“संध्याछाया आणि पालवी”

Submitted by Charudutt Ramti... on 30 December, 2020 - 08:11

परवाच मा.बो.वर ‘डिप्रेशन’ विषयक एक अत्यंत महत्वाचा धागा आणि त्यावरील मत-मतांतरे वाचली. त्या अनुषंगाने हे स्वानुभव कथन.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

मार्च मध्ये जसा आपल्याकडे करोना/लॉकडाऊन सुरु झाला, तसं माझ्या आईला इतर बऱ्याच जणांप्रमाणे 'एकटेपणा' , 'काळजी' ह्या विषयांनी घेरून टाकायला सुरुवात केली. दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमातील नकारात्मक स्वरूपाच्या बातम्या त्यात रोजची भर टाकतच होत्या. पहिले काही महिने तिने कसेबसे काढले. नंतर मात्र तिचा धीर खचत गेला. मुळांतच तिचा स्वभाव काळजी करणारा. म्हणजे सर्व सुरळीत सुरु असतं तेंव्हा सुद्धा ती काहीतरी कारणं शोधून काळजी करतंच असायची. आता तर काय? "बुडत्याचा पाय खोलात" अशी तिची गत झाली.

सुरवाती सुरवातीला तिचा 'स्वभाव'च आहे काळजी करण्याचा, असं म्हणंत आम्ही कधी तिच्या कडे दुर्लक्ष करत असू, तर कधी तिला हसण्यावारी घेत तिची टिंगल करत असू. हळू हळू मात्र, चांगल्या सारवलेल्या अंगणातली माती पोखरून मुंग्यांनी भुसभुशित करून त्यात विचित्र वारूळ करावं तसं, काही अंशी खऱ्या आणि काही अंशी अनाठायी अश्या काळजीनं तिला अंतर्बाह्य अगदी पोखरून टाकलं.

सगळ्यात आधी ह्या लॉकडाउन आणि करोना ने घाला घातला तो तिच्या “झोपे”वर. निद्रानाशाचा त्रास कधीच एकटा येत नाही, कुणाच्या घरी राहायला. तो नेहमी येतो तो आपले अपशकुनी पै पाहुणे घेऊनच. त्यामुळे मग जसजशी तिची झोप कमी कमी होत गेली तसतशी, पित्त आणि इतर पोटाच्या व्याधी आपोआपच डोकं वर काढू लागल्या. पर्यायाने डोके दुखणं आणि जेवण कमी होणं आणि झपाट्यानं वजन कमी होणं ह्या अश्या गंभीर स्वरूपाच्या गोष्टी सुरु झाल्या. पाहता पाहता साधारण जुलै ऑगस्ट च्या दरम्यान एखाद्या जुनाट दुर्लक्षित किल्ल्यावरचा बुरुज ढासळावा तशी तिची प्रकृती ढासळत गेली. वय सत्तरीचं. म्हंटल तर जगण्याचं, म्हंटल तर थकण्याचं.

पण नंतर विषय जसा जसा गंभीर होत गेला, तसे आम्ही एक एक करत तिच्या आधी पोटावर मग तिच्या श्वसनाच्या होणाऱ्या (दम्यावर) ऍलर्जी वगैरे समजून आणि एकंदर दूरगामी परिणाम साधावा म्हणून आयुर्वेदिक असे तीन तीन डॉक्टर सुरु केले. बऱ्याच डॉक्टरांचं निदान हे अयोग्य नसलं तरी ते शरीराच्या त्या त्या वैद्यकीय शाखां पुरतं (दुखण्यापुरतं) मर्यादित होतं. दुसरं , उपचारादरम्यान तात्पुरतं बरं वाटायचं तीन चार दिवसांनी परत गाडी रुळावरून घसरायची. पण ह्या सर्व त्रासामुळे आणि गोळ्या औषधांच्या माऱ्यामुळे ती मात्र पुरती खचून गेली. जीवनासक्ती संपुष्टात आल्याची भाषा करू लागली. कोणत्याच डॉक्टरांचा आणि औषधांचा म्हणावा तसा फायदा होत नाहीए असं चित्र दिसू लागल्यावर मात्र आम्हा घरातील सगळ्यांना सुद्धा हळू हळू निराशा आणि हतबलतेनं अगदी व्यापून टाकलं.

पण ह्या सगळ्या मध्ये तिच्यावर 'प्लासिबो' इफेक्ट प्रचंड आहे हे मात्र सतत आमच्या निरीक्षणात येत होतं. प्लासिबो म्हणजे डॉक्टरांना भेटून आलं आणि डॉक्टरांनी "सगळे पॅरामीटर्स ठीक आहेत फक्त ह्या गोळ्या पुढचे महिना भर घ्या" असं म्हंटलं की औषधं सुरु करण्या पूर्वीच तिला बऱ्याच अंशी बरं वाटू लागणं आणि आत्मविश्वास वाढल्या सारखं वाटणं. परंतु हा प्लासिबो इफेक्ट तिला फक्त एक दोन दिवस पुरायचा. परत सगळे च्या सगळे त्रास आहेत तसे सुरु व्हायचे, काही अंशी पूर्वी पेक्षा जास्त तीव्रतेने सुद्धा. ह्या सगळ्या मुळे बऱ्याच अंशी तिच्या जीवनात आलेलं "डिप्रेशन" हे आता तिच्या शरीरातील इतर आजाराचा/लक्षणांचा परिणाम नसून, डिप्रेशन हेच ह्या सर्व लक्षणांचं "मूळ" कारण असावं आणि त्यावर उपचार "केल्याशिवाय" कदाचित तरणोपाय नाही अश्या निर्णयास्पद आम्ही घरचे सगळे पोहचू लागलो.

बऱ्याच वेळेस आपण ज्याला ‘परिणाम’ (इफेक्ट) समजतो तो ‘परिणाम’ नसून तेच ‘मूळ कारण’ (रूट कॉज) असते आणि आपली फसगत होते. म्हणजे कार्य-कारण भाव (कॉज अँड इफेक्ट चं गणित) ते जेव्हा सुटतं तेंव्हा कदाचित "खूप सोपं होतं की!" असं वाटण्याची शक्यता असते. म्हणजे सातवीतील मुलगा 'अभ्यास करत नाही, म्हणून त्याला चांगले मार्क्स पडत नाहीत' हे जितकं सत्य असतं तितकंच त्याला 'चांगले मार्क्स पडत नाहीत, म्हणून तो अभ्यास करत नाही' हेही सत्य असतं. दुष्ट-चक्र (व्हिशियस सायकल) उलटे फिरवून त्याचे सुष्ट-चक्रात (वर्चुअस सायकल) मध्ये परिवर्तन करणे हे वरवर तसे वाटते तितके सोपे नसते.

आता ह्या पारंपरिक ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती बरोबर 'डिप्रेशन' ह्या मानसिक व्याधी वरती मानसोपचार (सायकियाट्रिस्ट) तज्ज्ञांची मदत घ्यायची हा महत्वाचा कौटुंबिक निर्णय झाल्यावर आता काही महत्वाची पाऊले आणि निर्णय घ्यायचे होते.
सगळ्यात प्रथम आईला सांगायचं होतं आणि 'पटवूनही' द्यायचं होतं की आपल्याला 'मानसोपचार' तज्ज्ञांना भेटायचं आहे. हे तितकं सोपं नसतं. मानसोपचार तद्न्य आणि 'वेड लागल्यावरच' त्यांना भेटायचं असतं हा पूर्वग्रहदोष ह्या प्रवासातील सगळ्यात मोठ्ठा अडसर असतो. 'मानसिक समुपदेशन' (सायकॉलॉजिस्ट) आणि 'मानसोपचार' (सायकियाट्रिस्ट) ह्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. त्या चढत जाव्या लागतात. परंतु कधी कधी एक पायरी गाळून दुसरी चटकन चढावी लागते. तुमच्या कडे किती वेळ उपलब्ध आहे आणि पेशंट ची परिस्थिती काय आहे ह्यावर ते अवलंबून आहे. ( डिप्रेस्ड पेशंट कोणती ही परिसीमा गाठू शकतो , हे इथे विसरून चालणार नाही )

दुसरं, पुण्यातील उत्कृष्ट आणि अनुभवी चांगले मानसोपचार तद्न्य कोण ह्या विषयी थोडी माहिती गोळा करायची होती. मागे माझ्या आधीच्या कंपनीतील आमच्या एका वरिष्ठांनी त्यांच्या आई साठी एका मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेतलेलं मला सांगितलं होतं, हे चटकन स्मरणात आलं. मग लगेचच त्यांना फोन केला. त्यांनी फोन वर जवळ जवळ एक तास बोलून त्यांचा सगळा अनुभव आणि मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मानसोपचार तद्न्य त्यांचे अनुभव, त्यांचे कौशल्य इत्यादी विषयी थोडा फार सर्वे केला आंतरजालावरील 'प्रॅक्टो' सारख्या संकेतस्थळांवरून.

हे सगळं आता अगदी सहज घडल्यासारखं लिहितोय खरा, पण हे सगळं प्रत्यक्षात घडत असताना आमच्या मनावर प्रचंड ताण होता. कारण ‘ही’ आईच्या आजारपणात कदाचित शेवटची पायरी होती. आम्ही ‘ती’ चढायला चुकलो की सगळं चं पत्यांच्या बंगल्यासारखं कोसळणार होतं. दुसरं, ह्या सगळ्या प्रवासात आई मानसिक रित्या तर ढासळली होतीच पण तिच्या शारीरिक क्षमतांचा सुद्धा प्रचंड ऱ्हास झालेला होता. सर्वात मुख्य म्हणजे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडलेला होता. त्यामुळे आमच्या एखाद्या सुद्धा चुकीच्या निर्णयामुळे मोजावी लागणारी किंमत परत न भरून पावणारी होती. ह्या सगळ्यात आम्ही आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला. तो योग्य की अयोग्य माहिती नाही, पण सध्याच्या करोनाच्या परिस्थितीत आम्ही तिला कुठेही अजिबात हॉस्पिटलाईज न करता, घरीच सगळे उपचार करत होतो. कारण हॉस्पिटॅलियझेशन मुळे तिला कदाचीत आणखी एकटेपणा आणि दडपण येईल असं आम्हाला सतत वाटायचं. घरी निदान ती माणसांच्या उठबैस मध्ये ती थोडी तरी बरी होईल असं आम्हाला वाटलं. अर्थात कोणत्याही डॉक्टरांनी तिला ऍडमिट करा असा सल्ला सुद्धा दिला नाही, त्यामुळे असेल कदाचित.

शेवटी एक निष्णात सायकियाट्रिस्ट फायनल ठरले. आम्ही ठरवलेल्या सायकियाट्रिस्ट ची एक आठवड्या नंतरची वेळ मिळाली. हल्ली डॉक्टर्स सुद्धा गर्दी कमी व्हावी म्हणून कमी अँपॉईंटमेंट्स देतात आणि अँपॉईंटमेंट्स शिवाय भेट मिळत नाही.

डॉक्टरांच्या भेटीची वेळ झाली तेंव्हा दवाखान्यात आई जेवढी चिंताग्रस्त होती तेवढेच किंबहुना तिच्यापेक्षा तसू भर जास्त आम्ही सुद्धा. डॉक्टरांनी साधारण पाच ते दहा मिनिटेच विचारपूस केली ( कदाचित त्या हुन कमीच असेल ). काही काळजीच कारण नाही असं बोलले आणि लॅपटॉप वर प्रिस्क्रिप्शन लिहू लागले. आम्हाला जरी सगळं नवीन असलं तरी, त्यांना असल्या रोजच्या पाचसहा केसेस, कदाचित जास्तंच. परंतु 'काही काळजीचं कारण नाही' ह्या चार शब्दांची आता आम्हाला एवढी सवय झाली होती की ह्या वाक्यावरचा आमचा विश्वासच उडाला होता. पण आम्ही अक्षरश: एखाद्या दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यानं भरून आलेल्या आभाळाकडे आशेनं नजर लावून पाहावं तसं त्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शन कडे पाहिलं आणि त्याचा निरोप घेऊन घरी आलो.

येता येता अर्थातच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं विकत घेतली होती. तीन गोळ्या होत्या. त्यातली एक अर्थातच झोप शांत लागावी म्हणून होती. रात्रीपासूनच औषधं सुरु केली. तीन पैकी दोन गोळ्या घेतल्यावर काही साईड इफेक्ट झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीची गोळी घेतल्या वर मात्र घेतल्यावर चांगलाच साईड इफेक्ट सुरु झाला. तिसरी गोळी घेतल्यावर आई ला होणारा त्रास पाहून, आपण परत चुकीच्या वाटेनं गेलो की काय अश्या विचारानं परत आमच्या काळजाचा ठोका चुकला. तातडीने डॉक्टरांना फोन केला, डॉक्टरांनी फोनवरच औषधांच्या डोसेस मध्ये किरकोळ फेरफार केले.

आणि ह्या घटने नंतर मात्र आमचा न संपणाऱ्या खोल अंधाराकडे निघालेला प्रवास थांबला, किंवा निदान पक्षी त्या प्रवासाची त्याची गती तरी मंद झाली, आणि बऱ्याच महिन्यानंतर आईच्या डोळ्यात आम्हाला आशेच्या किरणांची चमक जाणवू लागली. तिची झोप हळू हळू पूर्ववत झाली, मनात साचलेल्या नकारात्मक विचारांची ढगाळ जागा हळू हळू स्वच्छ निरभ्र सकारात्मक विचारांनी घेण्यास सुरवात झाली. तिचे खोल खोल जाणारे डोळे आणि तीतकाच खोल जाणारा आवाज हळू हळू चैत्रातल्या पळसाच्या फांदीला अंकुर फुटल्यासारखा जीवनेच्छुक बनून बहरू लागला. दिवसाकाठी भाताची अर्धा पाऊण वाटी पेज सुद्धा “चव नाही रे जिभेला” असं म्हणत कशी बशी पिणारी माझी आई, “थोडा गरम वरण भात खाते आज, फोडणी मात्र टाकते वरणाला , चव येते जरा बरी” असं म्हणून स्वतः स्वतःच्या हातून बनवून खाऊ लागली. तिची गोंदवलेकर महाराजांवर भलती श्रद्धा त्यामुळे कधी पहाटे पहाटे जाग आली तर ती बसल्या बसल्या मानसपूजा सुद्धा 'आटोपून' घेते. एवढेच काय, दोन आठवडयांनी पाहता पाहता दुष्ट चक्र थांबलं आणि जादू घडावी तशी आई, नुकताच कार्तिक संपून मार्गशीर्ष सुरु झाल्यामुळे सकाळी साडे सात पावणे आठला पडणाऱ्या कोवळ्या ऊन्हात पाच पन्नास पावलं चालून जाऊ लागली.

परवा डॉक्टरांनी सांगितलेल्या एक महिन्याच्या गोळ्यांच्या कोर्स नंतर फॉलोअप व्हिजिट साठी गेलो. डॉक्टरांनी अजून एक महिन्याचा कोर्स पूर्ण करून हळू हळू औषधें बंद करू असं सांगितलंय.

ह्या सर्व अनुभवातून आम्ही कुटुंबीय प्रचंड काही तरी नवीन शिकलो. ‘डोपामाईन’, ‘सेरोटोनिन’ वगैरे मानवी मनाला आणि विचारांना नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांच्या च्या अफाट गुंतागुंतीच्या आणि तरीही कुतुहुलपूर्ण रंजक अश्या जगाशी झालेली आमची नव्याने ओळखी. हाडाच्या डॉक्टर कडे आपण फ्रॅक्चर झाल्यावर जितक्या निःशंक मनाने जातो, तितक्याच पूर्वग्रह विरहित मानसिकतेने आपण मानसोपचार तज्ज्ञांच्या कडे गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे वेळेत गेलं पाहिजे, हे नव्यानं प्राप्त झालेलं ज्ञान.

आईच्या आयुष्यात हरवून गेलेल्या आणि रुसून बसलेल्या क्षणांना आता तिनं तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा हळू हळू का होईना निखळ पणे परत बोलवायला सुरुवात केलीये. ती रोज सकाळी उठून दारापुढे घालत असलेल्या रांगोळीचे फिकट होत जाणारे आता हळू हळू पूर्ववत गडद होत चाललेत. तिच्या फोन मधल्या व्हाट्सअँप वरच्या निगेटिव्ह अफवा वजा बातम्यांची जागा आता बऱ्याचश्या विनोदी आणि मिस्कील अश्या गोष्टींनी घेतली आहे. ती दुपारच्या वेळी जुने फोटोंचे अल्बम काढून बसते आणि चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या रम्य गोड आठवणीत रमून जाते, निदान दिवसातले पंचवीस तीस मिनिटे तरी. दुपारचा कधी कंटाळा आला की दूध घालून रव्याचा शिरा करते आणि त्यात बदामाचे चार तुकडेसुद्धा घालते, आपली शारीरिक क्षमता पूर्ववत व्हावी म्हणून. दुपारचे साडेचार वाजले आणि एखादा वामकुक्षी चा डुलका काढून झाला की, चहाने पित्त होतं म्हणून चहा ऐवजी वेलची घातलेली कॉफि पिते. शेवटी एकदाचे तिचे ते एकटे पणाने खेळण्याचे 'मनाचे खेळ' संपले आणि एकंदर तिच्या आयुष्याकडून असलेल्या माफक अपेक्षा आता थोड्या फार फरकानं का होईन पूर्ण होऊ लागल्यात. तिनें लालसर तांबूस कुंड्यांमध्ये लावलेल्या बाल्कनीतच लॉकडाऊन मध्ये अडकून बसलेला जाई जुई आणि वासंतीचा मंद परिमळ, आता वाऱ्या सवे तिच्या भवताली आणि घरभर पसरू लागला आहे… हळू हळू का असेना, पण तिची आयुष्याविषयीची आसक्ती पुन्हा अंकुरत आहे.

चारुदत्त रामतीर्थकर
३० डिसेंबर २०२०, पुणे.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

तळटीप : हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, "डिप्रेशन" हा विषय एकट्या दुकट्याचा राहिलेला नाही. करोना आणि लॉक डाऊन मध्ये मुळातंच गंभीर असलेला हा प्रश्न अधिकच व्यापक बनला आहे. ह्या पार्श्वभूमीवर, आमच्या घरातील ह्या "सत्यकथे" मुळे कदाचित ह्या त्रासाने ग्रासलेल्या मा.बो. च्या अनेक वाचकांपैकी एखाद दुसऱ्या व्यक्तींना जरी कुठेतरी काही फायदा झाला तर ह्या लेखाचा हेतू सध्या झाला असं मी मानेन. हेतुपुरस्सर इथे डॉक्टरांचे नांव वगैरे चा उल्लेख केलेला नाही. कुणास काही मदत हवी असल्यास 'वैयक्तिक' संपर्कातून मी अधिक माहिती अवश्य देईन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या आईंना मानसोपचारांनी बरे वाटले हा प्रत्यक्ष अनुभव ह्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी अनेक शंका निवारण करणारा आणि दिलासादायक आहे.
आईंची प्रकृती अशीच सुधारत जावो आणि पूर्वीसारखी होवो ही प्रार्थना.

महत्त्वाच्या विषयावर लिहिलयं तुम्ही...
कठीण विषय सोप्या शब्दांत समजावला आहे त्याबद्दल अभिनंदन तुमचे... आईला बरे वाटावे म्हणून तुम्ही केलेल्या प्रयत्नांत यश आले ते वाचून बरं वाटलं. तुमच्या आईला निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!!

महत्त्वाच्या विषयावर लिहिलयं तुम्ही...
कठीण विषय सोप्या शब्दांत समजावला आहे त्याबद्दल अभिनंदन तुमचे... आईला बरे वाटावे म्हणून तुम्ही केलेल्या प्रयत्नांत यश आले ते वाचून बरं वाटलं. तुमच्या आईला निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा°>>>>+1

उत्तम समयोचित लेख. तुमचे सायकियाट्रिस्ट हे मेडिकेशन वर भर देणारे दिसतात. थेरपीवर भर देणारे पण काही असतात. दोन पंथ आहेत त्यांच्यात.

खरच समयोचितच!!! अतिशय छान मांडले आहेत तुम्ही. मनाचे प्रश्न लाईटली घेउ नयेत. डॉक्टरांकडे जावेच. आता तर टेक्नॉलॉजी, सायन्स इतके पुढे गेलेल आहे (थँक्स टु रिसर्चर्स्/डॉक्टर्स) की तोडगा मिळतोच.

इथे तुमचा अनुभव मांडल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच. खूप गरज आहे मानसिक आरोग्याबद्द्ल जागरुकतेची. तुमच्या आईला निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!

अतिशय उत्तम शेअरिंग!!! या मुळे दोन महत्त्वाचे प्रश्न तुम्ही सोडवले आहेत.... मानसिक त्रास हा बरा करता येतो आणि
त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानसोपचार तज्ञ हे उत्तम उपचार करतात व ते थोतांड नाहीत ( कारण याच मायबोलीवर ते नुसते भोंदू आहेत असे अकलेचे तारे काही जणांनी तोडले होते!)
आपल्या आई अशाच आनंदात राहोत ही मनःपूर्वक कामना!

इथे तुमचा अनुभव मांडल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच. खूप गरज आहे मानसिक आरोग्याबद्द्ल जागरुकतेची. तुमच्या आईला निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा! >>> +१०८

हीरा, रूपाली विशे - पाटील, मंजूताई , प्रकाश घाटपांडे , सामो , स्वाती२ , रेव्यु --- आपणा सर्वांनी केलेल्या शुभ चिंतना बद्दल अत्यंत मन:पूर्वक आभार. _/\_ आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मी आई पर्यंत नक्की पोहोचवेन.

@ प्रकाश घाटपांडे : हो पंथ दोन आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे डिप्रेशन ची तीव्रता आणि कोणती स्टेज आहे, ह्यावर नुसती थेरपी की गोळ्या सुद्धा ? ह्यावर डॉक्टरांचा निर्णय होत असावा.

@रेव्यु : मानसोपचार हा भोंदूपणा वगैरे अश्या गैरसमजुती समाजात असतील तर ते खरोखरंच दुर्दैवी लक्षण आहे. आता विषय असा आहे की, बऱ्याच वेळेस 'गुण' न आल्यास त्या उपचार पद्धतीवरचा विश्वास उडतो आणि मग अश्या प्रकारच्या गैरसमजुती पसरल्या जातात. परंतु मानसोपचार ही शाखा 'भोंदू' आहे असं विधान करणं जरा अतिरेकी पणाचं आणि उथळ होईल.

@स्वाती२ >>>इथे तुमचा अनुभव मांडल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच<<<
अहो एव्हडे काही आभार वगैरे मानण्या इतके काही फार काम नाही केले. आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात त्याविषयी वगैरे लिहिणे हा तसा माझा बऱ्यापैकी छंद आहेच. पण इथे जरा हा अनुभव वाचून कुणाला तरी मदत होईल अशी थोडीशी आशा.

पुन्हा एकदा 'लेख आवडल्या बद्दल' सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!

हर्पेन आणि mrunali.samad , अभिप्रायाबद्दल आणि शुभेच्छां करीता धन्यवाद _/\_

चारुदत्त,
आभार यासाठी की जेष्ठ नागरीकांमधले नैराश्य हा फार दुर्लक्षित प्रकार आहे. बरेचसे डॉक्टरही या बाबत उदासिन असतात. आपल्याकडे तब्येतीची तक्रार घेवून आलेल्या रुग्णाच्या बाबतीत लक्षणे बघून जोडीला मनसोपचारांच्या दृष्टीने योग्य तज्ञांकडे पाठवणे हे सहसा घडत नाही. इतर औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनही असे घडू शकते याची कल्पना देणे वगैरे तसदी देखील घेत नाहीत. त्यामुळे तुमचे अनुभवकथन फार मोलाचे आहे.

सकारात्मक अनुभव लेखन !!
तुमच्या आई नेहमी हसत आनंदात राहो यासाठी शुभेच्छा !!! >> +९९९