बाजार..

Submitted by सांज on 18 December, 2020 - 07:27

माणसंच माणसं आहेत. चोहीकडे. कुणी गाडीत कुणी गाडीवर कुणी पायांवर.. चित्र सरकतय नुसतं डोळ्यासमोरून. इथे स्थिर असं काहीचं नाही का? कोणी चालतंय कोणी धावतंय कोणी चाहूल घेतंय. गाडे, वस्तू, दुकानं, काचा, माणसं, गर्दी, इच्छा, आकांक्षा, हौस, पोट, भूक, पैसा.. किती काय काय आहे इथं! हे पायाखालचे रस्ते थकत नाहीत का अव्याहत या साऱ्याचं ओझं वाहून.
कोणी स्वप्नं रंगवत जातंय, कोणी नोटा मोजतंय, कोणी चातका सारखी गिऱ्हाईकाची वाट पाहतंय! मध्येच एखादी भाजीवाली, एखादा फळवाला ऊन्हात, लेकरांची भूक कंठात घेऊन भाज्या-फळांची नावं घोकत पूढे जाताहेत. दात कोरत एखादा म्हातारा उगाचच गर्दी तोंडी लाऊन निघून जातोय. कोपऱ्यातल्या मंदिरासमोर मळकट कपडे ल्यालेला कोणी धडधाकट माणूस हातात याचना आणि डोळ्यात निलाजरेपणा घेऊन बसून आहे ओल्या घशाची स्वप्नं पहात.
कोणी बॅगाच्या बॅगा गाडीत कोंबतय, कोणी महिन्याचा हिशोब डोळ्यांसमोर ठेऊन अर्ध्याऐवजी पावच किलो भाजी घेतंय. आकर्षक काचांपलिकडच्या रंगी-बेरंगी कपड्यांची स्वप्नं पाहत एखादं पोर आईचा हात धरुन गाड्यावरचं चड्डी-बनियन घेऊन शांतपणे चालतंय.
टोपलीतल्या वस्तूंकडे पाहत कोणी अडाणी बोहारीण रात्रीच्या तेला-मीठाचा प्रश्न सुटेल काय याची गणितं मांडत बसलीये. दुकानातल्या वस्तू निपचितपणे ‘व्यवहार’ पहात पडून आहेत त्यांच्या त्यांच्या जागी. त्या मोठ्या मंदिराच्या आतला देव मात्र हे साऽरं निर्विकारपणे पाहत बसलाय नैवेद्याभिषेकांची, नवसाच्या नारळांची नोंद ठेवत!
हा बाजार रोज असाचं फुलतो, मावळतो. स्वप्नं मांडतो, गोळा करतो. घामाच्या सड्यात नाहतो, पैशांची रांगोळी रेखतो. वस्तू विकतो, माणसं जगवतो, डोळे दिपवतो.. महिनोन्महिने, वर्षानुवर्षे, शतकानुशतके चालतंच राहतो न थांबता!

~ सांज

https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users