घरटे

Submitted by निखिल मोडक on 6 November, 2020 - 03:44

एक एक काडी जमवी
चिमणी बांधी घरटे
थोडे न काही जरा मोठे
नाही जरासे खुरटे

ऊब ठेवी त्यात थोडी
ठेवी थोडी ममता
वाकड्या तिकड्या
काड्यात ठेवी जपून
देखणी वत्सलता

एका एका क्षणासाठी
एक एक काडी
गुंफलेल्या कालपटात ती
इवले अवकाश जोडी

पिल्लू तिचे क्षणासाठी
त्यात थोडे राही
इवल्या त्या घरट्यातली
ऊब पांघरून घेई

एका एका क्षणाचे
तेही पंख जोडून घेई
थांग घेण्या क्षितिजाचा
इवले पंख पसरी

मागे राहती घरट्यात
रोज गायिलेली गीते
आणि दोन चिमण्यांची
अथांग वत्सलता उरते

©निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults