बोलावणे नक्की आहे!

Submitted by अपूर्व जांभेकर on 4 January, 2021 - 05:24

टीप: हे काव्य एका निर्जन बेटावर एकाकी पडलेल्या, वठलेल्या, जीर्ण झालेल्या, वृक्षाचे मनोगत आहे. हि कविता, आयुष्याचा उत्तरार्धही संपत आलेल्या किंवा मृत्यू शय्येवर पडलेल्या वयो-वृद्ध व्यक्तीसाठी, उपमात्मकरित्या वापरली गेलेली नाही आणि तशी ती भासावी असा हेतू सुद्धा नाही. तरीसुद्धा, कुणाला तसे जाणवल्यास, हा केवळ योगा-योग समजावा.

निष्पर्ण आता, एकाकी, बेटावरती, होती ज्याची कधीकाळी हिरवी वसती
चहूकडे पसरला तटस्थ सिंधू अथांग, स्मृती-लाटांना ये एक-सारखी भरती...

अंधुक तरीही, स्पर्श अजून आठवतो, सौभाग्य-वस्त्र गारवा तोच हुळहुळतो
जागविती किंचित प्राण, प्रसव वेदना, ज्या नेहमीच जगल्या, कळी, फूल होताना

ओलाव्यात आणि कुठल्या तरी अजून, जपला आहे घन- निळा एक श्रावण,
'त्या' लाघव भेटी, कितीतरी, कुजबुजती, खग अनेक, त्यांची विणली-मोडली घरटी,

शशी-आदित्याचे नेमेचि, येणे-जाणे, क्षितिजावरले ते रोजचेच पाहुणे
संध्याहि पाहिली तीच रोज, पण नवी! रात्रीची नांदी कधी स्वप्न-भैरवी!

प्राणवायू शेवटी कधी उच्छवासीला? ते दान देउनी काळ किती लोटला?
सावली सुद्धा माहेरी परतून गेली, सोशीक बिचारी, किती उन्हे सोसली!

निष्पर्ण आता, एकाकी, बेटावरती, स्मृती-लाटांना ये एक-सारखी भरती
अलीकडे, हे असेच होते आहे...म्हणजे ‘त्याचे’, बोलावणे नक्की आहे, म्हणजे ‘त्याचे’, बोलावणे नक्की आहे!

© अपूर्व संजीव जांभेकर

Group content visibility: 
Use group defaults