होस्टेल

Submitted by वीरु on 26 December, 2020 - 06:01

गावाबाहेर विस्तीर्ण परिसरात आमचं इंजिनिअरिंग कॉलेज वसलेलं आहे. कॉलेजच्या एका टोकाला मुलांच्या वसतिगृहाची इमारत आहे तर दुसऱ्या टोकाला मुलींचे वसतिगृह. मुलामुलींचे होस्टेल दोन टोकांना ठेवण्याची कल्पना ज्याच्या डोक्यातुन निघाली असेल तो दरवर्षी अनेकांच्या शिव्याशापांचा धनी होत असेल. कॉलेज परिसरातील सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथली घनदाट झाडी. अभियांत्रिकी महाविद्यालय आहे की वनस्पतीशास्राचे, असा प्रश्न पडावा इतकी विविधप्रकारची जुनी, दुर्मिळ वृक्षसंपदा कॉलेजच्या परिसरामध्ये आहे. त्यामुळे दिवसाउजेडी कॉलेज परिसर मोठा नयनरम्य वाटतो. पण दिवस मावळल्यावर अंधार वाढायला लागतो तेव्हा झाडांचे आकार मोठे विचित्र भासतात आणि रात्री सोडियम दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात तो परिसर वेगळाच दिसतो. कॉलेजपासुन होस्टेलपर्यंत जायला जीवावर येते त्यामुळे शक्यतोवर होस्टलमधले विद्यार्थी एकट्याने रात्री उशिरापर्यंत कॉलेजमध्ये थांबायचे टाळतात. पण मला कशाचंच सोयरसुतक नसतं. मी फिरतो रात्रीबेरात्री इकडेतिकडे..
कॉलेजमध्ये प्रवेशाची लगबग सुरु झाली की, सुट्यांमध्ये सुस्तावलेल्या आमच्या वसतिगृहाला जाग येऊ लागते. पहिला पाऊस आणि नवीन चेहरे सोबतच येतात असं गंमतीनं म्हटलं जातं होस्टेलमध्ये. या वर्षीही बरेच नवीन चेहरे दिसताहेत. आमच्या होस्टेलमधल्या ज्येष्ठ नागरिकांना पलीकडच्या होस्टेलचीच जास्त उत्सुकता. तिकडे कोणकोण आलंय याबद्दल त्यांची रात्री उशीरापर्यंत रसभरित चर्चा रंगली होती. अशा चर्चांमध्ये माहितीगार मंडळींना फार भाव असतो.. आपल्याला काय, घेणं ना देणं, पण तरी बसलो त्यांच्या गप्पा ऐकत. मला ना या नवीन लोकांचे चेहरे वाचायला आवडते. काही भांबावलेले, कोणाच्या डोळ्यात स्वप्न, तर काही अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन आलेले आणि काही बापाचा पैसा मार्गी लावायला आलेले...
...मी पण असाच आलो होतो. भांबावलेला, आईवडीलांचं स्वप्न, भावंडांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन...
मुळात मला इंजिनिअरिंगला यायचेच नव्हते. कविता कराव्या, विविध भाषांमधल्या साहित्याचा अभ्यास करावा, शिक्षक होऊन शिकवावं असं वाटायचं. पण मी इंजिनिअर होणार हे स्वप्न माझ्या लहानपणीच वडीलांनी पाहिले आणि माझ्या हातात उरलं होतं त्यांच्या स्वप्नाची पुर्तता करणं. बरं माझ्याबद्दल स्वप्न पाहुन गप्प बसले असते तर तेही नाही. माझ्या लहान बहिणीने डॉक्टर व्हावं आणि छोट्या भावाने फौजदार हे पण त्यांचं स्वप्न. वडील शाळामास्तर, मग इतकी स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुढे पैसापण ‌लागेल, त्यासाठी प्रचंड काटकसर, घरात चीडचीड. ना हौस ना हट्ट. आणि वडील सांगतील ती पुर्व दिशा हे आईचं धोरण त्यामुळे तिला सांगुन काही उपयोग नसल्याने खेळण्या बागडण्याच्या वयातले ते दोन लहान जीव माझ्याजवळ येऊन मुसमुसत बसायचे आणि मी डोळ्यातले पाणी मागे सारुन त्यांना थोपटत सांगायचो की एक ना एक दिवस ही परिस्थिती नक्की बदलेल...
...कॉलेज सुरु होऊन दोन तीन दिवस झालेत. फस्ट इयरचे नवीन चेहरे होस्टेलमध्ये दिसताहेत. आज रात्री त्यांना कायतरी मार्गदर्शन करणार आहे म्हणे सीनियर मंडळी. कॉलेज प्रशासनाने रॅगिंगला आळा बसावा म्हणुन कितीही कडक उपाय केले तरी काहीतरी मार्ग शोधुन नव्या लोकांना त्रास दिल्याशिवाय यांना चैनच पडत नाही. कसला विकृत आनंद मिळतो त्यांनाच माहित. मला नाही आवडत अशा ठिकाणी जायला. पण तरी जावुन बसलो तिथे.
एक विषय चारचार वेळा देणारे, प्रॅक्टीकलच्या वेळी घशात हाडुक अडकल्यागत कोणालाच समजणार नाही अशा चिरक्या आवाजात उत्तरं देणारे आज सिनियर बनुन नवीन लोकांची उलट तपासणी घेऊन राहिले.
"ए..तु ये रे पुढे." चष्मीश सँडीने फस्ट इयरच्या एका पहिलवानाला पुढे बोलावलं. मघापासुन हा सिनियर लोकांकडे मारक्या रेड्यासारखा बघत होता. तेव्हाच मला अंदाज आला की याचं काही खरं नाही आज.
पहिलवान सँडीसमोर येऊन उभा राहिला.
"नाव काय रे तुझं?" सँडीने विचारले.
"विलास" पहिलवान पुटपुटला.
"बापाचे नाव घ्यायला लाज वाटते का? न्युटन्स लॉ माहितीये का तुला?" सँडी विलासवर डाफरला.
"ए ढापण्या.. रंगाशेठचे नाव ऐकलं आहे का तु? बाप आहे माझा. रंगाशेठ कोण आहे हे तुझ्या बापाला विचारुन ये आधी. मंग सांगतो तुला न्युटनचा लॉ." पहिलवानाने बॉम्बच फोडला.
अपमान,घोर अपमान.. नवीन आ‌लेल्या पोराने चारचौघात आपला अपमान करावा हे ‍सँडीला मुळीच आवडलं नाही. तो विलासच्या अंगावर धावुन गेला पण त्याच्या मित्रांनी त्याला आवरला. "जाऊ दे सँडी. आत्ता राडा नको. त्याला बघु नंतर" असं म्हणत ते सँडीला घेऊन गेले. रंगाशेठची किर्ती माझ्याही कानावर आली होती. जिल्ह्यातल्या सगळ्या अवैध धंद्यांचं उगमस्थान म्हणुन रंगाशेठची ओळख आहे. काय असेल ते असो पण आपल्याला तर जाम आवडला हा विलास. याच्यावर लक्ष ठेवायला हवं. नाहीतर पळवुन लावतील हे त्याला इथुन...
...मलाही खुप सहन करावं लागलं होतं नवीन असताना. पण घरचा विचार करुन अभ्यासात डोकं घातलं. विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन कॉलेजचे एक त्रैमासिक होते. त्यामध्ये माझ्या कविता छापुन यायला लागल्या. आणि एक दिवस ती समोरुन येताना दिसली.. माझ्याच वर्गात होती ती. वर्गात असली की तिच्याकडे पहातच रहावं असं वाटायचं.. जवळ आल्यावर थांबली अन् "कविता छान करतोस तु. मी वाचते तुझ्या कविता." असंं म्हणुन हसत निघुन गेली. मला तेव्हा काय बोलावे तेच सुचले नाही. ती माझी दखल घेईल हे वाटलच नव्हतं कधी. अत्यानंद काय असतो हे मी त्या दिवशी अनुभवत होतो. मग काय कधी योगायोगाने तर कधी ठरवुन आमच्या भेटी व्हायला लागल्या. बऱ्याच वेळा ती बोलत रहायची आणि मी तिला डोळ्यात साठवत रहायचो. कधी 'तुझ्या कविता वाचुन दाखव' असा हट्ट असायचा तिचा. आणि मी कविता वाचताना ती तहानभुक विसरायची..
कॉलेजमध्ये कधीच काही लपुन रहात नाही. त्यातच थर्ड इयरचा रोहित तिच्या प्रेमात पडला होता पण ती दाद देत नसल्याने तो बिथरला होता. रोहित आणि त्याच्या तीन चार मित्रांच्या वाट्याला कोणी फारसं जात नसे. मोठ्या घरची पोरं, त्यातच रोहितचे काका कॉलेजच्या संचालक मंडळावर होते. रोहितला आमच्याबद्दल समजल्यावर त्याने जमेल त्या मार्गाने त्रास द्यायला सुरुवात केली. धमक्या, मारहाण तर केलीच पण घरीही निनावी पत्र पाठवायला लागला. मला तर त्रास देत होताच पण तिच्या घरीही कळवुन मोकळा झाला. शेवटी तिच्या घरचे तिला घेऊन गेले. कायमचे.. ती गेल्यावर तर तो जास्तच बिथरला आणि माझ्या मागे हात धुवुन लागला. माझ्या त्रासाबद्दल वडीलांना सांगितले तर डीग्री मिळाल्याशिवाय तोंड दाखवु नकोस असं सांगितलं त्यांनी. काही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता माझ्यासमोर..
...विलास आता होस्टेलवर चांगलाच रमलाय. सिनियर लोकांनीही दोस्ती केलीय त्याच्याशी. आज रात्री होस्टेलवर पार्टी करताहेत ते. विलासला त्यांनी आग्रहाने बोलावले आहे. मी पण जाणार आहे तिथे.
"घे रे, काही होत नाही" सँडीने विलाससाठी पाचवा पेग भरला.
"मानल यार विलास तुला. डेरिंग आहे तुझ्यात" विक्या चकणा तोंडात टाकत म्हणाला.
"मंग, घाबरतो का मी कोणाला" तारीफ ऐकुन विलास खुष झाला.
"असं नाही विलास. तु चौथ्या मजल्यावरच्या डावीकडच्या शेवटच्या खोलीत अंधारात पंधरा मिनिट थांबुन दाखव. मग मानलं तुला." लल्याने हळुच गप्पांमध्ये तोंड खुपसलं.
"आरे पण ती खोली तर बंद असते. आणि पोरं काहीही बोलतात तिच्याबद्दल" विलासला धोक्याची जाणीव झाली.
"काही नाही रे. पावसाळ्यात खुप गळते म्हणुन बंद ठेवली ती खोली. हा सँडी तर एकदा झोपला होता तिथे. चावी आहे आपल्याकडे. वाटल्यास त्याला सोबत घेऊन जा" विलासने नकार द्यायच्या आत विक्याने पर्याय सुचवला..
चौथ्या मजल्यावरची ती कोपऱ्यातली खोली गेल्या दहा वर्षांपासुन बंदच होती. तिथे रहाणाऱ्या मुलांना काही चमत्कारिक अनुभव आल्याने तिथे कोणीच रहायला तयार नव्हते. या गोष्टीचा गवगवा होऊन होस्टेलची बदनामी होऊ नये म्हणुन ती खोली तर बंद केलीच होती पण बाजुच्याही दोन रुम बंद करण्यात आल्या होत्या. फक्त आठवड्यातुन एकदा साफसफाईसाठी ती खोली उघडली जायची...
...हो नाही करत विलास सँडीबरोबर जायला तयार झाला. चौथ्यामजल्यावर सध्या कोणी रहात नसल्याने शुकशुकाट होता. दोघेही एकमेकांच्या सोबतीने त्या खोलीपर्यंत पोहचले. कुलुप उघडुन दार आत ढकलताच करकर आवाज करत दरवाजा उघडला गेला. विलास दरवाजा उघडत असताना सँडी मागुन कधी पसार झाला ते विलासला समजलेच नाही. सँडी सोबत आहे असे समजुन तो आत जावुन बसला आणि पंधरा मिनिट थांबुन कुठल्याशा तंद्रीत खाली परत आला. विलासची हिंमत पाहुन सगळेच थक्क झाले...
...एका दिवशी सँडीला एकटा पाहुन विलासने गाठलं.
"थँक्यु यार. तु सोबत होतास म्हणुन मी अंधारात त्या रुममध्ये थांबु शकलो. कोणाला बोलु नकोस पण मला अंंधाराची आणि भुतांची खुप भीती वाटते रे. लाज राखलीस भावा तु माझी." सँडीचा हात हातात घेत विलास नम्रतेने म्हणाला.
"काय? मी तुझ्यासोबत रुममध्ये आलो?? येड्या तु दार उघडत होतास तेव्हाच मी पळुन गेलो होतो तिथुन. तुला जास्त झाली होती त्या दिवशी" सँडी खो-खो हसत सुटला.
"कसं शक्य आहे. तु माझ्या समोरच कॉटवर बसला होतास पाय हलवत. फक्त अंधारात नीट दिसत नव्हतं." विलासचा चेहरा पांढराफटक झाला होता. आणि सँडीला ही गंमत त्याच्या मित्रांना कधी सांगतो असं झालं होतं...
त्याच दिवशी संध्याकाळी विलास कॉलेज सोडुन गेला. हे सँडीने बरं केलं नाही...
... रोहितने पण बरं केलं नव्हतं. माझी तक्रार कोणीच ऐकुन घेतली नव्हती. कॉलेजनेपण नाही आणि वडीलांनी नाही. काही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. शेवटी माझ्या त्या चौथ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीतल्या पंख्यानेच मला सुटकेचा मार्ग दाखवला.. पण त्यानंतरही माझी तक्रार तशीच राहिली. 'मानसिक संतुलन बिघडल्याने विद्यार्थाची आत्महत्या' अशी बातमी दहा वर्षांपुर्वी छापली गेली पेपरात. माझा छळ झाला होता याचा उल्लेखही नव्हता. शेवटी मलाच पाऊल उचलावे लागले.. रोहित आणि त्याच्या कंपुतला एकजण रात्री पिक्चर पाहुन बाईकवरुन होस्टेलला येत असतांना एका वळणावर त्यांना मी दिसलो होतो म्हणे..बाईक सरळ खड्यात.. मित्र जागीच गेला. काहीतरी भयानक पाहिले असावे असं त्याच्या चेहऱ्याकडे पाहुन वाटत होते. रोहित जखमी. चार दिवस हॉस्पीटलमध्ये होता. मी त्याच्या पायथ्याशीच बसुन होतो ते चार दिवस, त्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत..
'तो आलाय, माझ्याकडे पाहुन हसतो' असं शेवटपर्यंत सारखा ओरडत होता रोहित..जखमांपेक्षा माझं तिथलं अस्तित्वच नकोसं झालं होतं त्याला..
...माझ्या जाण्यानंतर वडील पुर्ण बदलुन गेलेत. दोघा भावंडांना पोटाशी घेऊन रडत राहयचे. खुप लाड करतात त्यांचे. 'एक ना एक दिवस ही परिस्थिती नक्की बदलेल...' असं सांगितलं होतं मी दोघांना. खुप बरं वाटलं माझे शब्द खरे झालेले पाहुन..
...विलासला हाकलुन सँडीने काही बरं केले नाही. माझ्या खोलीत झोपला होता काय. आजपासुन मीच जातो सँडीच्या रुममध्ये रहायला..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

छान लिहिलीयं कथा!!
गुंतवून ठेवणारे कथानक आणि सहजसुंदर भाषाशैली!!
पुढच्या कथेला शुभेच्छा वीरुजी!!

धन्यवाद रश्मीताई.
धन्यवाद मृणालीताई.
धन्यवाद गार्गीजी.
धन्यवाद मानवजी.
धन्यवाद धनवन्तीजी.
रुपालीताई मनापासुन धन्यवाद.
धन्यवाद अनुताई.
धन्यवाद आनन्दाजी.

लावण्याजी, आनंदजी धन्यवाद.
<<काही ठिकाणी काळात गल्लत झालीये.>> आनंदजी कोणत्या ठिकाणी ते सांगाल का? म्हणजे शक्य असेल तर दुरुस्ती करता येईल.

मला आमच्या गावची आठवण आली. भूत स्टोरी सांगतंय हा भाग सोडला तर बाकी सगळं तसंच आहे. आत्महत्या होतात म्हणून वर्षानुवर्षे बंद असलेली खोली, दोन्ही टोकाला असलेली होस्टेल, निर्मनुष्य रस्ता सगळं सेम.

भन्नाट .....
Submitted by king_of_net >> धन्यवाद.
<<मला आमच्या गावची आठवण आली...>> बापरे, बोकलत कधीतरी सविस्तर लिहाच.
धन्यवाद आबासाहेब.
धन्यवाद वावेजी.

धन्यवाद शरदजी.
<<आवडली कथा...
Submitted by च्रप्स >> धन्यवाद च्रप्स. आपले प्रतिसाद प्रोत्साहन देतात.

अंदाज आला तरी वाचायला मजा आली.
प्रत्येक हॉस्टेलमध्ये अशी कथा असलेली एक रूम असतेच! आणि इंट्रोच्या दुसऱ्याच दिवशी त्याबद्दल सांगून फ्रेशर पोरांची फाडल्या जातेच.. आमचं हॉस्टेल, आमच्या इंट्रोच्या नाईट्स आठवल्या. पहिल्याच वर्षाच्या शेवटी म्हणजे दुसऱ्याच सेममध्ये पहिल्या सेमचे अडकलेले विषय द्यायला मी आणि माझा पार्टनर थांबलेलो, त्यावेळी संपूर्ण हॉस्टेल (टोटल १०५ खोल्या)मध्ये आम्ही दोघेच! चार रात्रीत आम्ही एकूण एक खोली फोडून कुठेही भूत नसल्याची खात्री करून घेतली होती!

प्लॅन बी:
खोली फोडून त्यात भूत दिसले असते तर नक्की काय करणार होतात ? Happy

धन्यवाद वर्णिताजी.
धन्यवाद अजिंक्यराव. रिकाम्या होस्टेलमध्ये भुत नसल्याची खात्री करुन घेणं. फारच रोमांचक अनुभव असेल तो.

खोली फोडून त्यात भूत दिसले असते तर नक्की काय करणार होतात ?>> त्यालासुद्धा घेऊन बसलो असतो कि (ओल्ड मंक शिल्लक होती आमची थोडीफार..) खरेतर आम्ही दरोडेखोर होतो होस्टेलचे. पण लूट करायचो ती फक्त बादल्या, मग आणि कोऱ्या जर्नल्सची. बाकी काही असायचेही नाही म्हणा रूम मध्ये सेम संपल्यावर.. सुट्ट्या लागल्यावर दरोड्याच्या भीतीने सगळीच पोरे आपला महत्वाचा सामान घेऊन जात घरी.