सर्वेषाम् अविरोधेन

Submitted by चैतन्य दीक्षित on 13 December, 2020 - 12:01

कोणत्याही पूजा, जप, यज्ञादि अनुष्ठानात 'आसनशुद्धी' नावाचा एक विधी/ उपचार असतो. त्यात, ज्या ठिकाणी पूजाविधी होतोय त्या स्थळाची शुद्धी कल्पिलेली असते. त्या जोडीला, त्या भूमीवरील भूत-पिशाच्चादींपासून त्रास न होता, ती भूते दूर निघून जावोत, सर्व दिशांपासून त्या स्थळाचं रक्षण होवो आणि अशा प्रकारे 'सर्वेषाम् अविरोधेन'... कुणाचाही विरोध न होता, 'यज्ञकर्म समारभे' मी यज्ञ (किंवा जे कार्य असेल ते) सुरू करतो, अशा अर्थाचे मंत्र येतात. कोणत्याही शुभकार्यात विघ्ने येऊ नयेत अशी कामना करणे, विघ्नकर गोष्टींचा बंदोबस्त करणं आणि मग ते कार्य सुरू करणं असा हा क्रम. या सर्वेषाम् मध्ये स्वत:ला मोजायला मात्र विसरून चालणार नाही.
आपण स्वतःच आपल्या वाटेत नकळत उभे असतो कधी कधी. आपला आपल्याला असलेला विरोध अनेक प्रकारांचा असतो. आणि हा विरोध प्रत्येक वेळी काही शुभ कार्य करतानाच असतो असं नाही. एरवीही आपण आपल्या विरोधात असतो. ते इतकं नकळत होतं की नीट लक्ष दिल्याशिवाय उमगत नाही. या विरोधाच्या भुतातलं मुख्य भूत असतं 'भूत'. भूत म्हणजे होऊन गेलेले. या भूतात गुंतुन पडलो तर आपण आपल्याच विरोधात उभे असल्यासारखे असतो. भूतकाळातल्या चांगल्या आठवणी असतील तर हरकत नाही, पण नकोशा आठवणी असतील तर त्या खर्‍या भुतासारख्या मानगुटीवर बसतात, किंबहुना आपण बसवून घेतो. 'गतं न शोच्यं' (म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीबद्दल खेद मानू नये) हे ऐकून माहीत असतं पण कळूनही वळत नाहीत काही गोष्टी. मग सुरू होतात हिशेब. कोण, कोणाशी, कधी, कसं वागलं? काय बोललं? पुढे जायचं असेल तर अशी भुतासारखी पावलं उलटी ठेवून उपयोग नाही. मग झालेले अपमान सोडून द्यायचे? आपल्याला मिळालेल्या वाईट वागणुकीचा बदला घ्यायचा नाही?
नाही! अपमान सोडून द्यायचे नाहीत, पण ते पुन्हा पुन्हा जगतही बसायचे नाहीत. प्रयत्नपूर्वक त्या घटनांकडे तटस्थ होऊन बघायचं. त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा जगायची मनाला सवय लागणार नाही. त्यामुळे आपण स्वतःबद्दल कोणतेही नकारात्मक विचार करणार नाही, स्वतःला कसलंही लेबल लावणार नाही. त्रयस्थपणामुळे, त्या दुसर्‍या व्यक्तीलाही आपण कोणतंच लेबल न लावता कदाचित बघू शकू. अगदीच गेला बाजार, इथून पुढे आपण कसं वागायचं हे आपल्याशी 'कोणतेही ग्रजेस न ठेवता' पक्कं करू शकू.
भूतकाळाचं हे भूत प्रत्येक वेळी आपल्या झालेल्या अपमानाचंच असेल असंही नाही. क्वचित आपल्याकडूनही काही चूक, आगळीक घडलेली असू शकते आणि ते अपराधीभावाचं भूत आपल्याला छळत असेल. याही भूताचा 'अविरोध' असायला हवा. याही भूताकडे त्रयस्थपणे पाहणं, ती घटना पुन्हा पुन्हा न जगणं, त्या एका/ एखाद्या घटनेमुळे स्वतःला कायमचं नकारात्मक लेबल लावून न घेणं हे 'अविरोधाचे' काही मार्ग. दुसर्‍याला माफ करणं एक वेळ जमण्यासारखं असतं, पण स्वतःला माफ करणं कधी कधी अवघड जातं. पण जितके आपण स्वतःला आरोपीच्याच पिंजर्‍यात उभे ठेवू तितकेच आपण हळू हळू इतरांनाही आरोपीच्या पिंजर्‍यातच उभे करत जायची शक्यता कैक पटींनी वाढते. त्यामुळे स्वतःला माफ करणं, किमान स्वतःला माफ करायची इच्छा बाळगणं खूप आवश्यक होतं. इच्छा असली की मार्गही मिळतातच.
हे सगळं करायचं ते 'स्वतःसाठी' ! सगळ्यांसारखाच आपल्यालाही २४ च तासांचा दिवस मिळतो. आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कशी वापरायची हे आपणच ठरवायला हवं. आपलं मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, शरीर स्वस्थ तर मन बिनधास्त, आणि मन बिनधास्त की कुठलंही काम मस्त!

चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Use group defaults

मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, शरीर स्वस्थ तर मन बिनधास्त, आणि मन बिनधास्त की कुठलंही काम मस्त! >>> सत्यवचन

खूप छान. मनाला वाईट गोष्टी 'उगाळत' बसण्याची खोडच असते. 'मेडिटेशन/ध्यानात' एक टेक्निक असेही आहे की त्रयस्थ दॄष्टीने स्वतःच्या विचारांकडे पहा. म्हणजे मग आपल्याला सल, शल्य बोचत नाही.