गादी

Submitted by निखिल मोडक on 7 November, 2020 - 05:32

फराच्या की कापसाच्या
आपल्या नाजूक विळख्यात
गादी घट्ट मिटून घेते
आपल्या मालकाला

दिवसाच्या एका निवांत
विचारशून्य क्षणाची सोबतीण
घट्ट करीत राहते आपले पाश
गडद होत जाणाऱ्या काळोखासोबत

किती क्षणांचे उष्ण उसासे
अस्फुटशा हास्याचे किती हुंदके
फुटलेल्या स्वप्नांचे बिलोरी किणकिणाट
उन्मत्त कामाचे किती हुंकार
ती कानात ऐकवीत घट्ट
मिटून घेते आपल्या मालकाला
आपल्या नाजूक फराच्या की कापसाच्या मिठीत

एखाद्यास झालाच जागृतीचा दंश
तर तो उठून बसतो तिच्यावर
मालक होतो तख्तनशी जरिकाठाच्या आज्ञेचा

ती मात्र उद्दन्ड अशी की
रात्रीच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर
ती अलगद घेते त्याला मिठीत
त्याचा विश्वामित्र करण्यासाठी

बाकीचे मात्र तसेच नित्य
सामावत राहतात तिच्या मिठीत
तख्तनशी जरिकाठाच्या आज्ञेची
वा विश्वामित्र होण्याची स्वप्ने पाहत

कालपुरुषाच्या एका धक्क्याने मात्र
हे सारे तख्तनशी, हे सारे विश्वामित्र
हे सारे भंगल्या स्वप्नांच्या
बिलोरी तुकड्याचे मानकरी
वार्धक्याने विसविशीत झालेल्या
आपल्या देहाने दास होतात
ह्या आपल्या नित्याच्या दासीचे

ती ही बेसावधपणे जखडून टाकते
आपल्या नाजूक फराच्या की कापसाच्या मिठीत
त्याच्या आणि तिच्या खऱ्या मालकाच्या,
कालपुरुषाच्या, ह्या विच्छिन्न देहाच्या दासाला

© निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults

चांगली आहे.
शेवटच्या कडव्याचा अर्थ थोडा अधिक स्पष्ट व्हायला हवा होता. एरवी संदिग्धता आणि धूसरतेत रम्यता वाटते, अर्थाचे अनेक पर्याय शोधावेसे वाटतात. इथे तसे नाही वाटले.

Ok! थोडेसे स्पष्ट करायचा प्रयत्न करतो! त्यात विचार असा आहे की आपण ज्या गादीला दासी मानत असतो ती खरेतर आपल्या सारखीच काळाची दासी असते. त्या काळाचे कार्यवहन करण्याचे मात्र एक माध्यम. तिच्या मिठीत आपल्या आयुष्याचा बराच काळ आपण घालवतो निव्वळ तिला आपली दासी मानून. पण अगदी शेवटी कळते की ती आपली कधीच नव्हती ती आता फक्त आपल्याला जखडून ठेवणार जोवर काळाचा कार्यभाग साधत नाही तोवर.