मुसाफिर! - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 19 December, 2020 - 13:49

भग्न अशा त्या मंदिराचे आकाशाला स्पर्श करणारे ते चार मनोरे तो निरखून बघत होता.
निळसर पांढरट रंगाचे ते मनोरे, आणि त्याच रंगाचे मंदिराचे अस्ताव्यस्त पसरलेले दगड.
...संपूर्ण पर्वत चढून तो वर आला होता...
बांगड्यांच्या मंजुळ किणकिणीने त्याची तंद्री भंगली.
समोरूनच त्याला एक संपूर्ण काळा बुरखा परिधान केलेली स्त्री येताना दिसली. तिच्या शरीराचा नखही दृष्टीस पडत नव्हता. तिच्या बांगड्याही दिसत नव्हत्या, मात्र तिचे पैंजण आणि बांगड्या एक मधुर किणकिण निर्माण करत होते.
"मुसाफिरा, कुठून आलास?"
तिच्या मंजुळ आवाजाने क्षणभर त्याच्या ह्रदयात कालवाकालव झाली. स्वतःला सावरून तो म्हणाला.
"मी कुठून आलो हे सांगू शकत नाही. पण मी तिथला राजकुमार आहे, हे सांगू शकतो."
"चुकीच्या उत्तराने मूल्य कमी होते मुसाफिरा!"
तो खजील झाला.
"इथे का आलास?"
"न्याय मागायला.'
"की शोधायला?" बुरख्याआडून आवाज आला.
तो विचारात पडला.
"मुसाफिरा, बरोबर उत्तरासाठी आधी प्रश्न बरोबर असायला हवा."
तो काहीही बोलला नाही.
"असो. इथे काही लोक न्याय मागायला येतात, काही लोक न्याय शोधायला. न्याय दिला जातो किंवा शोधून दिला जातो. तुला काय हवंय?"
"मला न्याय शोधून हवाय."
"कुणासाठी?"
"माझ्या स्वतःसाठी."
"तुझ्यावर काय अन्याय झालाय?"
"मला राज्यातून बेदखल केलंय."
"कुणी?"
"माझ्या वडिलांनी."
"का?"
"माझ्याकडून स्त्रीवध झाला म्हणून..."
"ठीक आहे..." आवाज खोल गेला.
"हे समोर मनोरे बघितलेस? यातील एक आहे नीतीचा मनोरा, दुसरा अनितीचा आणि हे बाजूचे दोन आहेत, त्यांच्यापैकी एक आहे सत्याचा आणि दुसरा असत्याचा, पण कुठला मनोरा कुठचा ते मलाही माहिती नाही."
मुसफिराने सगळे मनोरे निरखून बघितले.
"तुला न्याय कुठल्या रुपात हवाय?"
"मला राजकुमार म्हणून राज्यात सन्मानाने परत बोलवावं, आणि माझं राज्यारोहण व्हावं."
"ठीक आहे. आणि जर ही फिर्याद खोटी ठरली तर??"
"तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी स्वीकारेन."
"मुसाफिरा," त्या आवाजात पहिल्यांदाच विषाद जाणवला. "जर तुझी फिर्याद खोटी असली, तर तुझा शिरच्छेद होईल, आहे कबूल?"
त्याचा थरकाप उडाला, मात्र तरीही तो मनाचा निग्रह करून म्हणाला.
"कबूल..."
"ठीक आहे. खटला सुरू करूयात." तो आवाज म्हणाला, आणि मनोऱ्यांच्या जवळ गेला.
"हे मनोऱ्या, जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं की याने खरंच याच्यावर आरोप असलेला स्त्रीवध केलाय का? तर तो काय उत्तर देईल."
धीरगंभीर आवाज घुमला...
"हो केलाय!!!!!"
मुसाफिर भांबावला. त्याचा थरकाप उडाला.
"मुसाफिरा अभिनंदन, तुझी स्त्रीवधाच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात येत आहे."
तो हर्षावला...
"पण हेच सत्य असं तुम्हाला कसं कळलं?"
"प्रश्न नेमका असला, तर उत्तरही नेमकं असत मुसाफिरा..."
"धन्यवाद," तो हर्षभराने म्हणाला, आणि जायला निघाला.
"थांब मुसाफिरा, तुझा न्याय अजून झालेला नाही."
"म्हणजे?" तो घाबरला.
"तुझी फिर्याद तुला राजकुमार म्हणून परत बोलावावं व राज्यारोहण व्हावं अशी होती ना?"
"हो पण..."
"या फिर्यादीचा निकाल अजून लागलेला नाही. न्याय हा दुधारी असतो, म्हणून न्याय मागतानाही नेमका कशाचा मागावा, हे कळायला हवं.
हे मनोऱ्या जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं, की आजपर्यंत मुसाफिरच्या हातून स्त्रीवध झालाय का? तर तो काय उत्तर देईन."
"नाही झालाय!"
धीरगंभीर आवाज घुमला.
"मुसाफिरा. तुझ्या हातून कधीतरी स्त्रीवध झालाय. यामुळे तू राज्यात परत जाण्यासाठी अपात्र आहेस."
"नाही." मुसाफिर म्हणाला. "तो स्त्रीवध युद्धात झाला होता. आर्मेनियाची राजकुमारी पुरुषी चिलखत घालून लढत असताना अज्ञानाने तो वध झाला होता, त्यामुळे युद्धवध म्हणून हे नीतीस धरून आहे."
दुसऱ्या मनोऱ्यांकडे वळत बुरख्यातून आवाज आला.
"हे मनोऱ्या, मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं की हा स्त्रीवध नीतीला धरून आहे की नाही, तर तो काय उत्तर देईन?"
"नाही..." धीरगंभीर आवाज घुमला.
"धन्यवाद. अभिनंदन मुसाफिरा, तू याही आरोपातून सुटलास."
मुसाफिरा घाईघाईने मागे फिरण्यासाठी वळला.
"थांब मुसाफिरा. अजूनही न्याय बाकी आहे."
"म्हणजे?"
"तुला राजकुमार म्हणून राज्यारोहण व्हावं म्हणून तू पात्र आहेस, हे कोण ठरवणार?"
"हा शुद्ध पोरखेळ आहे." मुसाफिर ओरडला.
"नियतीच्या हातातील शूद्र बाहुले आहोत आपण मुसाफिरा, त्यासाठी पोरखेळ हा शब्द कमीच...
हे मनोऱ्या, जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं, की मुसाफिर राज्यारोहण व्हावं म्हणून पात्र आहे का? तर तो काय उत्तर देईन?"
"हो आहे." मनोऱ्यांमधून आवाज घुमला.
बुरखाधारी मुसाफिराकडे वळला.
"अरेरे मुसाफिरा, तू पात्र नाहीस. याचाच अर्थ तू खोटं बोललास."
"नाही." मुसफिर रागावला. "मी पात्र की अपात्र हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला.
नियतीने!"
"आणि नियतीला हा अधिकार कुणी दिला?"
"तू स्वतः..."
मुसाफिर भांबावला.
"ठीक आहे. मी हा न्याय मान्य करेन, पण न्यायालयाने हा न्याय कुठल्या पुराव्याने दिला, हे मला जाणून घ्यायचा नीतीने पूर्ण हक्क आहे."
"ठीक आहे, आपण नीती अनितीचा मनोऱ्याला विचारुयात." बुरख्याआडून आवाज आला.
"हे मनोऱ्या, जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं, की याला जाणून घ्यायचा हक्क आहे का? तर तो काय उत्तर देईन?"
"नाही." मनोऱ्याने धीरगंभीर आवाजात उत्तर दिले, मात्र आता त्या आवाजात उपहासही होता.
बुरख्याआडून आवाज आला.
"मुसाफिरा, तू स्वतःला राजकुमार समजतोस. म्हणजेच राजाचा पुत्र. बरोबर?"
"हो, हा काय प्रश्न आहे." मुसाफिर वैतागला.
आता बुरख्याआडून जोरात आवाज आला.
"हे सत्य असत्याच्या मनोऱ्या, जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं, की हा खरंच राजाचा पुत्र आहे का, तर तो काय उत्तर देईल?"
"होय" आवाज घुमला...
आणि त्याचक्षणी त्याने बाकीच्या मनोऱ्यांनाही विचारणा झाली...
"हे नीती अनितीच्या मनोऱ्या, जर मी दुसऱ्या मनोऱ्याला विचारलं, की हा राजाचा पुत्र नसताना राज्यारोहणाची मनीषा बाळगतोय, हे नीतीला धरून आहे का? तर तो काय उत्तर देईन?"
"होय..." पुन्हा आवाज घुमला.
मुसाफिर प्रचंड भांबावला... त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"पण का?" तो म्हणाला.
"न्याय झालाय मुसाफिरा. न्याय आदिम असतो, नागडा असतो. सूर्यप्रकाशासारखा लखलखीत असतो, धारदार असतो. त्याला भावना नसतात. त्याला फक्त दिसतात ते पुरावे, ठसठशीत, जखमांसारखे..."
"काहीही असू दे, मला कायम जाणीव असेन आणि कायम माहिती असेन, मी मेसोपोटेमियाचे राजे हलाल यांचा पुत्र झर्क्सच आहे. हा न्याय मला मान्य नाही." मुसाफिर म्हणाला..
"काय...." बुरख्याआडून प्रचंड अविश्वावासाने आवाज आला.
"काय झालं?" मुसाफिर म्हणाला.
बुरख्याआडून प्रचंड विषादाने आवाज आला...
"अनेक वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया एक गायक आला होता. अतिशय मंजुळ आवाजात तो गात असे, धीरगंभीर आवाजात गात असे, अनेक आवाजात गात असे. तुझी माता त्याच्या प्रेमात पडली व त्यातून तू जन्माला आलास.
तुझ्यावर राजाचा हक्क नाही राजकुमारा..."
मुसाफिराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
"म्हणजे, माझा जन्मच अनीतीतून झाला? माझं आयुष्यच असत्य होतं? म्हणजे माझं आयुष्यच नियतीचा पोरखेळ होता. या आयुष्याला जगण्याचा हक्क नाही..."
तो खाली वाकला. शिरच्छेदाची वाट बघत...
"बाळा... पुढच्याच क्षणी त्याच्या कानांवर एक धीरगंभीर आवाज पडला."
आता बुरखा गळून पडला, त्याजागी एक पोक्त पुरुष उभा होता.
"पुढची कथा ऐक, राजाला त्या प्रेमप्रकरणाविषयी कळलं, व त्याने गायकाला राज्यातून हद्दपार केलं. तो गायक देशोदेशी फिरत या मंदिरात आला, व न्यायदानाच काम करू लागला."
"म्हणजे... मुसाफिर प्रचंड आश्चर्यचकित झाला.
"मीच तुझा पिता बाळा... मीच तुझा पिता...मीच तो चांडाळ... हे मनोरे, हे न्यायदान सगळं खोटं, एक फार्स, नियतीच्या पटलावर खेळवण्याचा. या मनोऱ्यांना कुठून आवाज येणार? हे मनोरे, हे दगडं, सगळे वर्षानुवर्षे असेच उभे, मूक साक्षीदार! हे सगळे आवाज माझेच असतात. मला मन मानेल तसा मी न्याय देतो. कुणाला खरा, कुणाला खोटा. मात्र ती नियतीचं मला खेळवत राहिली. आज तुझ्यासोबतही खेळवत राहिली."
"म्हणजे हे सगळं खोटं होतं?"
"हो बाळा, ही मंदिराची मोहोर घे आणि निश्चितपणे जा. जगाला ओरडून सांग, मला पडक्या मंदिराने पात्र ठरवलंय. त्रिखंडावर राज्य कर. यशस्वी हो..."
मुसफिराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले...
त्याने गायकाच्या पायाला स्पर्श केला... व तो मंद पावले टाकत पायऱ्या उतरू लागला...
...एका चुकार क्षणी त्याचा पाय घसरला, व तो गडगडत पर्वतावरून खाली गेला...
"बाळा..."
गायकाने आकांताने आरोळी मारली!...
...व दुःखावेगाने त्याने पर्वतावरून उडी घेतली...
...आणि त्याचबरोबर ते मनोरे खदाखदा हसू लागले...

समाप्त!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
Manoryachya uttaranche negation karanyachi idea awadali. Mhanaje logical reasoning karata thavuk hote.
Pan kathet asa vapar awadala.
Ekun prashnahi awadale. Happy

जबरदस्त कथा!!!
अचाट कल्पनाशक्ती ...!!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

ही कथा लिहिताना प्रचंड वेळ गेला, मध्येमध्ये मीच confused झालो, पण, शेवटी झाली.
या कथेचं एक खूप मोठं unedited version आहे, बऱ्याच गोष्टी फिल्टर करून हे व्हर्जन तयार झालं.
ही कथा Lebrynth च्या Two door problem वर बेतलेली आहे, पण याची मूळ प्रेरणा जीए कुलकर्णी यांची प्रवासी ही कथा आहे.
यक्षप्रश्न नंतर मुसाफिर लिहिताना मस्त वाटलं. किंबहुना अशा गोष्टी डोक्याला प्रचंड खुराक देतात. मजा वाटते. अचाट कल्पनाशक्तीचे अफाट प्रयोग, दुसरं काय Lol
असे नवीन प्रयोग सगळ्यांना आवडतील अशी आशा आहे. धन्यवाद!!!

मस्तच, फारच वेगळी.. तुमच्या डोक्यात मोक्ष आणि मोहन चा धुडगूस चालू असताना अचानक मुसाफिर typical अज्ञात touch घेऊन येतो.. असे typical अज्ञातवासी वाचायला आवडतं.. आवडेल