प्राण समिधा

Submitted by चंदन सोनाये on 26 November, 2020 - 13:21

जाहलो बंदी तुझा, होऊन विश्वासघात,
परी न समज मला तू शरणागत,
ठेव म्यानेत घालुन तू शस्त्र,
उभा तुज पुढे हा हिंदू राजपुत्र...

सळसळती माझे हे अजस्त्र बाहू,
लाव्हा बनुनी वाहे आज माझे लहू,
भीती मरण्याची कोणा दाखविशी,
तुझा सामना आहे आज सिंहाशी...

अडकवती का मला हे साखळदंड,
गर्जनेने होतील माझ्या छिन्न विच्छिन्न,
काय बसवशिल रे मजवर पहारा,
स्वराज्याचा मी तर जळता निखारा..

काय घाबरेल मी ज्वालांनी,
धकधकतोय माझ्यातच धर्माग्नी,
करिता अंगावर वार शस्त्रांचे,
उडतील त्यातून कारंजे स्वधर्माचे...

काढशील डोळे माझे, देशील यम यातना,
परी न माहीत तुला, माझ्या धैर्याची सीमा,
कधी न बदलणार मी धर्म आपला,
हिंदू राहून मरण्यातच गर्व मजला...

काया करून माझी बेचिराख,
धुमसेल ही स्वाभिमानी राख,
कण कण देतील ग्वाही, पेटवूनी आसमंत,
अर्पिली समिधा मी प्राणाची, या धर्म यज्ञात...

Group content visibility: 
Use group defaults