तुला माहितीय का?

Submitted by सांज on 30 December, 2020 - 08:27

तुला माहितीय का?
मी सध्या वेड्या सारख्या कविता लिहतेय
थोड्या मनातल्या
थोड्या डोळ्यातल्या
थोड्या खुपलेल्या
थोड्या सुखावलेल्या.. कविताच कविता!
ओळ अन् ओळ, अगदी काना-मात्रा-उकारासह 
आभाळातून लेखणीत निथळतेय
का होतंय असं? आत्ताचं का होतंय आणि?
मी तशी काव्यात फार रमणारी नाही..
मला आवडतात गोष्टी सांगायला..
पण आता लागलेय शब्दातली लय शोधायला..
तुझ्यामुळे झालंय का असं?
त्या पहाटे, तुझ्या जाणीवेने जागी झाले..
तेव्हा पासून मन तेवतंय बघ अखंड, नंदादीपा सारखं!
आणि त्याचा प्रकाश पाझरतोय आता माझ्यातुन..
ओलेती, मातीचा सुगंध हातात घेऊन कविता शिंपडतेय..
चांदण्याच्या अंगणात!
तु म्हणशील.. तुझं आता जास्तच होतंय.. 
पण खरं सांगू का? 
जास्त असेलही, पण जे होतंय नं ते मोहक आहे..
आणि मलाचं नाही बरं, माझ्या जाईलाही जडलाय तुझा मोह..
सकाळी ती घमघमते नुसती, 
रात्री तुझा स्पर्श झाल्यासारखी!
हे बघ.. काय होतंय ते सांगता-सांगता पुन्हा एक कविता आकारली..
मुक्तछंदातली..
तुझ्या-माझ्या नात्यासारखी..
बंधनांपलिकडची..

त्या पहाटे नं.. 
पाझर फुटलाय बहुतेक.. 
तिलाही आणि मलाही..!!

~ सांज
https://chaafa.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users