दिल मै बजी गिटार….

Submitted by सरनौबत on 24 December, 2020 - 13:44

दिल मै बजी गिटार….

पूर्वी रविवार सकाळ म्हणजे भाजी मंडई हे समीकरण ठरलेलं असायचं. कोपऱ्यावर जागोजागी भाजीवाले असले तरी मंडईत जाऊन भाजी खरेदीची मजा काही औरच. बाबांच्या स्कुटरवर मागच्या सीटवर रिकाम्या पिशव्या सांभाळीत रिकाम्या लक्ष्मी रोडवरून जायला मस्त वाटायचं. रविवारी ताजी आवक असल्याने मंडईत पाऊल टाकताच मूड एकदम फ्रेश होऊन जात असे. तसंही मंडईत कधीही गेलं तरी छान वाटतं. मला विशेष आवडणारे दोन सीझन म्हणजे पावसाळा सुरु होण्यापूर्वी लोणच्याला कैऱ्या फोडून घेणे आणि डिसेंबर महिन्यात मटार खरेदी. बाठ्यासकट धडाधड स्पेशल विळीवर कैऱ्या फोडताना बघणे पर्वणीच! त्याचप्रमाणे थंडी चालू झाल्यावर जागोजागी मटाराच्या शेंगाचे आणि त्याला उत्तम कॉन्ट्रास्ट रंगसंगती साधणारे लाल गाजराचे लावलेले ढीग जणू डिसेंबरच्या आगमनाची वर्दी देत असतात.

Mandai

फ्रोझन मटार मुळे वर्षभर मटार उपलब्ध असतात. मात्र त्याला ताज्या मटारची सर नाही. मंडईतील लबाड भाजीवाले वजनात मारणे आणि मुद्दाम निबर शेंगा ढकलून गिऱ्हाईकांना ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावण्यात पटाईत असतात. त्यामुळे बारीक लक्ष ठेऊन मटार खरेदी करावी लागते. घरातील लहान मुलं जर मटार उसळ आवडीने खात नसल्यास 'एवढी उसळ संपवली तर नंतर गाजर हलवा मिळेल' असे गाजर दाखवावे लागते. त्यामुळे मटारच्या जोडीने गाजर खरेदी देखील करावी. पिशव्या भरून ग्रीन मटार घ्यायचे आणि घरी येताना ग्रीन बेकरीतून स्लाइस ब्रेड. डोळ्यासमोर चमचमीत मटार उसळ-ब्रेड चमकू लागते. स्कुटरच्या मागे बसल्या-बसल्या पिशवीतले कोवळे मटार खात-खात घर कधी येते समजत नाही.

इतके मटार सोलणे जरा कंटाळवाणा प्रकार आहे. पण सहकुटुंब हा कार्यक्रम सामूहिक केल्यास ढीगभर मटार कधी सोलून होतात त्याचा पत्ता लागत नाही. सोलताना ताजे कोवळे मटार तसेच खायचे. आमच्या घरी मांजरीची पिल्ले असल्याने अजूनच बहार. दाणे सोलताना खाली पडले तर त्या घरंगळणाऱ्या दाण्याचा पाठलाग करायला मांजरीच्या पिलांना भारी मजा यायची. दाणे पकडल्यावर एखादी मोठी शिकार पकडल्याच्या थाटात ते आपल्याकडे बघायचे. शेंगा सोलायला लहान पोरं असल्यास 'शेंगात अळी तर निघत नाही ना' ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी एखादा वडीलधाऱ्या माणसाची नेमणूक करावी. चुकून अळी तशीच उसळीत जाऊन शिजली तर मात्र 'अळी मिळी गुपचिळी' नाहीतर ''सगळीच उसळ मुसळ केरात''!

पितळी पातेल्यात मटार उसळ उकळू लागली कि मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. तर्रीदार मटार उसळ, ब्रेड आणि कांदा लिंबू म्हणजे जन्नत. साध्या ब्रेडपेक्षा ब्राऊन पेपरमधील कडक कड वाला ब्रेड रश्यात भिजवल्यावर फारच उत्कृष्ट लागतो. काही जण स्लाईस हातात घेऊन त्याचा दातांनी (कोरडा) तुकडा तोडतात व उसळ चमच्यानं तोंडात सारतात. त्यापेक्षा दोन्ही हातांनी ब्रेडचा तुकडा तोडून तो रश्श्यात बुडवून भिजवावा व अलगद तोंडात सोडावा. पहिला घास खाल्ला कि आनंदाची लाट अंगभर पसरते....डोळे मिटतात...कान बंद होतात...नाक त्या आनंदाला वाट करून द्यायला लागतं....आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी नेणीवांच्या पलिकडे जातात.....फक्त मटार उसळ आणि आपण एवढीच काय ती शाश्वत जाणीव उरते.... ब्रेड खेरीज पोळी, पराठा अगदी ज्वारीची भाकरी सुद्धा भन्नाट लागते. ह्या महोत्सवाची सांगता आंबेमोहोर भात, मटार उसळ आणि ताक ह्या भैरवीने करावी.

मटारात 'सिमला मटार' अतिशय प्रसिद्ध आहे. एकदा सासवडमार्गे पुण्याला येताना वाटेत हिवरे गावचा भाजीबाजार दिसला. मटार, सीताफळे, कांदा पात आणि पेरूमुळे 'हिवरे एकदम हिरवे' झाले होते. मटार इतका गोड कि सालीसकट खावा! भरगच्चं भरलेला पण कोवळीक जपलेला हा मटार! शेंगेच्या आतील एकसारखे टपोरे हिरवेगार मोतीच जणू…. एवढी वर्षे इतका सुंदर मटार पुण्याजवळ मिळत असूनही फक्त सिमला मटार खाल्ल्याबद्दल थोडे अपराधी वाटले. हे म्हणजे शेजारी मोहम्मद रफी रहात असताना रेडिओवर शब्बीर कुमारची गाणी ऐकण्यापैकी आहे. पुरंदरच्या कडक थंडीत तरारलेला हा पहिल्या तोडीचा गोड वाटाणा (मटार) मिळण्यास पूर्वजन्मीची पुण्याई लागते. ह्या गोड शेंगा फुफाट्यात भाजून खाव्यात. त्या चवीपुढे हुरडा देखील फिका वाटेल!

सध्या लहान मुलांच्या वाढदिवसाला पास्ता, पिझ्झा किंवा नूडल्स असा मेनू असतो. पूर्वी इडली सांबर किंवा पावभाजी हा ठरलेला मेनू. माझा वाढदिवस डिसेंबर महिन्यात असल्याने दर वर्षी न चुकता मटार उसळ ब्रेड आणि गाजर हलवा हाच मेनू असायचा. पुलंच्या नुसार पुणेकरांची चैनीची सीमा म्हणजे मटार उसळ आणि शिकरण. माझी वाढदिवसाच्या चैनीची कल्पना "मटार उसळ आणि गाजर का हलवा " अशी आहे.

मटार हा उसळीत प्रमुख भूमिका पार पाडतो तश्या इतर अनेक भूमिका देखील उत्तमपणे निभावतो. लोकांत मिळून-मिसळून सुद्धा स्वतःचा मान आणि वेगळे अस्तित्व कसे जपावे हे मला वाटतं मटाराकडून शिकावे. उसळ आणि मटार करंजी मध्ये हा मुख्य अभिनेता असतो. आलू-मटार आणि मटार-पनीर मध्ये सहाय्यक अभिनेता. बटाटा आणि पनीर सारखे दिग्गज असताना स्वतःचा आब राखून दुसऱ्यावर कुरघोडी न करता समंजसपणे वागतो. पोहे, भात किंवा पुलाव मध्ये पाहुणा कलाकार असूनही छाप सोडून जातो. मेथी मलई बरोबर देखील गुण्यागोविंदाने नांदतो.

हिवाळ्याची चाहूल लागली कि जागोजागी कोवळ्या मटारचे ढीग दिसू लागले कि मनात 'देखा तुझे मटार, दिल मै बजी गिटार' वाजू लागतं. सप्टेंबर महिन्यात World Peace Day साजरा केला जातो. जगात जवळपास सर्व देशांमध्ये मटार मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. त्यामुळे मटारच्या सन्मानार्थ डिसेंबर महिन्यात World Peas Day साजरा करावयास हवा. श्रावण सुरु होण्यापूर्वी कांदे नवमी कांदा भजी तसेच गटारी अमावस्या नॉन-व्हेज बनवून साजरी करतात. त्याच धर्तीवर जानेवारी संपण्यापूर्वी महाराष्ट्रात 'मटारी पौर्णिमा' सुरु करू या.

Matar Usal

....सरनौबत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है! फार छान लेख.

पुणेकरांचं डिसेंम्बरातल्या मटारशी एक खास नातं आहेच. पुण्यात असताना डिसेंबरला एकदातरी मटार उसळ-ब्रेड-गाजरहलवा हा बेत होतोच. पुलं म्हणतात तसं चैनीची परमावधी. आणि संक्रांतीच्या हळदीकुंकवाला एकातरी घरी मटारकरंजी/मटार पॅटिस असतातच.

@सरनौबत
लेखातले चित्र अप्रतिम. पण हे तुम्ही स्वतः काढलेले चित्र आहे किंवा तुम्ही मूळ चित्रकाराची परवानगी घेतली आहे का?

सरनौबत...
आपण मंडईच्या स्वारीवर जातीने गेलेले दिसत आहात. सरनौबत म्हटल्यावर कमरेला कट्यार वा हातात तरवार न दिसता हातातल्या पिशवीत मटार दिसताहेत.
(मटार)मधल्या आळीचे नाव सार्थ करीत किल्लेदार म्हणाले.
बाकी लेख उत्तम...

हा पण छान लेख आहे. मटारची उसळ हिरवे वाटण घालून मस्त होते. जिरे ओलेखोबरे, हिरवी मिरची धणे किंचित इतकेच. माझे फेवरिट ती हिरवी उसळ वरून कोथिंबीर आणी बारीक शेव
आणि लुसलुशीत पाव व्हाइट बटर लावून भाजलेले.

@webmaster - ह्या चित्रात पिशवी घेऊन उभा असलेला मटारप्रेमी गिऱ्हाईक मीच आहे. माझ्या जिवलग मित्राने वाढदिवसाची भेट म्हणून हे चित्र दिले आहे.

हा लेख मटार सामोश्याइतका खुसखुशीत आहे.

गाजर हलवा हा हिंदी हिरोंच्या आईने बनवलेला एकमेव श्रीमंत पदार्थ. येऊन जाऊन मा ने आज गाजर हलवा बनाया है .b4457065-reema-lagoo-serves-gajar-ka-halwa-salman-khan-hum-saath-saath-hai-500x360.jpg

हा ही लेख खुसखुशीत
ताजे मटार हल्ली आमच्याकडे खाणे होतच नाही, कारण ते फ्रोजन मटार वर्षभर फ्रिजमध्ये पडले असतात Sad

बाकी मटार देखील बटाट्यासारखाच या त्या भाजीत खुबीने मिसळतो हे मात्र खरेय. यावरूनच दोन पैसे माझेही जोडायचा मोह होतोय,
हमे और जेवने की, चाहत ना होती..
मटर तुम ना होते.. मटर तुम ना होते.. Happy

धन्यवाद निनाद, धनुडी, भाग्यश्री१२३, जाई, रश्मी, ऋन्मेऽऽष भाऊ. "कोवळे मटारदाणे खात-खात गस्त घालणे" ह्यावरूनच उर्दूत 'मटरगश्ती' शब्द आला असावा 🙂

छान लेख. थंडी, रविवारची मंडई, मटार, उसळ, गाजरं सगळा नॉस्टॅल्जिआ जागा झाला.
चित्र तर केवळ अप्रतिम आहे! चित्रकाराला नावानिशी श्रेय आवर्जून दिले पाहिजे असे मात्र या आणि तुमच्या आधीच्या लेखातही वाटले.

Pages