पेच आहे

Submitted by निशिकांत on 3 January, 2021 - 22:10

सार माझ्या जीवनाचे हेच आहे
कोण माझे? मी कुणाचा? पेच आहे

मीच वेडा चालतो सर्वापुढे अन
ते शहाणे, लागते मज ठेच आहे

काय नवखे जीवनी? कंटाळलो मी
पात्र दुसरे पण कथानक तेच आहे

काय मिळते पारदर्शी वागण्याने?
दांभिकाला या जगी शिरपेच आहे

लावली ही बाग कोणी कष्ट केले?
कोण तो करतो फुलांची वेच आहे?

दु:ख का आईस नाही! जाणतो मी
हास्य ओठी आत ती रडतेच आहे

जीवनाच्या मैफ़िलीला रंग चढता
शायरी इर्शादने खुलतेच आहे

कोण मोठा? कोण छोटा? शर्यतींची
चालली दिनरात रस्सीखेच आहे

वाटले होणार नाही घात, पण का?
आजही पाणी तिथे मुरतेच आहे

थांबतो "निशिकांत" का रे काळ केंव्हा?
जीवनाचे वस्त्र बघ विरतेच आहे

निशिकांत देश्पांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users