मराठी ते मल्याळम व्हाया कोंकणी!

Submitted by दिनेशG on 26 November, 2020 - 19:19

भारतातील कोणती भाषा शिकण्यासाठी सर्वात कठीण आहे? उत्तर अर्थात 'मल्याळम' आहे. जागतिक स्तरावर मँडरीन चायनीज नंतर शिकण्याच्या दृष्टीने सर्वात कठीण भाषेमध्ये दुसरा नंबर मल्याळमचा लागतो. आपण भारतीय लोक बहुभाषिक असलो तरी देवनागरीतुन द्रविडी भाषेकडे वळताना आपल्याला सुद्धा खूप सारे कष्ट घ्यावे लागतात.

देवनागरी आणि द्रविडी भाषेचा संगम कुठे होत असेल तर तो ‘कोंकणी’ भाषेमध्ये. गोव्यात देवनागरीत लिहिली जाणारी कोंकणी कारवार- मंगरुळू पट्ट्यात गेली की कन्नड लिपीत लिहिली जाते! दोन वेगवेगळ्या लिपी मध्ये लिहिली जाणारी भारतातील ही एकमेव भाषा असेल. मला गोव्याकडाची कोंकणी येत असल्याने तिचा दक्षिणेकडील प्रवास अनुभवायला मजा येते. केरळ मध्ये स्थलांतरित झालेल्या कोंकणी लोकांनी तर त्यात मल्याळम भाषेतील शब्द सुद्धा वापरात आणलेत.

केरळ मध्ये एक वर्ष उच्चशिक्षणासाठी राहूनही मला मल्याळममधले अंदाजे दिडशे दोनशे शब्दच येतात. कुठलीही भाषा थोडी फार कामचलाऊ बोलायला यायला हवी असेल तर ३०० ते ६०० शब्द यायला हवेत असे म्हणतात. पहिल्यांदाच कालिकत रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर NIT कॅम्पस ला जाणारी बस कुठली हे कळल्यावर सगळ्यात प्रथम मी त्या बसचा बोर्ड वाचायला शिकलो! मल्याळम वाचण्याचा आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता. खरेतर सुरुवातीला भाषा शिकण्यासाठी मुळाक्षरे आणि व्याकरण शिकणे मुळीच गरजेचे नसते किंबहुना संभाषणातून भाषा पटकन शिकता येते. पण नंतर जास्त प्रगती करायची असेल तर मात्र लिहायला वाचायला शिकणे खूप उपयुक्त ठरते. पण आजपर्यंत लिहिण्यापर्यंत काही मजल गेलेली नाही! केरळ मध्ये प्रवास करताना किंवा एकटा बाजारात खरेदी करायला गेलो तर अडत नाही! अर्थात कॉलेज च्या दिवसांमध्ये कॅम्पस सोडून बाहेरच्या जगाशी संबंध कमीच येत असल्याने तेथील भाषा शिकणे तसे कमीच होते.खाण्याची प्रचंड आवड असल्याने सर्व पदार्थांची आणि मुख्यत्वेकरून सर्व प्रकारच्या माशांची नावे मात्र एकदम पटकन शिकलो!

खूपसे साध्यर्म नसणाऱ्या तीन पेक्षा जास्त भाषा बोलू शकणाऱ्या व्यक्तींचे मला पहिल्यापासून कौतुक वाटत आलेय. पाच सहा भाषा येणारी व्यक्ती एखादी भाषा बोलत असताना तिच्या बोलण्यात दुसऱ्या भाषेतील शब्द येत असेल का? काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कार मेकॅनिकशी कोंकणीत बोलता बोलता चुकून एक मल्याळम शब्द बोलून गेलो. नंतर माझ्या लक्षात आले की हा कोंकणी नसून मल्याळम शब्द आहे! मला वाटते जे बहुभाषिक असतात त्यांच्या बाबतीतही हे असे होत असावे! मल्याळम आणि कोंकणी भाषा बोलताना होणाऱ्या जबड्याच्या आणि जिभेच्या हालचालींमध्ये खूपशी समानता पण आहे असे मला वाटते. शिवाय पोर्तुगीज भाषेचा प्रभाव अगदी थोड्या प्रमाणात का होईना दोन्ही भाषांवर आहे. उदा. जनेल- खिडकी अलमारी- कपाट, मेज - टेबल इत्यादी शब्द दोन्ही भाषांमध्ये येतात.

आजकाल युट्युब आणि गुगल ट्रान्सलेटर मुळे कोणतीही भाषा जुजबी स्तरावर शिकणे सोपे झालेय. युट्युब वर एक जगातील विविध भाषांमधील समान शब्द शोधणारे चॅनल खूप लोकप्रिय आहे. त्यात अँकर दोन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना दोन्ही भाषांमधील साध्यर्म असणारे शब्द देतो. एका व्यक्तीने बोललेल्या शब्दाचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीने आपल्या भाषेत काय होतो ते सांगायचे असते. बहुतेक वेळा आपणच आश्चर्यचकित होतो की इतरवेळी दुरान्वये ही संबंध नसणाऱ्या भाषांमधील शब्दांमध्ये किती समानता आहे.

जगभर पसरलेल्या मल्याळी लोकांमुळे इंटरनेट वर कितीतरी मल्याळम शिकण्याचे पर्याय मला आढळून आले. Eliza Keyton ही सध्या दुबईला राहणारी अमेरिकन युवती आहे. एक अमेरिकन व्यक्ती मल्याळम किती सहजतेने बोलू शकते आणि इतकेच नाही तर युट्यूब वर मल्याळम भाषा शिकविण्याचा स्वतःचे चॅनल सुरू करते ते पहायचे असेल तर युट्युब वर ‘Elikutty’ सर्च करा. कदाचित आपणाला पण ती शिकाविशी वाटेल, विशेषतः आखाती देशांत रहात असाल तर!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख.
पण काही गोष्टी सत्य पडताळुन लिहिल्या असत्या तर चांगले झाले असते.

भारतातील कोणती भाषा शिकण्यासाठी सर्वात कठीण आहे? उत्तर अर्थात 'मल्याळम' आहे.
>>
are you sure? on what basis? who decides this?

आपण भारतीय लोक बहुभाषिक असलो तरी देवनागरीतुन द्रविडी भाषेकडे वळताना आपल्याला सुद्धा खूप सारे कष्ट घ्यावे लागतात
देवनागरी आणि द्रविडी भाषेचा संगम कुठे होत असेल तर तो ‘कोंकणी’ भाषेमध्ये.
>>
देवनागरी ही भाषा नसुन लिपी आहे. तुम्हाला ईन्डो आर्यन व द्रविडी भाषा असे म्हणायचे असेल.
तसेच हा जो संगम आहे तो खरेतर महाराष्ट्री पाकृत पासुन सुरु होतो, ज्यात कोकणीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली मराठी आधी येते. त्यामुळे हा संगम मराठीत होतो, कोकणीमधे नाही.

गोव्यात देवनागरीत लिहिली जाणारी कोंकणी कारवार- मंगरुळू पट्ट्यात गेली की कन्नड लिपीत लिहिली जाते! दोन वेगवेगळ्या लिपी मध्ये लिहिली जाणारी भारतातील ही एकमेव भाषा असेल.
>>
ऐतिहासीक काळापासुन भारतातील अनेक मुख्य प्रवाहातल्या भाषा एकापेक्षा जास्त लिपीमधे लिहिल्या जात होत्या . यात मराठी, तामीळही येते.
कोकणी अधिकृतरीत्या दोन लिपीमधे लिहीली जात नाही. मंगळुरुतली कोकणी गोव्यापेक्षा बरीच वेगळी आहे व तीला कर्नाटकात अधिकॄत मान्यता नाही.

मराठी देवनागरी व्यतिरिक्त अन्य कोणत्या लिपीतुन लिहली जाते? whatsapp वरचे इंग्रजीतुन लिहिलेले मराठी वगळुन.

मराठी देवनागरी व्यतिरिक्त अन्य कोणत्या लिपीतुन लिहली जाते?
>>
ऐतिहासीक काळापासुन भारतातील अनेक मुख्य प्रवाहातल्या भाषा एकापेक्षा जास्त लिपीमधे लिहिल्या जात होत्या
कोकणी अधिकृतरीत्या दोन लिपीमधे लिहीली जात नाही.

do you see any difference in highlighted words? do you think they might mean something different than what you understood?

कोणत्याही भाषेला भाषांतराच्या माध्यमातून शिकण्याचा पर्याय वापरावा लागतो तो गूगलने सोपा केला आहेच. लहान मुले बघून, ऐकून शिकतात त्यामुळे चांगली शिकतात.

गोव्यातील कोकणी देवनागरी,कन्नडा आणि रोमन तीन लिपींंत लिहितात.

मलयालमचे उच्चार कळले की सोपी आहे कारण सत्तर टक्के संस्कृत शब्द आहेत. शोधिक्युक.

do you see any difference in highlighted words? do you think they might mean something different than what you understood?>> धन्यवाद.

मराठी देवनागरी व्यतिरिक्त अन्य कोणत्या लिपीतुन लिहली जाते? >>>
मोडी?
ही लिपी मोडीत निघाल्ये ते जाऊद्या पण मराठीची प्रचलित लिपी मोडीच होती म्हणे