येष्टी

Submitted by वावे on 5 January, 2021 - 06:16

प्रस्तुत कथा ही प्रत्यक्षात घडलेल्या एका किश्श्यावर बेतलेली आहे. तपशिलात थोडेफार बदल करण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे. एसटीचे ड्रायव्हर्स हे निर्व्यसनी, कुशल, कामात पक्के असतात असाच माझा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. खाली लिहिलेला किस्सा हा केवळ त्या नियमाला सिद्ध करणारा अपवाद समजावा!

रात्रीचे साडेनऊ वाजायला आले होते. एव्हाना खरं म्हणजे गौळवाडीत सगळीकडे शांतता झालेली असायची. मुळात गावात जेमतेम शंभर घरं. बरीचशी पुरुषमंडळी मुंबईला कामधंदा करायची. गावात बायकामुलं आणि म्हातारी माणसंच जास्त. जेवणं आटपल्यावर क्वचित एखाद्या घराच्या ओटीवर कधी म्हातार्‍याकोतार्‍यांचा नाहीतर आयाबायांचा गप्पांचा फड जमलेला असला तर तोच तेवढा आवाज यायचा. बाकी सगळं चिडीचूप होऊन जायचं या वेळेपर्यंत. दिवसभर शेतावर नाहीतर गुराढोरांच्या मागे राबून दमलेली माणसं लवकर झोपायची. आज मात्र गावात अजून जाग होती. मुंबईकर आलेले होते. गावातल्या शाळेच्या कट्ट्यावर पोरांचा गोंगाट चालू होता. त्याला कारणही तसंच होतं. आज गावात ’पिच्चर’ होता. चकाट्या पिटता पिटता मुलांचा एक कान रिक्षाच्या आवाजाकडे लागलेला होता. वर्षातून दोनतीन वेळा भाड्याने आणलेला पिक्चर ही गावाची त्या काळातली करमणुकीची कमाल चैन होती. परवाच गावात एक लग्न झालं होतं आणि रीतीप्रमाणे आज सत्यनारायणाची पूजाही आटपली होती. सकाळी अभंग, भक्तीगीतांपासून सुरुवात करून पूजेची आरती झाल्यावर मग हळूच मराठी चित्रपटसंगीत आणि शेवटी हिंदी पिक्चरची दाणदाण गाणी वाजवून दमलेला लाऊडस्पीकर आता बंद होता. लग्नघराच्या अंगणातल्या मांडवात पाव्हणीरावळी निवांत बसून गप्पा छाटीत होती. दोघे मुंबईवाले संध्याकाळीच एस्टीने खेर्डीला गेले होते. ’पिच्चर’चं भाड्याचं सामान, म्हणजे व्हीसीआर, कलर टीव्ही आणि पिक्चरची व्हिडिओ कॅसेट घेऊन ते रिक्षाने येणार होते. कुठला पिक्चर आणायचा, यावरून त्यांच्याकडे पोरांचे वशिलेही लावून झाले होते. आता वाट बघून बघून पोरांची उत्सुकता शिगेला पोचली होती. पण रिक्षाचा आवाज काही येत नव्हता.

खेर्डीकडून श्रीवर्धनकडे जाताना वालवटीनंतर दीडेक किलोमीटरवर गौळवाडीचा एसटी थांबा होता. तिथून कच्च्या रस्त्याने खाली जवळजवळ एक किलोमीटर आलं, की गावातली घरं लागायची. हा रस्ता लाल मातीचा, चांगलाच उताराचा आणि दगडधोंड्यांचा. येणार्‍या गाडीला एवढं जपून यायला लागायचं, की उतार संपून गावाआधीच्या बारक्याशा चढावर आल्याशिवाय गाडीचा आवाज गावात यायचाच नाही. त्या चढावर गाडी आली, की ती फटफटी आहे, रिक्षा आहे, की टेम्पो हे पोरं आवाजावरून बसल्या जागी ओळखायची. क्वचित ट्रक. यापलीकडे फारसं कुठलं वाहन गावात शक्यतो यायचंच नाही.

वाट पाहणार्‍या पोरांच्या कानावर एकदाचा गाडीचा आवाज पडला. पण आवाज रिक्षाचा नक्कीच नव्हता. टेम्पोचाही नाही.. मग काय ट्रक? आत्ता रात्रीचा? निरनिराळे तर्क लढवणार्‍या मुलांना दोन मिनिटांनी उत्तर मिळालं. हेडलाईट्सचा प्रकाश टाकत धीरगंभीर आवाज करत एक एसटी गावात शिरत होती. हे मात्र सगळ्यांच्याच कल्पनेपलीकडचं होतं. "च्यायला येश्टी?" असे उद्गार काढत पोरांनी धपाधप कट्टयावरून खाली उड्या मारल्या आणि ती एस्टीकडे धावत सुटली. एस्टी पुढे येऊन लग्नघराच्या मांडवाला टेकली आणि पुढे जायला जागाच नसल्यामुळे तिथे थांबली. तोपर्यंत पोरांचं कोंडाळं तिच्याभोवती जमलं. चक्क एस्टी गावात शिरल्यामुळे पोरांबरोबरच मांडवात बसलेले थोरही अचंबा करत बाहेर आले. यापूर्वी कधीही कुठल्याही एस्टीच्या चाकांना गौळवाडीच्या रस्त्यावरची धूळ लागली नव्हती. ड्रायव्हर खाली उतरला. त्याच्याकडे बघताच "त्याला थोडी ’जास्त’ झाली असावी" हे अनुभवी मंडळींनी चटकन ओळखलं. गाडीत पॅसेंजर तर जाऊद्या, पण कंडक्टरही नव्हता. ड्रायव्हर तर काही बोलत नव्हता. ही नक्की काय भानगड आहे, या विचारात पडलेल्या गावकर्‍यांना एस्टीच्या ’खेर्डी-कासारमलई’ या बोर्डकडे बघून थोडासा खुलासा झाला. ही तर कासारमलईची वस्तीची गाडी! पण ही गौळवाडीत कशी आली? आणि कंडक्टर आणि पॅसेंजर कुठायत?

कासारमलईत अगदी रस्त्याला लागून असलेलं घर म्हणजे तुकारामचं. तो झोपायला पडवीत आला तेव्हा त्याला पलीकडच्या पिंपळाच्या पाराखाली बोलण्याचा आवाज आला. हातातली बॅटरी तिकडे चमकवत त्याने आवाज दिला,
"कोन हाय रं पिंपलाखाली?"
"मी हाय दादा, सुरेश"
"सुरेश, आत्ता रात्रीचा? नि सोबत कोन हाय?"
"कोन नाय दादा, माजा पोरगा ओ. त्याची आईस नि काकू यायच्यात खेर्डीवरनं. यश्टीची वाट बगत बसलुय"
"बराच उशीर केलंन..सांच्या गाडीनी नाय यायचा?"
" बसल्या असतील बाजारात फिरत..."
" हा..यील आता गाडी.."
असं म्हणत तुकाराम भिंतीला टेकून अंथरुणावर बसला.

या वस्तीच्या गाडीत फारसे कुणी पाशिंजर नसत. बर्‍याच वेळा गाडीत ड्रायव्हर आणि कंडक्टर असे दोघेच असायचे. ते गाडीतच झोपायचे. रात्रभर गाडी पिंपळाखाली उभी असायची.
गावाला गाडीचा खरा उपयोग दुसर्‍या दिवशी सकाळी व्हायचा. गावातून वीसपंचवीस पोरं सातआठ किलोमीटरवरच्या वालवटीतल्या हायस्कूलला जायची. खेर्डीहून श्रीवर्धनला जायच्या रस्त्यावर वालवटीनंतर लगेचच एक फाटा होता. त्याला पांगलोली फाटा म्हणायचे. सिंगल, वळणावळणांचा डांबरी रस्ता. दिवसातून साताठ एश्ट्यांच्या फेर्‍या या रस्त्यावरून व्हायच्या. पांगलोली फाट्यावर वळलं, की सावर्डी, मेंदडी, पांगलोली या गावांनंतर कासारमलई हे या टप्प्यातलं शेवटचं गाव. कासारमलईच्या पुढे एक घाट होता आणि खाली उतरल्यावर म्हसळा तालुका. कासारमलईपर्यंतच्या टप्प्यातली सगळी मुलं हायस्कूलसाठी वालवटीलाच जात. या मुलांना घेऊन ही गाडी शाळेच्या वेळेला वालवटीला पोचायची. पोरांच्या शाळेची गाडी म्हणून गावाला या गाडीचं कौतुक होतं. पोरं वालवटीला उतरली की गाडी यू टर्न मारून सरळ बारा तेरा किलोमीटरवरच्या श्रीवर्धन डेपोत परत जायची. एवढं झालं, की ड्रायव्हर-कंडक्टरच्या त्या जोडीची ड्यूटी संपायची.

तुकारामच्या कानावर रिक्शाचा खडखडाट आला. वालवटीच्या बाळूची रिक्षा पिंपळाशी येऊन थांबली आणि तिच्यातून सुरेशची बायको आणि भावजय, दोघी उतरल्या. बाळू रिक्षा घेऊन निघून गेला. सुरेशचा पोरगा आईच्या हातातली पिशवी घेऊन धावत धावत घराकडे निघून गेला. चालायला सुरुवात करत सुरेश म्हणाला, "का ग, रिक्षानी आल्याव त्या? आणि यष्टी नाय आली अजून ती?"
आश्चर्य करीत त्या दोघी बोलल्या,
"यष्टी नाय आली ?"
"नाय आली मंजे? समोर बगा. दिसत्ये काय?"
"गेली कुटं मग? वालवटीहून मगाशीच गेली फुडं"
" मंजे तुमी येष्टीनी वालवटीला आल्याव? म उतरल्याव का?"
" त्या कंडाक्टरचा डायवरशी कायतरी भांडान जाला. कंडाक्टर आमाला बोलला, खाली उतरा. आमी उतारलो तसा तो पन उतारला."

"कंडाक्टर पन उतारला? आनि म येष्टी कुटं गेली?"
इतका वेळ हे बोलणं ऐकणार्‍या तुकारामने विचारलं.
"आता काय म्हाईत दादा कुटं गेली ती"

गाडी कुठे गेली? हाच कठीण प्रश्न श्रीवर्धन डेपोच्या मॅनेजरना, कांबळेसाहेबांना पडला होता. मनातला ताण चेहर्‍यावर दिसू न देता आणि मनातल्या मनात सुतार ड्रायव्हरला शिव्या मोजत ते एकाच वेळी समोरच्या रस्त्यावर आणि आजूबाजूला लक्ष ठेवून होते. सव्वानऊला ते त्यांच्या ऑफिसात बसलेले असताना वालवटीहून मोरे कंडक्टरचा फोन आला होता. तो म्हणाला होता, "सायेब, सुतार कासारमलई वस्तीची गाडी घेऊन गेला. मी सगळ्या पॅशेंजरना घेऊन वालवटीला उतरलोय"
साहेबांनी आश्चर्याने विचारलं, " गाडी घेऊन गेला म्हणजे?"
मोरे चाचरत म्हणाला, " सुतार दारू पिऊन आला सायेब खेर्डीला"
"दारू पिऊन? XXX.. ठोकलन गाडी?"
"नाय, पण जाम फाष्ट चालवत होता. मी वालवटीपर्यंत धीर धरला आणि शेवटी बोललो, आता बास कर. पुढं सिंगल रस्ताये. इथेच ठेव गाडी. पोष्टातनं साह्यबांना फोन करू. ते दुसरा डायवर पाठवतील .पण तो ऐकायलाच तयार नाही. तसाच गाडी घेऊन पुढं गेला. आम्ही सगळे इथे उतरलोय सायेब."
साहेबांना चांगलंच टेन्शन आलं. सुतार अधूनमधून दारू प्यायचा हे त्यांना माहिती नव्हतं असं नाही. त्यांनी त्याला एकदा यावरून झाडलंही होतं. पण तो ड्यूटीवर कधीच दारू पिऊन आला नव्हता. आता ह्याने गाडी कुठे डोंगरात घुसवली नाहीतर दरीत लोटली म्हणजे? आपल्याकडचे रस्ते काय सरळ आहेत? आणि समोरून ट्रकबिक आला आणि ॲक्सिडेंट झाला तर? तरी एक बरं, मोरेनी डोकं चालवून सगळ्या पॅसेंजरना उतरवलंय. च्यायला, पण आत्ता दहा मिनिटापूर्वी मुंबई रातराणी खेर्डीकडे गेली. भरलेली होती. सुतार पांगलोली फाट्यावर न वळता सरळ श्रीवर्धनकडे येत असला तर? साहेबांच्या डोक्यात नको नको ते विचार यायला लागले. पण मिनिटभरात ते स्वतःला सावरून उठले आणि त्यांनी असिस्टंट मॅनेजरना हाक मारली. त्यांना थोडक्यात परिस्थिती सांगून ते म्हणाले,
" पाटील, तुम्ही म्हसळा, खेर्डी, गोरेगाव, माणगाव सगळीकडे फोन करा. गाडी घेऊन तो आला तर तिथेच थांबवून ठेवायला सांगा. मी वालवटीला जातो."
लगेचच खाली स्टँडवर कंट्रोलरच्या केबिनमध्ये गप्पा मारत बसलेल्या कदम आणि पवार या दोन ड्रायव्हरना बोलावून, डेपोतली एक रिकामी बस काढून ते निघाले. पांगलोली फाट्यापर्यंत त्यांना वाटेत एकही एसटी बस दिसली नाही. रस्त्यावर नाही, सुदैवाने आजूबाजूला घुसलेलीही नाही. तसेच दोनतीनशे मीटर पुढे जाऊन ते वालवटीला गेले. मोरे कंडक्टरबरोबर वालवटीचे पार्टटाईम पोष्टमास्तर-कम-रेशन दुकानदार-कम किराणा दुकानदार नाईलाजाने आणि वालवटीची तीनचार रिकामटेकडी टाळकी उत्साहाने पोष्टात बसली होती. एष्टीचा आवाज ऐकून ती सगळी मंडळी बाहेर आली. मोरेने सगळ्या गार्‍हाण्याची सत्ताविसाव्यांदा उजळणी केली. त्यानंतरच्या इतरांच्या मौलिक टिप्पण्यांना शक्य तितका आवर घालून मोरेला घेऊन यू टर्न मारून साहेब कासारमलईच्या दिशेने निघाले. सगळे पॅसेंजर आधीच रिक्शाने नाहीतर चालत आपापल्या गावाला गेले होते. मुळात होते सगळे मिळून सहाआठजणंच. चांदणी रात्र होती. रस्ताही पायाखालचा. गाडीवाचून तसं कुणाचं अडलं नव्हतं. पंधरावीस मिनिटात कांबळेसाहेबांची शोधमोहीमही कासारमलईला पोचली. जाऊन पाहतात तर काय, तिथे एसटी नव्हतीच. असणार कशी म्हणा, जेव्हा कांबळेसाहेब श्रीवर्धन डेपोतून बाहेर पडत होते तेव्हाच ती गौळवाडीत शिरत होती आणि गौळवाडीच्या त्या तशा रस्त्यावरून परत मागे फिरून बाहेर पडणं आत्ताच्या या अवस्थेत तरी सुतारच्या आवाक्याबाहेरचं होतं.

गौळवाडीत एश्टी आल्याचा सुरुवातीला गौळवाडीकरांना बसलेला धक्का आता ओसरला होता. ड्रायव्हरने दिलेल्या उत्तरांमधून लोकांना एवढं कळलं की कंडक्टर आणि पॅसेंजर वालवटीला उतरले. यापलीकडे त्याला काही विचारण्यात अर्थ नव्हता. अर्थात, गौळवाडीच्या फाट्यावरून आत शिरल्यावर डांबरी रस्त्याऐवजी मातीचा दगडधोंड्यांचा रस्ता, उतार आणि अरुंद साकव बघून त्याचीही बरीचशी नशा उतरली होती म्हणा. पण आपण काहीतरी मोठा घोटाळा करून ठेवलाय याचा अंदाज आल्यामुळे तो जास्त काही बोलत नव्हता. थोड्या वेळाने तर तो चक्क गाडीत जाऊन झोपला आणि घोरायलाच लागला. गावात कुणाकडेच फोन नव्हता, त्यामुळे श्रीवर्धन डेपोत फोन करून सांगण्याचाही काही प्रश्न नव्हता. शेवटी थोडा वेळ दारू पिणार्‍यांचे जुने जुने किस्से रंगवून सांगून आणि ऐकून लोकांनी स्वतःची करमणूक करून घेतली आणि ’एश्टीवाले बघतील उद्या काय ते!’ असा सोयीस्कर सामुदायिक उद्गार काढून लोक पांगले. तोपर्यंत पिक्चरची रिक्शाही आलीच होती, त्यामुळे पोरं आधीच मांडवात पळाली होती.

इकडे कासारमलईत एसटीचा आवाज ऐकून तुकाराम अंथरुणावर उठून बसला. पण ही नेहमीची गाडी नाही, काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आलंच आणि तो उठून हळूहळू चालत एस्टीकडे गेला.
त्याच्याकडे बघून कांबळ्यांनी चौकशी केली.
"वस्तीची गाडी इथून पुढे गेली ?"
"गाडी अजून आलेलीच नाय"
"आलीच नाही असं कसं होईल? तुम्हाला दिसली नसेल एखादवेळेस"
" दिसली नाय असं कसं व्हईल? माजं घर हितंच हाय. मी जागाच हाय मगाचपासनं. नि गावातल्या एकाची बायको नि भावजय यायच्यावत्या खेर्डीहून. त्या मगाच रिक्शानी आल्या वालवटीपासनं. त्या बोलत हुत्या, कंडाक्टर नि डायवरमदे कायतरी जोरात बोलाचाली जाली नि कंडाक्टरनी आमाला वालवटीला खाली उतरवलंन. गाडी वालवटीवरनं तशीच जोरात फुडं गेली . .पन नेमका झाला काय सायेब?"
"नाही, काही नाही. पण नक्की गाडी इथून पुढे गेली नाही ना?"
"नाय सायेब. पायजे तर विचारा तुमी गावात कुनालापन. अजून लोका झोपली नसतील. हाक मारू काय?"
"नको नको, राहू दे. तुमचं घर हे समोरचंच ना?"
"व्हय तर.."

गाडी श्रीवर्धनकडे गेली नाही, इकडेही आली नाही. याचा अर्थ असा, की सुतार दारूच्या नशेत भलत्याच कुठल्यातरी गावात शिरला. या पंचक्रोशीत, एसटी जाऊ शकेल असा रुंद रस्ता एकाच गावाला होता, ते म्हणजे गोणघर. बाकी सगळ्या गावांचे रस्ते अरुंदच. गोणघरचा फाटा पांगलोली फाट्याच्या जवळच, पण विरुद्ध दिशेला होता. परत मागे वळून शोधमोहिमेची एसटी तिथपर्यंत पोचली. ती गोणघरच्या रस्त्यावर वळणार, तेवढ्यात गावातून एकजण स्कूटरवर येताना दिसला. त्याला हात करून साहेबांनी थांबवला.
" गोणघरला गावात एसटीची बस आलीय का कुठली?"
"येष्टी? छ्या! येष्टी कशाला येईल गावात?"
"नाही, चुकून आली असेल तर... ड्रायव्हर जरा नवीन होता या भागात." साहेब अजूनही प्रकरण शक्य तितकं सावरण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात, कितीही सावरलं तरी हे सहजासहजी आवरण्यातलं प्रकरण नाही याची त्यांना आता खात्री पटलेली होती.
"कुटली येष्टी?"
"कासारमलई वस्तीची"
" नाय ओ. मी आत्ता गावातनंच आलु. येष्टीबिष्टी काय नाय आलेली. शिवर्धनकडं गेली असंल बगा!"
फुकटचा एक सल्ला देऊन स्कूटरस्वार निघून गेला.
आता शोधण्यासारखी कुठली जागा या भागात तरी राहिली नाही, याची मोरे, कदम, पवार आणि कांबळेसाहेब या सगळ्यांची खात्री पटली. कदाचित आपली सुतारशी चुकामूक झाली असेल. मोरेनी आपल्याला फोन करून आपण गाडी काढून निघेस्तोवर नाही म्हटलं तरी पंधरा मिन्टं गेली असतील. त्याच्या आधीच सुतार श्रीवर्धनजवळ पोचून म्हसळ्याच्या रस्त्याला लागला असेल, अशी अंधुक आशा साहेबांना वाटू लागली. पाटलांनी फोनही केले असतील जिकडेतिकडे. त्यांना काही बातमी मिळाली असली तर बघूया..जाऊ परत श्रीवर्धनलाच. कायतरी नक्की कळेल. इथे फिरत बसण्यात काय अर्थ नाही, असा विचार करून ते शेवटी श्रीवर्धनला परत गेले. जातानाही त्या सर्वांचंच रस्त्याच्या आजूबाजूला बारीक लक्ष होतंच.

कोंबड्याची बांग ऐकून सुतार जागा झाला. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर काल रात्री केलेल्या गफलतीची त्याला आठवण झाली आणि त्याच्या पोटात खड्डा पडला. तो हळूच गाडीतून बाहेर आला. अजून पुरतं उजाडलं नव्हतं. समोरच्या घरातली एक बाई दार उघडत होती. तिच्याकडे त्याने पाणी मागितलं. तोंड धुवून पाणी पिऊन सुतार ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला आणि त्याने गाडीचा स्टार्टर दाबला.

सात वाजले. कांबळेसाहेब रात्रभर जागे होते. गाडीचा पत्ता नव्हताच. तेवढ्यात खालून कंट्रोलरचा फोन आला. तो म्हणाला, "साहेब, सुतार गाडी स्टॅंडमधे ठेवून गेलेला दिस्तोय कधीतरी."
"काय सांगताय? थांबा मी खाली येतो"
खाली जाऊन पाहतात तर खरंच स्टॅंडवर एका टोकाला झाडाखाली ती बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित गाडी उभी होती. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सुतार पहाटेच कधीतरी येऊन गाडी ठेवून, कुणाला काही कळायच्या आत गुपचूप निघून गेला असावा. पहाटेच्या एकदीड तासात पुण्या-मुंबईकडच्या लागोपाठ तीनचार गाड्या निघतात, एकदोन रातराण्या परतही येतात, त्या गडबडीत कुणाला हे कळलंच नाही! उजव्या बाजूला आलेला ताजा लांबलचक ओरखडा सोडला, तर गाडीला काही इजाही झालेली दिसत नव्हती. कांबळेसाहेबांनी हलकेच सुटकेचा नि:श्वास टाकला. सुतारचं काय करायचं ते बघूच, पण त्या मानाने थोडक्यावर संपलं म्हणायचं प्रकरण!

गौळवाडीच्या पुलाच्या कठड्याचा निखळलेला एक पाईप मात्र पुढची कितीतरी वर्षं गावात शिरलेल्या येष्टीची आठवण गावकर्‍यांना करून देत होता!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.. खुसखुशीत..! Bw
एसटीचा ड्रायव्हर असा वागु शकतो यावर महत्प्रयासाने विश्वास ठेवावा लागला होता ते संतोष माने च्या स्वारगेट-सातारा विनाथांबा प्रकरणात.. त्यावर ही दुसरी केस वाचली. Bw

एसटीचा ड्रायव्हर असा वागु शकतो यावर महत्प्रयासाने विश्वास ठेवावा लागला होता.....
>>>>>

दारू !
दारू प्यायलेल्या व्यक्तीसाठी हे सामान्य आहे .. ती तुमच्या मेंदूचा ताबा घेते.

प्रतिसादांसाठी मनापासून धन्यवाद!!
Dj, अगदी खरं आहे. म्हणूनच वर डिस्क्लेमर लिहिला Happy
निलुदा, कंडक्टरचं खरंच कौतुक आहे. त्याला खरं म्हणजे काही तरी बक्षीस मिळायला हवं होतं. दिलंही असेल एसटी खात्याने.
ऋन्मेष, खरं आहे.

मस्त. मजा आली वाचायला.
लहान असताना गावात आठवड्यातुन एक दिवस एस्टी यायची
मुक्कामाला. आठवडा बाजाराला गावकऱ्यांना तालुक्याच्या गावाला नेण्यासाठी. रात्री एस्टी आली‌ की आम्ही पोरंटोरं एस्टीभोवतीच खेळत रहायचो.
एस्टीचे ड्रायव्हर हिरो वाटायचे तेव्हा आम्हा पोरांना.

एस्टीचे ड्रायव्हर हिरो वाटायचे तेव्हा आम्हा पोरांना.>> अगदी अगदी Proud

लहानपणी मला कुणी विचारलं की "तू मोठा झाल्यावर कोण होणार?" तर मी झटकन उत्तर द्यायचो "यष्टीचा ड्रायव्हर..!" Bw

छान लिहिली आहे कथा..
गावांची नावं मी पहिल्यांदा ऐकलीत..म्हणून दोन दोनदा वाचली.. Happy

धन्यवाद सर्वांना!
@वीरू, मला लहानपणी ड्रायव्हरपेक्षाही कंडक्टर जी कामं करतो, म्हणजे चालत्या गाडीत, गर्दीत उभा राहून तिकिटं फाडतो, पैशांचा बरोबर हिशेब करतो, एखाद्याला पैसे परत द्यायचे राहिले असतील तर सुट्टे मिळाले की आठवणीने परत देतो, मोठ्या प्रवासात मधल्या वेळात फाडलेल्या तिकिटांचा हिशेब त्या खास वहीत लिहितो, या सगळ्याचं जास्त आकर्षण होतं.
(स्वतः गाडी शिकायला लागल्यावर एसटी ड्रायव्हरबद्दलचा आदर वाढला Happy )

अगदी अगदी वावे...! सेम हीयर.. Bw . परंतु मला कंडक्टरची कामे किचकट वाटायची.. आमचा हिरो ड्रायव्हरच असायचा.

आता कंडक्टर कडे ऑटोमेटेड टिकेट व्हेंडिंग मशिन असते त्यामुळे तो त्यात नंबर दाबून हव्या त्या स्टॉपचं तिकिट देतो.. आता तीपुर्वीप्रमाणे तगडाला लावलेली लॉगशीट चालत्या गाडीत धक्के खात मोडी लिपी सारख्या मराठीत लिहिण्याचे कसब देखील कायमचे अस्तंगत झाले. गेले ते दिवस.. उरल्या त्या आठवणी. Bw

https://www.maayboli.com/node/70112 मीच लिहिला होता आपल्या लाडक्या यष्टीच्या एकाहत्तराव्या बड्डे निमित्त. Bw

https://www.maayboli.com/node/70112 मीच लिहिला होता आपल्या लाडक्या यष्टीच्या एकाहत्तराव्या बड्डे निमित्त >>>

मलाही हाच लेख आठवला होता

एसटी प्रवासादरम्यान अनेक गमतीदार किस्से घडतात. त्यावरही एखादा धागा यायला हवा.>> तुमच्या विनंतीला मान देऊन काढला एक धागा Biggrin

https://www.maayboli.com/node/77726

@ कंडक्टर विरुद्ध ड्रायव्हर - यात हिरो कोण..
तर लहानपणी स्कूलबसमध्ये जेव्हा ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसायचा बहुमान मिळायचा तेव्हा ड्रायव्हरच हिरो वाटायचा..
नंतर बॉम्बे टू गोवा चित्रपट पाहिल्यानंतर ड्रायव्हर साईड कलाकार आणि कंडक्टर हिरो वाटू लागला Happy

Pages