वाट अशी होईन

Submitted by निखिल मोडक on 24 December, 2020 - 02:25

वसंती फुलताना राने शिशिरी गळता पाने
वाट अशी होईन जीला नसेल कोठे जाणे

तिच्यावरी ना काटे नसे फुफाटीचे पोळणे
असतील वळणावरी तेथे अमृताची रांजणे

नसती चकवे अन असती स्पष्ट निशाणे
रिझवण्या मन आणिक गातील पक्षी गाणे

कदंब देतील छाया अली गुंगतील दिवाणे
फुलवीत पिसारा मोर घेईल निळे उखाणे

अस्तसमयी रवीची धरीतील किरणे पाने
ती काजवे होऊन उजळतील काळी बने

पुढती गेले त्यांचे लेऊन शुभंकर लेणे
होईन वाट अशी जी फेडील पाऊलदेणे

(पहिल्या कडव्यात कवी स्वतःच्या तारुण्यात वा म्हातारपणी अशी वाट होण्याची अपेक्षा करीत आहे की जी गतिमान नसेल. तिच्यावरून चालताना काटे (दुःख) वा फुफाटे (भोग) नसतील. कुठलाही फसवेपणा नसून थेट मार्गदर्शन असेल, आणि चालण्याचा कंटाळा आल्यास मन रिझवायला गाण्यासारखी एखादी कला असेल. कदंबासारखी उंच व्यक्तिमत्वे असतील आणि अखंड ज्ञानगुंग असणारे विद्वान असतील तिथे साक्षात सरस्वती आनंदाने नाचत असेल. हे ज्ञानी कठीण काळी आधीचे ज्ञान धारण करून ठेवतील व अंधारात निदान त्या पकडलेल्या किरणांचे काजवे होऊन वाट उजळत राहतील. मी ही अशी वाट होईन असे कवी म्हणतो व पुढे म्हणतो की ही वाट म्हणजे मी पुढे गेलेल्यांची पावले अंगावर लेऊन असेन व त्यांचे पाउलदेणे मी फेडीन. शेवटच्या कडव्यात, वाट पावलांनी तयार होत असल्याने ती पावलांची ऋणी आहे अशी कल्पना केली आहे)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults