संवत्सर ते जुने संपले

Submitted by निशिकांत on 30 December, 2020 - 23:25

बघता बघता संवत्सर ते जुने संपले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

महिला मंडळ, किट्टी पार्ट्या, हळदी कुंकू
बंद जाहले, आज वाटते विश्व त्रिशंकू
कोरोनाची साथ पसरली, चित्र बदलले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

सनिटायजर हात धुवाया वेळोवेळी
मास्क बांधला चेहर्‍यावरती तिन्हीत्रिकाळी
अंतर ठेउन वागायाचे नवीन शिकले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

काम घरातुन, काम घराचे दोन्ही माझे
कुणा न ठावे किती वाढले माझे ओझे
हास्य लेउनी, सांगत नाही मीही थकले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

बंद मंदिरे, बार मोकळे एकेकाळी
निर्णय लागू करण्याची ही तर्‍हा निराळी
देवांनीही मूकपणे हे सर्व भोगले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

हिशोब करता सरत्या वर्षी काय कमवले?
ओंजळ माझी रितीच होती ध्यानी आले
इसवीसन एकाने होते पुढे सरकले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

नववर्षाची प्रभात लाली आज पाहिली
असेल मंगल सारे कांही, आस जागली
उत्साहाला नवे धुमारे फुटू लागले
स्वागतास मी नववर्षाच्या, खुदकन हसले

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users