ते माझंच घर असतं

Submitted by jpradnya on 5 January, 2021 - 01:46

जिथे माझा फुटकळ काव्यप्रकार
तोंडभरुन दाद मिळवतो
जिथे मी चुकल्यावर
माझा कान कडकडून पिळला जातो
....ते माझंच घर असतं

जिथल्या किमती सोफ्याची इस्त्री
मी मांडी घालून बसल्याने बिघडत नाही
भूक लागलीये काही खायला आहे का
असं बिनधास्त सांगायला लाज वाटत नाही
....ते माझंच घर असतं

जिथे माझी ... माझ्या राखीची
मनापासून वाट पाहिली जाते
राखी पोहोचण्यापूर्वीच जिथून
ओवाळणी पोस्टात गेलेली असते
....ते माझंच घर असतं

आभाळ कोसळत तेव्हा
जिथली दारं सताड उघडी असतात
मुके अश्रू पुसत जिथून
मदतीचे हात धावून येतात
....ते माझंच घर असतं

त्या अश्या माझ्या घरांना
जेव्हा माझी गरज भासते
भिंती सावरायला तिथल्या
माझी कंबर नक्कीच कसते
कारण ....ते माझंच घर असतं

मी असेन मी नसेन
जिथे माझी आठवण निघेल
भिंतीवर नाही टांगणार
पण मनात छोटीशी छबि जपेल
....ते माझंच घर असेल

-प्रज्ञा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता! आवडली!
चुकून कथा/कादंबरी विभागात पोस्ट झाली आहे.

मी असेन मी नसेन
जिथे माझी आठवण निघेल
भिंतीवर नाही टांगणार
पण मनात छोटीशी छबि जपेल
....ते माझंच घर असेल>>>> Hats Off

सुरेख कविता ओ,
तुमचं पाहून असं वाटतंय की
मला सुद्धा आज एक लिहायला हवी होती
Opening ceremony म्हणून Wink
उद्या वगैरे, लिहीन आता

अता नको देवा
कुणाचेही बोल |
मला माझी भूल
सोसवेना ||