवत असतात; पण माझ्या उदास मनाला उभारी देणारा तुझा तो स्पर्श नाही अनुभवता येत !! आई बाबा पण खूप मिस करतात रे तुला. मला वाईट वाटेल म्हणून चेहेऱ्यावर आपलं दुःख दिसू देत नाहीत... पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांचे चेहेरे वाचायला शिकलीये मी... आज तर खूपच आठवण येतीये त्यांना तुझी !!'

कसेबसे आपल्या मनातले विचार आणि डोळ्यांतले अश्रू परतवून लावत अर्पितानी तिचा नेहेमीचा हास्याचा मुखवटा चढवला आणि ती येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायला बाहेरच्या खोलीत गेली.

पाहुण्यांच्या यादीत अर्पिताचे काही सहकर्मचारी वगळता बाकी सगळे ज्येष्ठ नागरिक च होते.... तिच्या सासू सासऱ्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. कित्येक वर्षांपासून एकाच गावात राहिल्यामुळे त्यांच्या मैत्रीची वीण देखील खूप घट्ट झाली होती. खरं म्हणजे - या नव्या घरात राहायला येण्यामागचं मुख्य कारण सुद्धा ही मैत्रीच होती !

वर्षभरापूर्वी जयंतरावांच्या एका मित्राने त्यांना आणि त्यांच्या इतर मित्रांना या रिटायरमेंट होम च्या स्कीम बद्दल सांगितलं होतं. लवकरच ते दोघं नवराबायको त्या कॉलनी मधे शिफ्ट होणार होते ; आणि त्यांनी आपल्या इतर मित्रांच्या मागे सुद्धा तोच तगादा लावला होता. एक एक करून सगळेच मित्र हा प्रस्ताव उचलून धरत होते.

सुरुवातीला जयंतरावांना काही फारसं पटलं नव्हतं.. पण मग जेव्हा त्यांनी आणि प्रमिलाताईंनी या सूचनेचा फेरविचार केला तेव्हा त्यांना हळूहळू ही कल्पना पटायला लागली. बरेच फायदे होते या रिटायरमेंट होम मधे राहण्याचे... पण त्यातले दोन सगळ्यात महत्वाचे आणि त्या दोघांना पटलेले फायदे म्हणजे - समवयस्क लोकांचा सहवास आणि दुसरं म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा तात्काळ वैद्यकीय मदतीची खात्री !

त्यानंतरचे काही दिवस रोज उठता बसता घरात याच विषयावर बोलणं होत होतं. अर्पिताला सुद्धा ही कल्पना खूप स्वागतार्ह वाटत होती.या एका निर्णयामुळे तिच्या बऱ्याचशा काळज्या मिटणार होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांना सोबत मिळणार होती. अर्पिताच्या कामाचं स्वरूप बघता ती दिवसाचा बराचसा वेळ घराबाहेर असायची . तिची स्वतःची 'event management' कंपनी होती. त्यामुळे बऱ्याचदा तिला रात्री काम संपवून घरी यायला बराच उशीर व्हायचा. अधून मधून बाहेरगावी देखील जावं लागायचं. मागच्या वर्षापर्यंत तिची मुलगी - मैथिली - त्यांच्याबरोबर राहत असल्यामुळे अर्पिताला आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची काही काळजी नव्हती. पण आता मैथिली लग्न होऊन आपल्या नवऱ्याबरोबर परदेशात रवाना झाली होती. त्यामुळे अर्पिताला सतत घरात एकट्या असणाऱ्या आई बाबांची काळजी वाटायची. रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायला घेतलं की त्यात किमान एक तरी बातमी असायचीच.... 'घरात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करून लूटपाट ' ....

तिच्या एका मैत्रिणीनी सुचवलं त्याप्रमाणे आईबाबांसाठी घरात एखादी कायमस्वरूपी caretaker बाई ठेवायचा पर्याय होता. पण अर्पिताला तो फारसा पटला नव्हता. अशा एखाद्या caretaker मुळे जरी त्यांच्या सोबतीचा आणि इतर घरकामांचा प्रश्न सुटला असता तरी त्यात तेवढाच धोकाही होता. एका परक्या, अनोळखी व्यक्तीच्या भरवशावर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना घरात एकटं सोडून जाणं अर्पिताला योग्य वाटत नव्हतं....

पण या नव्या रिटायरमेंट होम च्या कॉलनीमधे एकूणच सुरक्षा व्यवस्था चोख असल्यामुळे अशी कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. फक्त एकच अडचण होती - अर्पिताला तिथे राहता येणार नव्हतं ... तसं स्पष्टच लिहिलं होतं कॉलनी च्या नियमावली मधे... फक्त ज्येष्ठ नागरिकांची वसाहत होती ती... अर्थात, पाहुण्यांना मज्जाव नव्हता म्हणा !

बराच उहापोह केल्यानंतर शेवटी त्यांनी तिघांनी एक सुवर्णमध्य काढला- जेव्हा जेव्हा अर्पिताला सुट्टी असेल तेव्हा आई बाबांनी आपल्या जुन्या घरी अर्पिता बरोबर जाऊन राहायचं ; आणि दर रविवारी अर्पितानी त्यांना भेटायला त्यांच्या नव्या घरी जायचं...…इतर वेळी त्यांची काळजी घ्यायला, त्यांची देखभाल करायला कॉलनी चा स्टाफ होताच.

पण आपला होकार सांगण्याआधी अर्पितानी एकदा ती कॉलनी आणि तिथल्या सगळ्या सोयी प्रत्यक्ष तिथे जाऊन पारखून घेतल्या आणि पूर्ण खात्री झाल्यावर मगच तिनी आपली संमती दिली. नंतर मात्र भराभर सगळी सूत्रं हलली. त्यांच्या राहत्या दुमजली घराचा वरचा मजला विकून - आलेल्या पैशांत थोडी भर घालून नवीन फ्लॅट घ्यायचं ठरलं. सुदैवाने लवकरच सगळं काही मनासारखं घडून आलं आणि शेवटी आज त्यांनी तिघांनी त्यांच्या या नव्या वास्तूत प्रवेश केला.

पुढच्या काही मिनिटांतच ती नवी कोरी वास्तु लोकांच्या गप्पांनी आणि हास्यविनोदानी भरून गेली. आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत अर्पिता आणि तिचे सासू सासरे गुंतून गेले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users