भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडीनला लवकर बरे वाटू दे. ओडीन एरव्ही किती निरागस वाटतो तर आजारपणात त्याच्याकडे पाहून किती वाईट वाटत असेल. मला तर त्याचा चेहरा इमॅजिन करूनच गलबलून आलं.
त्याची खुशाली कळवत रहा आशूचॅम्प. आणि लवकर त्याचे नवीन किस्से पण येऊ देत. ओडिनचे किस्से स्ट्रेस बस्टर असतात.

आमच्या सिंबा बोक्याला एक विचित्र आवड होती - प्लास्टिक wrappers ना lick करायची. बिस्किटाचा डबा उघडला की त्याला आवाज यायचाच आणि जिथे कुठे असेल घरात तिथून पळत पळत यायचा!

सर्वात प्रेमळपणे माझ्या मुलीशी वागायचा तो. त्याची लहान बहीण होती ना ती! त्यामुळे तिला काहीही करू द्यायचा. तिचा पण त्याच्यावर फार जीव.

अरेच्या, मला वाटले गेट टुगेदर चे अपडेट आले की काय. ओडिन ला लवकर बरे वाटू देत! बिचारा, ताप , व्हेट विजिट आणि इन्जेक्शन. किती हाल!
बरे वाटले की हसरा फोटो येऊ द्या एक Happy

सर्वांचे आभार

ओडीन एरव्ही किती निरागस वाटतो तर आजारपणात त्याच्याकडे पाहून किती वाईट वाटत असेल. मला तर त्याचा चेहरा इमॅजिन करूनच गलबलून आलं>>>>
अगदी अगदी हेच होतंय
एरवी तो दंगा करत असतो
टीव्ही बघू देत नाही, खेळ म्हणत असतो तेव्हा त्याला रागावतो की जरा स्वस्थ बस पाहू, आता बाळ इतकं मलूल होऊन पडलंय की खेळ मस्ती कर मी अजिबात ओरडणार नाही असं म्हणतोय

जिना चढून आला तरी धाप लागत आहे बिचाऱ्याला

तरीही मांजर आलं की जातोच, आणि एकदाच भो करून येतो
मी म्हणलं राहू दे काही दिवस आलं तरी चालेल मांजर पण नाहीच

इंजेक्शन ची जागा चांगलीच दुखत आहे, मी त्याला पडल्या पडल्या थोपटून माया करत होतो तर मांडीला हात लागताच कळवळून ओरडला आणि पटकन हात धरला तोंडात माझा
म्हणलं अरे काय झालं मग लक्षात आलं, एकदम कळ गेली असेल डोक्यात

ओड्या, नालायका लवकर बरा हो सगळेच मिस करताय बघ तुला नी तुझ्या नवनवीन खोड्यांना. गेट वेल सुन :))

व्हेटला विचारून बर्फाने शेका>>>>

व्हेटला नाही विचारलं पण मीच घरी आईस पॅक होता त्याने शेकलं

आज अगदीच त्रासलाय, उठताना बसताना पण त्याला दुखतयं हे दिसतयं

मग जाऊन आज त्याच्या आवडीचा खाऊ, काही वेगळ्या ट्रीट्स, च्युस्टीक्स वगैरे घेऊन आलो.

गोळ्या अजिबात घेत नाही, कितीही खाण्यात लपवून दिल्या तरी बरोबर वास येतो त्याला आणि जिभेने बाजूला सारून बाकीचे खातो. बाऊलमध्ये फक्त गोळ्या उरलेल्या असतात.

मग तोंड उघडून गोळी घाला घशात, तोंड दाबा, नाकावर फुंकर मारा असले प्रकार करायला लावतो. त्यातही आता गालफडात गोळी लपवायला शिकलाय. आपण तोंड सोडलं की हळूच कडेने बाहेर काढून टाकून देतो. त्यामुळे गोळ्या दिल्यावर पुढची काही मिनिटे पूर्ण लक्ष ठेवावं लागतं की पोटातच गेल्यात गोळ्या

दूधात विरघळवुन द्या किंवा पाण्यात घालून.>>>>

तोंड पण लावत नाही तो मग, तसा बसून राहतो

सिरप पाजणे हेही त्रासदायक, सिरिंज असते त्यात भरून तोंड जबरदस्ती उघडून, अशा वेळी तो सुळे घट्ट दाबून ठेवतो की त्याची अशी क्रॉस पकड बसते की उघडताच येत नाही. मग दाढेच्या इथून फट शोधून जबडा उचकटून मग त्यात ती सिंरींज मोकळी करावी लागते. त्यात तो सिरिंज चावणार नाही हे बघून पटकन बाहेर काढावी लागते....

बाकी माझं पोर अगदी गुणाचं आहे पण मनाविरुद्ध त्याला औषध देणे म्हणजे महाकठीण काम

मध्ये एक सिरप होतं ते गोड होतं, ते वाटीत घालून दिलं तरी मिटक्या मारत चाटून संपवायचा

धागा ( आणि मायबोलीही) वेळ होईल तसा वाचते.
@आशुचॅंप,
ओडिनचं आजारपण वाचून वाईट वाटलं.
गोळ्यांचं वाचून अगदी अगदी झालं. स्नोसुद्धा गोळी गालात , जिभेवर मागे ठेवून देतो. लगेच बाहेर टाकत नाही. फार हुशार असतात हे प्राणी! थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या / तिसऱ्या दिवशी कुठे तरी सोफ्याच्या कडेला , भिंतीच्या कडेला मग ती गोळी सापडते. यावर उपाय म्हणून कधी गोळी द्यायची वेळ आलीच तर गोळीची पावडर करून पीनट बटर मध्ये मिक्स करून चाटवतो. पीनट बटर त्याला प्रचंड आवडते. तो आणि आम्ही दोघेही खुश! गोळी भरडायचं crusher इथे फार्मसीत मिळतं.
ओडीनला आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा!
( अवांतर :ओडीन डायरी लिहिली नाही का बरेच दिवसात. वेळ झाला कि नक्की लिहा बरं .
अतिअवांतर: स्नोसुद्धा नुकत्याच एका दिव्यातून गेला. रस्त्यावर फिरवताना समोरून, अश्याच एका त्याच्या मालकिणीबरोबर फिरायला येणाऱ्या कुत्र्याने ध्यानीमनी नसताना त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या चेहऱ्यावर दात रोवून त्याला जखमी केलं. डोळा वाचला पण रक्ताची धार लागली. आता स्नो ठीक आहे Happy इतर भू भू पालकांना अशा प्रकारचा प्रसंग अचानक ओढवू शकतो याची कल्पना असावी म्हणून इथे लिहिलं. )

<<<कुत्र्याने ध्यानीमनी नसताना त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या चेहऱ्यावर दात रोवून त्याला जखमी केलं. डोळा वाचला पण रक्ताची धार लागली. >>>
अरे बापरे... बरेच सोपस्कार करावे लागले असतील ना... बिचारा... त्याला एक warm hug माझ्याकडून.

सिरप पाजणे हेही त्रासदायक, सिरिंज असते त्यात भरून तोंड जबरदस्ती उघडून, अशा वेळी तो सुळे घट्ट दाबून ठेवतो की त्याची अशी क्रॉस पकड बसते की उघडताच येत नाही. मग दाढेच्या इथून फट शोधून जबडा उचकटून मग त्यात ती सिंरींज मोकळी करावी लागते. त्यात तो सिरिंज चावणार नाही हे बघून पटकन बाहेर काढावी लागते.... <<<>>>>>> अगदी. औषध पाजणे हे फार कठीण काम आहे. आमच्या मांजरुला आधीच कळायचं आम्ही औषध देणार ते. हातातच यायचा नाही.

ओडीनला लवकर बरे वाटेल.

कुत्र्याने ध्यानीमनी नसताना त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या चेहऱ्यावर दात रोवून त्याला जखमी केलं. डोळा वाचला पण रक्ताची धार लागली>>>>बापरे
वाचूनचनकसे तरी झालं, बिच्चारा
जाम घाबरून गेला असेल, बरा झालाय वाचून छान वाटलं

आणि बटर च्या आयडिया साठी धन्यवाद
मी लगेच घेऊन आलो आणि गोळ्या क्रश करून त्यात मिक्स करून दिल्या
पण त्या कावळ्याला बरोबर वास आला
नकोच म्हणून तोंड बंद केलं
मी मग तोंड उघडून चक्क ती पेस्ट दाताल तोंडाला लावली
मग खाल्ली चाटून

कालच्या डोस नंतर आज रिकव्हरी होताना दिसत आहे
सकाळीच शेपटी हलवण्याचा स्पीड वरून अंदाज आला
गडी नॉर्मल होऊ लागला आहे
चिकन भाकरी खाली मस्त आणि झोपला
अजून विकनेस आहे पण होईल लवकरच बरा असे दिसतंय

सगळ्यांनाच्या सदिच्छा पोचल्या

मला दडपणच आलेलं म्हणून मी काही लिहिले नाही. बट प्रेइन्ग फॉर स्पीडि रिकव्हरी. तोंडावर चावणे हा दोन मेल कुत्र्यांमधला सुपिरिअरिटी दाखवण्याचा प्रकार आहे. नाहीतर कान चावुन तुकडाच काढतात. हा सभ्य असल्याने अ‍ॅग्रेसिव कुत्र्याशी कसे वागावे समजले नसेल.

अरे वा, ओडिन बेटर आहे का आता, चला छान झालं! औषध भरवणे खरंच कसरत असते. आमच्याकडे पिल पॉकेट मोस्टली काम करते. पण लिक्विड औषध असेल तर महा अवघड. हल्ली मला एक टिक्निक जमले आहे बर्‍यापैकी. बोटाने लिक्विड किंवा पेस्टी औषधाचा चा लम्प त्याच्या नाकाच्या जस्ट खाली आणि ओठाच्या वर लावायचा , त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते चटकन चाटतात तो, नको असला तरी! मग लगेच अजून पुढचा थेंब असे करत ४-५ वेळा दिले की साधारण अर्धा पाउण चमचा औषध जाते पोटात. Happy

ओडिन बरा होतोय वाचून बरं वाटलं, औषध देणं अवघड आहे हे अगदी खरंय.ओडिनला फ्लिज आणि टिक प्रेव्हेंटीव्ह गोळी/ इंजेक्शन देवूनही असा त्रास झाला का ?

धन्यवाद धनवन्ती.
हो, काय झालं हे लक्षात आल्यावर दोन्ही भू भूंच्या मालकांची तारांबळ, जरा गडबड - धावपळ, Vet कडे धाव असे सगळे एपिसोड झाले. सुदैवाने चावऱ्या भू भूच्या मालकिणीने सर्वांना टॅक्सीत घालून Vet Emergency Care मध्ये नेण्यापासून स्नोच्या औषधोपचाराचा सगळा खर्च स्वतः पुढाकार घेऊन उचलण्यापर्यंत पूर्ण सहकार्य केले. चावऱ्या भू भू चं रेकॉर्ड खराब झाल्याचं त्याच्या मालकिणीला थोडं वाईट वाटलं. तिच्या सांगण्यानुसार तो तोपर्यंत कोणाला चावला नव्हता.

इथे सगळे भू भू registered ( नोंदणीकृत ?) असतात त्यामुळे अश्या प्रकारच्या तक्रारीची Vet कडे रीतसर आणि कायमस्वरूपी नोंद होते. मला याविषयी फार माहिती नाही.

हो अमा. आमचं भू भू बाळ गुणी आणि सभ्य Happy आहे. तरी असा मार खाल्ल्यामुळे त्याला कळो न कळो आम्ही आता यावरून त्याची बरीच थट्टा करतो.
@ आशुचॅंप,
अर्र, पीनट बटर आवडत नाही का ओडीनला ? दही आवडत असेल तर त्यातूनही चालेल. तब्येतीत सुधारणा आहे हे छानच झालं. स्नोसुद्धा पाण्यातून / दुधातून मुळीच औषध घेत नाही आणि पिल पॉकेट खाऊन गोळी हळूच कुठे तरी टाकून देतो!
या बाळांना एकत्र आणलं तर गुणांबरोबर वाण पण लागेल बहुतेक! एकेकाच्या तऱ्हा आहेत ! Lol

आई म्हणे, त्याला शरीराला प्रोटिन हवं आहे हे कसं कळलं बघ. म्हणलं उगाच कौतुक, त्याला चिकन आवडतं हे खरे कारण आहे.>>> आजिच प्रेम << हो त्याने नुसती भाकरी खाल्ली असती तर आज्जी म्हणाली असती, आजार्पणात चिकन पचणार नाही हे कसं कळलं बघ. हाहा

<< हो त्याने नुसती भाकरी खाल्ली असती तर आज्जी म्हणाली असती, आजार्पणात चिकन पचणार नाही हे कसं कळलं बघ. हाहा

Submitted by अदिति on 2 August, 2022 - 00:18 >>>>>>>>>>>>मस्तच!!!!

सगळ्या आजारी पेशंट्सना : - गेट वेल सून & बिग हग.

पेस्टी औषधाचा चा लम्प त्याच्या नाकाच्या जस्ट खाली आणि ओठाच्या वर लावायचा>>> हा ही पण भारी आयडिया आहे Happy

अर्र, पीनट बटर आवडत नाही का ओडीनला ?>>> आवडलं आहे पण त्याला गोळीचा, औषधाचा वास येतोच बरोबर.
चिकन भाकरी खाऊ लागल्याने आता सिरप चा प्रश्न मिटला, फूड तयार करून त्यावर टॉप अप करायचं सिरप की झालं

त्याने नुसती भाकरी खाल्ली असती तर आज्जी म्हणाली असती, आजार्पणात चिकन पचणार नाही हे कसं कळलं बघ. हाहा>>>>
अगदी अगदी
नुसते लाड आणि कौतुक करून घेतोय

ओडिनला फ्लिज आणि टिक प्रेव्हेंटीव्ह गोळी/ इंजेक्शन देवूनही असा त्रास झाला का ?>>>
हो ना, त्याला ती 800 रु वाली गोळी दिली होती म्हणून मी निवांत होतो
गेले सहा आठ महिने एक टिक नव्हती अंगावर
आणि कहर म्हणजे जेव्हा टिक्स असायच्या तेव्हा कधी नाही आला फिव्हर

Pages