अगम्य : २

Submitted by सोहनी सोहनी on 4 January, 2021 - 05:21

अगम्य : २

https://www.maayboli.com/node/77667 - अगम्य : १

विस्कटलेले केस, कपड्यांचा वंगाळ अवतार, बाळ होतं कि नाही ते दिसत नव्हतं पण मांडीवर बाळ पकडल्यासारखे हात ठेऊन एक मांडी एका विशिष्ट गतीने हालत होती, मोठाले टपोरे घारे डोळे तेही अतिशय रागाने एकटक माझ्यावर रोखलेले.
आत एक बाईमाणूस होती, तिची नजर अतिशय विषारी होती, मी अशे डोळे आजवर कधीच पहिले नव्हते पण तिची ती नजर पाहून मी जागीच गार झालो, जणू ती आता उठून माझ्या अंगावर धावेल, तितक्यात माझ्या पाठीवर हात पडला आणि मी दचकून मोठ्याने ओरडलो.
त्या आई होत्या, मला काही न सुचल्याने मी त्या दाराकडे आणि त्यांच्याकडे पाहत राहिलो.

त्यांनी मला खाली नेलं आणि बसवलं, प्रथमच त्या माझ्यासोबत बोलल्या. किती गोड़ आणि आपुलकीचा आवाज होता त्यांचा, मला माय आठवली.
त्यांना मी ओळखत होतोच म्हणजे एक दोन वेळा आलो होतो बा' बरोबर पण बोलणं कधी झालं नव्हतं.
वरच्या खोलीत मी ज्यांना पाहिलं त्या डॉक्टर साहेबांच्या पत्नी होत्या, एका अपघातात डोक्याला मार लागून जरा वेडसर वागतात केव्हा केव्हा, घाबरण्यासारखं काही नाहीये, केव्हा केव्हा पूर्णपणे व्यवस्थित देखील होतात, आणि डॉक्टर त्यांचा उपचार घरातच करत आहेत त्यामुळे लवकर बऱ्या होतील, असं आईंनी जेव्हा सांगितलं तेव्हा कुठे माझी धडधड थांबली.

घरात आईंना लागेल त्यात मदत करायची, वाणसामान आणून द्यायचं, बाहेर बागेला पाणी द्यायचं आणि दोन चार म्हशी होत्या त्यांची देखरेख हे माझं काम.
जमेल तसं करत जा दम धीर खाऊन, काही घाई नसते आणि कुणी ओरडणार नाही आईंच्या अश्या बोलण्याने मला खूप बरं वाटलं आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागलो.
काम उरकता उरकता केव्हा अंधार झाला कळलंच नाही, काम आवरले होते पण खूप दमलो होतो, इतकं काम कधी केलं नव्हतं, कधी झोपतो असं झालं होतं.
इतक्यात आईंनी आवाज दिला, अंघोळ वैगेरे काय करायची असेल तर आवरून घे आणि जेवायला ये.
मी गेलो तर त्यांनी मला स्वयंपाक घरात बोलावलं मी चाचरत आत गेलो पण त्या मला घरातल्या माणसासारखाच वागवत होत्या, त्यांनी ताट हाताने मला वाढून किती काय हवं नको विचारून मी मागितल्या पेक्षा चार घास वाढीव दिले.
मी जेऊन घेतलं आणि पडलो, दमल्यामुळे कधी झोप लागली कळलंच नाही. खूप गाढ झोप लागली होती, आणि अचानक मधेच कितीची वेळ होती कोण जाणे मला बाळ रडण्याचा आवाज येत असावा त्यामुळे मी हळूहळू जागा झालो, आवाज हळूहळू वाढू लागला. मी पूर्णपणे जागा झालो, आवाज अजून तीव्र झाला, घरात बाळ रडत होतं म्हणजे त्या बाईकडे खरंच बाळ होतं तर.
बराच वेळ झाला बाळ रडतोय तरीही कोणाचा आवाज येत नाहीये, आणि बाळ इथेच बाहेर रडतोय असं वाटत होतं म्हणून मी बाहेर आलो, सगळीकडे पाहिलं पण कुणीच नव्हतं बाहेर.
आवाज अजूनही येत होता म्हणून मी वरच्या मजल्यावर हळूहळू पायरी चढत होतो तर अचानक आवाज बंद झाला.
बाळाला दूध वैगेरे देत असावेत त्यामुळे शांत झाला समजून मी खाली आलो आणि दार उघडून माझ्या खोलीत चाललो होतोच तर पुन्हा बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला पण बाहेरून अंगणातून.
मी मुख्य दारातून अंगणात आलो तर आवाज थोडा थोडा लांब चालला होता पण बाळ रडतच होतं अजूनही.

काय करावं काही सुचत नव्हतं आता मला चांगलीच भीती वाटत होती, हिम्मत करून मी बाळाच्या आवाजाच्या दिशेने जोरात हाक मारली 'कोण आहे तिकडे?'
बाळाचा आवाज पूर्णपणे थांबला, काय चाललंय काही कळत नव्हतं?

मला वेगळीच शंका आली, बाईसाहेबांकडे बाळ असावं आणि त्यांना वेडाचा झटका आला असावा म्हणून त्या अश्या अंधारात बाहेर पडल्या असाव्यात कि काय??
पण असं असेल तर बाळाच्या जीवाला धोका आहे, मला खूप भीती वाटली म्हणून मी आवाज आला होता त्या दिशेने धावत सुटलो.

क्रमशः:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults