हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-२

Submitted by mi_anu on 2 January, 2021 - 00:39

यापूर्वीचा भाग
यापूर्वीचे भागः
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-1

विभा(विश्वंभर भाटवडेकर) लिफ्ट पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर 'आपल्याला भेटायला योगायोगाने सुंदर बाई आली नाही' याची खंत 10 सेकंद तरळली आणि मग त्याने दिलखुलास हसून हाय हॅलो केले.

नवव्या मजल्यावर गच्चीचं दार,5 झाडू, व्हॅक्युम क्लिनर आणि एक रखवालदार होता.मांजरीने पटकन वि. भा. कडे पाहिलं.1 एप्रिल पण नव्हता.वि. भा. च्या चेहऱ्यावर प्रचंड बावळट भाव आणि आश्चर्य दिसायला लागलं.
"इथे नवं कँटीन होतं ना?"
(आता मांजरीला ग्रहण मालिकेतल्या सारखं वि. भा. कोणत्यातरी समांतर विश्वातून आल्याचा भास झाला.)
"कँटीन?? असं काही नाही इथे.4 नंबर ला जा."
"मी 4 नंबर मधूनच आलोय.इथे एक कँटीन आहे असं मला तिथल्याच माणसाने सांगितलं."
"हां ते!! आता ध्यानात आलं. ते इथे नाय, बिल्डिंग 5 ला.हिथनं चालत जाता येतं.ते अजून 15 दिवसाने सत्यनारायण पूजा झाल्यावर उघडणार. आता प्लॅस्टिक आहे सगळीकडे."

ही एक या बिल्डिंग ची गंमत आहे.शिवकालीन किल्ल्याच्या वाटा एकीकडून निघून एकदम वेगळ्याच दुसरीकडे बाहेर पडतात तसे इथे कोणतेही रस्ते कुठेही बाहेर पडतात.बेसमेंट पार्किंग मध्ये चुकीचं वळलं की थेट सिगारेट टपरी समोर, चौथ्या मजल्यावरच्या गनिमी वाटेने थेट प्रतिस्पर्धी कंपनी च्या गेटसमोर, कँटीन च्या भांडी घासायच्या खोलीतून उतरून थेट आग विझवण्याच्या बंबा समोर प्रकट होणे असे विविध चमत्कार करता येतात.त्यामुळे मांजरीने 'गच्चीवरून बिल्डिंग 5 च्या कँटीन ला जाता येईल' ला मान डोलावली.

वि. भा. आणि मांजर परत 1-2 लिफ्ट बदलून आणि पार्किंग मधून येणाऱ्या गाड्यांशी बुवा कुक करत 4 नंबर कँटीन ला गेले.
"मी ना, गेली अनेक वर्षं ग्रीन टी पितो.तुम्ही पण पिऊन बघा.आयुष्यभर इंडियन चाय टी चं नावही काढणार नाही."
(या वाक्यावर मांजरीने मनातल्या मनात वि. भा.चे दात पाडले..इतके मजले वर खाली आणि इतक्या बिल्डिंग चाली-चाली करून मेला ग्रीन टी प्यायचा?व्यर्थ हे जीवन.)
"आज नको ग्रीन टी.मला साधाच चहा चालेल."

'अमका आता कुठे आहे, ती नवी उघडलेली कंपनी कोणा तमक्याची आहे' चौकशी आणि चहा एकत्रच संपला.

वि. भा. आता चौकशी मोड मध्ये होता.
"मग सध्या कोणते नवे प्रोजेक्ट आले तुमच्याकडे?"
"मी अजून नवीन आहे.मला फार काही माहीत नाही."
"तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वर काम करता?"
"हॅ हॅ हॅ.. आय पी आर आहे ना. नाहीतर सांगितलं असतं.मी त्या तिकडे पॅसिफिक समुद्रापार असलेल्या एका खाणीत काम करते."
"खाणीत काय बनतं?"
"तसं बरंच काही बनतं. त्यामुळे अमुक एक असं सांगता येत नाही.तुमच्या इथे कोणती प्रोजेक्ट येतायत?"(एरवी मांजरीने एखादं नाव सांगितलं असतं.पण 'आयुष्यभर ग्रीन टी पी' असं सुचवणाऱ्या दुष्टाला इतके साधेपणाने हवी ती माहिती अजिबात द्यायची नसते.)
"आहेत एक दोन.मीच बोलणी करतोय.पण सध्या आय पी आर मुळे सांगता येत नाही.हॅ हॅ हॅ.पण तुम्ही रिझ्युम मध्ये क्लायंट ची नावं का लिहीत नाही?"(वि. भा.ने लगेच वचपा काढला.)
"एखाद्या ब्रॅण्ड च्या नावा पेक्षा आम्ही त्यांना काय करून दिलं, काय टेक्नॉलॉजी वापरल्या हे जास्त महत्वाचं असतं.नाव लिहिलं की त्या नावाच्या ग्लॅमर वर नोकरी मिळणार, स्किल्स न बघता.किंवा त्या ब्रँड मधल्या काही सिक्रेट गोष्टी कामाच्या ओघात सांगाव्या अशी अपेक्षा असणार.दोन्ही मुळे मूळ पर्पज पासून फोकस जातो."
"पण जर मी इंटरव्ह्यू घेत असेन आणि ज्या प्रोजेक्ट साठी आहे त्याने 'इंडक्शन वर वेळ न घालवता जो माणूस आमच्या प्रोजेक्ट मध्ये काम करतो किंवा केलेला आहे तो जॉब मार्केट मधून उचल' सांगितलं असेल तर तुम्ही क्लायंट नेम न लिहिल्याने रिजेक्ट व्हाल आणि या लॉजिकमधलं भंपकत्व तुम्हाला पटेल."
"पटेल.पण तरीही मी रिझ्युम मध्ये क्लायंट कंपनीची नावं लिहिणार नाहीये."
(आता मांजर आणि वि. भा. हे दोघेही एकमेकांचे मनातल्या मनात दात पाडत बसले होते. ही भेट गुंडाळणे लवकरात लवकर गरजेचे होते.)

फोनची घंटी वाजली आणि या संभाषणातून सुटका झाली.फोनवर मांजरीची लहान टीममेट सुमी होती.सुमीचा आवाज घाबरा घुबरा होता.
"अगं आपल्या सॉफ्टवेअर वर सगळी स्पॅनिश अक्षरं चौकोन चौकोन दिसतायत.मेनू वर चौकोन, एरर मेसेज चौकोन.तू कुठे आहेस?"
"जरा बघ, शेवटची मेसेज फाईल कोणी बदलली?युटीएफ ऐवजी आस्की फॉरमॅट मध्ये चेकइन झाली असेल."
"तुझंच नाव आहे."
(इथे मांजरीने मनात कपाळावर हात मारला.पमीचा फोन आल्यावर बोलत बोलत बाहेर जाताना युटीएफ फॉरमॅट न निवडता बटन दाबलं होतं.)
"ओह.मी 5 मिनिटात आले हां.तोवर सर्व्हर स्टॉप करून ठेव."

"मला जायला पाहिजे.आपण नंतर बोलू.पण माझ्या इंटरव्ह्यू चं काय झालं?"
"ते ना..जरा सिनियर पडतं ना प्रोफाइल.आम्ही लहान मुलं बघतोय."
"हरकत नाही.सिनियर प्रोफाईल ची गरज असेल तेव्हा आठवण ठेवा.बाय!!"

जागेवर येऊन सर्व गोंधळ निस्तरून सर्व्हर परत चालू केला.या गडबडीत इतर मांजरी जेवणाला बोलावून गेल्या.आता डोळ्यासमोर अजून मोठे पंखे फिरत होते.पटकन कँटीन ला डबा घेऊन एका प्रोजेक्ट मधल्या चिंटू बरोबर बसली.

"अरे वाह, आपका फास्ट है क्या? क्या डेलीकसी लाया है आपने?"
"पंपकीन का सबजी और ग्राऊंडनट लड्डू.खाओगे?"
"नही, थँक्स. मै पंपकीन नही खाता.पिछले छब्बीस साल मे खाया नही है और कभी नही खाऊंगा."
(मांजरीने मनात खुनशी हसत 'याला नक्की लाल भोपळा प्रचंड आवडणारी बायको मिळणार' अशी आकाशवाणी केली.)

तितक्यात सगळीकडे फायर अलार्म वाजायला लागले आणि सिक्युरिटी वाले पळवायला आले.
"पटकन खाऊन घेते"
"मॅडम इमर्जन्सी फायर ड्रिल आहे.संक्रांत हळदीकुंकू नाही.पटकन जावं लागेल."
(क्रमशः)

यानंतरचा भागः
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-3

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(आता मांजरीला ग्रहण मालिकेतल्या सारखं वि. भा. कोणत्यातरी समांतर विश्वातून आल्याचा भास झाला.)>>>>>

वि. भा. आणि मांजर परत 1-2 लिफ्ट बदलून आणि पार्किंग मधून येणाऱ्या गाड्यांशी बुवा कुक करत 3 नंबर कँटीन ला गेले>>>>>>

भयानक हसू आल्याने पूर्ण वाचु शकले नाही. Rofl Rofl

मॅडम इमर्जन्सी फायर ड्रिल आहे.संक्रांत हळदीकुंकू नाही.पटकन जावं लागेल.">>> हे मस्त होते.
अजून येऊ देत मांजरीण ची धमाल

हाहाहा! सध्या अनेक महिने वर्क फ्रॉम होम केल्यावर हे सारे वाचायला जाम धमाल येत्येय! अनु, तू जर मुंबईत रहात असतीस तर लोकल/बेस्ट/मेट्रो/शेअर रिक्षा/टॅक्सी इत्यादी मधून घडणाऱ्या प्रवासातले अनुभव तुझ्या शैलीत वाचायला मिळाले असते आम्हाला! (हा अति अवांतर विचार पार्किंग मधल्या गाड्यांशी बुवा कुक कुक या अफाट वाक्यामुळे सुचला!)

"पटकन खाऊन घेते"
"मॅडम इमर्जन्सी फायर ड्रिल आहे.संक्रांत हळदीकुंकू नाही.पटकन जावं लागेल.">>>>> आवडलंच.

भ....न्ना....ट... नेहमीप्रमाणेच...!! Bw

"इथे नवं कँटीन होतं ना?"
(आता मांजरीला ग्रहण मालिकेतल्या सारखं वि. भा. कोणत्यातरी समांतर विश्वातून आल्याचा भास झाला.) >> Biggrin

तितक्यात सगळीकडे फायर अलार्म वाजायला लागले आणि सिक्युरिटी वाले पळवायला आले.
"पटकन खाऊन घेते"
"मॅडम इमर्जन्सी फायर ड्रिल आहे.संक्रांत हळदीकुंकू नाही.पटकन जावं लागेल.">> Rofl

अनु, तू जर मुंबईत रहात असतीस तर लोकल/बेस्ट/मेट्रो/शेअर रिक्षा/टॅक्सी इत्यादी मधून घडणाऱ्या प्रवासातले अनुभव तुझ्या शैलीत वाचायला मिळाले असते आम्हाला! >>> +१

धमाल आहे हा भागही Lol